News Flash

एक नजर

‘‘या वेळीच ही मागच्या बाजूची खोली मिळाली हं आपल्याला.

‘‘या वेळीच ही मागच्या बाजूची खोली मिळाली हं आपल्याला. नाहीतर कायम पुढच्या बाजूची मिळत असते.’’ सुधामावशीचा हा तक्रारीचा सूर ऐकून आभा तिला समजावत म्हणाली, ‘‘हरकत नाही गं, मावशी. इथे जास्त शांत वाटतंय बघ. तशीही समोरच्या बाजूला खूपच गजबज असते.’’

‘‘ ते झालंच गं. पण सवय झालीय ना गं इतक्या वर्षांची.’’

वर्षांनुर्वष मावशी या आश्रमात येत होती. बरेचदा आभा देखील यायची तिच्याबरोबर. आभाने खिडक्या उघडून एक मोकळा श्वास घेतला आणि खोलीचं निरीक्षण केलं. दोन्ही खोल्यांमध्ये काहीच बदल नव्हता. ही खोलीदेखील आटोपशीर होती. दोन समोरासमोर पलंग आणि त्यांच्यामध्ये एक टेबल व खुर्ची. कोपऱ्यात छोटा टीपॉय ठेवलेला होता. आभाने मावशीची बॅग टेबलावर आणि तिची स्वत:ची बॅग टीपॉयवर ठेवली.

‘‘मावशी, तू होतेस फ्रेश की मी आधी जाऊ?’’

‘‘ नाही गं, तूच जा. तो लांबलचक रस्ता आणि ते जिने चढून दमलेय मी. थोडीशी विश्रांती घेऊन मग मी फ्रेश होते.’’

‘‘सावकाश अगं. यावर्षी गाडी अगदी वेळेवर आल्यामुळे दरवर्षीपेक्षा लवकरच पोहोचलोत आपण.’’ असं हसत हसत बोलून आभा निघून गेली.

सुधामावशी डोळे मिटून पडून राहिली. तरुणपणी कामानिमित्त फिरतीवर असताना हा नाशिकजवळील आश्रम जेव्हा तिला दिसला होता; तेव्हा ती या आश्रमाच्या अगदी प्रेमात पडली होती. शिस्त, शांतता, स्वच्छता याचीच मोहिनी खरं तर जास्त होती. आध्यात्मिकतेची आवड नसतानाही मग दरवर्षी ती इथे येत राहिली होती. आभा म्हणजे जणू तिचं शेपूटच. धाकटय़ा बहिणीची, मेधाची, लाडकी लेक आणि तिची पण लाडकी भाची-लेक.

सुधाने आजन्म लग्न न करता राहायचा तिचा निर्णय जाहीर केल्यावर घरात बराच गहजब झाला होता. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. मग धाकटीने, मेधाने, शोधलेल्या मुलाबरोबर, सुनीलशी, आईबाबांनी मेधाचं लग्न लावून दिलं होतं. आभाच्या जन्मानंतर सगळंच वातावरण पालटलं. खरी आई कोणती हे कळणार देखील नाही इतकं प्रेम ही मावशी करत होती, जणू माया उधळत होती अगदी आभावर. सुनील आणि मेधा यांना तिच्या निष्पाप प्रेमाची पूर्ण जाणीव असल्यामुळे कसलीच आडकाठी ते करत नसत. मेधाच्या बाजूचं घर जेव्हा विकायला काढलं तेव्हा थोडं महाग असूनही किंचितही विचार न करता मावशीने ते घर विकत घेतलं होतं. सुनील आणि मेधाला खूप आनंद झाला होता. त्यांना वाटलं होतं की आता गरज पडल्यास, एकटेपणा दूर घालवायला, आपण आहोत सुधासाठी. परंतु त्यांना काही विशेष करावंच लागलं नाही. ते काम आभाने सहजगत्या चोख बजावलं होतं.

