डॉ. श्रीकलांना खूप आश्चर्य वाटत होते. नखातही रोग नसलेली श्रेया, मे महिन्यात आनंदाने भेटलेली ही मुलगी दीड महिन्यात इतकी खंगली? कशाने?..

डॉ. श्रीकला त्यांच्या शाहुपुरीतील क्लिनिकमध्ये जरा लगबगीनेच आल्या. बरोबर नऊ वाजता सकाळी त्या त्यांच्या क्लिनिकमध्ये येत. आजच जरा उशीर झाला. कारण सकाळची मान्यांच्या घरची ‘होम व्हिजिट’ बरीच लांबली. श्रेयाला झोपेचे इंजेक्शन देऊन, राहीबाईंना औषधांची यादी देऊन, मग त्या क्लिनिकला आल्या.

पाऊस पडत होता आणि सुट्टीचा दिवस नव्हता. त्यामुळे रुग्णांची फारशी गर्दी नव्हती. अपॉइंटमेंट घेतलेले रुग्ण तपासले आणि क्लिनिकची वेळ संपण्यापूर्वीच त्या परत निघाल्या. ते थेट मान्यांच्या घरी आल्या. आल्या आल्या त्या थेट श्रेयाच्या बेडपाशी गेल्या. श्रेया अर्धवट ग्लानीत होती. चेहरा लालेलाल आणि वेदनेने डवरलेला.. छाती धपापत होती आणि तिच्या कण्हण्याचा आवाज शांततेत अस्वस्थता आणत होता. पंधरा वर्षांची नवतरुण, रसरशीत श्रेया, कोल्हापूर जिल्ह्य़ातून नेमबाजीत पहिली येऊन, महाराष्ट्राच्या टीममध्ये निवडली गेलेली होती, हीच ती श्रेया, यावरती

डॉ. श्रीकलांचा सुद्धा विश्वास बसत नव्हता. मे महिन्यांच्या सुट्टीत टीममध्ये निवडली गेल्याच्या आनंदात श्रेया, तिची आजी राहीबाई आणि आजोबा बजाबा, त्यांच्या राधानगरीच्या शेतातली आंब्याची पेटी घेऊन आले होते. श्रेयाचे सर्वत्र कौतुक होत होते. नेमबाजी करतानाचे फोटो झळकत होते. आपल्या मुला-सुनेच्या माघारी मोठय़ा केलेल्या नातीने, त्यांना यश दिले होते. ‘डॉक्टर, हे तुमच्यामुळे बरं का.. गेल्या पावसाळ्याने मला किती दमवले होते. वाटत होतं, कधी हा पाऊस संपेल आणि मी ताप-खोकला आणि जीवघेण्या त्रासातून सुटेन.. पण डॉक्टर तुमची औषधे आणि पाऊस एकदमच संपला.. माझा त्रास थांबला. ज्युनिअर कॉलेज आणि नेमबाजीची प्रॅक्टिस एकदमच सुरू झाली..’ श्रेयाने त्यांना वाकून नमस्कार केला..

‘आता नाही ना भीती आजाराची?’राहीबाईंनी विचारलं.  ‘नाही राहीबाई’ श्रेयाच्या सर्व तपासण्या झाल्या. त्या अगदी नॉर्मलच नाहीत, तर परफेक्ट आहेत. अहो, हिचे वय लहान आहे.. उत्तम खेळाडू आहे. तुमच्या राधानगरीच्या शेतातल्या भाज्या फळांचा उत्तम आहार आहे. आजाराचे भय कशाला? गेल्या पावसाळ्यातला आजार हा अपघात धरा..’ डॉ. श्रीकलांना हे स्पष्ट आठवत होते आणि खूप आश्चर्य वाटत होते. नखातही रोग नसलेली श्रेया, मे महिन्यात आनंदाने भेटलेली ही मुलगी दीड महिन्यात इतकी खंगली? कशाने? खाशाबा- राहीबाईंचे मंगळवार पेठेतले घर स्वच्छ, नेटके, खिडक्यांना सर्वत्र जाळ्या बसवलेल्या. संसर्गाची शक्यता विरळाच होती. म्हणून दोन दिवसांपूर्वीच श्रीकलांनी फिरून एकदा रक्ताच्या तपासण्या करवून घेतल्या. कुठेही बाह्य़ संसर्ग झालेला नव्हता. तरीही श्रेयाचा ताप आणि श्वासाचा त्रास थांबत नव्हता. अण्टिबायोटिक्सना शह देऊन दमा बळावतच होता. राहीबाईंच्या शुश्रूषेत कमतरता नव्हती..

