23 November 2017

News Flash

गार्गी

कुलकर्णी कुटुंब आमच्या शेजारी थोडय़ाच दिवसांत राहायला आलं. नवराबायको आणि एक-दीड वर्षांची छोटी गार्गी.

Updated: August 26, 2017 2:20 AM

छोटी गार्गी

कुलकर्णी कुटुंब आमच्या शेजारी थोडय़ाच दिवसांत राहायला आलं. नवराबायको आणि एक-दीड वर्षांची छोटी गार्गी. छोटी गार्गी माझ्या पत्नीला- रेखाला ‘ननन्’ अशी हाक मारून पहिल्या भेटीतच बिलगली, पूर्वीची कोणतीही ओळखपाळख नसताना!

जन्मत:च नातलगांचा गोतावळा घेऊनच सगळ्यांचा या जगात प्रवेश होतो. पुढे या गोतावळ्यात वाढ होत जाते, दोनाचे चार झाल्यावर. अशा आपसूक निर्माण झालेल्या नात्यांना पर्याय नसतो. निवडीचे स्वातंत्र्य नसलेल्या नातेसंबंधांची जपणूक मात्र करावी लागते. शेजारपाजाऱ्यांशी जमलेलं नातं मात्र वेगळं असतं.

एकाच घरात चार दशकं राहिल्यानंतर इमारतीच्या पुनर्विकासामुळे आम्हाला काही काळासाठी का होईना, पण घर बदलावं लागलं. नवीन ठिकाणी शेजारी कोण असेल याबद्दल उत्सुकता अर्थातच होती. आमच्या मजल्यावर आणखी दोन फ्लॅट होते. आमच्या अगदी बाजूच्या जागेत नुकतंच विवाह झालेलं जोडपं होतं. नोकरीनिमित्त दोघंही दिवसभर बाहेरच असायची, तर सुटय़ांच्या वारी नातलग, मित्रमैत्रिणी यांच्या भेटीगाठीत बिझी असायची, तर दुसरा फ्लॅट आमच्यासारख्याच तात्पुरत्या भाडेकरूच्या प्रतीक्षेत रिकामा होता. कुलकर्णी कुटुंब आमच्या शेजारी थोडय़ाच दिवसांत राहायला आलं. नवराबायको आणि एक-दीड वर्षांची छोटी गार्गी. नव्या जागेत आल्याच्या दुसऱ्याच दिवशी गार्गीची आई- जान्हवी काही विचारायला आमच्याकडे आली अन् आमच्या घरात आल्या-आल्याच छोटी गार्गी माझ्या पत्नीला- रेखाला ‘ननन्’ अशी हाक मारून पहिल्या भेटीतच बिलगली, पूर्वीची कोणतीही ओळखपाळख नसताना! तिच्या लाघवी बिलगण्यानं आम्ही सर्वच क्षणभर आश्चर्यचकित झालो. आमच्याकडे येतायेता ‘‘शेजारच्या काकूंकडे जाऊ या’’ असं जान्हवीच्या पुटपुटण्यातला ‘काकू’साठीचा ‘ननन्’ हा गार्गीनं तिला उच्चारता येईल असा शब्द योजला असावा. त्यानंतरच्या काही दिवसांतच गार्गीच्या निरागस लडिवाळपणात हळूहळू पण अलगद गुरफटायला झालं आणि नवं शेजार आमचं सख्खं शेजार कधी बनलं ते समजलंच नाही.

पहिल्या भेटीतच तिने रेखाचा प्रेमळ, मायाळू स्वभाव जोखला असावा, कारण त्यानंतर गार्गी सातत्याने आमच्या घरी येऊ  लागली. आमच्याकडे येण्यासाठी आईजवळ हट्ट धरू लागली.आमच्या घरातला तिचा वावरदेखील सहज होऊ  लागला, आमच्या घरातलीच एक असल्यासारखा. परकेपणाचा, नवखेपणाचा लवलेश नसलेला. खेळणी ठेवायची कोपऱ्यातली जागा ठरवणे, तिला हवा असलेला कोणताही खाऊ  खाणाखुणा करून हक्काने आणि हट्टाने मागणं, शू केल्यानंतर कोणीही सांगायच्या आत तांब्याने बाथरूममध्ये धडाधड पाणी ओतणे हे तिच्या ननन्बरोबर होत असलेल्या घट्ट जवळिकेचे टप्पे होते.