आभा फ्रेश होऊन आल्यामुळे आता मावशीला उठून जावंच लागलं. साठीची मावशी आभासाठी तरुणच होती. लाडात ती कित्येकदा मावशीला ‘सुमू’ अशी हाक मारायची. आभाला दहावीनंतर आर्ट्सला अ‍ॅडमिशन घ्यायची होती तर आईबाबांना ते पटवून द्यायला मावशीच उपयोगी पडली होती. तिघांनीही आभाला वाढवताना कसल्याच गोष्टींची उणीव कधी तिला भासू दिली नव्हती आणि तरीही अतिशय शिस्तीत तिला वाढवलं होतं. फाजील लाड कसलेच केले नव्हते.

मावशी मस्त सुती सलवार कुर्ता घालून तयार होऊन आली. दोघीही आश्रम परिसरात फिरायला बाहेर पडल्या. आश्रमात मध्यभागी प्रार्थना मंदिर आणि डावीकडे व उजवीकडे राहायची व्यवस्था. मागच्या बाजूला ऑफिस, वाचनालय व भोजनालय. मंदिरासमोर विस्तीर्ण बाग. अनेक डेरेदार वृक्ष. त्या वृक्षांच्या मुळाशी ऐसपस बसायला पार बांधलेला. शिवाय चालण्यासाठी मार्ग वेगळा होता. तिथली आखीव-रेखीव बाग सगळ्यांची लाडकी होती. भर माध्यान्हीसुद्धा या वनराईत सावली असल्यामुळे बरेचजण कायम कुठल्या ना कुठल्या पारावर बसलेले असत. वाचत, गाणी ऐकत, गप्पा मारत नाहीतर ध्यानस्थ. बागेच्या मधोमध पुष्पवाटिका आणि बसायला काही बाकंसुद्धा ठेवली होती.

मावशी आणि आभा पार बागेपर्यंत चालत जाऊन तिथल्या जवळच्या पारावर बसल्या. त्याच पारावर एक आजी आधीपासूनच डोळे मिटून शांत बसून होती. या दोघी आपल्याच तंद्रीत गप्पा मारत आल्या आणि त्यांच्या आवाजाने आजींनी डोळे उघडून पाहिले.

मावशीने आजीकडे पाहिल्या पाहिल्या आजीने विचारलंच ‘‘कुठून आलात तुम्ही?’’

मावशीने हसून उत्तर दिलं ‘‘मुंबई.’’

आजी खूश होऊन म्हणाली, ‘‘हो का! आम्ही ठाण्याहून.’’

एकंदरीत मावशी दिसल्यामुळे आजीची कळी खुलली असावी. एकटीच बसून ती कंटाळली होती बहुधा. मग मावशी आणि आजी गप्पा मारताहेत बघून आभाने जवळच असलेल्या तलावाकडे जाऊन यायचं ठरवलं. पण मावशीने ‘‘आज नको गं. आता काळोख होईल. उद्या आपण दोघीही जाऊ या’’ असं म्हणून तिला थोपवलं. मग आभापुढे त्या दोघींच्या गप्पा ऐकण्याशिवाय काहीही दुसरा पर्याय उरला नव्हता.

त्या आश्रमाच्या जवळ कोणताही मोबाइल टॉवर नसल्यामुळे मोबाइलला रेंज नव्हती. इंटरनेट नव्हतं. फक्त आपत्कालीन परिस्थिती असल्यास फोन करायला एक लँडलाइन तेवढा त्यांच्या ऑफिसमध्ये होता. पण सहसा इथे आल्यावर कोणालाही मोबाइलला हात लावायची पण इच्छा होत नसे. असं असूनही आल्यापासून आभाचं लक्ष एका तरुणाने वेधून घेतलं होतं. समोरच्या पारावर झाडाच्या बुंध्याला टेकून तो बसला होता. नजर एकटक लॅपटॉपवर होती.

‘‘इतक्या शांत, निसर्गरम्य परिसरात हा मुलगा लॅपटॉप घेऊन कसा बसू शकतो?’’ हा विचार तेव्हा आलाच आभाच्या मनात.

