|| सुचित्रा साठे

एका सुमुहूर्तावर डोक्यावर अक्षता पडल्या आणि ‘ती’ सासरी गेली. नवं वातावरण, नवी माणसं, नवीन पद्धती, नव्या आवडीनिवडी या सगळ्याचं तिच्या मनावर थोडंसं दडपण आलं. ‘सगळ्यांची मर्जी संपादन कर. कोणाला दुखावू नको. प्रत्येक गोष्ट विचारून कर. उलट बोलू नकोस. जबाबदारीने वाग,’ आईने सूचनांची पारायणं केली होती. कुठं तरी नियमांमध्ये अडकल्यासारखं, जखडल्यासारखं वाटलं तिला आणि त्या क्षणी आईवडिलांची, त्या घरातील ऐच्छिक स्वातंत्र्याची प्रकर्षांने आठवण झाली, ‘माहेर’ जन्माला आलं.

मधुचंद्राहून आल्यावर दोन दिवस ‘जाणार आज मी माहेराला’ असं गुणगुणत ती माहेरी आली, गालावरून मोरपीसच फिरलं. सासरी गेल्यावर ही माहेरची ऊब तिला जाणवायला लागली. कारणाकारणाने ती माहेरी जात राहिली. कोणाच्याही वागण्या-बोलण्यात काहीही फरक नव्हता. बागडताना ‘कोण काय म्हणेल’ हाही प्रश्न नव्हता. तरीही ‘आता हे माझं घर नाही’ या भावनेची अस्पष्ट रेषा तिला स्पर्श करायची. थोडा परकेपणा वाटायचा, सत्ता गेल्यासारखं जाणवायचं. मनाचे खेळ आहेत असा विचार करत माहेरी जाऊन ‘ती’ चार्ज होत राहिली..

पुलावरून बरंच पाणी गेलं. हळूहळू माहेरची ओढ कमी झाली. पितृछत्र हरपलं. भावंडांचे संसार मार्गस्थ झाले. स्वत:च्या भक्कम आधारावर घराचा डोलारा सांभाळणारी आई थकत चालली. तिला एकटीला घरी ठेवून भावंडांना कुठेही जाता येईना. ‘‘अरे, आईला माझ्याकडे पाठवा की’’ तिनं सुचवलं आणि आईसकट सगळ्यांनी एकमुखाने मान्य केलं. ती आईला आणायला गेली. बघते तर आई अगदी जय्यत तयारी करून तिची वाट बघत बसलेली होती. ‘दोन-तीन पातळं, चष्मा, तो ठेवायचं कव्हर, दातांचा डबा, नातीनं दिलेली पर्स, त्यात नोटांची भेंडोळी, सुपारीचा डबा, भजनाची डायरी, पेन,’ तिला बघताच आईने ‘या पिशवीमध्ये दडलंय काय’ याचा गौप्यस्फोट केला. रिक्षाने दोघी आल्या. तिच्या घरात पाऊल टाकताच ‘इथे ठेव गं पिशवी. दातांचा डबा लागतो मला अधूनमधून कवळीची काढ-घाल करायला,’ आईने कारण सांगत पिशवीची आणि दातांच्या डब्याची सोईस्कर जागा निवडली. पहिल्यांदाच राहायला आली असली तरी आपण कुठेही काहीही ठेवू शकतो, त्याचं मनमुराद स्वातंत्र्य आपल्याला आहे याची जणू आईला खात्री होती, त्यामुळे कृतीत मोकळेपणा होता. ठेवू का, करू का, ही साशंकता नव्हती. हळूहळू सगळ्या खोल्यांतून आई फिरून आली. खिडकीतून दिसणाऱ्या झाडांची दखल घेतली गेली. शेजारी कोण राहातं, याची ऐकीव माहिती आईला होती; पण आपण लेकीकडे राहायला आलोय ही बातमी देण्याची ‘वृद्धसुलभ’ उत्सुकता होती म्हणून बाल्कनीतून अंदाज घेण्याचा प्रयत्नही झाला; पण एसीमुळे शेजारी कडेकोट बंदोबस्त होता. ‘आपण उद्या त्यांना भेटू हं!’ तिनं आईला आश्वस्त केलं. समाधानाचं चांदणं फुललं. थोडय़ा वेळाने तिचा नवरा आला. आल्या आल्या त्यानं सासूबाईंना आदरानं नमस्कार केला. आईच्या नजरेतलं जावयाबद्दलचं कौतुक तिनं हळूच टिपलं.

ती स्वयंपाकाला लागली. सासूबाई आणि जावई यांच्यात ‘संवाद’ रंगू लागला. ‘पंखा बारीक करू का असू दे’, ‘कोणती मालिका बघता रोज ती लावू या’, ‘बरं वाटलं तुम्ही आलात म्हणून’ असं म्हणत तिच्या नवऱ्यानं अगत्य दाखवलं. मालिकेतला कालचा कथाभाग, आज काय घडणार याविषयी अंदाज, उत्सुकता, कोणाला प्रत्यक्षात तसा आलेला अनुभव, पडद्यावरच्या संवादाला आईचा तत्पर प्रतिसाद, त्यात ‘आमच्या वेळी असं होतं किंवा नव्हतं’ची खरखरणारी रेकॉर्ड, अशी एकाच वेळी लागलेली दोन रेडिओ स्टेशन्स ती आत काम करता करता ऐकत राहिली. नात्याचा वयाचा आदर ठेवून ‘आईसाठी’ असं स्वागताचं ‘रेड कार्पेट’ अंथरणाऱ्या नवऱ्याबद्दलच्या अभिमानानं तिचा ऊर भरून आला. जेवणाची अंगतपंगत झाली.

