News Flash

देव तारी त्याला कोण मारी

डॉक्टरांनी जखमा धुवायला सुरुवात केली. तो मातीचा लेपपण वाळला होता. काढला तिथून नुसते मांस दिसत होते.

भगवानने चिमटे, इंजेक्शन, सीरिंज उकळायला ठेवले. बाहेरचे किडे आत येऊ नये म्हणून खिडक्या बंद केल्या. आतमध्ये आम्ही तिघे आणि तो रुग्ण..  मला आठवते ती रात्र आणि यांनी मृत्यूच्या दाढेतून परत आणण्याचे केलेले प्रयत्न..

माझे यजमान डॉक्टर आहेत. आज ते ९० वर्षांचे आहेत. हात अवघडल्यामुळे ते स्वत: लिहिण्याची मेहनत करू शकत नाहीत. त्यांनी आणि मी घेतलेले वैद्यकीय विश्वातील बरेच अनुभव बेचैन करणारे असले तरी त्याने जीवन जवळून पाहाता आले. त्यापैकीच एक अनुभव त्यांच्याच अनुमतीने मी लिहिते आहे.

साधारण १९७५ ची गोष्ट असेल. आम्ही छत्तीसगडमध्ये ‘महासमुंद’मध्ये होतो. महासमुंद हे छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्य़ातलं तहसील आहे. त्या वेळी हा इलाखा बऱ्यापैकी सुधारला असला तरी आजूबाजूच्या भागांत आदिवासी, गोंड, हलबा आदी समाजाचे लोक प्रामुख्याने होतेच.

दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस! नर्सेस, डॉक्टर्स, वॉर्डबॉय सगळ्यांची हक्काची सुट्टी. आमच्या कॅम्पसमध्ये सगळं सुनसान. सगळ्यांच्या घरांचे बंद दरवाजे. माझी दोन्हीही मुले नागपूरला काकाकडे गेलेली. आम्ही दोघं आणि एक जमादार एवढेच होतो. माझे यजमान डॉक्टर नाफडे, तेथील इनचार्ज, त्यामुळे सुट्टी नाहीच. एकच धास्ती, अशा वेळी एखादी केस आली तर? कारण अशा वेळी जुगार, दारू पिणे खूप असायचे, मारामाऱ्या व्हायच्या. दुपारपासून का कोण जाणे उदास वातावरण जाणवत होते. ‘लक्ष्मीपूजन’ झाले. रात्रीच्या नऊ-साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चार-पाच जण एक खाट घेऊन येताना दिसले. मी तर घाबरलेच. बरोबर पोलीस नाही. नेहमीचा आरडाओरडा नाही. काय झाले असेल? त्यांच्या झोकांडय़ांवरून ती प्यायलेली आहेत हे उघड होते. हे दवाखान्यात गेले. त्यांच्यामागोमाग मी सुद्धा. आणि समोरचं दृश्य बघून कापरंच भरलं. खाटेवरचा माणूस निपचित पडलेला होता. अंगावरचं रक्त वाळलेलं, डोळे, नाक दिसत नव्हते. डोक्यावर, कपाळावर मातीचा लेप. हातवारे करून ती माणसं काही सांगत होती. मला काही समजलं नाही. यांनी जमादाराला आवाज दिला, ‘‘भगवान, भगवान.’’ तो झोकांडय़ा देत आला. मदतीला दुसरं कुणीच नव्हतं. काय करायचं? पण यांनी हिंमत केली. त्याला एकदम ऑपरेशन रूममध्ये नेलं. टेबलावर ठेवताना वाळलेल्या रक्तामधून पुन्हा रक्तस्राव सुरू झाला. हे बघून त्या जमादाराची दारूची नशा उतरली बहुधा. तो लगबगीने कामाला लागला. त्या माणसावर अस्वलाने समोरून हल्ला केला होता. एका पंजात त्याने चेहरा ओरबाडला होता. आरडाओरड, धावाधाव करून बाकीच्यांनी त्याला सोडवले होते. हे घडले भर दुपारी तीन वाजता, गावाच्या शेजारी!.. रक्त जास्त वाहू नये म्हणून त्याच्या डोक्यावर माती आणि शेण थापले होते. वेदना होऊ नये म्हणून त्याला दारू पाजली आणि मजल दरमजल करीत इथे आणले. काय म्हणणार? काय रागावणार? आधी इलाज करणे भाग होते. डोक्यापासून कपाळाचे कातडे खाली तोंडापर्यंत लोंबत होते. विचित्र, किळसवाणे वाटत होते सगळे..

आणि तो बेशुद्ध होता.. त्याच्या बरोबरीची माणसे मात्र हात जोडत होती, पाया पडत होती, वाचवा म्हणून सांगत होती. त्या सगळ्यांना भगवानने त्यांच्या भाषेत समजावून बाहेर काढले. यांनी त्याला सूचना दिल्या. तो कामाला लागला. यांनी देवाला हात जोडले आणि तपासायला सुरुवात केली. ते सगळं पाहून मला कुठून बळ आलं कुणास ठाऊक! थरथरणारे हातपाय स्थिर व्हायला लागले आणि मी मदतीकरिता तयार झाले; पण मला काही येत नव्हतं. यांनी मला सांगितले, समोरच्या अलमारीतील औषधं आण आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी औषधे नीट वाचून बाहेर काढली. भगवानने चिमटे, इंजेक्शन, सीरिंज आणखी काय काय उकळायला ठेवले. बाहेरचे किडे आत येऊ नये म्हणून खिडक्या बंद आणि आतमध्ये आम्ही तिघे आणि तो रुग्ण..

