13 August 2020

News Flash

संन्यासाकडून संसाराकडे!

‘माझं ठीक आहे हो, बच्चमजी. पण तुम्ही संन्यास घेतलाय यावर कुणाचा तरी विश्वास बसला पाहिजे नं?

‘माझं ठीक आहे हो, बच्चमजी. पण तुम्ही संन्यास घेतलाय यावर कुणाचा तरी विश्वास बसला पाहिजे नं? तुम्ही काय सगळ्यांना सांगत थोडंच बसणार संन्यास घेतल्याचं? त्यापेक्षा गांधी टोपीवर दोन्ही बाजूला मार्करनं लिहायचं, ‘मैं संन्यासी हूं’ सुरुवातीला हसतील सगळे.. नंतर समजून घेतील. घराबाहेर पडताना फक्त न विसरता टोपी घालायची. हल्लीचा तो राजकारणातला नवा फॅशन-ट्रेण्ड आहे! कुणी सांगावं, आता कदाचित तुमचे दिवस येतील!’
सुमा, मी ठरवलंय.. संन्यास घ्यायचा!’ स्वयंपाकघरांत एन्ट्री घेत डायिनग टेबलाशी खुर्चीवर स्थानापन्न होताच गजानं घोषणा केली! नेहमीप्रमाणे सुमानं गजाकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं, अन् ती फ्रीझरमधून दुधाची कालची स्पेअर -आता बर्फ झालेली- पिशवी काढू लागली. तिला गजाचे सगळे ‘संडे-मूड्स’ अनुभवाने आता सवयीचे झालेत.

रविवारची रम्य सकाळ. दूधवाल्याचा अजून पत्ता नाही. पेपरवाला आज आरामातच येणार. आठवडय़ाभराचा आठ अठ्ठावीसची सी.एस.टी डबल-फास्ट पकडण्यासाठी आटापिटा नाही. सगळं कसं निवांत, रम्य.. रविवार ‘लागायला’ साजेसं. कुणाला एसटी ‘लागते’, कुणाला ट्रेन ‘लागते’. आज गजाला रविवार सकाळीच ‘लागला’! असा रविवार लागणं म्हणजे गजा ‘नॉर्मल’ असल्याचं चिन्ह.. त्यामुळे सुमादेखील नििश्चत. गजालादेखील माहीत होतं की सुमा नेहमीप्रमाणे मुद्दाम त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतेय.. अर्थात त्यामुळे त्याचा उत्साह कमी होण्याची शक्यताच नव्हती.

