समोरच्या डोहात निळ्याभोर आकाशाचं प्रतििबब पडलं होतं. त्यामुळे त्या उन्हावल्या सकाळी.. अवघा डोहच निळाईनं व्यापून गेला होता. त्याच निळ्या पाण्यात लाल, पिवळ्या, तांबूस, किरमिजी, करडय़ा आणि हिरव्या रंगांच्या असंख्य छटांनी रंगलेलं उलटं चित्रं उमटलं होतं. इथं शिशिराच्या येण्यानं सुरू झालेला रंगोत्सव पाहात होते..
रात्रभर पाऊस पडत होता, त्यामुळे गारठा कमालीचा वाढला होता..आता एडमंटनमध्ये थंडीची चाहूल लागायला लागली होती..घरातील हीटर चालू करावे लागणार होते. थंडीमुळे की काय कोण जाणे, आज नेहमीपेक्षा लवकरच जाग आली.. पण बाहेरचा रिमझिम पाऊस आणि प्रचंड गारठा यामुळे आजही फिरायला बाहेर पडता येणार नाही असं वाटत होतं.. मन नाराज झालं..

कॅनडामधील एडमंटन शहरात आल्यापासून गेले काही दिवस जवळच असणाऱ्या ‘व्हाईट मड पार्क’ या जंगलात फिरायला जायची सवय झाली होती. माझ्यासाठी फिरणं हाच काय तो विरंगुळा होता. नाही तर उभा दिवस आ वासल्यागत समोर उभा ठाकायचा. नातू डे केअरमधून संध्याकाळी येईपर्यंत मी आपली एकटीच. माशा माराव्यात तर त्याही नसतात इकडे! त्यामुळे गारठा असला तरी लपेटून घेत बाहेर पडलं की मन गुंतून जायचं. तसंही वूडमध्ये जाऊन १५ दिवस होऊन गेले होते. कारण येथूनच ह्य़ुस्टनला लेकीकडे जाऊन आले होते. पण परत आल्यापासून वूडसला भेटणं जमलं नव्हतं. खरं तर मनाला ओढ लागून राहिली होती. वैतागले आणि कॉफीचा मोठा मग घेऊन बसून राहिले. बोलायलासुद्धा कुणी नव्हतं. स्काईपवर भारतात कुणाशी बोलावं तर जो तो बिझी!

काय करावं या विचारात होते. पाऊस थांबला होता. अचानक ढगातल्या फटीतून आलेल्या सोनेरी सूर्यप्रकाशानं अवघं आसमंत व्यापून गेलं. मग मात्र लगबगीनं तयार झाले. अंगभर कपडे, उबदार स्वेटर, त्यावर टोपी असलेलं जॅकेट घालून बाहेर पडले. कारण ऊन पडलं असलं तरी हवेतील गारठा तसाच राहाणार होता. पाऊस पडून गेल्यामुळे सारं कसं छान प्रसन्न वाटत होतं. तसंही इथल्या स्वच्छ हवेत धूळ नावालाही नसतेच. आज हवा अधिकच शुद्ध वाटत होती. झपझप चालत व्हाईट मड पार्कच्या रस्त्यावर पोहोचलेसुद्धा. डाव्या बाजूला जंगलाची हद्द सुरू झाली होती. शहराच्या मध्यावर असले तरी व्हाईट मडचे हे जंगल एकदम घनदाट आहे. इथला ‘फॉल’ आताशी कुठं सुरू होतोय म्हणे. झाडांचे रंग बदलायला सुरवात झाली होती. पाईनचे उंच वृक्ष हारीने उभे होते. त्यांना ‘फॉल’चे नियम लागू होत नाहीत हे इथं अनुभवत होते! जंगलातील बाकीच्या झाडांची पाने कधीपासून रंग बदलू लागली होती. हिरव्यागार पानांनी कधी पोपटी रंग ल्यायला सुरुवात केली ते उमजलंच नाही. हळूहळू पोपटी रंगाची छटा बदलून पानं पिवळ्या रंगात माखू लागली. बघता बघता अवघी झाडं सुवर्णागत झळाळणाऱ्या पिवळ्याधमक रंगात रंगून जायला लागली. काही झाडांची पानं लालबुंद, तांबूस, मरून अशा रंगात रंगून गेली. जिकडं पाहावं तिकडं हिरव्या रंगाच्या जोडीला लाल पिवळ्या रंगात रंगलेल्या पानांमुळे झाडं चक्क गोजिरवाणी दिसायला लागली. हे सगळंच माझ्यासाठी अनोखं होतं. आता इकडं येऊन दोन महिने होऊन गेले होते. आता भारतातल्या गजबजाटाची आठवण यायला लागली होती. तिकडच्या आठवणींमुळं मन उदासायला लागलं होतं! पण या मड पार्कच्या सहवासामुळे माझं एकटेपण सुसह्य़ होत होतं.