डॉक्टरांनी जखमा धुवायला सुरुवात केली. तो मातीचा लेपपण वाळला होता. काढला तिथून नुसते मांस दिसत होते. खूप वेळ लागला जखम धुवायला. मधूनमधून हे नाडी बघत होते. हृदयाचे ठोके बघत होते. आता भगवान मदतीला आला. त्याने चक्क इंजेक्शन दिले त्या माणसाला. तोपर्यंत हे पुन्हा हात धुऊन आले. ते चिमटे, त्या कात्र्या, सुया भगवान सराईतासारखा पुढे करीत होता. मला खूप आश्चर्य वाटले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी औषध पुढे करीत होते आणि नेमकी वीज गेली. त्या अंधाराची मला खूप भीती वाटू लागली.. भगवानने खिशातून माचिस काढली, पेटवली आणि टॉर्च शोधला.  मी टॉर्च घेऊन पुढच्या मदतीकरिता पुढे झाले आणि तेवढय़ात वीज आली. मग डॉक्टरांनी भराभर पुन्हा त्या जखमेत मलम, पावडर घातली आणि लोंबणारे कातडे हळूहळू वर सरकवत डोक्यापाशी कपाळावर ठेवलं. कातडं वेडंवाकडं फाटलं होतं. त्याला नीट जागेवर ठेवणं अतिशय कठीण काम. डॉक्टरांनी टाके घालायला सुरुवात केली. टाके घातले, बँडेज करून यांनी हात धुतले. पुन्हा एकदा इंजेक्शनचा दौर झाला; पण त्याला तिथून हलवणं म्हणजे एक दिव्य होते. डॉक्टरांनी सांगितलं, एक तास त्याला असेच राहू दे. मग मी पुन्हा त्याची तपासणी करेन. मगच वॉर्डात हलवू..

भिंतीवरच्या घडय़ाळाकडे लक्ष गेले. रात्रीचे अकरा वाजले होते. साडे नऊ ते ११ आम्ही एका वादळाला तोंड देत होतो. शरीरापेक्षा मेंदू, मन थकले होते. बाहेर आलो तेव्हा ती सगळी माणसे केविलवाणी बसली होती. त्यांच्या पाठीवर थोपटत घरी आलो.

मला तर रात्रभर झोप आली नाही. सकाळ झाली. कसा असेल तो याचे औत्सुक्य होतंच. मी सहज बाहेर येऊन वॉर्डाकडे बघितले. सारं काही शांत होते. मी भगवानला हाक मारली. विचारलं, ‘‘कैसा है वो?’’

‘‘ठीक होगा बाईसाब.’’ तो म्हणाला. रोज अशा प्रकारचे रुग्ण बघून तोही निर्ढावला असणार. माझी बेचैनी बघून हे म्हणाले, ‘‘तू चल माझ्याबरोबर, तुझी पहिली केस ना.. हे रोजचं आहे.’’

मी गेले वॉर्डमध्ये. खरंच कुठल्या मातीची असतात ही माणसं? तो रुग्ण उठून बसला होता पलंगावर. त्याला जबरदस्तीनं झोपवलं.. आणि बाकी सगळी भराभर पाया पडायला आली. ‘‘पाय लागू डॉक्टरीण बाय.’’ त्यांनी म्हटलं. केवढय़ा उंचीवर नेऊन ठेवलं मला! ‘डॉ. बाबू’ म्हणत त्यांनी यांना मिठी मारली. त्यांनी खूश होऊन आपल्या जवळची पेज आम्हाला एका अ‍ॅल्युमिनियम भांडय़ात दिली. त्याही परिस्थितीत आपल्या भावना, आदर व्यक्त करायला त्यांना जराही वेळ लागला नाही.

‘‘रायपूला घेऊन जा. बडे अस्पताल में.’’ यांनी सुचवलं. ती माणसं ऐकायला तयार नव्हती. ‘‘हमारा बिटुवा चंगा नही जाबोन तैच कर सब.. हम जाबो..’’ त्यांनी आपल्या भाषेत सांगितलं.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मोठा सण असतो. बस बंद असतात. जेमतेम आठ दिवस राहिली ती माणसे. मग निघून गेली. तो माणूस ठणठणीत झाला. अनेकांची रांग लागली त्या माणसाला बघायला.

किती काटक, जगापासून दूर, निर्मळ मनाची, दृढ विचारसरणी असणारी ही माणसे. ही गोष्ट माझ्या मनात कोरली गेली. मला आंतरिक समाधान मिळालं. डॉक्टरांबद्दल म्हणजे यांच्याबद्दल आदर दुणावला. कुठे असतील ती सगळी?

पण मला मात्र आठवते ती रात्र आणि यांनी मृत्यूच्या दाढेतून परत आणण्याचे केलेले प्रयत्न.. खरंच ‘देव तारी त्याला कोण मारी’..

मंगला नाफडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 5:39 am

Web Title: story of 90 year old doctor
Next Stories
1 आठवणीत तुझ्या
2 नावापुरते देवीपण
3 अविस्मरणीय वारी इटलीची
Just Now!
X