तोरिनोला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. टी.सी. आला म्हणून मी ऐटीत तिकीट दाखवले तर तो काही तरी सांगू लागला. भाषेमुळे मला काही कळले नाही. शेवटी हावभाव आणि मोडक्या इंग्लिशमध्ये समजले की मला शंभर युरो दंड भरावा लागणार होता. कारण मी ते तिकीट स्टेशनवर पंच केले नव्हते. माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले.. सुरुवातीला अक्षरश: रडकुंडीला आणलेल्या या शहराने नंतर इतका जीव लावला की आपण परत कदाचित इथे कधीच येणार नाही या विचाराने मनात हुरहूर दाटून आली!

अखेरीस एक कोणती तरी खासगी बस मिळाली आणि मी मिलान स्टेशनला पोहोचले. तिथे तिकीट कसेबसे (तोडकं मोडकं इंग्रजी वापरून) मिळवले आणि सामान घेऊन एस्कॅलेटरवरून प्लॅटफॉर्मवर आले. समोरच तोरिनोला जाणारी ट्रेन उभी होते त्यामुळे देवाचे आभार मानून त्या गाडीत चढले आणि लगेच गाडी सुटली. इतक्या प्रवासानंतर मी चांगलीच थकले होते आणि डोळे अक्षरश: मिटत होते. शेजारीच एक गृहस्थ त्यांच्या बायको मुलांबरोबर बसले होते. माझ्या बॅगवरील पोलिटेक्निकोचा पत्ता बघून त्यांनी विचारले ‘इंजिनीअर?’ आणि मी मान डोलावून हसले. भाषा येत नसल्याने यापुढचा संवाद झाला नाही.

 

जवळपास दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आयआयटी मुंबईमध्ये पीएच.डी.च्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली आणि पहिल्याच वर्षी व्हिझिटिंग रिसर्चर म्हणून इटलीच्या एका विद्यापीठाला भेट देण्याची संधी मिळाली. आजही इटलीमधले ‘ते’ दोन महिने जसेच्या तसे डोळ्यासमोर येतात. जीवनातील चढउतार अनुभवून आधीच सुन्न झालेल्या मनाला हा अनुभव तर क्लायमॅक्सच वाटला. ‘जब वी मेट’ या हिंदी चित्रपटामधला ‘भगवान, लाइफ अब थोडी बोअिरग बना दो’ ही गीत अर्थात करीनाची विनंती वारंवार आठवू लागली. तर अशा या चित्तरंजक अविस्मरणीय इटली वारीची ही कहाणी..

माझ्या प्रोफेसरांनी माझे आणि एका सहअध्यायी मित्राचे नाव इंडो-इटालियन स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅमसाठी निवडले. माझा पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी गेला असल्याने मला वेळेवर व्हिसा मिळेल की नाही असे वाटत होते. आमचे तिकीट तर काढून ठेवले होते. माझ्या मित्रांचे व्हिसा अ‍ॅप्लिकेशनपण झाले. मला वाटू लागले, आता माझे काही जमणार नाही कारण ट्रिपला दोन आठवडेच बाकी होते आणि माझा पासपोर्टही माझ्या हातात येत नव्हता; परंतु माझ्या मित्राचा काही कारणाने व्हिसा रिजेक्ट झाला आणि माझा पासपोर्ट आणि व्हिसा प्रवासाच्या आदल्या दिवशी हातात मिळाले. प्रवासाच्या दिवशी फोरेक्स वगैरे अशी सगळी धावपळ करून रात्रीचे विमान होते. आधी दोघं जाणार म्हणून विमान इटली म्हणजे तुरीन (किंवा तोरिनो)ला कधी पोहोचते असा विचार केला नव्हता. मात्र आता एकटीने जायचे म्हटल्यावर भीती दाटून आली. (या अनुभवानंतर मात्र कधीही दिवसा उजेडी पोहोचणारे विमानच कटाक्षाने घ्यायला शिकले.)

