मला थोडा वेळ तपासल्यावर, त्यांनी सहज विचारल्यासारखं माझं वय विचारलं. वय ऐकल्यावर ते गडबडलेच. पण लागलीच स्वत:ला सावरून घेत म्हणाले, ‘‘मग बरोबर आहे. आता या वयात, प्रकृतीच्या काही ना काही तक्रारी, कुरबुरी चालूच रहाणार. मी तुम्हाला काही तपासण्या करायला सांगतो त्या स्पेशालिस्टकडून करून घ्या.’’ म्हटलं, आता या टेस्टमध्ये तरले, तर विविध औषधांच्या मदतीनं का होईना, पण माझं हे बोनस आयुष्य मी एन्जॉय करू शकणार होते. पण तोपर्यंत, किती वेळा, या दातेरी चक्रातून (टेस्टस्च्या) फेऱ्या मारणार होते, देव जाणे!

घडय़ाळाची टिक्  टिक्  अखंड चालू असते; कारण घडय़ाळात म्हणे दोन दातेरी चक्र असतात. एक लहान, एक मोठे! त्यांचे आरे एकमेकांत अशा पद्धतीने अडकलेले असतात, की एकातून सुटका झाली की त्यातला आरा दुसऱ्या आऱ्यात अडकतो आणि घडय़ाळ चालू राहते. घडय़ाळ चालू राहावं म्हणून, पूर्वी घडय़ाळाला किल्ली द्यावी लागत असे. पण आजकाल तंत्रज्ञानात इतकी क्रांती झाली आहे की, किल्ली न देताही घडय़ाळ चालू राहते. (किल्ली न देताही, अखंड, दिवसभर चालू राहाणाऱ्या ‘आजीचे घडय़ाळ’ या आचार्य अत्रे यांच्या (कवी- केशव कुमार) कवितेची आठवण झाली ना!)

मला मात्र, आज आत्ताच या ‘दातेरी चक्राची’ आठवण होण्याचं कारण म्हणजे, माझ्या मागं लागलेला, डॉक्टरांचा ससेमिरा आणि विविध प्रकारच्या, ‘क्ष किरण’ आणि पॅथॉलॉजिकल तपासण्या यांचं शुल्क काष्ट!

त्याचं काय झालं, गेले काही दिवस माझी तब्येत जरा चांगली नव्हती. काही ना काही किरकोळ तक्रारी चालूच होत्या. कधी अगदी गळून गेल्यासारखं वाटे. तर कधी सर्दी खोकल्यानं हैराण! कधी आत्यंतिक अनुत्साह, तर कधी जिना चढताना दम लागतो, म्हणून चालायला जाण्याचा आळस! औषध घेतलं की चार दिवस बरं वाटायचं, पण पुन्हा येरे माझ्या मागल्या!

सर्दी खोकला नित्याचाच आजार, म्हणून त्याकडं दुर्लक्ष केलं, पण जिना चढताना, दम लागतो, त्याचं काय? त्यामुळं मात्र मी काहीशी चिंतेत पडले. थोडीशी घाबरलेच म्हणा ना! म्हणून मग मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. आमचे हे फॅमिली डॉक्टर म्हणजे बहुधा ‘शेवटचा पेशवा’ असं म्हणू ! कारण हल्ली सर्वजण कशाचे ना कशाचे ‘स्पेशालिस्ट’च असतात. साधा ‘फिजिशियन’ कोणीच नसतो.

मला थोडा वेळ तपासल्यावर, त्यांनी सहज विचारल्यासारखं माझं वय विचारलं. वय ऐकल्यावर ते गडबडलेच. पण लागलीच स्वत:ला सावरून घेत म्हणाले, ‘‘मग बरोबर आहे. आता या वयांत, प्रकृतीच्या काही ना काही तक्रारी, कुरबुरी चालूच राहाणार. काळजी करू नका. मी तुम्हाला काही तपासण्या करायला सांगतो त्या स्पेशालिस्टकडून करून घ्या आणि रिपोर्ट घेऊन पुढच्या आठवडय़ात मला भेटा. तोपर्यंत ही औषधं केमिस्टकडून घेऊन या. बघू या काय होतं ते.’’ त्यांच्या स्वत:च्या नावाच्या लेटरहेडवर त्यांनी दोनतीन अवघड नावाच्या गोळ्यांची नावं लिहून कागद माझ्याकडे दिला आणि दहा दिवसांनी मला परत बोलावले.