डॉक्टर श्रीकलांनी स्मरणाला आवाहन दिले. ओळीने तिसऱ्या वर्षी जूनअखेरीस अथवा जुलैच्या सुरुवातीस नेमक्या याच काळात श्रेयाचा आजार बळावत होता. एरवी श्रेया कधीही रुग्ण म्हणून आली नव्हती. तिची आजी राहीबाई आणि आजोबा बजाबा, पाच वर्षांपूर्वी श्रेयाच्या शिक्षण आणि नेमबाजीसाठी, राधानगरीची शेती कुळांवर सोपवून, कायमचे कोल्हापुरात वास्तव्यास आले. तेव्हापासून ते डॉ. श्रीकलांना ओळखत होते. श्रेया त्यांची नात.. राधानगरीतल्या अफाट पावसात वर्षांनुवर्षे गेलेली. त्यामुळे श्रेयाला पावसाळा झेपत नाही, असे असूच शकत नाही!

डॉ. श्रीकला एम.डी. होत्या. धन्वंतरी म्हणून त्यांचा लौकिक होता. श्रेयाची केस त्यांनी आव्हान म्हणून घेण्याचे ठरवले. ‘राहीबाई, हा पावसाळाभर श्रेयाला मी माझ्या घरीच राहायला नेते. चालेल ना?’

..श्रीकलांनी श्रेयाच्या छातीला स्टेथास्कोप लावला. अर्धवट ग्लानीतल्या श्रेयाने त्यांचा हात घट्ट धरला.. ‘‘आई, घे ना मला तुझ्यापाशी.. किती दिवस झाले.. तू झोपलेलीच.. सारखी रडतेस.. आजीच सगळे पाहते.. म्हणते ‘पावसाळा बाधलाय’.. पाऊस गेला की सुधारेल तुझी तब्येत.. आई गं ए आई..’’ श्रेयाचा आवाज थांबला. डोळे मिटले.. श्रीकलांना वाटले तापात भास होतात, कोणाकोणाला.. त्यांनी तिला इंजेक्शन दिले.. चार दिवसांनी परत तसेच.. ‘‘आई, आजी म्हणते सुनेला टी.बी. आहे. तिला कोल्हापूरला हलवायला हवंय.. कशाला? दवाखान्यात ठेवणार?’’

डॉ. श्रीकलांना अशा बोलण्यातून एक धागा मिळाला. त्यांनी मानसशास्त्राच्या डॉक्टर स्नेहा अवचटांना घरी बोलावले आणि श्रेयाची केस सांगितली. ‘‘होय, डॉक्टर श्रीकला, नेमका हाच सुमार.. पाऊस जोरात येणारा.. त्याच काळात उफाळणारा दमा.. औषधांचा उपयोग नसणं आणि एरवीची अत्यंत निरोगी प्रकृती.. आजाराचे धागे मनाशी गुंतलेले वाटतात.’’

रविवारी त्यांनी डॉ. स्नेहांना,  राहीबाई आणि बजाबांना बोलावले. राहीबाई सांगू लागल्या, ‘‘आम्ही राधानगरीत होतो. श्रेया सहा-साडेसहा वर्षांची होती. तिची आई वसुधा नाजूक प्रकृतीची. पावसाळ्यात तिला श्वास लागायचा.. कधी ताप धरायचा.. राधानगरीतले डॉक्टर औषध देत. आम्हीही तिला सांभाळून घेत होतो. पण त्या पावसाळ्यात ती पार खंगली.. कोल्हापूरला गाडी करून नेली.. श्रेया लहान म्हणून मी घरीच राहिले. अ‍ॅम्ब्युलन्स आली.. बाहेर धो धो पाऊस पडत होता. श्रेया आईचा हात सोडत नव्हती. मला घेऊन चल म्हणून रडत होती. वसुधेचा जीव पार हलका झालेला. डॉक्टरताई, श्रेयानी आईला गाडीत चढवताना पाहिले.. ते शेवटचेच.. पुढे अंत्यसंस्कार माहेरीच.. कोल्हापुरातच..’’ राहीबाईंना अश्रू आवरेनात.