मला ‘पॉलिटेक्निको दि टोरिनो’ या कॉलेजमध्ये व्हिझिटिंग रिसर्चर म्हणून दोन महिने काम करायचे होते. त्यांचे हॉस्टेल बुकिंग तिथे गेल्यावरच होणार होते म्हणून गेल्यावर दोन दिवसांसाठी एक पेइंग गेस्ट अकोमोडेशन बुक केले. माझे विमान मुंबई ते मिलान (इटलीमधले  मोठे शहर) येथे जाणार होते आणि मिलान ते तोरिनो हा प्रवास रेल्वेने करावा लागणार होता. रात्री विमानात बसल्यावर जरा हुश्श केले कारण व्हिसा, फोरेक्स आणि पॅकिंगमध्ये दिवस फारच गडबडीत गेला होता. मिलानला पोहचल्यावर पहिला धक्का बसला, त्या दिवशी तिथल्या बसचा संप होता. मला एअरपोर्ट टू मिलान स्टेशन जायचे होते. तसंच नवी माहिती म्हणजे सामान न्यायची ट्रॉलीपण काही पैसे (युरो) घातल्यावरच घेता येत होती. त्यासाठी नक्की किती आणि कसे पैसे घालायचे हे कोडं सोडवण्यात थोडा वेळ गेला. ट्रॉली घेऊन एकदाची बाहेर आले तर संपाचा धक्का! मग तिथल्या पब्लिक फोनवरून एका ओळखीच्या लोकल व्यक्तीला फोन केला. तो करतानाही  युरो किती घालायचे हे विचारणे हीपण कसरतच कारण इंग्लिश कुणाला समजत नव्हते. या सगळ्या गोष्टींसाठी सुट्टे युरो लागतात आणि माझ्याकडे फक्त नोटा होत्या आणखी एक धडा मिळाला! सुट्टी नाणी बरोबर न्यायची.

अखेरीस एक कोणती तरी खासगी बस मिळाली आणि मी मिलान स्टेशनला पोहोचले. तिथे तिकीट कसेबसे (तोडकं मोडकं इंग्रजी वापरून) मिळवले आणि सामान घेऊन एस्कॅलेटरवरून प्लॅटफॉर्मवर आले. समोरच तोरिनोला जाणारी ट्रेन उभी होते त्यामुळे देवाचे आभार मानून त्या गाडीत चढले आणि लगेच गाडी सुटली. इतक्या प्रवासानंतर मी चांगलीच थकले होते आणि डोळे अक्षरश: मिटत होते. शेजारीच एक गृहस्थ त्यांच्या बायको मुलांबरोबर बसले होते. माझ्या बॅगवरील पोलिटेक्निकोचा पत्ता बघून त्यांनी विचारले ‘इंजिनीअर?’ आणि मी मान डोलावून हसले. भाषा येत नसल्याने यापुढचा संवाद झाला नाही.

थोडय़ा वेळाने मी डोळे उघडले तर टी.सी. आला होता. मी ऐटीत माझे तिकीट दाखवले तर तो मला काही तरी सांगू लागला, पण भाषेमुळे मला काही कळत नव्हते.  शेवटी हावभाव आणि मोडक्या इंग्लिशमध्ये समजले की मला शंभर युरो दंड भरावा लागणार होता. कारण मी ते तिकीट स्टेशनवर पंच केले नव्हते. असं काही करायचं असतं हे मला कळालंच नव्हतं कारण तिकीट इंग्लिशमध्ये नाही तर इटालियनमध्ये होतं. माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले आणि मला काही सांगताही येत नव्हते. तोपर्यंत ते शेजारचे इंजिनीअर अंकल मध्ये पडले आणि त्यांनी बहुतेक टी.सी.ला सांगितले की, इंडियाहून स्टुडंट आली आहे फर्स्ट टाइम आणि तिला हे माहीत नव्हते. शेवटी टी. सी. निघून गेला आणि मी ‘मोठय़ा’ दंड भरण्यातून वाचले. (एका विद्यार्थ्यांसाठी एक एक युरोची किंमत फार मोठी असते.)

तोरिनो येईपर्यंत रात्रीचे दहा वाजले अणि माझे अक्षरश: धाबे दणाणले कारण अनोळखी देशात (मुख्यत: बिनभाषेच्या) मला पत्ता शोधून तिथे सुखरूप पोहोचायचं होतं. प्लॅटफॉर्मवरून सामान घेऊन चालताना मी अगदी रडकुंडीला आले होते. टॅक्सी स्टॅण्ड कुठे आहे हे विचारण्याचीही सोय नव्हती. देवाचं नाव घेत मी एका बाजूला चालत राहिले आणि समोर खरंच टॅक्सी दिसल्या. त्या पाहून तेव्हा बरं वाटलं परंतु नंतर कळलं की दुसऱ्या बाजूला ‘रेड लाइट एरिया’ होता आणि रात्री तिथे जाणं फारच धोक्याचं होतं.

