पारिजातकाचा मंद दरवळ पसरला होता. निशिगंधाचे तुरे ताठ उभे होते. रामफळ, आंबा, कढीपत्ता, लिंबू, सीताफळ, सगळीकडे हिरव्यागार झाडांची तालबद्ध सळसळ जणू माझ्या स्वागताला सज्ज होती. माझी घरवापसी आनंददायी करण्यात या सगळ्यांचा किती मोलाचा वाटा आहे हे माझ्या लक्षात आले.

सॅनफ्रान्सिस्को विमानतळावर विमान थांबलं. हवाई-सुंदऱ्यांना हाय- हॅलो करत मी विमानाच्या बाहेर पडले. लगेचच इमिग्रेशन काऊंटर गाठलं. पासपोर्ट तिथल्या कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केला. अन् वाट बघत उभी राहिले. पासपोर्ट हातात पडताच मी अधीरतेनं बघितलं, कोणती तारीख पडलीय ते. त्यानुसार मला राहायला मिळणार होतं ना! अपेक्षेसारखीच परवानगी मिळाली होती. हुश्य करत आनंदातच मी सामान घेऊन बाहेर पडले. गेटवर वृषाली, संजय, चैत्राली अन् मुलं माझी वाट पाहत उभी होती. नातवंडांना खूप आनंद झाला आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं. कारण त्यांची उन्हाळ्याची सुट्टी आजीबरोबर जाणार होती.

सुटीत काय काय करायचं याचे सगळे प्लॅन तयार होते त्यांचे. मलासुद्धा मुलांबरोबर राहायला मिळणार याचा आनंद होताच की. जेट लॅग गेल्यावर आमचे ठरलेले कार्यक्रम सुरू झाले. कधी आऊटिंग, कधी बोर्ड गेम्स, तर कधी बॅकयार्ड कॅम्पिंग. शिवाय मराठीचे क्लासेस तर होतेच त्यांच्या यादीत. दोन महिने कसे भरकन् निघून गेले ते कळलंच नाही. मुलांच्या शाळा सुरू झाल्या. त्यांचं रुटिन सुरू झालं. लगोलग सणावारांची गर्दी सुरू झाली. श्रावण, गणपती, गौरी, नवरात्र की लगेच दिवाळी. तिकडचेही सण होतेच. हॅलोविन आणि थँक्स गिव्हिंग. आपली दिवाळी झाली अन् थँक्स गिव्हिंग आलं. तो सण आला अन् माझ्या पोटात कालवाकालव व्हायला सुरुवात झाली. कारण त्यानंतर मला निघायचं होतं. जसजसा निघायचा दिवस जवळ यायला लागला तसा मुलांचा चेहरा बघण्यासारखा व्हायला लागला होता. ओमला त्यांचे विशेष गांभीर्य नव्हते, पण श्रीराम मात्र हिरमुसला होता. वरचेवर मला म्हणायचा, ‘‘आजी, तू इकडेच का येत नाहीस राहायला.’’ रोज एकदा तरी त्याचे ‘आय विल मिस यू’ हे वाक्य ठरलेलं असायचं. माझा जीव पण गलबलून जायचा. पण काय करणार, कायद्यापुढे कोणाचंच चालत नाही ना तिथे! शेवटी माझा भारतात परतायचा दिवस उजाडला. मुद्दामच मुलांना विमानतळावर नेलं नव्हतं. सगळे सोपस्कार पूर्ण करून मी विमानात बसले. डोळ्यासमोर औरंगाबादचं घर तर येत होतं. पण जायला नकोही वाटत होतं. मनात येत होतं, कुणासाठी जातेय मी तिथे? कोण माझी वाट बघतंय?

मला आठवलं, मृणालच्या लग्नानंतरच पहिला अधिक महिना होता. तिला माहेरी यायला जमणार नव्हतं. म्हणून मीच अधिकाचे वाण घेऊन एकटीच दिल्लीला गेले होते. परत आले तेव्हा रेल्वेस्टेशनवर हे मला घ्यायला आले होते. तेव्हा काय किंवा मी पंढरपूरच्या वारीहून परत आले तेव्हा, यांच्याकडे पाहून असं वाटत होतं, ते माझी किती आतुरतेने वाट बघत आहेत. म्हणालेसुद्धा तसं ते, ‘‘घर नुसतं खायला उठलं होतं.’’
खरंच, मनापासून कुणी तरी आपली वाट बघतंय या कल्पनेनेच किती छान वाटतं ना!