आभानं आता लक्ष आजी आणि मावशीच्या गप्पांकडे वळवलं. त्या दोघी तिच्याविषयीच बोलत होत्या. ती काय करते वगरे.

‘‘मावशी पण ना उगीच माझी स्तुती करते हो.’’ तिनं मध्येच तोंड खुपसून नाराजी व्यक्त केली.

कारण मावशीनं तिच्या गाण्याची स्तुती केल्यामुळे आजी आता तिला गाणं म्हणून दाखव असा हट्ट करत होती. शेवटी आजी अगदीच ऐकेना तेव्हा तिनं एक गाणं म्हणून दाखवलं. तिचे पक्के सूर आणि गोड आवाज यांनी लपटॉपवरची नजर देखील एक-दोनदा उचलली गेलेली तिनं पाहिली.

तिच्याही नकळत ती त्या तरुणाला कधीपासून निरखत होती. गव्हाळ, काहीसा राकट, किंचित दाढी वाढवलेला तो अंदाजे पंचविशीचा तरुण तिला आकर्षति करत होता. त्यामुळे उगीचच त्याच्या उचललेल्या डोळ्यात तिला गाण्याविषयीचं कौतुक देखील जाणवलं होतं; की भास होता तो? इथे आजी तर तिची खूपच स्तुती करू लागली.

आभाला अगदी लाजल्यागत झालं म्हणून विषय बदलायला तिनं आजीला विचारलं, ‘‘तुम्ही एकटय़ाच आल्या आहात का इथे?’’

‘‘नाही गं, तो काय, त्या झाडाखाली माझा नातू बसलाय, निनाद. त्याची परीक्षा आहे ना; म्हणून अभ्यास करतोय तो. दरवर्षी नेमानं मला घेऊन येतो तो इथे. भयंकर जीव आहे त्याचा माझ्यावर.’’

आजी त्याचं जितकं कौतुक करू लागली तितकं आभाचं आकर्षणमिश्रित कुतूहल वाढू लागलं. ती कसं विचारायचं याच विचारात असताना मावशीने विचारलंच, ‘‘काय शिकतोय तो?’’

‘‘नेव्हीत आहे.’’

‘‘त्याची कसलीशी महत्त्वाची परीक्षा आहे पुढच्या आठवडय़ात. त्या अभ्यासासाठी आलाय एक आठवडा सुट्टी घेऊन. चार दिवसांनी जाईल पुन्हा विशाखापट्टणमला.’’

आभा या मिळालेल्या माहितीवर जाम खूश झाली.

तोपर्यंत निनाद उठून आजीकडे आला आणि तिला ‘‘जाऊ या ना?’’ असं विचारत घेऊनच गेला. जाता जाता त्याची व आभाची ओझरती नजरभेट झाली. आभा मनातल्या मनात उगीचच लाजली. तिलाही आश्चर्य वाटत होतं आणि स्वत:चा रागही येत होता. हे काय नवीनच अनुभवत होती ती? लहानपणापासून इतके मित्र होते तिला आणि मोकळ्या स्वभावाची ती, असं असूनही आणि कॉलेजमध्येसुद्धा अनेक आकर्षक तरुण मुलं असूनही, ती कायम ‘या’ भावनेपासून अलिप्त राहिली होती. पण आज मात्र ओळखदेख नसलेल्या एका तरुणामुळे ती चक्क लाजत होती. तिला काहीच समजेना झालं. आणि हे गुपित कुणाला सांगूही नये असंही वाटलं. अगदी मावशीलाही.

प्रार्थनेची वेळ झाली म्हणून ती आणि मावशी मंदिराकडे जायला निघाल्या. त्या आजी आणि नातू दुरून येताना दिसले तशी आभा उगीच बेचन झाली. मंदिरात डावीकडे बायका आणि उजवीकडे पुरुष बसत. निनादची आजी या दोघींबरोबर बसली होती. प्रार्थना संपेपर्यंत आभा जसं आणि जितकं जमेल तसं निनादचं निरीक्षण करत होती. दोन-तीनदा निनादनं तिला पकडलं होतं; तेव्हा अगदी कानकोंडी झाली होती ती.