टॅक्सी ड्रायव्हरने मी लिहून दाखवलेल्या पत्त्यावर सोडलं. तिथे बिल्डिंगला खाली सिक्युरिटी फोन असतो त्यावरून ओळख सांगून मगच दार उघडलं जातं. मी फुटपाथवर सामान घेऊन उभी आणि फोन कोणी उचलत नव्हतं. पत्ता बरोबर आहे की नाही हे कळायलाही मार्ग नव्हता, टॅक्सीवाला तोपर्यंत निघून गेला होता. परत एकदा मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला. थोडय़ा वेळाच्या प्रयत्नानंतर करकरत तो दरवाजा उघडला आणि सामान घेऊन मी पेइंगगेस्ट असलेल्या घरी पोहोचले. एक वयस्कर बाई, त्यांची मुलगी आणि एक मांजर असे तिथे राहत होते.  कागदपत्र दाखवल्यानंतर मला एक छोटी रूम मिळाली. त्यांनाही  इंग्लिश येत नसल्याने खाणाखुणा सुरू झाल्या. इतक्या ‘इव्हेन्टफुल’ प्रवासानंतर मी कधी झोपले ते कळालंच नाही.

दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टपासून पुन्हा भाषेचा संघर्ष सुरू झाला. पेइंग गेस्टवाल्या त्या आजी मला काही तरी विचारत होत्या पण कसलं काय! शेवटी मी शाकाहारी आहे हे सांगण्यात मला यश आलं आणि दूध आणि पाव असं काही तरी पोटात ढकललं. मात्र दुसऱ्या दिवशी त्या आजींनी स्पेशल व्हेज पाय् केला ब्रेकफास्टसाठी आणि प्रेमाने पाठीवरून हातही फिरवला. अनोळख्या देशातील बिनभाषेच्या या मायेच्या ओलाव्याने माझे डोळे भरून आले.

पुढचे एक-दोन दिवस तिथले फोन कार्ड घेणं, कॉलेजला कसं जायचं ते शोधण्यात गेले. अर्थात हे सगळं बिना इंग्लिशचं! कॉलेजच्या बसमध्ये बसले आणि स्टॉपचं नाव अगदी नीट लक्षात ठेवलं होतं. तेवढय़ात ते नाव अनाऊन्स झालं आणि मी पटकन बसमधून उतरले. थोडय़ा वेळाने कळलं की मी एक स्टॉप आधीच उतरले आहे, ती अनाऊन्समेंट पुढच्या स्टॉपची हाती. प्रोसिमा फर माता डय़ुका डेग्ली अब्रुसी (नेक्स्ट स्टॉप इज डय़ुका डेग्ली अब्रुसी) सगळ्या गमती जमती होत रोजचे उद्योग कसे बसे पार पडू लागले. भाज्या आणताना टोमेटो म्हणजे पोमोडोरो, बटाटे म्हणजे पोटाटे असे कळले. कॉलेजमध्ये रीसर्च इंग्लिशमध्ये असला तरी एकूण वातावरण इटालियन, कारण बी. टेक.पर्यंत तिथे इटालियनमध्येच शिक्षण होतं. त्यामुळे कॉलेज कॅन्टीनमध्येपण नो-मीट (म्हणजे व्हेजेटरियन) सांगितल्यावरही प्लेटमध्ये फिश आणि एग्ज! मी तेही नको सांगितल्यावर त्यांचा चेहरा बघण्यासारखा होता. जणू काही ही मुलगी खाते तरी काय मग! फक्त सलाड आणि पानिनि (म्हणजे सँडविच तेपण कडक ब्रेडचे) हेच जेवण.

होस्टेलला जेवण बनवायची सोय नव्हती आणि पैसेही फार जास्त नव्हते. त्यामुळे भाडय़ाने रूम शेअर करून राहावं असं ठरलं. मधल्या काळात, इटलीमध्ये आल्यावर आठ दिवसांच्या आत पोलीस व्हेरिफिकेशन करावे लागते. तिथे एकटीने पत्ता शोधत जाऊन तिथल्या सावळ्या गोंधळात ते काम एकदाचे पार पडले. ‘सिंगोला कॅमेरा’ अशा (सिंगल रूम)च्या जाहिराती आता कळू लागल्या होत्या. तर मुलीच असलेल्या (तिथे मुलं- मुली एकत्र भाडय़ाच्या घरात राहणे अगदी सर्रास आहे. त्यामुळे फक्त मुली राहत असलेले घर शोधणे आणखीनच अवघड!) एका घराचा पत्ता मिळवून ते बघून आले. त्या मुलींशी भेट नाही झाली फक्त घरमालक कागदपत्रे घेऊन भेटला. ही कागदपत्रेपण इटालियनमध्येच! कॉलेजमधल्या माझ्या प्रोफेसर बाईला मी एकदा फोन करून त्या घरमालकाशी बोलायला सांगितलं तरीपण काय नक्की लिहिलं आहे हे माहीत नसणाऱ्या त्या कागदावर सही करताना भीती  वाटलीच. देवाचं नाव घेऊन सही केली आणि त्या घरात राहायला गेले. कॉलेजकडून ज्या प्रकारे लोकांची मदत अपेक्षित होती (हॉस्पिटॅलिटी) तशी नाही मिळाली मात्र एक इटालियन मित्र भेटला. तो आय.आय.टी. कानपूरहून बी. टेक.चा विद्यार्थी होता आणि त्याच्या तिसऱ्या वर्षांच्या इंटर्नशिपसाठी त्याच कॉलेजमध्ये आला होता. बाहेरच्या देशात ‘आपले’ (आपल्या देशातले) माणूस भेटण्याचा आनंद किती मोठा असतो याचा अनुभव आला. या मित्राची खूपच मदत झाली आणि अगदी लहान भावाप्रमाणे इटलीतून निघेपर्यंत तो माझ्या मागे उभा राहिला.

