06 July 2020

News Flash

गोड बातमी

माणूस आपल्या आयुष्यात अनेक नाती जोडतो. या अनेक नात्यांत आई-वडील, बायको, मुलं ही नातीच खरं तर त्याचं आयुष्य बनतं

manatle_kagdavar‘अहो, झोपलात का, बसल्या बसल्या?’ आजीचा आवाज ऐकून आजोबा जागे झाले. ‘नाही गं, थोडा पडलो होतो इतकंच. मुलांची वाट पाहतोय.’ आजी म्हणाली, ‘नका काळजी करू. गोड बातमी घेऊन येतील पाहा आपले अदु आणि सावनी.’ ‘गोड बातमी?’ आजोबा जरा गडबडलेच..
‘अभी ना जाओ छोडम्कर, ये दिल अभी भरा नहीं..’ रेडिओवरती गाणं चालू होतं. गाणं ऐकता ऐकता नकळत सावनीचं लक्ष आजोबांकडे गेलं. डोळे मिटून आरामखुर्चीत बसून गाणं ऐकता ऐकता त्यांच्या डोळ्यांमधून वाहणारे अश्रू पाहून तिला खूप वाईट वाटलं. त्या गाण्याने जणू त्यांना परत त्याच वळणावर नेऊन ठेवलं होतं. आजीला जाऊन जेमतेम दोन महिने झाले होते. थोडा बदल होईल म्हणून आदित्य-सावनी नुकतेच आजोबांना इथे, पुण्याला घेऊन आले होते. ५० वर्षांची आजीची सोबत आता फक्त आठवण होऊन त्यांच्याबरोबर होती. आजोबा म्हणायचे, ‘ही पैज जिंकली तुझी आजी, माझ्या आधी जायची. जाताना मला मात्र अगदी एकटं करून गेली.’
खरंच, अवतीभोवती सारे जण असूनही आजोबा एकटे होते. प्रत्येकाला काही ना काही व्याप होते, आयुष्य होतं, पण आजोबांचं काय? अगदी रितं रितं झालं होतं त्यांचं आयुष्य. आजीचा फोटो उशाशी घेऊन झोपायचे, जुनी गाणी ऐकताना हळवे व्हायचे. एके काळी काय रुबाब होता आजोबांचा, आदित्य सांगायचा ना सावनीला. त्यांची कडक शिस्त, वेळ पाळण्याची सवय, रोखठोक स्वभाव, आदरयुक्त भीती वाटायची. आता मात्र त्यांच्याकडे पाहून केवळ सहानुभूती वाटते. आजीबरोबर आदित्यचे आजोबासुद्धा हरवले होते जणू.

माणूस आपल्या आयुष्यात अनेक नाती जोडतो. या अनेक नात्यांत आई-वडील, बायको, मुलं ही नातीच खरं तर त्याचं आयुष्य बनतं आणि शेवटी आलेलं हे असं रिकामपण अगदी मोडून टाकतं त्याला. आजोबा ही असेच मोडले होते ‘आतून’ पण तरीही ‘मी ठीक आहे’, असं दाखवत होते जगाला. कोणावरती अवलंबून नको राहायला म्हणून आपण आपली सगळी कामं स्वत: करायचे. पेपर वाचणं, फिरायला जाणं इतकंच काय पण टी.व्ही.सुद्धा आजकाल पाहायला लागले होते, नाही तर टी.व्ही. हे एक कारण असायचं आजी-आजोबांच्या लुटुपुटुच्या भांडणाचं. पण आजकाल म्हणायचे, ‘हिला कसं समजणार, पुढे काय झालं ते म्हणून पाहतो मी सीरियल आणि झोपेत तिला सांगतो,’ असं म्हणून आजी पाहायची त्या सर्व सीरियल्स पाहायचे आजोबा.
सावनी आणि आदित्य खूप जपायचे आजोबांना. दोन वर्षांपूर्वी लग्न झालं दोघांचं आणि नोकरीकरता पुण्यात स्थायिक झाले दोघं. ऑफिसमधून आल्यावर आजोबांबरोबर चहा पिताना गप्पा आणि रात्री जेवणं झाल्यावर सोसायटीत आजोबांना घेऊन चक्कर मारणं, हा जणू रोजचाच पायंडा पडला होता. आजीची जागा आपण नाही घेऊ शकणार पण आजोबांना एकटं वाटू नये, याकरता दोघांची धडपड सुरू असायची.