पण आता तसं काहीच नव्हतं. वाट बघणारं कुणी नव्हतंच ना! तरीसुद्धा घरी जावंच लागणार होतं. त्याच विमनस्क अवस्थेत संपूर्ण प्रवास झाला. व्हाया हैदराबाद मी औरंगाबादला घरी आले. गेली ८ वर्षे एकटं राहायची जरी सवय होती तरी यावेळेस नको वाटत होतं. मी घरी आल्यावर नलूबाईंना (माझ्या घरच्या मावशीबाईंना) म्हटलंसुद्धा तसं. माझी कोण आतुरतेने वाट बघतंय आता? पटकन् त्या म्हणाल्या, ‘‘बाई, असं का म्हणताय? मी बघत होते ना तुमची वाट! मला तरी तुमच्याशिवाय कोण आहे. मी कोणाजवळ माझं सुख दु:ख सांगू हो, ६ महिने मी कसे काढले माझं मला माहीत.’’ दुखऱ्या मनाला नलूबाईंच्या बोलण्यामुळे दिलासा मिळाला.

रात्री अंथरुणावर जेव्हा पडले, तेव्हा कसले तरी भास मला व्हायला लागले. वाटलं कुणीतरी बोलतंय माझ्याशी, मी अर्धवट झोपेतच होते, तरी मला जाणवलंच, घराच्या भिंती एक-एक करून माझ्याशी बोलायला लागल्या होत्या. आतापर्यंत ऐकलं होतं, ‘भिंतीला कान असतात.’ पण आज जाणवलं, भिंती बोलूही शकतात. त्या मला म्हणत होत्या, ‘‘का गं आम्ही नाही का तुझ्या कोणी? का तू मनात आणलंस असं, आपली वाट बघणारं कोणी नाही म्हणून. अगं, तुला शेवटपर्यंत साथ द्यायलाच तर उभ्या आहोत ना आम्ही! तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रसंगाच्या आम्ही साक्षीदार आहोत ना! वास्तुशांतीच्या दिवशी अभिमानाने फुललेला तुझा चेहरा आठवतोय ना आम्हाला. मुलींच्या यशाने भारावलेले दिवस, त्यांच्या लग्नात, बाळंतपणात तुझी होणारी तारांबळ, पण तरीसुद्धा तृप्तीची, समाधानाची तुझ्या चेहऱ्यावरची झळाळी आम्ही कशी विसरू? या आनंदाच्या प्रसंगात तर आम्ही होतोच पण दु:खाचे काय कमी दिवस पाहिलेत का आम्ही. या चार भिंतींचाच तुला आधार वाटला होता ना त्यावेळेस!’’ माझी त्या समजूत काढत असतानाच माझा डोळा लागला.

सकाळी जाग आली तीच मुळी कुणाच्या तरी कुजबुजीने. उठून अंगणात गेले कोण बोलतंय ते पाहायला तर शेवंती, गुलाब, मोगरा, पारिजात, कुंद, निशिगंध आपापसात बोलत होते. कान देऊन मी ऐकायला लागले, तर ते म्हणत होते, ‘‘हिला म्हणे यावेसे वाटत नव्हते. आपण वेडेच, हिची वाट बघत होतो.’’

‘‘हो ना!’’ मोगरा म्हणत होता, ‘‘हिवाळ्यात कधी माझी फुले असतात का पण ही येणार म्हणून मी मुद्दाम आलो हिच्या स्वागताला.’’ ‘‘मारे कवितातून – लेखातून उल्लेख करते आपला ‘माझे सखे सोबती’ असा. मग कुठे गेले ते सख्य?’’ शेवंती फुसफुस करत होती. कुंदालाही नुकतीच फुले यायला सुरुवात झाली होती. पारिजातकाचाही मंद दरवळ पसरला होता. निशिगंधाचे तुरे ताठ उभे होते. रामफळ, आंबा, कढीपत्ता, लिंबू, सीताफळ, सगळीकडे हिरव्यागार झाडांची तालबद्ध सळसळ जणू माझ्या स्वागताला सज्ज होती. रामफळाच्या झाडावर भारद्वाज बसला होता. माझे येणे हे जणू त्याच्यासाठीच शुभशकुनाचा संकेत होता. खारुताई आनंदाने इकडून तिकडून आपली झुपकेदार शेपटी सावरत पळत होती.

हे सगळे ‘स्वप्न म्हणू की सत्य’ पाह्यले अन् माझी मलाच लाज वाटायला लागली. कारण घर भरलेले असो वा नसो, हे सगळे जण माझी साथ करत होते अन् पुढेही करणार होते. मग मी कशी त्यांना विसरले? ‘सॉरी! मी एकटी नाही याची तुम्ही सगळ्यांनी मला किती छान जाणीव करून दिली.’ अनेक उन्हाळे- पावसाळे एकत्र घालवलेले आम्ही सारे जण पुन्हा मनाने एकत्र आलो. मायेची ऊब यापेक्षा काय वेगळी असते! मन आनंदाने भरून गेले अन् जाणवले, The less you respond to negativily The more pleasant, your life becomes.
माझी घरवापसी आनंददायी करण्यात या सगळ्यांचा किती मोलाचा वाटा आहे हे माझ्या लक्षात आले. पुन्हा अशी चूक करणार नाही ही कबुली मी त्या सगळ्यांनाच दिली; अन् पुन्हा एकदा त्यांचे आभार मानले.

– निर्मला जोशी
nmjoshi24@yahoo.com