‘तू ऐकूनदेखील राजकारण्यांसारखं माझ्याकडे दुर्लक्ष करतेयस.. म्हणूनच मी संन्यास घेणार आहे!’ आतां गजाचा आवाज ठाम. सुमानं ‘दुधीबर्फ’ वितळण्यासाठी पिशवी पातेल्यातल्या पाण्यात ठेवली, अन् चहाचं आंधण गॅसवर ठेवीत म्हणाली,
‘तुमची ती स्वच्छ पांढरी गांधी टोपी कपाटांत कुठं ठेवली आहे माहिती आहे नं?’
‘अगं मी काय सांगतोय, अन् तू काय बोलतीयेस.. गांधीटोपीचा काय संबंध? संन्यासासाठी गांधीटोपी ही
प्री-कंडिशन’ आहे की ड्रेस-कोड?’
‘अन् बाहेरच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये काळं मार्कर पेनदेखील आहे..’
आता गजा बिथरला. ‘तू मला कधी सीरियसली घेतेस.. एक वेळ त्या दुधाचा बर्फ लवकर वितळेल, पण तुला पाझर फुटणार नाही! तिकडे ऑफिसांत तो पाषाणहृदयी बॉस, अन् घरी तू..’
‘पत्थर, दगड, धोंडा, शिळा.. काय वाट्टेल ते म्हणा. बट आय एम सीरियस. संन्यास घेणं ही काही खायची गोष्ट नाही.. आणि खाण्याशिवाय जीवन नाही, हे आपलं ब्रीद! येता-जातां काही तरी तोंडांत टाकायची आपली जन्मजात सवय, खरंय ना, पप्पू गजाननबुवा!’
‘पप्पू? आता हे काय लाडिक.. सकाळीच?’
‘परमपूज्य गजाननबुवा! सध्या बुवा, बाबा, बापू गाजताहेत.. हा ट्रेण्ड, ही इमेजदेखील महत्त्वाची. अहो, घरी तुमची संन्यासी इमेज मी सांभाळून घेईन, पण घराबाहेर काय? लोकांना कसं कळणार, तुम्ही संन्यास घेतल्याचं?’
‘कु छ तो गडबड है..’ गजा क्राइम सीरियलमधल्या ए.सी.पी. प्रद्युम्नसारखा गोंधळला.
‘माझं ठीक आहे हो, बच्चमजी. पण तुम्ही संन्यास घेतलाय यावर कुणाचा तरी विश्वास बसला पाहिजे नं? तुम्ही काय सगळ्यांना सांगत थोडंच बसणार संन्यास घेतल्याचं? त्यापेक्षा गांधी टोपीवर दोन्ही बाजूला मार्करनं लिहायचं, ‘मैं संन्यासी हूं’ सुरुवातीला हसतील सगळे.. नंतर समजून घेतील. घराबाहेर पडताना फक्त न विसरता टोपी घालायची. हल्लीचा तो राजकारणातला नवा फॅशन-ट्रेण्ड आहे! कुणी सांगावं, आता कदाचित तुमचे दिवस येतील!’ आता गजाची टय़ूब पेटली. आपल्या स्टेटमेंटमधली ‘गडबड’ समजून गजा हसला, अन् म्हणाला, ‘गांधी टोपीचा फॅ शन-ट्रेण्ड? कुठच्या ट्रेण्डच्या जमान्यात वावरतेस, तू सुमा? अर्धी-चड्डी जाऊन फुल-पॅण्ट आली तरी त्याची हल्ली फ्रंट-पेज न्यूज होते! तुझी हीच तर गडबड आहे. मला तू पूर्ण ऐकूनच घेत नाहीस. मी संन्यास घेणार आहे तो संसारातून नव्हे, वेडे,.. तर राजकारणांतून!’
‘अरेरे.. मला वाटलं खरंच संसारातून मस्त संन्यासबिन्यास घेताय! बिनवातीचा फटाकाच निघाला.. हुकला चान्स! मला सांगा, राजकारणांतून संन्यास घ्यायला तुम्ही राजकारणात शिरलात कधी?’ चहाच्या आंधणात अंदाजाने नेमकी साखर टाकीत सुमाचा प्रश्न.
‘तीच तर गोची आहे. अगं, राजकारणांत शिरायला कशाला पाहिजे? आपण राजकारणात असतोच. राजकारणाशिवाय आपली सुटकाच नाही. त्यातून गेली दोनेक वर्ष सगळा देशच राजकारणांतच बुडाला होता. आधी दिल्ली निवडणुका, मग लोकसभा निवडणुका, मग आपल्या विधानसभा निवडणुका, मग पुन्हा दिल्ली निवडणुका. मग कुठल्या न कुठल्या राज्याच्या विधानसभा निवडणुका! थोडक्यात, या ना त्या निवडणुकांचा नुसता गदारोळ. घरोघरी- रस्त्यारस्त्यांवर, लोकल्स-ऑफिसेसमधून, छोटय़ा पडद्यावर- वर्तमानपत्रांतून नुसती राजकीय पक्षांचे अभिनिवेश घेऊन राजकारणावर चर्चा, तावातावाने हमरीतुमरीवर येऊन अद्वातद्वा भांडत, एकमेकांचे भ्रष्टाचार उकरून काढत! आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, अशा आविर्भावांत! त्यांचा तो सत्तेचा धंदाच आहे पोटापाण्याचा, पिढय़ान्पिढय़ाचा. ‘समोरच्या बाकावरून’ टीका करणं हा प्रत्येक विरोधी पक्षाचा सत्ता नसतानाचा रिकामपणाचा उद्योग. आज हा पक्ष, उद्या तो पक्ष.. बाहेरून नांव बदललं, तरी आतून सगळे सारखेच. बिकॉज पॉवर करप्टस.. मोअर पॉवर करप्टस मोअर! मग माणसाचा गोठून बर्फ व्हायला वेळ नाही लागत. तो वितळायला लागण्याआधीच बर्फाचा दगड होतो!..’