क्लिनिकमधून बाहेर पडताना माझ्या कानांत त्यांचे शब्द घुमत होते. ‘‘अहो, साठीनंतरचे आयुष्य म्हणजे बोनस! काही घाबरू नका. ‘एन्जॉय’ अगदी बिनधास्त एन्जॉय करा!’’ मनात म्हटलं हा फुकटचा बोनस, चांगलाच महागात पडणार तर!

पहिली टेस्ट होती, छातीचा एक्सरे! तो नॉर्मल होता. तो घेऊन मी डॉक्टरांकडे गेले. तो पहिल्यावर त्यांनी ‘सोनोग्राफी’ करायला सांगितली. सोनोग्राफीचा रिपोर्ट ही ‘नॉर्मल’ आला. तेव्हा त्यांनी मला पी. एफ. टी. (पल्मीनरी फंक्शन टेस्ट; म्हणजे फुफुस्सांची कार्यक्षमता चाचणी) करून घ्यायला सांगितली. ही टेस्ट खरोखरच अवघड असते.

या टेस्टमध्ये रुग्णानं काय करायचं असतं, हेच कळत नाही. कारण या टेस्टमध्ये, तोंडानं घेतलेली हवा कपडे वाळत घालायच्या चिमटय़ाने, नाक दाबलेल्या अवस्थेत नाकानं सोडायची असते. दुसरी तपासणी होती, एका दमात फुंकर मारून पाच मेणबत्त्या विझवायच्या. माझ्या फक्त दोन मेणबत्त्या विझल्या. फुगे फुगविण्याच्या तिसऱ्या टेस्टमध्ये तर मी सपशेल फेल झाले. मला एकही फुगा फुगविता आला नाही. मुख्य म्हणजे या सर्व टेस्ट कॉम्प्युटराइज्ड होत्या, त्यामुळे, तिकडे स्क्रीनवर, त्याचा ग्राफ येत होता. ‘‘काय आजी वाढदिवसाला कधी फुगे फुगविले नव्हते वाटतं?’’ असं त्या टेक्निशियननं विचारलं. मनात म्हटलं बोनस, आयुष्यातला आहेर! दुसरं काय? एकूण काय पी.एफ.टी.मध्ये मी पूर्ण नापास झाले होते.

‘‘आता आणखी एक तपासणी करू या. २ डी एको.’’ इति डॉक्टर. म्हटलं, चला, आलीया भोगासी असावे सादर. आता या टेस्टमध्ये तरले, तर विविध औषधांच्या मदतीनं का होईना, पण माझं हे बोनस आयुष्य मी एन्जॉय करू शकणार होते. पण तोपर्यंत, किती वेळा, या दातेरी चक्रातून (टेस्टस्च्या) फेऱ्या मारणार होते, देव जाणे!

साधुसंतांनी ८४ लक्ष योनीच्या फेऱ्यातून मानव प्राण्याला ‘पुनरपि जननम्, पुनरपि मरणम्, पुनरपि जननी जठरे शयनम्’ – असं म्हणत फेरे मारावे लागतात, असं सांगितलं आहे. संसारचक्राच्या फेऱ्यातून मानवाची सुटका नाही हा त्याचा ‘अर्थ’ पण मानव जन्मात ‘या टेस्टच्या फेऱ्या कराव्या लागतील’ हा धोक्याचा कंदील त्यांनी आपल्याला दाखवला नाही त्याला आपण काय करणार?

या सर्व तपासणी प्रकरणात पंधरावीस दिवस गेले. त्या अवधीत माझ्या एका मैत्रिणीनं, ‘सेकंड ओपीनियन घे’ असं सुचविलं. हे डॉक्टर मुंबईतले चांगले नामांकित डॉक्टर होते. ‘हृदय रोगतज्ञ’. तेच तिच्या यजमानांना गेली दोन वर्षे उपचार देत होते. ‘कुणाच्या का कोंबडय़ानं उजाडू दे’ असं म्हणत आम्ही त्यांची अपॉईंटमेंट घेतली. सर्व टेस्टस् आणि त्यांचे रिपोर्टस् यांची एक फाइलच आम्ही तयार केली होती. ती घेऊन आम्ही गेलो. ठरलेल्या वेळी आम्हाला आत बोलावण्यात आलं. त्यांनी अतिशय काळजीपूर्वक सर्व रिपोर्टस् बघितले आणि म्हणाले, ‘‘सर्व टेस्टस् आणि रिपोर्टस् अगदी स्पष्ट आणि सविस्तर आहेत. शंकेला कुठे जागा नाही. विशेष म्हणजे तुम्ही फाईल अगदी छान तयार केली आहे. यावरून हेच स्पष्ट आहे की तुमची तब्येत अगदी छान आहे. मग तुम्हाला वाटेल की या सर्व टेस्टस्ची जरुरी होती का? तर त्याचं काय आहे, पूर्वी मेडिकल क्षेत्र इतकं प्रगत झालेलं नव्हतं. वैद्याच्या औषधावर आपली भिस्त असायची आणि ते नाडी, जीभ, डोळे इत्यादींवरून रोगाचं निदान करीत. पण आता त्यात खूप बदल होत आहेत. रुग्णाची तपासणी करण्याची विविध साधने आज आमच्या हाताशी आहेत. आम्ही रुग्णाला तपासतो त्याच्याकडून काही माहिती घेतो. यावरून आम्ही रोगाचं निदान व उपाययोजना करीत असतो. आधुनिक, प्रगत ज्ञानाची जोड देण्यासाठी या टेस्टस् उपयुक्त ठरतात. त्यात रुग्णाला जरा त्रास होतो. पण रोगाचं अचूक निदान आणि योग्य उपचार यांच्या साह्य़ानं, रुग्णाला नक्की बरं वाटेल, याविषयी आम्हाला विश्वास असतो. तेव्हा काळजी करू नका. एव्हरीथिंग विल बी ओके.’’

