07 July 2020

News Flash

पिठलं.. आणि तोंड मिटलं

कुळथाचं पीठ करण्यासाठी त्याची डाळ करावी लागते.

खरं हुकमाचं पान म्हणजे कुळथाचं पिठलं, जे पानात वाढलं की पान खरोखर भरून जातं. पिठलं वाटीबिटीत वाढणं आणि ते चमच्याने खाणं हा पिठल्याचा महान अपमान आहे. त्याची जागा पानात उजवीकडेच. आमच्याकडे कुळथाचं पिठलं सगळ्यांना आवडतं. अगदी रोज खाऊनही त्याचा कंटाळा येत नाही. या पिठलं प्रेमावरूनच माझ्या एका सासूबाईंनी म्हणच तयार केली आहे, ‘‘पिठलं.. आणि तोंड मिटलं.’’

कोकणात आमच्याकडे पावसाळ्यात भातशेती करतात आणि जमिनीचा पोत कायम राखण्यासाठी हिवाळ्यात कुळथाचे पीक घेतलं जातं. घरचंच असल्यामुळे सहाजिकच आमच्या आहारात भात आणि कुळीथ यांचा समावेश जास्त असतो. साधारण नोव्हेंबरच्या सुरुवातीला कुळथाची पेरणी होते. याचे वेल असतात. कुळथाच्या वेलाचं हिरवंगार शेत फार सुंदर दिसतं. फेब्रुवारी, मार्चमध्ये याच्या लांबट, शिडशिडीत शेंगेत दाणा तयार होतो. मग तोडणी, झोडपणी, पाखडणी वगरे संस्कार होऊन चपटा, गोल, लालसर काळ्या रंगाचा दाणा मोकळा होतो खरा; पण हाच..पुढे वर्षभर खाण्यासाठी आमच्या कोठी खोलीत बंदिस्तच केला जातो.

या कुळथाची इतर कडधान्याची करतात तशी मोड आणून उसळ आणि कळणही करतात. मोड आलेले लाल, पांढरे, कच्चे कुळीथही खूप सुंदर दिसतात. या उसळीत आम्ही इतर कोणता मसाला न घालता वेस्वार नावाचा फक्त आमच्याच भागात केला जाणारा मसाला घालतो. कुणी पाव्हणे मंडळी आली की खास म्हणून एखाद दिवशी होतेच ही उसळ.

कुळथाचं पीठ करण्यासाठी त्याची डाळ करावी लागते. त्यासाठी कुळीथ मडक्यात भाजून नंतर ते जात्यावर भरडले जातात. मग पाखडून सालं आणि डाळ वेगळी केली जाते. सालं काढलेली डाळ पिवळट दिसते. ही दळून आणली की कुळीथ पीठ तयार. या डाळीचं वरण अप्रतिम होतं. डाळ शिजली की फार घोटायची नाही आणि जास्त पाणीही घालायचं नाही. त्यात हळद, िहग, मीठ आणि लाल मिरच्या, जिरं, सुकं खोबरं याचं वाटण घालायचं. या वरणावर तूप न घालता नारळाचा घट्ट रस घालायचा. हे वरण, गरम भात आणि जोडीला पापड कुरडय़ांचं तळण. आमच्याकडचा सॉलिड हिट बेत आहे हा.

नमनाला घडाभर कुळीथ खर्ची पडलेत. आता पिठल्याकडे वळू या. अहो, उसळ, कळण काय किंवा वरण काय, हे तर पाहुणे कलाकार. कधीतरी होणारे. देशावर करतात त्या शेंगोळ्या तर आमच्याकडे कधी होतच नाहीत. खरं हुकमाचं पान म्हणजे कुळथाचं पिठलं जे पानात वाढलं की पान खरोखर भरून जातं. पिठलं वाटीबिटीत वाढणं आणि ते चमच्याने खाणं हा पिठल्याचा महान अपमान आहे. त्याची जागा पानात उजवीकडेच. आमच्याकडे कुळथाचं पिठलं सगळ्यांना आवडतं. पिठलं म्हटलं की कुळथाचंच, कधी चण्याचं केलं तर तसं सांगायचं. अगदी रोज खाऊनही त्याचा कंटाळा येत नाही. या पिठलं प्रेमावरूनच माझ्या एका सासूबाईंनी ‘‘पिठलं.. आणि तोंड मिटलं.’’ अशी मुळी म्हणच तयार केली आहे. घरात काही महाभाग आहेत पानात पिठल्याचा थेंबही पाडून न घेणारे. पण ते किती? अपवादाने नियम सिद्ध होतो म्हणण्या इतपतच.