आता हळूहळू तिथली भाषा समजून घेण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु एक दिवस बराच वेळ झाला तरी कॉलेजला जायला बस आली नाही तेव्हा कळाले की त्या दिवशी बसचा संप होता. सगळ्या बस स्थानकांवर, तशी नोटीस लावली होती पण वाचता न आल्याने हा फटका बसला. ‘निरक्षर’ असल्याचा ‘फील’ परत एकदा (घराच्या कागदपत्रांवर सही करतानापण) प्रकर्षांने जाणवला. तिथली माणसं मात्र खूपच छान आहेत आणि अगदी भारतीय लोकांप्रमाणे आपुलकीने बोलायला येतात. एक दिवस मी बस स्टॉपवर उभी असताना एक वयस्क आजी अचानक बोलायला लागल्या आणि मी मोडक्या इटालियनमधून चक्क संवाद साधू शकले.

भाडय़ाच्या घरात राहायला आल्यावर बाकी तीन मुलींशी (रूम मेट) ओळख झाली. दोन मुली इटलीच्याच दुसऱ्या भागांतून शिकण्यासाठी तोरिनोला आल्या होत्या अणि तिसरी मुलगी युक्रेनमधून आली होती. त्यांनापण जेमतेम इंग्लिश येत असल्याने हावभावांवर संवाद सुरू झाला. पण थोडय़ा दिवसांत त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. त्यांचं नॉन-व्हेज कुकिंग, रात्री-बेरात्री बाहेर येणं-जाणं, त्यांना भेटायला येणारे बॉयफ्रेंड्स याची सवय झाली. मी कुकर नेला असल्याने आता एक वेळा तरी भाजी-भात खाता येऊ लागला. तसंच जवळच पिझ्झाचं दुकान होतं तिथे आपल्या समोर पिझ्झा बेसपासून पिझ्झा बनवला जातो. माझ्यासाठी एकच व्हेज पिझ्झा होता, पण एगप्लांट (वांगे) घातलेला पिझ्झा ही मिळतो याचा शोध लागला माझ्या इटालियन रूममेटस्मुळे. मग कधी जेवणात पिझ्झा आणून तर कधी आईस्क्रीम ‘जिलेटो’ खाऊन पोट भरणं सुरू झालं. एका रविवारी आम्ही सगळ्या (रूम मेट) घरी होतो हे पाहून माझ्या इटालियन मैत्रिणीने रिझोटो हे इटालियन पक्वान्न स्वत: करून आम्हाला खायला घातलं. त्याच सुमारास फुटबॉल वर्ल्डकप सुरू होता आणि त्याच्या सेमी-फायनल आणि फायनल मॅचेस तिथे बघण्याचा योग आला. फायनल मॅच आम्ही सगळ्या जणींनी घरी बसून टी.व्ही.वर बघितली तो अनुभव फारच छान होता. इटालियन मुली त्यांचा झेंडा अंगाभोवती लपेटून बसल्या होत्या. आपल्या इथे जसे ‘अरे बाहेर नको जाऊस नाही तर सचिन आऊट होईल’ असे डायलॉग ऐकू येतात तशाच कमेंट्स त्या मॅचच्या वेळेला कानावर आल्या आणि हसू आले! इटालियन लोकांच्या देशप्रेमाने खरंच मन भरून आलं. मॅच जिंकल्यावर माझ्या मैत्रिणी अक्षरश: रडत होत्या, नाचत होत्या (नशीब, इटली जिंकली नाहीतर काय झाले असतं याचा विचार नाही करवत.) रात्री अकरा वाजता रस्त्यांवर लोक गाडय़ांमधून जोरजोरात हॉर्न वाजवत फिरत होते. (एरवी हॉर्न वाजवणे शिष्ट संमत नाही) एकूणच फुटबॉल वर्ल्डकपचा माहोल खूप छान अनुभवता आला.