आमच्या सर्व शंकांचं निरसन करून, आमचा चिंतेचा भार हलका करण्यात डॉक्टर यशस्वी झाले होते. डॉक्टरांना मनापासून धन्यवाद देऊन, प्रसन्न चेहऱ्यानं आम्ही क्लिनिकमधून बाहेर पडलो.

असाच एक सुरेख, नितळ अनुभव मी काही वर्षांपूर्वी अमेरिकेत माझ्या मुलीकडे गेले असताना मला आला. माझ्या मुलीच्या पहिल्या डिलिव्हरीवेळी मी तिच्याजवळ होते. डॉक्टर अमेरिकेतले असले तरी भारतीय होते. तिला पहिली मुलगी झाली. डॉक्टरांना वाटलं मी जरा नाराज असेन. दुपटय़ात गुंडाळलेली ती छोटीशी बेबी. माझ्या हातात न देता, नुसती दुरून दाखवीत ते म्हणाले ‘‘नो नो नॉट टुडे’’ चारपाच दिवसांनी तुम्ही तिला घेऊ शकता.

‘‘हॅलो बेबी, बघ, बघ, आजी अगदी खूश आहे. कारण म्हणतात ना, पहिली बेटी धनाची पेटी’’ आणि खरच, त्या चिमण्या जीवाला पाहून मी अगदी खूश झाले होते. पंचवीस वर्षांनी घरात पाळणा हलणार होता.

त्या गोष्टीला आता अठरा वर्षे लोटली होती. तिला घेऊन, आम्ही परत त्यांच्याकडे गेलो होतो. माझ्याबरोबर ती भारतात येणार होती. त्यापूर्वी तिला व्हॅक्सीनेशन घ्यायचं होतं. तिला सोबत म्हणून मी तिच्याबरोबर गेले होते. मला पहाताच डॉक्टर म्हणाले ‘‘काय आजीबाई नातीच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी आलात वाटतं.’’ त्यांच्या या आपुलकीच्या चौकशीनं मी अगदी भारावून गेले. मध्ये इतका कालावधी लोटला होता, पण ते विसरले नव्हते.

यथा अवकाश डॉक्टरांनी सुचविलेली टू डी एको टेस्ट पार पडली. निकाल येणं बाकी होतं. पण माझ्या मनाचा निर्धार झाला होता. आता काहीही होवो, रिपोर्ट काहीही येऊ दे, आणखी नवीन तपासण्या कराव्या लागल्या तरी चालेल. पण आपण हे ‘बोनस’ आयुष्य भरभरून जगायचं, कन्हत, कुंथत नाही. अगदी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून!

रोज वॉकला जायचं, नवीन आलेले बूट नुसतेच पडून आहेत त्याचं साग्रसंगीत उद्घाटन करायचं, आणि नियमितपणे फिरायला जायचं. ब्रिस्क वॉकिंग (जलद चालणं) जमलं नाही तरी चालेल, पण शिवाजी पार्कला एक चक्कर मारायचीच. थोडा वेळ थांबून का होईना एक चक्कर पूर्ण करायचीच. जिना चढताना दम लागला तर एक जिना चढल्यावर मध्ये थांबायचं, पण लिफ्टचा वापर करायचा नाही. औषधं वेळेवर घ्यायची, संतुलित आहार घ्यायचा आणि हे ‘बोनस आयुष्य’ एन्जॉऽऽऽय करायचं!

सरोज राईलकर chaturang@expressindia.com