News Flash

आठवणीत तुझ्या

माझी लहान बहीण, कर्करोगाने गेली. पण या जीवघेण्या रोगाशी शेवटपर्यंत लढली.

माझी लहान बहीण, कर्करोगाने गेली. पण या जीवघेण्या रोगाशी शेवटपर्यंत लढली. आमच्या आठवणीत ती कायम जिवंत राहील. पण काही गोष्टींची खंत राहूनच गेली. तिला जाऊन वर्ष होत आहे. त्या निमित्ताने तिला वाहिलेही ही आदरांजली..

आज तुझी फार आठवण येते गं. तशी तर रोजच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत येतच असते. तू होतीस तेव्हा तुझ्या मेसेज, फोनशिवाय कुणाचाही वाढदिवस साजरा झाला नाही ना सण साजरे झाले. आज तू शरीराने नसलीस तरी मनाने सदैव जवळच असणार आहोत, हे सत्य आहे. तुला जाऊन वर्ष होत आलंय. कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगाशी तू शेवटपर्यंत लढलीस. खरंतर ज्या दिवशी तुला कर्करोग झाला, तेव्हा तू निम्मी खचून गेली होतीस. पण तरीही लढत राहिलीस शेवटपर्यंत.. आमच्यासाठी. आज राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं. तुझ्याबाबतीत आम्ही कमी नाही ना पडलो.. तुझ्यावर वेळीच योग्य उपचार झाले असते तर?

सुरुवातीला तुला फक्त स्तनाचा कर्करोग झाला होता, पण योग्य उपचाराअभावी पसरत जाऊन फुप्फुसात गेला. तेव्हा खरं तर डॉक्टरांनी आपल्याला त्याची कल्पना द्यायला हवी होती. आपण किती विश्वास ठेवला त्यांच्यावर आणि त्यांनी मात्र.. सगळेच डॉक्टर असे असतात असं मी नाही म्हणणार किंबहुना आपल्यालाही चांगला अनुभव आला आहेच. पण या बाबतीतला अनुभव खरंच वाईट निघाला. का झालं असेल असं? प्रत्येक वेळा शस्त्रक्रिया केल्यावर तुझ्यावर केमोथेरपीचे उपचार सुरू असत तेव्हा केमोथेरपीस्ट आणि त्या रुग्णालयामधले डॉक्टर यांच्यातला वैयक्तिक ईगोच जास्त जाणवायचा.

हॉस्पिटलमधले नवीन वा शिकाऊ  डॉक्टरांना तर अनेकदा रुग्णांच्या सुखदु:खाशी काहीही घेणे देणे नव्हते असंच वाटायचं. त्याचं अलिप्त असणं आपण समजू शकतो मात्र बेफिकिरी? बरेच वेळा एका रुग्णाला तपासण्याकरिता येताना दुसऱ्याच रुग्णाची फाईल आणत. शेवटी शेवटी तुझ्या ब्लड रिपोर्टकरिता पायातून रक्त काढावे लागे. मोठय़ा मुश्किलीने रक्त निघे, किती त्रास व्हायचा तुला, तरी दोनदा तुझा रिपोर्ट गहाळ झाला होता. विचारले तर उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. पुन्हा रक्त घ्यावं लागलं. त्या हॉस्पिटलच्या केमिस्टची तर अजून वेगळीच अरेरावी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांस औषधासाठी तास-तासभर उभे करत, पण दुसरीकडून औषध आणू देत नसत, शिवाय कुठल्या बिलावर सवलत तर दूरच. तीच गोष्ट हॉस्पिटलचे साफसफाई कर्मचाऱ्यांची. तक्रार कोणाकडे करणार आणि केली तर जास्तच त्रास देणार म्हणून घाबरून कोणी करत नव्हते.

बायकोच्या आजारपणामुळे हतबल झालेला तुझा नवरा, आपली लाडकी मुलगी काहीही करून बरी होईल या विश्वासावर असलेले आपले आई-पप्पा आणि आम्ही दोघी बहिणी डॉक्टर सांगतील ते उपचार तुला देत होतो, आम्ही कसेही करून प्रत्येक उपचारासाठी पैसे उभे करत होतो, अगदी बँकेचे कर्ज काढूनही, कारण आम्हाला तुला बरे करायचे होते. तुझ्या मुलाकडे बघून पुढचे उपचार करायला हो म्हणत होतो. तुला जवळपास ५ ते ६ वेळा केमो दिल्या, ८ ते ९ वेळा रेडीएशन दिले. दरवेळी केमो सुरू होण्याआधी तू तुझा छानसा केस मोकळे सोडून फोटो काढायचीस, नंतर उपचार घेताना केस गळत, त्यामुळे तू खूप खचून जायचीस, मला आठवतंय तू स्वत: प्रत्येक रिपोर्ट्स घेऊन यायचीस आणि मनसोक्त रडून झाल्यावर आईला धीर देत व आपल्या ८ वर्षांच्या मुलाकडे बघून खंबीरपणे पुढचे उपचार सुरू करायचीस..