तिला आईच्या आवडीनिवडी माहीत होत्या. त्यामुळे रोजच्या नियमांना फाटा देत गोडाचा शिरा, कोरडी चटणी, इडली, डोसा, गोळ्याचं सांबार, वाटली डाळ, भोपळ्याचे घारगे, तिखटामिठाच्या पुऱ्या असा तिनं मेनू कार्डात बदल केला. प्रसन्न हास्यातून आईनं मोकळी दाद दिली.

‘मी तुझ्याकडे आलेय तर जवळपास राहणाऱ्यांना बोलाव’ ही आईच्या मनातली सुप्त इच्छा तिनं न सांगता ओळखली होती. तशी फोनाफोनीही झाली. ‘आपली’ माणसं येणार म्हणून, ती आली म्हणून आणि ती भेटून गेल्यानंतरही त्या भावनेच्या ओलाव्यानं आईच्या मनाला तरतरी आली. दिवसाला आठवणीचं कोंदण लाभलं. लहान मूल जसं आईच्या पदराला धरून घरभर फिरत राहातं तसं तिची आई तिच्या मागे मागे करत राहायची. ती स्वयंपाक करत असली की तिथे स्टुलावर बसून बोलत राहायची. पोळ्या करताना जवळ येऊन उभी रहायची. ‘मी घासू का गं पाणी प्यायची भांडी’ म्हणत ‘नको’ म्हटलं तरी भांडय़ाशी खेळत राहायची. ‘आपण आयतोबा नाही, मदत केली’ याचं आईला सार्थक वाटायचं. ती आईच्या या आनंदावर विरजण घालायची नाही.

कामं आटोपून ती रिकामी बसली की आईला लगेच भजनाची वही आठवायची. ही दोन भजनं उतरवून ठेव गं, म्हणत तिच्या मैत्रिणीने दिलेले कागद आई तिच्या हातात सरकवायची. ‘आज देवळात अमुकअमुक बाईंचं भजन, कीर्तन आहे. शेजारी राहणाऱ्या आजींना माझी आठवण येईल. आम्हाला एकमेकींची सोबत असायची’ आठवणींची साखळी लांबत जायची. मग घराचंच देऊळ व्हायचं आणि तीन-चार भजनं म्हणून दाखवायची. तेव्हा आईला बरं वाटायचं. संध्याकाळी जवळच्याच मंदिरात रिक्षाने जाऊन यायचा ठराव त्याच वेळी पास व्हायचा. रिक्षानं जाऊन येण्याइतकं अंतर नसतानाही मंदिरात नेऊन आणण्याचे आणि तेही रिक्षाने असे आईचे दुप्पट लाड ती आवर्जून करायची आणि आईलाही ते आवडायचं. मात्र अगदी घरापर्यंत रिक्षा न आणता गेटातच थांबवून चार पावलं हळूहळू चालत यायचं, असा तिचा आग्रह आई मोकळेपणाने मान्य करायची. त्यामागे आणखी एक रहस्य होतं. कोणी ना कोणी वाटेत भेटायचं. मग ‘लेकीकडे राहायला आलेय’ हे सांगताना आईचा चेहरा उजळून निघायचा. सगळ्यांच्या ओळखी व्हायच्या. दोन-चार शब्दांची देवाणघेवाण व्हायची.

एक दिवस पातळ खरेदी व्हायची. ती आईला देवळात बसवून दुकानांत जाऊन यायची. फॅन्सी रंग, बारीक काठ, प्युअर कॉटन या अटी दुकानदारालाही पाठ होत्या. ती बरेच फोटो काढून आणायची. ‘अगं बाई, सगळं दुकानच घरी आलं की,’ आई आश्चर्यचकित व्हायची. मग साडीच्या निवडीचा मनोरंजक कार्यक्रम व्हायचा. ती सगळे फोटो झूम करून दाखवायची. प्रत्येक फोटोवर टिप्पणी तयार असायची. ‘हा रंग नको, असे काठ झालेले आहेत, याचं डिझाईन फारच गिचमिड आहे, हा केवढा मोठा छाप आहे, मोठय़ा चौकटी बटबटीत दिसतात, काठाचं वजन फार आहे, पदर कसा आहे.’ डिझाइन्स पसंत पडायची, पण रंग सारखे व्हायचे. निवडीला असे अनेक पदर सुटायचे. मस्त टाइमपास होऊन पुन:पुन्हा बघून साडय़ा ठरायच्या. ती लगेच घेऊन यायची; पण पुन्हा अदलाबदल व्हायची. ‘ब्लाऊजपीस पांढरे आणि एक मीटर आण हं!’ आईच्या सूचनेने साडय़ा खरेदीला पूर्णविराम मिळायचा.

चार-पाच दिवस भुर्रकन् उडून जायचे. आईला जाण्याचे वेध लागायचे. ‘राहा की आणखीन..’ ती आग्रह करायची. ‘नको बाई, चार दिवस बरं वाटतं, माहेरी आल्यासारखं,’ म्हणत आई पिशवी भरायला लागायची. निरोपाची घटिका हुरहुर लावायची. ‘या पुन्हा’ तिचा नवरा आवर्जून सांगायचा. आई सद्गदित होऊन मान हलवायची. तिच्या मनाच्या पार्श्वभूमीवर शब्द झोके घ्यायचे.

..आईच्या माहेरासाठी, लेक सासरी नांदते..

chaturang@expressindia.com