आज सकाळपासून सावनी झोपूनच होती, जरा बरं वाटत नव्हतं तिला. आदित्यसुद्धा घरीच होता. आजोबा थोडेसे अस्वस्थ होते. ‘तुम्हा मुलांना तब्येतीची काही काळजी घेता येत नाही. वेळेवर खाणं नाही, दूध प्यायला नको. एकसारखं कॉम्प्युटरसमोर बसून काय ते काम आणि काय ती कॉफी सारखी’, आजोबा आपल्या परीने बोलत होते. आदित्य म्हणाला, ‘काय हे. कशाचा कशाशी संबंध जोडताय आजोबा. मी सांगितलं ना तुम्ही काळजी करू नका, डॉक्टरकडे जातोय ना आम्ही. बरं वाटेल औषध घेऊन.’ असं बोलून आदित्य सावनीला घेऊन गेलाही डॉक्टरांकडे आणि इकडे आजोबा मात्र येरझाऱ्या घालू लागले. दोन-तीन वेळा भास झाला म्हणून दारसुद्धा उघडून झालं, तास-दीड तास झाला होता त्या दोघांना जाऊन. आता मात्र आजोबा थकून आरामखुर्चीत बसले आणि पंख्याच्या गार वाऱ्यात त्यांचा डोळा लागला.
‘अहो, झोपलात का, बसल्या बसल्या?’ आजीचा आवाज ऐकून आजोबा जागे झाले. ‘नाही गं, थोडा पडलो होतो इतकंच. मुलांची वाट पाहतोय.’ आजी म्हणाली, ‘मी काय म्हणते, नका काळजी करू. गोड बातमी घेऊन येतील पाहा आपले अदु आणि सावनी.’
‘गोड बातमी?’ आजोबा जरा गडबडले.

आजी नेहमीच्या सवयीने म्हणाली, ‘अहो, असं काय करताय? गोड बातमी हो, गोड बातमी..’
हे ऐकताच आजोबांचा चेहरा एकदम खुलला, ‘हं..हं समजलं, समजलं मला. अरे माझ्या लक्षातच नाही आलं. उगीच ओरडलो सकाळी मुलांना, तू पणजी आणि मी पणजोबा. हा हा हा.’ आजी हे ऐकून गालातच हसली. त्या सुरकुतल्या चेहऱ्यावरती खळ्या अजूनच खुलून दिसत होत्या. समजुतीच्या स्वरात आजी म्हणाली, ‘आता तुम्हालाच काळजी घ्यायला हवी मुलांची, थोडी मदत करायला हवी घरात त्यांना, मी असते तर..’
‘हो गं, करीन मी मदत, तू नको काळजी करू,’ आजोबा बोलून गेले.
इतक्यात दारावरची बेल वाजली. एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा. आजोबा दचकून जागे झाले. ‘आलो रे आलो’ म्हणत दरवाज्यापाशी गेले. कधी एकदा दार उघडीन असं झाल होतं त्यांना.
दारात सावनी आणि आदित्यला पाहून म्हणाले, ‘काय झालं बाळा, काय म्हणाले डॉक्टर?’ आदित्य म्हणाला, ‘काही नाही आजोबा, सगळं ठीक आहे.’ आजोबांचे कान काही तरी वेगळं ऐकण्यासाठी आतुर होते. ‘अरे बोल राजा, आनंदाची बातमी आहे ना, ते सांग ना आधी.’ आजोबांच्या या वाक्याने दोघंही गडबडले. आदित्य म्हणाला, ‘आजोबा तुम्हाला कसं माहीत?’ हे ऐकून आजोबा अजूनच खूश झाले, ‘म्हणजे खरं आहे तर. वा. वा. वा, अरे हेच तर ऐकायचं होतं मला. आताच ही सांगून गेली मला की, मी पणजोबा होणार आहे.’ असं म्हणत आजोबांनी आदित्यचा हात हातात घेतला. डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या झाल्या होत्या, त्या पुसत म्हणाले, ‘सावनी-आदित्य, खूश राहा बेटा.’ असं म्हणून ते देवघराकडे गेले. आजीचा आनंदी चेहरा सारखा समोर येत होता. देवाचे मनापासून आतून आभार मानायचे होते त्यांना, कारण पुढे चालण्याकरता एक आशेचा किरण दिला होता त्याने. येणाऱ्या चिमुकल्या पिलाच्या ओढीने जगायला नवीन उमेद मिळाली होती. कालपर्यंत जगण्याची इच्छा नसलेले आजोबा आज मात्र उद्याच्या स्वप्नांत केव्हाच हरवून गेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2016 1:55 am

Web Title: story of grandfather 2
टॅग Chaturang
Next Stories
1 टबुली
2 झुम्बा हो हो हो..
3 दुसऱ्याला ‘चील’ करताना..
Just Now!
X