पण सर्व प्रयत्न करूनही जेव्हा तुझा आजार पसरत जायला लागला, तेव्हा पुण्यातल्या डॉक्टरांनी आम्हाला मुंबईच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. टाटा हॉस्पिटलमधे गेल्यावर कळले की पुण्यात केलेले पहिलेच ऑपरेशनच चुकीचे केल्यामुळे तुझा रोग सगळीकडे फारच लवकर पसरला गेला. आम्ही इतके हतबल झालो होतो तरीही तू मात्र शांत होतीस, देवावर तुझा खूप विश्वास होता. पण त्याने तुला कायमचे या जीवघेण्या आजारपणातून मुक्त केलं. शेवटी मुंबईला उपचार घेणे शक्य नाही म्हणून तुला परत पुण्यात उपचार सुरू ठेवले. मुंबईच्या डॉक्टरांनी आम्हाला कल्पना दिली होती की तू फार दिवस जगू शकणार नाहीस पण तरीही पुण्यातल्या डॉक्टरांनी तुझ्यावर केमो-रेडीएशनचा मारा केला आणि तुझ्या शरीराचे किती हाल झाले. आज आठवलं तरी शहारा येतो.

मला तू अगदी लहानपणापासून आठवते आहेस. तुझ्या जन्माच्या वेळी मी अवघी तीन वर्षांची होते, तरी तू जन्माला आल्यावर माझी झालेली घालमेल, आईचं सतत तुझ्याकडेच लक्ष. मला असूयाच वाटायची, पण जेव्हा तू मोठी होत होती, मला खेळायला एक बाहुलीच मिळाली होती जणू, न बोलणारी कुरळ्या केसांची, गोड. अगदी तू या जगातून गेली तेव्हाही तशीच दिसत होतीस. खूप शांत, प्रसन्न जणू सगळ्या वेदनांवर मात करून जिंकल्यासारखा तुझा चेहरा अजून आठवतोय. तुझा स्पर्श, नेहमी तुला सोडून निघताना तू हात घट्ट धरायचीस, किंवा तुला मारलेली ती घट्ट मिठी नाही विसरू शकत मी. घरच्या जबाबदारीमुळे मी किंवा ताई तुला शेवटी शेवटी नाही वेळ देऊ  शकलो, त्याचं खूप खूप वाईट वाटतं. तू शेवटच्या भेटीत म्हणाली होतीस नको जाऊस आता राहा ना, पण घरी दोघा मुलांना सोडून आलेली मी, तुला आश्वासन देऊन आले की, सुट्टीत मी मुलांना घेऊन खूप दिवस राहायला येईन, गूढ हास्य होतं तुझ्या चेहऱ्यावर त्यावेळी.. का ते आता कळतंय..

नंतर नंतर तू खूप चिडायला लागलीस. आजारपणामुळे त्रासलेली असायचीस ना, पण नंतर सगळं विसरूनही जायचीस. मला माहीत आहे, पैशांच्या प्रश्नाने तू शेवटी शेवटी फार खचली होतीस, आम्ही फार मदत नाही करू शकलो गं. पैसा फार महत्त्वाचा असतो गं सगळी नाती टिकवायला. शरीराने तू फारच थकत चालली होतीस ते बघवत नव्हतं, तुला शेवटी काय वाटत होतं, काय सांगायचं होतं किंवा मरणाच्या दारात गेल्यावर तुझ्या मनाची काय अवस्था होती आम्ही कल्पनाच नाही करू शकत. आता तुझ्या मुलाकडे बघितलं की जाणवतं, तो किती तुझ्यात अडकला आहे ते. एवढासा जीव, माझ्याकडे आला तेव्हा तुझ्या आठवणीने किती रडला गं. पण तू काही काळजी करू नको, आता त्याचे बाबा, आई आणि पप्पा त्याला व्यवस्थित बघतात.

फक्त एकच खंत मनाला टोचत राहाते. मुंबईच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळीच तुझ्यावर योग्य उपचार झाले असते तर तू असतीस का आमच्यात? आमच्या सारख्या शिकलेल्या लोकांची जर एवढी फसवणूक होत असेल तर गरीब गावांतून शहरात उपचार घेण्यास येणाऱ्यांची किती वाईट परिस्थिती होत असेल. जे आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक नाहीत अशा डॉक्टरांना ही कळकळीची विनंती आहे की कोणत्याही जीवघेण्या आजाराच्या उपचारात आपल्याला अचूक निदान करता नाही आले तर रुग्णाचा अमूल्य वेळ वाया न घालवता त्यांना दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगावे. रुग्ण फार आशेने तुमच्याकडे येतात, तेव्हा त्यांना जिवंतपणी तरी नरक यातना देऊ  नका.

आता देवाजवळ एकच प्रार्थना, तू जिथे असशील तिथे सुखी राहावीस. तू शरीराने आमच्यात नसलीस तरी आमच्या आठवणीत कायम जिवंत आहेसच. तुला विसरणं केवळ अशक्य.

– आई, पप्पा, ताई, मी आणि तुझा लाडका सोनू

स्वप्नजा पंडित

spandit14@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 4:57 am

Web Title: tribute to my sister death
Next Stories
1 नावापुरते देवीपण
2 अविस्मरणीय वारी इटलीची
3 छंद आगळा
Just Now!
X