प्रामुख्याने कोकणात न्याहारीला पातळ पेज असते, पण आमच्याकडे न्याहारीला असतो पिठलं भात. करायला अगदी सोपं, पण चवीला भन्नाट. थोडय़ा तेलात कांदा परतायचा, नंतर त्यात पाणी घालायचं. मीठ, तिखट आणि चवीला एखादं सोलं टाकायचं आणि अंदाजाने पीठ घालून ढवळत राहायचं, गुठळी होऊ द्यायची नाही. पाच सात मिनिटं उकळवायचं, पिठल्याचा घमघमाट दरवळला की गॅस बंद, पिठलं तयार. हिरवी मिरची, कोिथबीर असे पिठल्याचे लाड क्वचितच होतात कोकणात. गरम भात, तूप, पिठलं आणि दही भात त्यात चवीला पिठलं. तोंडी लावायला आंब्याचं लोणचं. न्याहारीचा न्याराच बेत. ओरपा हवं तेवढं. अशी भरभक्कम न्याहारी झाली की माणूस आहारला नाही तरच नवल.
एवढं जरी असलं तरी दुपारच्या जेवणात पिठलं कधीच नसतं. कारण दुपारच्या जेवणातल्या पिठल्याचा संबंध अशुभ घटनेशी लावला गेला आहे. हां. पण पानातली भाजी अगदीच कोणाच्या नावडीची असेल तर सकाळच्या उरलेल्या पिठल्याचा वाडगा त्याच्या समोर ठेवला जातो. मग त्याचं जेवण बिनबोभाट होतं. शिळं पिठलं ही काही जणांना जास्त आवडतं, पण मला स्वत:ला नाही आवडत ते.

सणासुदीच्या दिवशी दुपारचं गोडाधोडाचं जेवण, तेही थोडय़ा उशिराच झालेलं. रात्री जेवणार नाही फक्त ताक घेऊ, असं सांगून पुरुष मंडळी ओटीवर गप्पा मारत बसलेली असतात. घरातल्या इतर माणसांसाठी आणि मुलांसाठी रात्री भात पिठलं केलं जातंच. पिठल्याचा घमघमणारा दरवळ ओटीवरच्या पुरुषांना स्वयंपाकघरात खेचून आणतो. ‘‘घासभर पिठलं भात खाईन म्हणतो.’’ असं म्हणत एकेकाची विकेट पडायला लागते. आम्हाला याचा अंदाज असतोच. पिठलं भात जास्तच केलेला असतो. पण मंडळी कधी कधी असा काही हाणतात की पिठलं आणि भात आम्हाला दोन्ही पुन्हा करावं लागतं.

पिठलं फक्त कोकणातल्या आमच्या हेड ऑफिसमध्येच केलं जातं असं नाही तर मुंबई पुण्याच्या शाखांमध्येही ते तेवढय़ाच आवडीनं केलं जातं. पिठाचा स्टॉक कायम लागतो घरात. अगदी परदेशी राहाणारी मंडळीही बॅगेतून कुळथाच्या पिठाची पुडी आवर्जून नेतात. या पिठाचा वास बॅगेतल्या इतर वस्तूंना चटकन् लागतो व तो लवकर जातही नाही म्हणून जाड पॅकिंग करून नेतात, पण नेल्याशिवाय राहात नाहीत. इथे मात्र पीठ कधी संपलं तर चार दिवस आमटी, सार असं करून काढले जातात, पण नंतर गावाला फोन केला जातोच. ‘‘पीठ कुरिअर करा असा’’. वास्तविक हल्ली सगळीकडे कुळीथ पीठ विकत मिळतं तरीही कुरिअरनं पीठ मागवणं हे खरं तर आम्हाला शोभत नाही. पण काय करणार? विकतच्या पिठाला आमच्याकडे बिग नो नो. पीठ घरचंच हवं. त्यासाठी मग कुरिअरचा खर्चही सोसायची तयारी.

जाऊबाई कधी सर्दी पडशाने बेजार झाल्या की जेवताना म्हणतात, ‘‘पिठलं वाढ गं थोडं, तोंडाला रुची येईल जरा.’’ नवीन सुना घरात रुळायच्याही आधी पिठलं आवडीनं खायला लागतात. शिक्षणासाठी बाहेर राहणारी मुलं घरी आली की, ‘‘काकू, पिठलं पोळी वाढ, किती दिवस झाले खाल्लं नाहीये’’ असं म्हणतात. दोन वर्षांचं घरातलं छोटं बाळ वरणभाताला तोंड फिरवतं आणि भात पिठलं मात्र मिटक्या मारत खातं.
या सगळ्यामुळे पिठलं प्रेमाची आमच्या घरची ही परंपरा या पुढेही अशीच कायम राहील याची खात्री पटते आणि मन आश्वस्त होते..

– हेमा वेलणकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2016 1:07 am

Web Title: pithla bhakri
Next Stories
1 बदली
2 संन्यासाकडून संसाराकडे!
3 अब्दुलचाचा .!
Just Now!
X