17 December 2017

News Flash

नात्याची शिवण

शाळा-कॉलेजानंतर प्रत्येक जण आपापला मार्ग आक्रमत जीवनात स्थिरावला.

प्रिया श्रीकांत | Updated: September 30, 2017 1:01 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

शाळा-कॉलेजानंतर प्रत्येक जण आपापला मार्ग आक्रमत जीवनात स्थिरावला. घराची घडी विस्कळायला लागली होती. कुणी समोर, कुणी आडून आपले परखड विचार ठेवत. ते सर्वमान्य असोत नसोत, कुणाला आवडेल न आवडेल याचा सारासार विचार नाही. जो तो आपल्या आवडत्या मार्गाने गेला व मागे वळून बघितलं नाही. तसं म्हणायला एकमेकांच्या कार्यापुरती भेट व्हायची. चांगल्या-वाईट प्रसंगात सगळे एकत्र असायचे; पण तेवढय़ापुरतेच. सगळ्यांचं जग आपापल्यापुरतं मर्यादित. एखाद्या बेटासारखं.. एकटं एकटं. असं कधी, का, कसं झालं कळलंच नाही. नात्याची शिवण उसवली होती हे नक्की.

‘‘काय राव? आज तुम्ही नेहमीसारखे दिसत नाहीत. तब्येत-बिब्येत ठीक आहे ना?’’

‘‘काही नाही हो शेटजी! सगळं ठीक आहे. आपण रोज इथं येऊन तास-दीड तास पोहण्याचा व्यायाम करू शकतो याकरिता देवाचे आभारच मानले पाहिजेत, नाही का?’’ मी म्हणालो.

‘‘अगदी खरं बोललात! साठीनंतर आपण सगळे इथं येऊ  शकतो; मनसोक्त पोहून गप्पा-टप्पा, टिंगल-बिंगल करू शकतो, पोट भरून हसू शकतो.. खरंच खूप भाग्यवान आहोत आपण! मी तरी स्वत:ला तसं मानतो,’’  शेटजीही हसत म्हणाले.

थोडय़ा इकडच्या-तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर आम्ही एकमेकांचा त्या दिवसापुरता निरोप घेतला व घरी परतलो. स्विमिंग पूलचा आमचा ग्रुप गेली दहा-एक वर्षे एकत्र आहे. पहाटे पुलावर येतो, भरपूर पोहून झाल्यावर थोडय़ा गप्पागोष्टी होतात. त्यात विनोद, एकमेकाची टांग खेचणं, थोडंबहुत चालू क्रिकेट मॅचवर चर्चा.. हे सगळं आलंच. अन् दर रविवारी कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये एकत्र नाष्टा. कुणाच्याही खासगी जीवनात आम्ही डोकावत नाही; तरी पण एकमेकाच्या काही मोघम गोष्टी सर्वाना ठाऊक आहेत. मात्र चांगल्या प्रसंगी अन् अडीअडचणीला सगळे एकत्र येतात. म्हणूनच रोज पहाटे उठून क्लबवर येणं सगळ्यांनाच आवडतं.

तसं आज शेटजींनी बरोबर हेरलं होतं की काही तरी बिनसलंय. पण त्यांना घरातल्या खासगी गोष्टी सांगणं योग्य नव्हतं. म्हणून मी गप्प बसलो.

‘‘काय करावं, कसं करावं?’’ आईचा फोन आल्यापासून जरा अस्वस्थ होतो. आईला जरा बरं नव्हतं. आताशा सहजपणे फिरायला तिला जमत नव्हतं. उठता बसता त्रास होऊ  लागला होता. बरं, तिला आमचं जुनं घरही सोडवेना. तिला तिथंच राहायचं होतं. आम्ही इतके भाऊ  बहिणी; सगळे आपापल्या घरी, ज्याच्या त्याच्या उद्योगात. आईबरोबर राहायला तिथे कुणाला वेळ नव्हता व आवडतही नव्हतं. आईला आमच्याच घरी येऊन राहा म्हटलं तर ती तयार नव्हती. सासू सुनांच्या गोष्टी त्यांनाच माहीत. नवीन पिढी, मुलं आपापल्या विश्वात.. कुठूनच काही जमत नव्हतं. ‘‘मोठे आहोत म्हणून नेहमी आपणच का सगळं अंगावर घ्यायचं? सगळ्यांनीच नको का विचार करायला?’’ हे बायकोचं म्हणणंही मला पटत होतं. मार्ग निघत नव्हता. बरं, ही पहिली वेळ नव्हती. अनेक वेळा काही काही अशा अडचणी उभ्या राहत की जीव अगदी मेटाकुटीस येई. आजारपण, बाळंतपण, शाळा-कॉलेजच्या अडचणी, सण, इतर कार्ये.. अनेक वेळा असे प्रश्न उभे राहिले की ‘तू कर..तू कर..’ असंच बऱ्याच वेळा व्हायचं. बायका नोकऱ्या करतात. त्यांचेही करियर्स आहेत. मग मुलांचा प्रश्न.. आजारपणात तर आणखी हाल! म्हणायला कुटुंब एवढं मोठं. पण अशा वेळी एकटेपणा जाणवायचा. प्रत्येकाचं आपल्यापुरतं सगळं मर्यादित. दुसऱ्यांचा विचार नाहीच. जास्त काळ कोणीच कोणाला सहन करू शकत नाही. तेवढय़ापुरतं भेटणं, हसणं बोलणं झालं की संपलं. प्रत्येकाची वेगळी दिशा..