‘‘ताई, सूनबाई गेली. तिचे दिवस झाले. वसंता, श्रेयाचा बाबा, राधानगरीला परत आला. उदास.. हरवेला.. डॉक्टरांना बायकोची तब्येत दाखवायला उशीर झाला, म्हणून हळहळणारा.. अशात आषाढी आली. ‘पांडुरंगाला जाऊन येतो. वारीला जातो..’ म्हणत श्रेयाला जवळ घेतली. ‘येतो पोरी’ म्हणून निरोप घेऊन गेला. तो तिकडे चंद्रभागेचाच झाला. आम्ही दोघं पोरीसाठी जगत गेलो. तीही आता अशी.. पावसात दुखणं काढणारी..’’ श्रीकलांनी बजाबांना शांत केले.  ‘‘श्रेया बरी होणार.. तुम्ही नातजावई पाहणार आणि श्रेयाचे नेमबाजीतले यशही..’’

डॉक्टर श्रीकला आणि डॉक्टर स्नेहा, दोघीही सज्ज झाल्या.. नाना औषधे.. आहार, व्यायाम, गौरी गणपती सरल्या, पाऊस उघडला आणि आस्ते आस्ते श्रेयाची तब्येत सुधारू लागली.

‘‘डॉक्टर श्रीकला, ही केस आपल्या दोघींनाही आव्हान होती.. आहे.. श्रेयाचा आजार फक्त आणि फक्त पावसाळ्यातच बळावतो, याची मूळं तिच्या मनात आहेत. पाऊस आणि बालपणातल्या अप्रिय घटना यांची मनात निरगाठ बसली आहे.. श्रेया लहान.. भर पावसात अ‍ॅम्ब्युलन्समधून परगावी गेलेली आई.. तीही परत न आलेली.. फिरून त्याच पावसाळ्यात तिचा निरोप घेऊन पंढरपूरला गेलेला बाप.. तोही परत न येण्यासाठी.. तिच्या मनाने या पावसाचे भय घेतले आहे. लहानपणी मन अबोध असते. वाढत्या वयात जाणिवा नेणिवा विकसित होतात. पावसाळ्यात आपली आई गेली, वडील गेले, याचा तिच्या अंतर्मनात धसका बसला आहे, ती भीती. मग शरीर दुखण्यात रूपांतरित होते. श्रेयाचेही तसेच झाले आहे.’’ डॉ. स्नेहा म्हणाल्या.

‘‘मग आता यापुढे?’’

‘‘मी माझे मानसशास्त्रीय कौशल्य पणाला लावेन.. औषधोपचार तुमचे.. पण श्रेयाच्या मनातील पाऊस आणि मृत्यू हे भय मी नक्की घालवेन.. झाल्या घटना या घडणाऱ्या होत्या.. त्याचा पावसाशी संबंध नाही. तो एक अपघात होता. हे तिला पटवीन.. पुढच्या पावसाळ्याला अद्याप खूप अवकाश आहे. आपल्या हातात वेळ आहे. राहीबाई, विश्वास ठेवा आमच्यावर..’’ डॉ. स्नेहा म्हणाल्या.

जून महिन्याची अखेर.. कोल्हापूरचे रेल्वे स्टेशन. उमदी, हसरी श्रेया प्रशिक्षणासाठी दिल्लीला निघाली होती. तिला निरोप द्यायला डॉ. श्रीकला,

डॉ. स्नेहा, राहीबाई, बजाबा, तिचे मित्र-मैत्रिणी आले होते. श्रेया रेल्वेच्या डब्यात शिरली.. बाहेर पाऊस सुरू झाला आणि श्रेया खिडकीतून दोन्ही हात बाहेर काढून पावसाच्या सरी आनंदाने झेलत होती.. हसत होती..

शरीर आणि मनाचे घट्ट नाते डॉ. श्रीकलांना फिरून नव्याने उमगले आणि त्यांनी श्रेयाकडे पाहून आनंदाने निरोपाचा हात हलवला..

डॉ. सुवर्णा दिवेकर drsuvarnadivekar@gmail.com