जिवलगाला भेटायची ओढ लागावी तशी या जंगलाच्या ओढीनं माझी पावलं झपझप पडत होती. पार्किंग लॉटमध्ये एक दोन कार उभ्या होत्या. अजून म्हणावी तशी वर्दळ सुरू झाली नव्हती. मी उतारावरून जंगलाची पायवाट उतरायला सुरुवात केली. जंगलाची निरवता अजूनही तशीच होती. हवेतील गारठय़ामुळे जंगलाच्या आतमध्ये, झाडांच्या सभोवताली धुक्याचा एक तरल, अलवारसा कोष तयार झालाय असं वाटत होतं. लहान आकाराच्या टेकडय़ांनी वेढलेल्या मड पार्काच्या आत घनदाट वृक्षराजीमुळे सूर्याची किरणं अद्यापही पोहोचली नव्हती. त्यामुळे गूढरम्य सावल्यांमधूनच पिवळ्याधमक रंगांत सळसळणाऱ्या शेलटय़ा बांध्याच्या वृक्षांचा नकळत हेवा वाटून गेला. उंचच्या उंच बर्च आणि पाईनच्या शेंडय़ांवर कधीचीच किरणं रेंगाळून राहिली होती. इथल्या आकाशाचा रंगही अप्रूप वाटावं इतका गडद निळा असतो. त्या निळाईच्या पाश्र्वभूमीवर मड पार्कच्या सौंदर्याचे वर्णन करायचं तर, कुणीतरी हिरवागार शालू नेसलेला असावा, त्याला लाल रंगाचा जरीकाठी भरजरी पदर असावा वर जरीच्या बुंदक्यांची अंगभर नक्षी असावी असं काहीसं वाटत होतं.
बाकी पार्क अजूनही निवांत होता.
पार्काच्या मधून वाहणाऱ्या ओढय़ातील पाणी बऱ्यापकी वाढलं होतं. इथल्या पावसाला पाऊस तरी कसं म्हणावं! आकाशभर ढगांची गर्दी होते, मात्र उगी थेंब थेंब पडत राहातो. मात्र तापमान एवढं कमी होतं की कपडय़ांचे तीन तीन थर घालूनच बाहेर पडावं लागतं. उत्तर ध्रुवाजवळच्या आर्टक्टि प्रदेशाला खेटून असलेलं हे शहर. सहा महिने खच्चून बर्फ असतं म्हणे. बर्फ पडायला सुरुवात होईल तेव्हा मी आपल्या उबदार देशात परतलेली असेन. कालच्या पावसामुळे अजूनही झाडांच्या पानांवर ओठंगलेल्या थेंबांची नक्षी दिसत होती. ओढय़ातील पाण्यावर बर्फाची साय तयार झालेली होती.

थंडीमुळे की काय अजून पक्ष्यांचा चिवचिवाटही सुरू झाला नव्हता. पण एकदा का उन्हं वर चढली की सगळे तालासुरात गायला सुरुवात करतात हे अनुभवानं ठाऊक होतं. त्यातही इथला देखणा निळा जय अगदी कर्कश आवाजात ओरडत राहातो. बाकी इथल्या चिकाडय़ा भारी गोड आहेत. पार्कात येणाऱ्या लहानग्यांनी खाऊ द्यायची सवय लावल्यामुळे बिनधास्त अवतीभवती फिरत राहतात. त्यांचा आणि खारकुंडय़ांचाच आवाज असतो जंगलात. ओढय़ावरचा पहिला लाकडी ब्रीज ओलांडून गेल्यानंतर पाईनच्या मोठाल्या वृक्षांची घनदाट झाडी सुरू होते. याच्या शेंडय़ावरच्या पानांवर नक्षीदार पाईन कोन घोसांनी लटकत असतात. लालसर तांबूस रंगांच्या खारुकल्या कुरतडून कुरतडून या पाईन कोनांचा सडा पाडून ठेवतात वाटेवर. हिरवेगार पाईन कोन छान रसाळ आणि लुसलुशीत असतात. बर्फ पडण्यापूर्वी या पाईन कोनांची बेगमी करून ठेवतात म्हणे या खारी त्यांच्या बिळांमध्ये. मड पार्काला खास पाईनचा गंध आहे. जसं प्रत्येक जंगलाला स्वतच रूप असतं, तसा खास गंधही असतो. मला आता या आगळ्यावेगळ्या गंधाची सवय झाली होती. पाईनचा उग्र गंध नाकाशी रेंगाळत राहिला.