कधी कधी मन विषण्ण होई. ‘हे असं कसं झालं?’ तसं बघायला आपल्या घरी तर सगळं व्यवस्थित होतं. आई-अण्णांची आम्ही दहा मुलं. सामान्य परिस्थिती असली तरी घरचे संस्कार खूपच चांगल्या प्रकारचे. गीता, मनाचे श्लोक, स्तोत्रं, सुभाषितं या सर्वाचा आम्हावर बालपणापासूनच प्रभाव. जीवनात कसं वागावं, काय करावं, आपली कर्तव्यं कशी पार पाडावीत, जबाबदाऱ्या कशा निभाव्यात हे लहानपणापासूनच मनावर बिंबवलेलं. आई-अण्णांच्या विचारांमुळेच आमच्याकडे राबता खूप होता. किती जण यायचे जायचे! कुणाकुणाची करय आमच्याकडे झाली! घरात फारसं काही नसलं तरी येणारा भाजी-पोळीने तृप्त होई. असं लहानपण आम्ही भावंडांनी पाहिलेलं.

शाळा-कॉलेजानंतर प्रत्येक जण आपापला मार्ग आक्रमित जीवनात स्थिरावला. अण्णांच्या शेवटच्या दिवसातच घडी विस्कळायला लागली होती. कुणी समोर, कुणी आडून आपले परखड विचार ठेवत. ते सर्वमान्य असोत नसोत, कुणाला आवडेल न आवडेल याचा सारासार विचार नाही. आई-अण्णांना काय वाटेल याचाही कुणी विचार मनावर घेतला नाही. जो तो आपल्या आवडत्या मार्गाने गेला व मागे वळून बघितलं नाही. तसं म्हणायला एकमेकांच्या कार्यापुरती भेट व्हायची. चांगल्या-वाईट प्रसंगात सगळे एकत्र असायचे; पण तेवढय़ापुरतेच. सगळ्यांचं जग आपापल्यापुरतं मर्यादित. एखाद्या बेटासारखं.. एकटं एकटं. असं कधी, का, कसं झालं कळलंच नाही. कदाचित बाहेरच्या जगातला वेगळेपणा, नावीन्य, उथळ आधुनिकपणा आणि हळूच आपल्या ‘सिस्टम’मध्ये शिरलेला स्वार्थ यांनी आपली माणसंच बदलून टाकली. ओळखीच्या चेहऱ्यांच्या वागण्यातला अनोळखीपणा फार बटबटीत होता. सगळेच म्हणायचे, ‘तुमचं इतकं मोठं कुटुंब, इतकी माणसं, छाऽऽन वाटत असेल नाही? हल्ली तर चौघा-तिघांचंच कुटुंब झालंय्, त्यामुळं तर पुढची कल्पना करवत नाही.’  बरं, ते दु:खी आहेत का? मुळीच नाही! तरुण पिढीचं आपापलं मित्रमैत्रिणींचं ‘नेट’ विश्व आहे. तोंडातून एक शब्दही न काढता सतत संवाद चालू असतो. प्रत्येकाच्या वाटय़ाला तशी बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता आली आहे. त्यामुळे ‘आर्थिक’ कारणांमुळे ‘विसंबून’ राहण्याची मजबुरी नाही. कारणं जी काही असेनात, पण हे विखुरलेपण आमच्या तरी कुटुंबीयांच्या नशिबी आलं. कुणाला सांगायचं? का? आणि सांगून काय उपयोग?

