महिन्याभरातच विचित्र घटना घडली. द्रविडआजी कसल्याशा इन्फेक्शननं आजारी पडल्या. आठ दिवस त्यांचं खाली उतरणं बंद झालं. अन् एक दिवस सकाळी कामतांच्याकडून काही जणांना फोन गेला सोसायटीत, द्रविडआज्जी गेल्याचा. वय झालं होतं तरी त्या सिरियस वगैरे असल्याची बातमी नव्हती. असं एकदम अचानक..

द्रविड म्हणजे द्रविडआजी. राहुलची आजी. राहुल परदेशांत स्थायिक झाला असला तरी इकडे घरच्यांसाठी कायम ती राहुलची आजीच. वय नव्वदीच्या उंबरठय़ावर. काठीच्या आधारानं काहीशा कमरेत वाकून चालत असल्या, तरी तब्येत एरवी ठीकठाक. ‘चाळिशी’ साठीत लागली तरी ‘दूरदृष्टी’ अजूनही बऱ्यापैकी शाबूत. त्याबद्दल त्या गमतीनं म्हणतात, ‘राहुल द्रविड क्रिकेट क्षितिजावर उगवण्यापूर्वी मी नातवाचं राहुल नाव सुचवलं.. आहे की नाही दूरदृष्टी!’ तसाही क्रिकेट हा त्यांचा फार पूर्वीपासून आवडीचा विषय अन् इंग्रजी हा शाळेत शिकविण्याचा. त्यामुळे टी.व्ही.पूर्व जमान्यातले इंग्रजीतले रेडिओ समालोचन त्यांना भलते आवडायचे. अगदी तरुण वयात ऐकलेली बॉबी तल्यारखानची तर विशेष.. ‘बॉबीचं भन्नाट विदेशी इंग्लिश ऐकण्यासारखं, तर विजय र्मचटचं तर्खडकरी स्वदेशी इंग्लिश शिकण्यासारखं!’ अशी त्यांची कॉमेंट्री क्रिकेटचा विषय निघाला की हमखास चालू होते. त्यांना रिटायर झाल्यालादेखील द्रविडआजींना तीस वर्षे झाली होती. त्यांचा मुलगा, म्हणजे सायंटिस्ट माधव द्रविडदेखील वर्षभरापूर्वी बी.ए.आर.सी.मधून निवृत्त झाला. राहुलची आई राधिकावहिनींनीदेखील नुकतीच बँकेतून व्ही.आर.एस. घेतलेली. घरात फक्त तिघेच.. तिघेही निवृत्त. पण सगळ्यात द्रविडआजींचा उत्साह दांडगा, त्यांतून स्वभाव गप्पिष्ट. ‘मेमरी’ अजून तल्लख.. आणि मतंदेखील ठाम! त्यामुळे फुटकळ गप्पा क्वचितच. गप्पा मारायला कुणीतरी हवं, एवढंच.

त्या दिवशी तसंच झालं. नुकत्याच झालेल्या नवरात्रीच्या दिवसात अष्टमीला देवीच्या देवळात एवढय़ा गर्दीतदेखील द्रविडआजींना देवळाबाहेरच्या पारावर एकटंच बसलेलं पाहिलं. ‘आजी, एकटय़ाच आलात एवढय़ा गर्दीत?’ त्यावर त्या हसतच म्हणाल्या, ‘एकटं कोण सोडील मला.. माधव आलाय की बरोबर. काही औषधं आणायला गेलाय जवळ दुकानात. तू उभा का? बस की.’‘म्हणजे तुमचं दर्शन झालंय..’

‘माझं तरी झालंय.. अन् माधवला इंटरेस्ट शून्य! तो कसला येणार देवळात. पक्का नास्तिक म्हणवतो स्वत:ला. या वैज्ञानिक लोकांची गंमत असते. या विश्वनिर्मितीमागे, ते युगानुयुगं अथक चालण्यामागे काही शक्ती आहे असं मानणं, हे अवैज्ञानिक समजतात. पण विज्ञान कशातून आलं, या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांच्याजवळ नसतं. काही मानणं आवश्यक असतं, तसं मानलं तर भक्तीतूनदेखील त्या शक्तीचा अनुभव घेता येतो. विज्ञानाला हे अमान्य. मूळशक्तीचा शोध तसाही निरंतर चालूच राहणार.. मार्ग वेगळे एवढंच. पण माधव माझ्यासाठी इथवर आला.. नेहमीच येतो. आईवर श्रद्धा असणारा माणूस नास्तिक कसा, तूच सांग..’ असं म्हणून त्या मनमोकळं हसल्या.

विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळीही असंच. मतदानाला सकाळी साडेआठ वाजताच म्युनिसिपल शाळेत द्रविडआजी हजर. बरोबर माधव आणि राधिकावहिनी. आजींना पाहून मतदानवर्गाच्या दरवाजावरील हवालदार म्हणाला, ‘आज्जी, तुम्ही या पुढे.’ आम्ही मत देऊन बाहेर पडत होतो, पण थांबलो. आजी मतदान करून आल्या.
‘चला आजी, तिथं झाडाखाली बसू, माधव येईपर्यंत.’ कट्टय़ावर सावलीत बसल्यावर आजींना म्हटलं, ‘आजी, या वयातदेखील मतदानाला यायचा तुमचा उत्साह पाहता, आपल्या लोकशाहीला मरण नाही हे निश्चित! पण हल्लीचं राजकारण पाहता अजूनही तुम्हाला मतदान करावंसं वाटतं?’

‘खरं सांगू.. माझ्या उत्साहाचं म्हणशील तर एक गंमत सांगते. गेल्या लोकसभा निवडणुकीला माझं नावच व्होटिंग लिस्टमधून ‘डिलीट’ झालं होतं! मत नाही देता आलं. माधवनं नंतर सगळे सोपस्कार अन् खटपट केल्यामुळे आज तरी मी मतदान करू शकले! आता या वयात मत देऊन काय करायचं आहे, असं तोदेखील म्हणाला नाही अन् मलादेखील कधीच वाटलं नाही.. आता हल्लीच्या राजकारणाविषयी म्हणशील तर, अगदी स्वतंत्र भारतातील पहिल्या निवडणुकीपासून आत्तापर्यंत इतक्या वर्षांत इतके सगळे प्रकार पाहिलेत! तेव्हा काय उमेदवारांची प्रत होती.. अन् आताची ही अवस्था झालीय, की ‘नोटा’ म्हणजे ‘नन ऑफ द अबोव्ह’ – वरीलपैकी कुणीही लायक नाही- या पर्यायाची गरज भासू लागली! राजकारण्यांना त्याचंदेखील काही वाटेनासं झालं आहे. पॉलिटिक्स लाइक क्रिकेट, इज नो मोअर ए जंटलमन्स गेम. बेटिंग-फिक्सिंग, घोडेबाजार.. दोन्हीकडे सारखंच. नथिंग लेस. पावित्र्य कुठेही उरलं नसलं तरी आपण आपलं मतदानाचं कर्तव्य बजावायचं.. अन् त्याला पवित्र कर्तव्य म्हणायचं! किती लज्जास्पद अवस्था आहे नाही? कधीतरी निश्चित वाटतं, वुई आर हेल्पलेस.. पण जगभर जे चाललंय ते पाहता वाटतं, आपल्याकडे तरी लोकशाहीला पर्याय नाही.. कधीतरी परिस्थिती निश्चित सुधारेल.. बट व्होट वुई मस्ट!’ असं म्हणत स्वत:शीच हसल्या अन् पुढे म्हणाल्या, ‘मी पण सकाळी सकाळी ‘शाळा’ घ्यायला लागते हल्ली. असं होता कामा नये.. चला, आले माधव अन् राधिका.. शाळा संपली, पण मूळ स्वभाव काही जाईना!’ असं म्हणत त्या हसतच उठल्या.

मात्र महिन्याभरातच विचित्र घटना घडली. द्रविडआजी कसल्याशा इन्फेक्शननं आजारी पडल्या. आठ दिवस त्यांचं खाली उतरणं बंद झालं. अन् एक दिवस सकाळी कामतांच्याकडून काही जणांना फोन गेला सोसायटीत, द्रविडआज्जी गेल्याचा. हा धक्काच होता. वय झालं होतं तरी त्या सिरियस वगैरे असल्याची बातमी नव्हती. असं एकदम अचानक.. काही मंडळी त्यांच्या घरचा जिना चढू लागली. राधिकावहिनींनीच दार उघडलं. अन् सर्वाना एकत्र पाहून हसतच त्यांनी स्वागत केलं. ‘अरे वा वा, या आत या.. एकदम सगळे इतके, अन् तेही अचानक.. काही विशेष? बसा ना सगळे. बोलावते यांना..’ असं म्हणून त्या आत माधवरावांना बोलवायला गेल्या. अन् आतून चक्क द्रविडआजीच बाहेर आल्या! सगळे चक्रावलेच.
‘अरे बसा की सगळे.. उभे का?’ शेवटी द्रविडआजींनीच झोपाळ्यावर बसत सगळ्यांना बसायला सांगितलं. ‘कशा आहात तुम्ही आजी?’