पार्कात नागमोडी वळणं घेत वाहणाऱ्या ओढय़ावर चार ठिकाणी लाकडी पूल आहेत. एकापुढे एक हे पूल ओलांडत जंगलाच्या पायवाटेवरून चालताना मी एकटीच होते. पायवाटेवर आता पानांचा सडा पडायला सुरुवात झाली होती. लाल पिवळ्या पानांनी नटलेल्या वृक्षांच्या कमानीखालून चालताना असं वाटलं, या नव्या नवलाईच्या जगात मी पाहुणी आलीय. ‘एलिस इन वंडरलँड’ झाले होते मी.. अमेरिका, कॅनडा या देशांतील फॉल्सचं वर्णन ऐकलं होतं खरं, पण हा अनोखा रंगोत्सव मी या मड पार्कच्या जंगलात अनुभवत होते. किती विविध छटांमध्ये रंगलं होतं हे पानांचं वैभव! जंगलाच्या आत झाडीमध्ये जाणाऱ्या असंख्य पायवाटा इथं तिथं खुणावत राहतात. मला या पायवाटांवर रेंगाळत भटकायची सवय झाली होती. अशाच एका पायवाटेनं चालत पुढे जाऊन ओढय़ाच्या काठावर उतरले. आता सोनेरी उन्हं अवघ्या जंगलात उतरली होती. खऱ्या अर्थानं सोनेरी होती ही किरणं. त्यात उन्हाचा चटका नव्हता. मी ओढय़ाच्या काठाशी माझ्या नेहमीच्या ठिकाणी बसून राहिले. एक अनवट निरामयता होती अवतीभवती. फक्त झुळझुळणाऱ्या ओढय़ाचा मंद स्वर ऐकू येत होता. मला ती निस्तब्धता हवीहवीशी वाटत होती. तो अनाहत नाद अलगद वेचून घ्यावा मनानं असं वाटत होतं. एकीकडं भारतातील गर्दी, गजबजाट आणि गोंगाट पुनश्च ऐकायला आतुरले होते मनातून. पण कॅनडातील थंडीमध्ये त्या उन्हावल्या सकाळी निसर्गाच्या त्या देखण्या वैभवाला बघून मन आश्वासलं होतं. हाकेच्या अंतरावर हे वैभव नसतं तर या परक्या देशात मी कसे श्वास घेतले असते? मला ठाऊक होतं, माझ्या मनाची घुसमट मला सोसली नसती. समोरच्या डोहात निळ्याभोर आकाशाचं प्रतििबब पडलं होतं. त्यामुळे अवघा डोहच निळाईनं व्यापून गेला होता. त्याच निळ्या पाण्यात लाल, पिवळ्या, तांबूस, किरमिजी, करडय़ा आणि हिरव्या रंगांच्या असंख्य छटांनी रंगलेलं उलटं चित्रं उमटलं होतं. आपल्याकडे वसंताच्या येण्यानं रंगोत्सव साजरा होताना पाहतोच की आपण! पण इथं शिशिराच्या येण्यानं सुरू झालेला रंगोत्सव पाहत होते.

‘इजंट इट ब्युटिफुल..!’ मी भावसमाधीतून जागं होतं बाजूला उभ्या स्त्रीकडे पाहिलं.. ती माझ्याकडे पाहत हसून विचारीत होती.
‘सुंदर आहे ना हे सगळं?’
‘खरंच खूप सुंदर आहे. मला तर हे सगळंच नवीन आहे,’ मी हसूनच प्रतिसाद दिला. गंमत म्हणजे कॅनडातील लोकं आपणहून हसतात, बोलतात. इथं माणसांचीच वानवा आहे म्हणा!
किती तरी वेळ तिथेच बसून होते. उन्हं झेलत. अचानक क्लीरऽऽक्लीर असं चीत्कारत डोक्यावरून पक्षी उडाला. तशी ताडकन उठले. माझा अंदाज बरोबर होता. समोरच्या सुकलेल्या झाडाच्या शेंडय़ावर सुतार पक्षी येऊन बसला होता. मस्त लालबुंद तुरा डोक्यावर घेऊन मिरवणारा. मागच्या वेळी दिसला तेव्हा अगदी जवळून बघितला होता. टकटक करीत झाडाच्या बुंध्यावर चोच बडवीत कितीतरी वेळ माझ्या अस्तित्वाला नाकारीत आपल्याच विश्वात दंग राहिला होता. नेमका माझा कॅमेरा नव्हता त्या दिवशी. दुसरे दिवशी त्याला टिपायचेच या तयारीनिशी गेले. टेली बिली घेऊन पण याचा मागमूसच नव्हता उभ्या जंगलात. छान हुलकावणी दिली त्यानं. पुन्हा कधी दिसेल की नाही असं वाटत होतं. आज मात्र सुयोग जुळून आला. हा कॅनेडीयन वुडपेकर आकारानं कावळ्यासारखा मोठा दिसतो, पण डोक्यावरची लाल टोपी मात्र अगदी खासच! जोडी होती.. इकडून तिकडे टकटक करीत फुदकत राहिला पण मिळाला! त्यामुळे दिवस पदरात पडल्यासारखे झाले. मस्त गाणं गुणगुणावं असं वाटत होतं. ऐकायला फक्त वृक्षवल्लरी सोयरीच होती! एव्हाना बराच वेळ झाला होता. पण मला घरी परतायची घाई नव्हतीच. संध्याकाळी सहापर्यंत कुण्णी नव्हतं बोलायला. त्यानंतर नातू आणि मी. रेंगाळतच परतायला सुरुवात केली. आता जंगलातील पायवाटेवर वर्दळ वाढली होती. आपापल्या छोटुकल्या मोटुकल्या कुत्र्यांना घेऊन मंडळी फिरायला येऊ लागली होती. एका ठिकाणी सूचना फलक पाहायला मिळाला. पांढऱ्याशुभ्र कागदावर सुंदर अक्षरांमध्ये लिहले होते..