बऱ्याचदा खूप हाका मारूनही आमच्या घरचा मुक्काम गार्गी सहजासहजी हलवीत नसे. मग तिला परत घरी आणण्याच्या मोहिमेवर कॉलेजात जाणारा गार्गीचा काका अन्या येत असे आणि गार्गीला सरळ उचलून घेऊन जात असे. कधी कधी गार्गीला चिडवण्याच्या निमित्ताने ‘‘अन्या अन्या ये आणि गार्गीला घेऊन जा,’’ असं म्हटल्याबरोबर मानेला जोरात हिसडा देऊन जोरात ‘‘नाही’’ म्हणून गार्गी ननन्ला बिलगत असे. दररोज संध्याकाळी इमारतीच्या आवारात लहानग्यांचा खेळ रंगत असे. सवंगडय़ांबरोबर रंगलेल्या खेळात गार्गीचादेखील सहभाग असेच, पण त्याचबरोबर बाहेर पडताना ननन् दृष्टीला पडलीच तर बरोबरच्या सवंगडय़ांसोबत रंगात आलेला खेळ झटक्यात सोडून देऊन ननन्बरोबर फिरायला जाण्याचा हट्ट धरत असे, एवढेच नव्हे तर आईबाबांबरोबर फिरायला बाहेर पडलेल्या गार्गीला ननन् रस्त्यात चुकून जरी दिसली

तरी तिला बिलगण्यात आणि ननन्बरोबर फिरायला जाण्यात तिला विलक्षण आनंद वाटत असे. गार्गी-ननन्मध्ये असलेल्या अशा या जगावेगळ्या नात्याला गतजन्मीचे ऋणानुबंध असं सर्वच म्हणत असत.

दीड वर्षांची गार्गी फक्त चार-पाच शब्दच बोलत असे. कितीही प्रयत्न केले तरी गार्गीची शब्दोच्चारांची गाडी चार-पाच शब्दांपलीकडे गेली नाही. ननन्चा प्रयत्न होता तिने तिला ‘काकू’ अशी हाक मारावी म्हणून. ‘काकू’ म्हणायला सांगितलं तर खटय़ाळपणे ओठांचा चंबू करून मुद्दाम ‘‘नूनून’’ असं म्हणायची. ‘काकू’ अशी हाक न मारण्यातला तिला होणारा आनंद तिच्या डोळ्यातल्या मिश्कील भावातून व्यक्त व्हायचा. शब्द उच्चारण्यात काही अडचण असावी असंही वाटत नव्हतं, कारण तिच्यापेक्षा वयानं लहान असलेल्या एका सवंगडय़ाला, आर्यनला खेळण्याची वेळ झाल्यावर गार्गी सुरात हाकाटय़ा मारीत असे. उच्चारदेखील स्वच्छ अन् स्पष्ट! कोणीही न शिकवता केलेले. ‘आर्यन’सारखा कठीण शब्द अगदी सहजपणे उच्चारणाऱ्या गार्गीला स्वत:चं नाव सोडून द्या, पण काका, मामासारखे सोपे शब्ददेखील बोलता न येणं हे एक आश्चर्यच होतं. गार्गीचं लांबत चाललेलं बोलणं ही तिच्या आईला- जान्हवीला एक काळजीच होती.

काही महिन्यांतच आमचा मुक्काम हलण्याचा दिवस नक्की झाला. त्याच दरम्यान गार्गीच्या कुटुंबाचंही घर सोडण्याचं पक्कं झालं; पण आमच्या आधी दोन दिवस.

जाण्याच्या एक दिवस आधी गार्गी सकाळीच आली तीच मुळी डोळ्यात मिश्कील भाव घेऊन. पहिल्यांदा रेखाला नेहमीप्रमाणे पण हळूच हाक मारली ‘ननन्’ अशी. एक छोटा श्वास घेऊन पुन्हा हाक मारली ‘‘तातू’’! अन् त्यानंतर दिवसभर ‘तातूचा’ गजरच तिने लावला. गार्गीच्या बोलण्यात झालेल्या प्रगतीचा हा सुखद पुढचा टप्पा तर नव्हता? काय चाललं असेल तिच्या मनात? दुसऱ्याच दिवशी ननन्बरोबर कायमची ताटातूट होणार हे तिला कळलं असेल?

जाण्याच्या दिवशी गार्गीच्या घरच्यांची सामानाची बांधाबांध आटोपली. सर्व सामान आवरून निघायची वेळ आली. गार्गीची आई जान्हवी आमच्याकडे निरोप घ्यायला आली. थोडं निरोपाचं बोलणं झाल्यावर मागून हळूहळू चालत गार्गी आली. चालण्यात ना नेहमीचा जोर होता ना उत्साह. चेहरा थोडासा म्लान झालेला अन् करुण भाव असलेली नजर.

काही बोलायच्या आत ननन्चे कान ऐकायला आतुर असलेली ‘‘काकू’’ अशी हाक स्पष्टपणे मारून गार्गी रेखाला बिलगली. पुढच्या आयुष्यात अशा भेटीगाठी होतील याची शक्यता कमीच होती. ननन्चा होणारा कायमचा वियोग तिला नक्की जाणवला होता. ‘काकू’ म्हणून गार्गीने मारलेली हाक रेखासाठी जन्मांतरीच्या नातेबंधाचं देणं होतं; विसरता न येण्याजोगं!

प्र.अ. जोशी pajoshi51@hotmail.com

First Published on August 26, 2017 2:20 am

Web Title: one and half year old small gargi