‘‘एकदा माझ्या बायकोला घेऊन येतो मी. अहो आमच्या लग्नातपण अशा खुर्ची नव्हत्या. तेव्हा मला खूप वाटले होते की अशा राजेशाही खुर्चीत बसून बायकोबरोबर फोटो काढावा, पण ते जमलेच नाही. अहो, आमचं लग्न म्हणजे एकतर कर्ज काढून, त्यातून दारूकामातच भरपूर खर्च आणि खेडेगाव, अशा खुर्ची तिथे कुठे असणार? एकदोनदा स्टुडिओतही जाऊन आलो पण तिथे अशी खुर्ची नव्हती.’’  त्यांची खंत व्यक्त होत होती.

वसंतराव गांगुर्डे हे काही फार मोठे गृहस्थ नव्हते. ते कोणी सामाजिक पुढारी नव्हते, राजकीय नेते नव्हते किंवा समाजातील कोणी प्रभावी व्यक्तिमत्त्वही नव्हते! एक साधेसुधे, खरेतर भोळे आणि भाबडे असेच होते; त्यामुळे कधी कोणी त्यांची चेष्टामस्करी केली तरी त्यांच्या लक्षातच येत नसे.

त्यांना बघितल्यावर त्यांची अतिशय बेताची उंची, सतत अस्वस्थ असल्यासारखी त्यांची शारीरिक हालचाल, म्हणजे स्थिर उभे राहणेच नाही, कधी या पायावर तर कधी त्या पायावर जोर देऊन उभं राहणं, काहीतरी बरंच बोलायचे आहे पण सुचत नाही, शब्द सापडत नाहीत, चाचपडायला होतंय अशी ओठांची हालचाल, अत्यंत साधे कपडे, जाड भिंगाचा चष्मा, त्या चष्म्याच्या आडून दिसणारे त्यांचे लुकलुकणारे डोळे, खांद्याला मळकट झोळी अशा प्रकारचे त्यांचे दर्शन, अगदी स्पष्टच बोलायचे तर त्यांचं ‘खुजं’ व्यक्तिमत्त्व लक्षात येई. तरीसुद्धा त्यांच्यावर लिहावंसं वाटतं याचं कारण म्हणजे त्यांच्या स्वभावातील निव्र्याजता, आतबाहेरची निर्मळता, जे काही बोलतील त्यातील प्रांजळपणा, त्यांच्या अस्वस्थ हालचालीमागचा खरेपणा जो त्यांच्या प्रत्येक भेटीत मला जाणवला. अभावग्रस्तता, न्यूनगंड यामुळे त्यांच्या वागणुकीत आत्मविश्वास नसावा असे मला वाटले.

अशा वसंतरावांची माझी पहिली भेट झाली ती एका साहित्यिक कार्यक्रमात. व्यासपीठावरून प्रमुख पाहुणे आपलं भाषण, आपला मुद्दा अतिशय जोरकसपणे मांडत होते. त्यांच्या भाषणात मानवी संस्कृती, तिचा विकास, भाषा, आंतरराष्ट्रीय संबंध असा मोठमोठय़ा मुद्दय़ांचा उल्लेख होत होता. सर्व सभागृह शांतपणे त्यांचे विचार ऐकत होते; आणि अचानक श्रोत्यांच्या मधल्या रांगेतून, अगदी कडेला असलेल्या खुर्चीत बसलेले वसंतराव (मला हे नाव नंतर कळले) उठले, दोन-चार पावले पुढे जात स्टेजसमोर आले. वसंतराव पुढे गेले आणि आपली अस्वस्थ हालचाल करीत अडखळत म्हणाले, ‘‘तुमचा मुद्दा मला चुकीचा वाटतो, आकडेवारीही चुकीची आहे. असे अभ्यास न करता व्यासपीठावरून बोलणे योग्य नाही.’’ त्यांचे शब्दही नीट कळत नव्हते, घाईघाईने बोलल्यासारखे, काहीतरी उच्चारल्यासारखे. त्यांच्या धारिष्टय़ाची मला तर कमालच वाटली.

पटकन उठून कुणीतरी त्यांना समजावले. ‘‘हवं तर भाषणानंतर वक्त्यांना भेटून तुमचे आक्षेप सांगा.’’ दोन-चार मिनिटांतच हा प्रसंग मिटला पण नाराजीने कुरकुरत वसंतराव पुन्हा खुर्चीत बसले.

‘‘हे नेहमी असेच करतात.’’ अशीही मुक्ताफळं मी ऐकली. कार्यक्रम झाल्यावर मी स्वत:हून त्यांना भेटलो. त्यांचा परिचय करून घेतला. त्यांना म्हटलं, ‘‘असं मध्येच बोलणं बरं दिसत नाही, हवं तर आता वक्त्यांना भेटा.’’ त्यांना ते पटलं. मी निघताना त्यांना माझं कार्ड दिलं.