शेटजींच्या प्रश्नाचं उत्तर मला सापडत नव्हतं. आईच्या राहण्याच्या प्रश्नाबद्दल बोलायचं झालं तर.. काही आकाश कोसळलं नव्हतं. बघू या. काही तरी मार्ग काढू. दुसऱ्या दिवशी पोहणं झाल्यावर मी अन् शेटजी बोलत होतो. ते व्यापारी. सगळेच त्यांना ‘शेटजी’ म्हणतात. आम्हीही म्हणू लागलो. तसे वयानं माझ्यापेक्षा बरेच मोठे आहेत; पण कामाचा उरक दांडगा.. सगळ्याच बाबतीत. त्यांचा स्वत:चा सुक्यामेव्याचा व्यापार आहे; पण अजूनही जातीने इतर कुटुंबीयांच्या व्यापारांकडे लक्ष ठेवतात अन् हवं तिथे मदत किंवा मार्गदर्शन करतात. आम्ही त्यांच्या घरी कित्येक वेळा गेलो आहोत. पाहिलंय् की त्यांच्या घरी सुबत्ता तर आहेच; पण मुलं, सुना, लेकी, जावई, मामा, काका.. सगळे कसे एकमेकाला धरून आहेत असं वाटतं. त्यांच्या सबंध कुटुंबात एक प्रकारची सुसूत्रता जाणवते.

आज न राहवून मी त्यांना म्हणालो, ‘‘शेटजी, इतक्या  मोठय़ा कुटुंबाचा गोतावळा, अनेक व्यापार तुम्ही कसे सांभाळता?’’

शेटजींनी माझ्याकडं बघितलं, खुर्चीत स्वस्थ बसले, मलाही बसायला खुणावलं आणि चष्मा पुसत म्हणाले, ‘‘अहो, खरं सांगू का? प्रत्येक कामामागे, योजनेमागे जर एक ‘सिस्टम’ ठरवली व त्याप्रमाणे अमलात आणून वागलो तर सगळं व्यवस्थित होतं..’’ ‘‘सिस्टम’ म्हणजे असे काही नियम ज्यामुळे एखादी व्यवस्था सुरळीत काम करते. होय ना?’’

‘‘अगदी बरोबर. आम्ही तुमच्यासारखे बुद्धिजीवी नाहीत, व्यापारी आहोत अन् त्याकरिता लागणारी व्यवस्था आमच्याकडे आहे. कोणत्याही व्यापाराला माणसांची ताकद लागते. बाहेरची माणसं ती बाहेरची. घरचीच असली तर मग काय बोला – सर्वोत्तम! श्रम, मेहनत, नफातोटा हे सगळं त्यात असतंच; त्याशिवाय व्यापार मोठा होत नाही. माझ्या वडिलांनी जो व्यापार सुरू केला तो आज अनेक पटींनी वाढलाय. आम्हाला हे बाळकडू जन्मापासूनच दिलेलं असतं. एक सत्तेचे केंद्र असलं की फक्त पैशाच्या दृष्टीने नव्हे तर जीवनाशी, समाजाशी निगडित सगळ्या दृष्टीने टिकून. धरून राहण्याची क्षमता त्यात असते. माझे आजोबा, माझे वडील आणि आता मी.. आम्ही सगळे एकत्र कुटुंब व्यवस्थेत राहिलो व व्यापाराचा आवाका वाढवला. अर्थात राग, लोभ, आनंद, दु:ख घराघरामधल्या कुटुंबांत असतात, पण आम्हाला हे माहीत असतं की, आमच्या काही नियमांपलीकडे जायचा विचार आम्ही करतच नाही.. व भक्कम आधाराचं केंद्रस्थान असलं की, आपोआपच त्याभोवती कुटुंबव्यवस्था, आर्थिक, सामाजिक समाजाची वीण विणली जाते. धागेदोरे घट्ट होतात व सगळ्यांनाच अजाणता एकमेकांचा आधार असतो. कारण सगळ्यांच्या फायद्याचं असतं ते.’’

‘‘पण शेटजी, आता काळ बदललाय. किती झपाटय़ानं सगळं बदलत चाललंय! या बदलत्या जगाचा परिणाम सगळ्यांवर होतोच.. माणूस स्वत:च्या इच्छेनुसार जगू पाहतो; फार काळ तो कोंडमारा सहन करू शकत नाही. तसं केलं तर स्फोट होणारच..’’