‘आता माझी सटकलेला’ गजाराव सिंघम भाषणातून भानावर येत म्हणाला, ‘बरं, दुधाचं काय झालं?’
‘वितळतोय दुधाचा बर्फ..’
अंदाजाने आधणात नेमकी चहा पावडर टाकीत सुमानं विचारलं, ‘पण काय हो, तुम्ही संन्यास घेणार म्हणजे नेमकं काय करणार?’
‘राजकारणापासून अलिप्त राहणार. नो चर्चा. नो गॉसििपग. उगाच एका पक्षाची बाजू घेत अद्वातद्वा फालतू वाद घालायचे, खोटय़ाचं खोटं समर्थन करीत बसायचं.. निर्थक टाइमपास. लाटा काय, येतात तशा जातात. सगळे एका लाटेचे.. सॉरी, एका माळेचे मणी! सत्ता-लोभी राजकारण्यांना निवडणुका झाल्यावर सामान्य जनतेशी कुठलंच देणं-घेणं नसतं! त्यांच्यावर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा, काही तरी कन्स्ट्रक्टिव्ह करायचं ठरवलंय मी. त्यासाठी आधी राजकारणापासून संन्यास ही पहिली पायरी. त्याशिवाय काही कन्स्ट्रक्टिव्ह होणार नाही.’
‘गुड! पण कन्स्ट्रक्टिव्ह.. म्हणजे नक्की काय हो?’
‘मला सांग, देश नक्की कुणामुळे चालतो? या राजकारण्यांमुळे की, कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या सर्वोच्च न्यायालयांतील न्यायाधीशापासून रस्त्यावरच्या घाम गळणाऱ्या सामान्य स्वच्छता कामगारापर्यंत तमाम जनतेमुळे?’
‘अर्थातच काम करणाऱ्या जनतेमुळे.. अन् निवडणुकीत जनताच ठरवते सत्ता कुणाला द्यायची ते!’ ‘ग्रेट! कधी कधी सेन्सिबल बोलतेस तू.. तर म्हणून मी ठरवलंय, राजकारण्यांविषयी फालतू बडबड करून टाइमपास करण्यापेक्षा काही तरी कन्स्ट्रक्टिव्ह करायचं!’
‘अच्छा, म्हणजे केरसुणी घेऊन ‘स्वच्छ भारत अभियाना’ंत रस्त्यावर उतरणार तर! पण तसं असेल तर आधी आज घरापासून सुरुवात करा.. शांताबाई येणार नाहीत आज.’
‘म्हणजे? अरे, काय चाललंय काय? शांताबाई येणार नाही, साडेसात वाजले तरी दूधवाल्याचा पत्ता नाही, पेपरवाला अजून उगवायचाय.. झाडले पाहिजेत सगळ्यांना..’
‘हो, पण त्यासाठी आपल्याला आधी नवा झाडू आणला पाहिजे.. अगदी काडय़ा झाल्यात हो झाडूच्या. अन् काय हो, तुम्हीच म्हणत होता ना, की देश या अशा सामान्य माणसांमुळेच चालतो म्हणून! मग या सामान्य माणसांवर असं चिडून काय उपयोग? त्यांचीदेखील काही कामं असतील, रविवार त्यांनादेखील हवा असतो. तुम्ही कुणाकुणापासून लांब पळणार, संन्याशासारखे?’
‘पळतोय कोण,’ प्रश्न या सामान्य माणसानं कसं वागायचं हा आहे. म्हणजे ‘आम आदमी’तदेखील काही दम नाही राहिला.. छय़ा! सच्चाईच राहिली नाही.. इंटिग्रिटीच राहिली नाही! वितळला का दुधाचा बर्फ?’
‘ठेवलंय दूध तापायला. ‘आम औरत’ मध्ये मात्र अजून इंटिग्रिटी आहे.. चहा नक्की मिळेल, पण तुम्ही म्हणता ते खरंच आहे. परवा राजाभाऊजीदेखील हेच म्हणत होते, इंटिग्रिटीच राहिली नाही कुठे..’
‘राजा? कधी आला होता?’
‘आले नव्हते.. भाजीबाजारांत भेटले होते. म्हणत होते, तुमचं हल्ली ऑफिसात कामात लक्ष्य नसतं म्हणून. बॉसनं झापलं.. भांडणिबडण झालं का विचारत होते.’