एव्हाना येऊन एक महिना झाला होता आणि गोष्टी बऱ्यापैकी स्थिरस्थावर होऊन आता तोरिनो आपले वाटायला लागले होते. बऱ्याच बस मार्गाची माहिती झाली होती. त्यातील एका मार्गाच्या शेवटी ‘सोनिया गांधी’ यांचे घर आहे. तिथेही जाण्याचा योग आला. माझ्या आईची आणि सोनिया गांधी यांचा जन्मदिवस एकच आहे तसंच माझी आणि प्रियंका गांधीची जन्मतारीख (वर्ष सोडून) सारखी आहे हा एक वेगळा योगायोग!

पिझ्झा सॅन कालरे हा एक महत्त्वाचा चौक तोरिनो मधला. तिथे बऱ्याच वेळा जाऊन त्याची जणू सवयच झाली. तिथली अतिशय सुंदर दोन चर्चेस तसंच मंद मधुर असं तिथल्या कॉरिडोर्समध्ये वाजवलं जाणारं गिटारवरचं संगीत याने मनाला भुरळ पाडली. तिथल्या इमारती आणि वास्तू इतक्या प्रचंड आहेत तरीही तो चौकच इतका अवाढव्य असल्याने तो परिसर मोकळा वाटतो आणि अनेक संध्याकाळी तिथे गेल्याने प्रसन्न होतात.

त्याच सुमारास माझी एक आय.आय.टी.मधील मैत्रीण त्रेन्तो तिथल्या कॉलेजमध्ये संशोधनासाठी आली होती. मग आम्ही एकमेकींच्या गावाला भेटी तर दिल्याच शिवाय पिसा, फ्लोरन्स आणि चिंक्यू टेरी (चिंक्यू म्हणजे पाच आणि टेरी म्हणजे गाव- व्हिलेज किंवा गाव) ही ठिकाणं पाहिली. पिसा आणि फ्लोरन्स त्यांच्या ऐतिहासिक गोष्टींमुळे प्रसिद्ध आहेत आणि खरंच एकदा तरी भेट द्यावी अशी आहेत. पण इटलीमध्ये निसर्ग सौंदर्य बघण्याचे ठिकाण म्हणजे चिंक्यू टेरी. पाच डोंगराच्या मध्ये त्यांना जोडणारी एक रेल्वे आहे. आपण हवे तेवढे अंतर रेल्वेने जाऊन बाकीचे ट्रेकिंग करून चढू शकतो. प्रत्येक डोंगराच्या पायथ्याशी एक गाव वसलेले आहे. आम्ही एक डोंगर चढून उतरलो आणि पायथ्याच्या गावात फिरलो. तिथे खाल्लेला पिझ्झा आजपर्यंतचा सर्वात चविष्ट पिझ्झा आहे. निळंशार पाणी, गर्द हिरवी झाडी, निळं आकाश असं नयनरम्य दृश्य पाहत डोंगर चढण्याचा अनुभव काही आगळाच होता!

या सगळ्या अनुभवांनी समृद्ध होता होता वीकेंडस् कसे संपले कळले नाही आणि हातातले संशोधनाचे काम आणि दुसरा व शेवटचा महिना (तोरिनोमधला) संपत आला. हातात उरलेले पैसे (युरो) आणि नातेवाईक/मित्रमैत्रिणींना इथून काय भेटी नेता येतील याचा हिशेब मनाशी सुरू झाला. शेवटचा वीकेंड शॉपिंग आणि पॅकिंगसाठी राखून ठेवला. त्याआधी शेवटचे ‘जिलेटो’ एगप्लांट पिझ्झा, खायचाय शेवटची ‘पिझ्झा सॅन कालरे’ला भेट द्यायची असं प्लॅनिंग सुरू झालं. सुरुवातीला अक्षरश: रडकुंडीला आणलेल्या या शहरात शेवटी शेवटी आता आपण परत कदाचित इथे कधीच येणार नाही या विचाराने मनात हुरहुर दाटून आली!

पाण्यात पडलं की पोहता येतं म्हणतात तसं अनोळखी शहरात/ ठिकाणी पडल्यावर ‘भगवान भरोसे’ तरंगता येतं याचा अनुभव आला. ‘देव नावाच्या त्या अगम्य शक्तीचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला आणि हात नकळत जोडले गेले!

pallavimm@ymail.com