पर दिल है के मानता नहीं। क्या करे? तिला आता निनादच्या चेहऱ्यावर काहीसे मिश्किल भाव दिसले होते; की हाही भास होता?

‘‘बाप रे! याला कळलं की काय? मी तर त्यालाच बघतेय कधीपासून. प्रार्थनेतही लक्षच नाहीये माझं.’’ आभाच्या मनात आल्यावाचून राहिलं नाही.

रात्री पुन्हा काही त्यांची भेट झाली नाही आणि रात्रभर आभाला झोपही आली नाही. तिने उद्या काहीही करून स्वत: पुढाकार घ्यायचा आणि निनादशी बोलायचं असं जेव्हा मनाशी ठरवलं तेव्हा कुठे थोडा वेळ डोळा लागला तिचा. पहाटे किलबिलाटाने मुळात अर्धवट झोपेत असलेली आभा एकदम उठूनच बसली. तयार होऊन मॉìनग वॉकसाठी बाहेर पडली. सुरेख प्रसन्न कोवळी सकाळ होती. बागेच्या जॉगिंग ट्रॅकवर ती पोहोचली तर तिच्या पुढे काही अंतरावर तिला नेमका निनाद धावताना दिसला. अत्यानंदाने आभाने त्याचा पाठलाग केल्यागत धावायला सुरुवात केली. अशा धावत चार फेऱ्या झाल्या तरीही तो सतत तिच्या पुढेच राहिला. त्यांच्यातील अंतर काही घटलं नाही. आणि तो तसाच निघून गेला. आभा निराश होऊन आणखी दोन फेऱ्या मारून परतली.

‘‘काय गं? एरवी सकाळी उत्साहात असणारी तू आज अशी का कोमेजल्यागत दिसतेयेस? काय झालं?’’ मावशीने आभाचा मूड बरोबर पकडला. पण आभाने तिला ताकास तूर लागू दिला नाही.

‘‘आता नाश्त्याच्या वेळी गाठतेच निनादला’’ असं मनाशी ठरवून ती तयार व्हायला गेली.

आभा आणि मावशी दोघीही तयार होऊन नाश्त्यासाठी जात असताना गेटपाशी एक टॅक्सी आलेली बघितली. फार थोडय़ा जणांसाठी, तब्येतीची कुरबुर असेल तर, ही सोय मिळत असे.

‘‘कोण बरं आलं की चाललं परत?’’ असं मनात म्हणेपर्यंत निनाद एका हाताने आजीचा हात धरून आणि दुसऱ्या हातात बॅग घेऊन टॅक्सीकडे जाताना दिसला. आभाला नीट अर्थबोध होईपर्यंत ते दोघंही टॅक्सीपर्यंत पोहोचले होते. निनादने मागच्या सीटवर बॅग ठेवली आणि आजी बसल्यावर दरवाजा बंद करून तो पुढच्या सीटवर बसला. टॅक्सी सुरू होताना एकवार आश्रमकडे पाहिलं तर त्याला आभा दिसली. एकटक त्याच्याचकडे बघत होती. तिची नजर बरंच काही बोलत होती. यावेळी तोही नजर ढळू न देता तिच्याकडे बघत राहिला. अगदी पार नजरेआड नजर होईपर्यंत..

मावशीचं लक्ष निनाद आणि आभाकडे गेलं आणि ती जे समजायचं ते समजून चुकली. पण आभाप्रमाणेच तिलाही त्यांची फारशी काही माहिती नव्हती. मावशीचा जीव आभासाठी तुटला. तिच्या लाडक्या आभासोबत आता केवळ राहिली होती ती ‘एक नजर’!

– उल्का कडले

ulkakadlay@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 12:52 am

Web Title: the love story of abha
Next Stories
1 ‘कानडा हो विठ्ठलू कर्नाटकु’?
2 आयुष्याचं प्रत्येक पाऊल..
3 एक प्रवास.. आठवणींचा
Just Now!
X