‘लग्न लागत आहे..प्लीज शांतता राखा..’ आश्चर्यच वाटले. कारण जाताना हा सूचना फलक तिथे नव्हता. थोडेसे पुढे आल्यावर बघतच राहिले. पाईनच्या घनदाट वृक्षराजीमध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर लहानसा सोहळा चालू होता. पांढराशुभ्र लांब फ्रॉक आणि झिरमिरीत ओढणीमध्ये नटलेली सुंदर तरुणी आणि गडद निळ्या रंगाच्या संपूर्ण सुटाबुटामध्ये अगदी उठून दिसणारा तरुण एकमेकासमोर उभे होते. जवळच फादर हातात बायबल घेऊन उभे होते. सभोवताली अगदी मोजकीच मंडळी होती. अडीच तीन वर्षांचा सोनुकला बाजूलाच उभा होता. आपल्या आईबाबांच्या लग्नात स्वारी नटून थटून ऐटीत उभी होती. फार फार तर २०-२२ लोक उपस्थित होते. मीसुद्धा निशंकपणे एका झाडाआड उभी राहिले. कारण माझ्या दृष्टीने तो सोहळा म्हणजे अपूर्वाईच होती. सकाळच्या त्या रम्य प्रहरी, पाईन वृक्षांच्या गर्द झाडीत, अलगद झिरपणाऱ्या सोनेरी किरणांच्या साक्षीने, अगदी बोटावर मोजता येतील इतक्याच प्रियजनांच्या साक्षीने लग्नाच्या आणाभाका घेणाऱ्या त्या प्रेमी युगुलाचं मला मनापासून कौतुक वाटलं. किती सुंदर कल्पना! ना बडेजाव ना पशांची उधळपट्टी, ना आमंत्रितांचा गोंधळ. फक्त मनापासून हवे असणारे प्रियजन आणि त्यांचे आशीर्वाद. पाश्र्वभूमीवर उपस्थित असणारा, खऱ्या अर्थानं सर्जनाचा संदेश देणारा देखणा निसर्ग.. अहाहा.. आणखीन काय हवं.. हा अनुपम सोहळा पाहून मनात आलं, आपल्याकडची लग्नं कधीतरी अशा पद्धतीनं साजरी होतील का? त्या सुंदर सोहळ्याचं कौतुक मनात साठवतच मी पुढे निघाले..

मी रमतगमत थोडं फार चालून गेले असेन तोच, नवरा-नवरी पाठीमागून येताना दिसले. पाठोपाठ बहुधा त्याचे किंवा तिचे आईवडील बाळाला घेऊन आले. वऱ्हाडी मंडळी लगोलग येतच होती. सगळेजण आपापल्या गाडय़ात बसून वाटेलाही लागले. एक सुंदर सोहळा कसा आटोपशीरपणे झाला होता. नवलच वाटत राहिलं. मस्त सूर्यप्रकाशात अवघा परिसर न्हाऊन निघाला होता. आदल्या दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण होतं. रात्री पावसाची रिपरिप होती. तरीही लग्न सोहळा आनंदात पार पडला होता. कारण इथं आठ आठ दिवसांचे हवामानाचे अंदाज मोबाइलवर आधीच पाहायला मिळतात. ते अगदी बिनचूक असतात हे मात्र नक्की!
मी माझा कॅमेरा सांभाळीत घराकडे चालू लागले. सुतार पक्षी मिळाला होता.. लग्न लागलं होतं.. फॉल्सचे रंगबिरंगी फोटोही मिळाले होते.. दिवस सार्थकी लागल्याचं समाधान लाभलं होतं.

– राधिका टिपरे