दोनच दिवसांनी वसंतराव आले. केबिनच्या दरवाजावर टकटक केलं नि सरळ दरवाजा ढकलून आत आलेदेखील. फोनवरचं माझं बोलणं मी लगेच थांबवलं. त्यांचं असं आत येणं मला आवडलं नव्हतं. असा काही शिष्टाचार असतो हेच त्यांना ठाऊकही नव्हते! ‘‘अरे, तुम्ही फोनवर बोलत होता काय?’’ असं विचारून धपकन ते खुर्चीत बसले.

त्यांच्या बोलण्यातली निव्र्याजता मला जाणवली. लहान मुलांना नाही का आपण मुळात चूक करतोय हे कळतच नाही, हातातील वस्तू धाडकन टाकून ते मूल जसं निर्मळपणे हसते नि आपल्याला, ‘या लहान मुलाला काही कळत नाही’ हे कळत असल्यामुळे धड रागावताही येत नाही, अगदी तसंच मला आताही वाटले. क्षणात मी माझी नाराजी झटकली आणि हसून त्यांच्याशी बोलू लागलो.

मग वसंतराव येतच गेले, वेळी अवेळी. एकदा अचानक ते घरीच आले. मी ऑफिसमध्ये नव्हतो तर चौकशी करून ते पत्ता शोधत आले.

‘‘अरे वा! तुमचे घर खूप छान आहे, असं म्हणत सोफ्यावर बसले. हॉलमध्ये सर्वत्र नजर फिरवून ते म्हणाले, ‘‘साहेब (ते मला नेहमी साहेब म्हणायचे) या छान रंगीत खुच्र्याना काय म्हणतात हो!’’

‘‘अहो, याला संखेडा फर्निचर म्हणतात. गुजरातचा आहे हा प्रकार.’’ मी सांगितले.

‘‘मला खूप आवडलं, खूप महाग असेल ना? आणि साहेब एक विचारू का?’’ ते बोलू की नको या संभ्रमात पडले होते.

‘‘विचारा की.’’ मी म्हटले.

काही क्षण थांबून ते म्हणाले, ‘‘एकदा माझ्या बायकोला घेऊन येतो मी. अहो आमच्या लग्नातपण अशा खुच्र्या नव्हत्या. तेव्हा मला खूप वाटले होते की अशा राजेशाही खुर्चीत बसून बायकोबरोबर फोटो काढावा, पण ते जमलेच नाही. अहो, आमचं लग्न म्हणजे एकतर कर्ज काढून, त्यातून दारूकामातच भरपूर खर्च आणि खेडेगाव, अशा खुच्र्या तिथे कुठे असणार? एकदोनदा स्टुडिओतही जाऊन आलो, पण तिथे अशी खुर्ची नव्हती.’’ आपल्या बोटांची अस्वस्थ हालचाल करत ते निरीक्षण करत होते.

‘‘एवढंच ना, अहो कधी या तुमच्या मिसेसना घेऊन, नाही तर असे करा, जेवायलाच या दोघेही. तुम्ही दोघे खुर्चीत बसा, आपण फोटो काढू भरपूर.’’ मी म्हटले.

‘‘येतो, मी बायकोला घेऊन येतो, पण साहेब बायकोला ‘मिसेस’ म्हणतात ना, ते मला नाही आवडत, अहो मिसेसचा अर्थ वेगळा आहे.’’

‘‘ठीक आहे, तुमचे म्हणणे बरोबर आहे. या तुम्ही तुमच्या वाइफला घेऊन.’’ मी म्हणालो. त्यांची इतकी साधी इच्छा पुरी करण्यात मला आनंदच होणार होता.

..पण वसंतरावांचे पुन्हा घरी येणे झालेच नाही.

आठ-पंधरा दिवसांनी येणारे वसंतराव दोन-तीन महिने झाले तरी आले नाहीत. मग मीच त्यांना ओळखणाऱ्याकडे चौकशी केली तेव्हा कळले की, त्यांची पत्नी खूप आजारी होती आणि शेवटी तर त्या गेल्याच.

मी त्यांना सांत्वनासाठी भेटलो, जमेल तसं सांत्वन केलं. घरी या म्हणालो, ‘‘नको साहेब, तुमच्या घरची ती राजेशाही खुर्ची पाहून मला ‘तिची’ आठवण येईल. एवढी साधी इच्छादेखील पूर्ण नाही होऊ  शकली..’’असे अत्यंत जड आवाजात बोलत वसंतराव निघून गेले..!

..आता संखेडा फर्निचर बदलायचं मी ठरवलं आहे!

 

सुरेश देशपांडे

scd2000@gmail.com