‘‘अर्थातच! मनुष्य सामाजिक प्राणी आहे, तरी त्याचं स्वत:चं व्यक्तिमत्त्व आहेच. म्हणूनच मी माझ्या मुलांना त्यांच्या आवडीचा व्यवसाय निवडण्याची मुभा दिली. माझ्या सुनाही मदत करतातच. वेगवेगळे व्यवसाय असले तरी आम्ही एकत्र असतो. माझा बंगला तुम्ही बघितलाय. सगळ्यांना आपापल्या खोल्या आहेत; पण आम्हा सर्वाचं स्वयंपाकघर मात्र एकच आहे. त्यामुळे होतं काय की, आम्ही एकत्र असलो तरी प्रत्येकाला स्वत:ची ‘स्पेस’ आहे. आम्ही एकत्र कुटुंबपद्धतीने राहतो; म्हणून लहान मुलं, ज्येष्ठ मंडळी, आजारी व्यक्ती सगळ्यांची देखभाल होते. त्यामुळे सगळ्या दृष्टीने जगणं सोपं होतं. स्पर्धेत टिकून राहतो, पुढे जातो. असं आहे, साहेब! आम्ही नोकऱ्या करीत नाही, म्हणूनच हे शक्य होतं. आपला व्यापार, आपली कुटुंबं, आपलं मनाप्रमाणं जीवन.. बस, परमेश्वराची कृपा..’’

‘‘खरंय् तुम्ही म्हणता ते. आमच्या घरात एक समस्या उद्भवली आहे. पण बघतो मी काय करायचं ते.’’

‘‘मी काही तुमच्यासाठी करण्यासारखं असेल तर मला जरूर सांगा. एवढे तरी आपण जवळचे आहोत. नाही का?’’

‘‘हो, नक्कीच. तसं काही वाटलं तर नक्की सांगेन.’’ मी त्यांचा निरोप घेऊन घराकडे निघालो. डोक्यात काहूर माजलं होतं. ‘किती भाग्यवान आहेत शेटजी! त्यांच्या कुटुंबात आपल्यासारखे प्रश्न, अडचणी नसतील असं नाही, पण वेगळ्या स्वरूपाच्या. आपल्याकडे कोणी रिकामं नाही. ‘हक्क’ कुणावर अन् कसा दाखवायचा?  आपण बिझिनेस कम्युनिटीला नावं का ठेवतो? लहानपणापासून ऐकत आलोय् की, लबाडीशिवाय धंदा होत नाही. शिवाय त्यात ‘रिस्क’ केवढी! जमलं तर सगळं छान, नाही तर भिकेला लागायची वेळ येते. ते जाऊ दे. तो व्यवसाय झाला. घरातली नाती बघा, कशी घट्टं! ते लोक कुटुंबासहित भरपूर प्रवास करतात. कार्यक्रमांचं आयोजन करतात. दानधर्म करतात. घरातला महिलावर्गही उद्योगामध्ये येऊ लागलाय. घरात सीमित जीवन जगत बसलेल्या नाहीत. उलट जीवनाचा भरपूर आनंद लुटतात. नोकरी करणारे आपण आपले ‘ईगो’ इतके मोठे झालेत की, सगळ्या नात्यांचीच चाळण झाली. नोकरीतही बॉसचा शब्द झेलणं, सहकर्मचाऱ्यांबरोबर जमवून घेणं, वेळ सांभाळा, मर्जी सांभाळा.. बॉसनं चांगला रिपोर्ट दिला तरच प्रमोशन, नाही तर बसा तिथेच कुढत.. च् च् कसं निस्तरावं सगळं आता? हा प्रश्न आपल्या एकटय़ाचा नाही. कुटुंबाचा तर आहेच, समाजातल्या आपल्या सारख्या सर्वाचा आहे. एका मशीनमधे असलेले, बसवलेले, वंगण नसलेले सुटे भाग सगळे.

..इतरांच्या दृष्टीने खूप उशीर झाला असला, प्रयत्न करूनही उपयोग होणार नसला, तरीही मी आता ठरवलंय – आमच्या या वेगवेगळ्या विणीला एकत्र जोडणारा, गुंफणारा सुई आणि दोरा मीच होणार..

प्रिया श्रीकांत priyaaskul@gmail.com

First Published on September 30, 2017 1:01 am

Web Title: priya srikanth article on how to behave in life