‘मूर्ख आहे लेकाचा! अगं, ऑफिसच्या कँटीनमध्ये परवा थंडगार डबा खाताना राजकारणावर गरमागरम चर्चा झडून वातावरण तापलं, तेव्हा मी बोलून गेलो.. आता ‘लाटाबिटा’ ओसरल्या, बडबड बास झाली.. घोषणा बास झाल्या, आता कामाला लागा, म्हणावं. हे पलीकडच्या कोपऱ्यात लंच घेणाऱ्या बॉसनं ऐकलं. बॉस पक्का ‘लाट’साब. तो पेटलाच अन् माझ्यावर उगाचच घसरला. केबिनमध्ये बोलावून झापलं. म्हणाला, तुम्ही काय आता राज्यकर्त्यांना शिकवणार काय काम करायला? आधी आपल्या ऑफिसातल्या कामात लक्ष्य घाला. चुका होतातच कशा.. वगरे. म्हणून गेले दोन दिवस विनाकारण ओव्हर-टाइम करायला लावला.. अन् त्यांत राजानं काडी लावली तुझ्याकडे. म्हणे कामांत लक्ष्य नाही.. भेटेल उद्या आठ अठ्ठावीसला. जातो कुठं? इंटिग्रिटीच राहिली नाही कुठे!’
‘अच्छा, अब आयी बात समझ में..रविवारच्या मस्त सकाळी राजकारण संन्यासाची घोषणा का झाली ते!’ तेव्हढय़ात दारांत पेपर लागल्याचा आवाज आला.
‘हं, हे घ्या. आले तुमचे पेपर.. पण आज तुमचा ‘राजकारण संन्यास’, म्हणजे पेपर वाचणार नसाल! पेपरांत दुसरं काय असणार? राजकारणाचा खेळखंडोबा अन् खेळांतील राजकारण.. मागील पानावरून पुढे चालू! त्यापेक्षा हा गरमागरम चहा घ्या.. अन् एक सांगू, फार नका विचार करू. बिनधास्त पेपरही वाचा. चहात बुडवायला सकाळी वर्तमानपत्रातले ‘राजकारणी’ शब्द बरे असतात. कुठलाच संन्यास नाही झेपणार आपल्याला..’
चहाचा पहिला घोट घेताच गजा खूश झाला. आता त्याला चहा ‘लागला’ अन त्याचा ‘लागलेला’ रविवार ‘सुधारला.’ ‘चहा बेस्ट! सर्वपक्षीय राजकारण्यांसारखा मस्त मुरलेला..’
‘अन् ताजं वर्तमानपत्र?’
‘डोंबलाचं ताजं! त्याच शिळ्या बातम्या.. जुन्या-नव्या सत्ताधाऱ्यांनी जमविलेली हजारो कोटींची माया.. हजारो कोटी बुडवून सत्ताधाऱ्यांच्या कृपेनं आकाशमाग्रे परदेशी पळून गेलेले ‘मोठे मासे’.. भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर विरोधकांचा सभात्याग..! कामं करायला नको.. माजलेत लेकाचे!’
‘आतां कसं! ‘चाय-इफेक्ट’! उगाच संन्याशाची सोंगं नकोत. सांगा उद्या तुमच्या बॉसला, जो काम करतो तोच चुकतो. जो चुकत नाही तो मुळांत कामच करीत नाही.. चॉइस इज युवर्स! बॉस पेटला, इसलिए क्यूं संसार से भागे फिरते हो? बाय द वे, मी मात्र आज स्वयंपाक-संन्यास घेणार आहे! बिकॉज, घरी.. आय एम द बॉस!’
‘यू आर द बॉस.. ही देखील जुनीच बातमी. पण आता हे काय नवीन खूळ?’
‘आज शांताबाई येणार नाहीत. तुम्ही ‘स्वच्छ घर अभियान’ सांभाळा, मी कपडे धुण्याचं बघते. जेवायला बाहेरच जाऊ म्हणजे भाडय़ांचा प्रश्नच मिटला!’
‘थोडक्यात महागाईत तेरावा महिना.. अन् इथं तर सभात्याग करायची सोय नाही!’
‘संन्यासाची देखील सोय नाही.. तुमचा संन्यास म्हणजे चहाच्या कपातलं वादळ! त्यापेक्षा अजून गरमागरम चहा घ्या मस्त.. काम करायला स्फूर्ती येईल ! आपल्याकडे साधा चहावालादेखील देशाचा पंत..’ चहा संपवून गजा घोषणा देत उठला..
‘तो हम तय करें.. हमारा गांव, हमारा शहर, हमारी गली, हमारा मोहल्ला, हमारे स्कूल, हमारे मंदिर, हमारे अस्पताल.. गन्दगी का नामोनिशान नहीं रेहेने देंगे !’
‘संन्यासाच्या घोषणेसारखी नुसती घोषणा नको.. आता कामाला लागा, असं तुम्हीच म्हणता ना ! त्यासाठी स्वच्छतेला सुरुवात घरापासून.. त्या दारामागे झाडू आहे!.. बच्चमजी, संन्यास ही सोपी पळवाट आहे, संसार ही अवघड वहिवाट आहे, आयी बात समझ में!

– प्रभाकर बोकील 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:08 am

Web Title: renounce to family life
Next Stories
1 अब्दुलचाचा .!
2 माझी घरवापसी
3 रेशीमबंध
Just Now!
X