‘मला काय धाड भरलीय? हे इन्फेक्शन-बिन्फेक्शन किरकोळ आहे. उगाच गोळ्या खायच्या अन् पडून राहायचं.. कंटाळा आलाय अगदी. त्यात आमचा टी.व्ही. बंद पडलाय कालपासून. संदेशला निरोप पाठवलाय मघाशीच.. हा काय आलाच की!’ दारात सोसायटीचा इलेक्ट्रिशियन संदेश साबळे उभा. त्यानं एकूण परिस्थितीचा अंदाज घेतला अन् पुढं होऊन आजींचे चक्क पाय धरले.. अन् हमसून रडू लागला. कुणालाच काही कळेना. ‘अरे अरे, हे काय करतोयस संदेश, काय झालं काय?’ ‘भयंकर चूक झाली माझ्याकडून, आजी.’ अन् हमसतच त्यानं घडलेलं सारं कांही सांगितलं. त्या दिवशी सकाळी सोसायटीत तो येत असताना राधिकावहिनी बाल्कनीत उभ्या होत्या, संदेशला पाहून त्यांनी त्याला डोळ्यावर चष्म्यासारखी गोलाकार बोटं करून, ‘गेल्याची’ खूण केली. तो हबकला. कालच त्यांच्याकडे गिझर दुरुस्त करून आला होता, तेव्हा त्याला द्रविडआजींची तब्येत बरी नसल्याचं दिसलं होतं. अन् त्यांतही त्यांनी त्याला विचारलं, ‘काय रे संदेश, बायकोची तारीख जवळ आली असेल ना?’
‘होय आजी, येत्या रविवारची तारीख आहे.’

‘अरे मग इथं काय टाइमपास करतोयस? पळ सासुरवाडीला.. तिची काळजी घ्यायला!’ तेव्हापासून सतत डोक्यांत बायकोचीच काळजी.. राधिकावहिनीला ‘येतो’ सांगितलं. त्याचं कामतांच्या घरी काम चालू होतं. ते संपलं की तो सासुरवाडीला पळणारच होता. पण त्या खुणेचा त्याने लावलेला अर्थ इतरांपर्यंतही पोहोचला.

मात्र गोंधळ तिथून सुरू झाला! ‘टी.व्ही. गेल्या’च्या राधिकावहिनींच्या खुणेच्या भलत्या अर्थामुळे झालेला घोटाळा! एव्हाना राधिकावहिनी अन् माधवरावदेखील बाहेर आले. सुरुवातीला तेदेखील गोंधळलेले, पण नंतर त्यांनाही परिस्थितीचा अंदाज आला. तरी सगळे सुन्न होऊन गप्प. शेवटी आजींनीच संदेशच्या पाठीवर हात फिरवत, त्याला शांत करत बोलू लागल्या.. ‘अरे संदेश, तू कशाला एवढं ओशाळतोस? तू मुद्दाम थोडंच हे सगळं केलंस? छोटय़ा-मोठय़ा चुका तर सगळ्यांच्याच हातून होतात. मागे मतदार यादीतून माझं नाव ‘डिलीट’ झालं होतं, नंतर पुन्हा आलं. काही काळ तसंच झालं असं समजायचं. अन् माझं तर आयुष्य वाढणारच की आता.. ! हल्लीच्या भाषेत सांगायचं तर, सगळं ‘मेमरीतून डिलीट’ कर विसरून जा, अन् पळ सासुरवाडीला. आणि आता चांगला ‘संदेश’ घेऊन ये. असे चुकीचे संदेश नकोत आता. खरं की नाही राधिका?’’
सुनेकडे मिश्किलपणे पाहात आजींनी विचारलं. राधिकावहिनीदेखील त्यांनी दिलेल्या ‘सिग्नल’चा परिणाम पाहून अवाक् झाल्या होत्या, त्या सावरल्या. तेवढय़ात संदेशचा मोबाइल वाजला. फोन संपताच डोळे पुसत आजींना म्हणाला, ‘आजी, मुलगी झाली!’

‘अरे वा! पाहिलंस, तिथं तुझ्या मुलीचा जन्म अन् इथं तुझ्यामुळे माझा पुनर्जन्म ! पळ आता.. पहिली बेटी, ‘ज्ञानाची’ पेटी.. लक्षात ठेव.’ संदेश आजींना वाकून नमस्कार करून, मागे वळून न बघता धूम पाळला!
‘म्हणजे आजी, आता तुमची सेन्चुरी नक्कीच होणार..!’ कुणीतरी म्हणालं.
‘अन् मीसुद्धा वेळेवर पूर्ण करणार.. शंभराव्या शतकासारखी वाट पाहायला नाही लावणार! पण हे सगळं उपरवाल्या थर्ड-अम्पायरच्या हातात! सध्या तरी त्याचा निर्णय ‘द्रविड नॉट-आउट’!’ द्रविडआजींच्या या नव्यानं घेतलेल्या ‘गार्ड’मुळे वातावरण निवळलं अन् सगळे हसत बाहेर पडले. अन् जन्म-मृत्यूच्या घडलेल्या या झोक्यांचा अर्थ लावीत, द्रविडआजी मंद झोका घेत राहिल्या..
pbbokil@rediffmail.com