मंदिरातील देवीच्या चेहऱ्यावरच्या करारीपणाचा लवलेशही भारतीच्या चेहऱ्यावर नव्हता. सुजलेल्या तोंडाभोवती पदर घेऊन अपराधी चेहऱ्याने ती जमिनीकडे नजर खिळवून बसली होती. मनात आले, या देवीला जोवर आपल्यावरच्या अन्यायाची, आपल्या आत्मसन्मानाची जाणीव होत नाही तोवर आपल्या ढोंगी समाजाकडून मंदिरातील देवींना आणि भारतीसारख्या देवींना मिळणाऱ्या वागणुकीत प्रचंड तफावतच असणार.

शिबूचा म्हणजेच भारतीच्या नवऱ्याचा आजवर न पाहिलेला हिंसक चेहरा प्रथमच माझ्यापुढे आला होता. आज सकाळी घराबाहेर पडले तेव्हा वाटेत तिच्याकडे जुने पडदे देऊन बाजारात जायचा विचार करत मी तिथे गेले. मला बघून ती एकदम चमकली. पटकन दाराआड होत पदराआड चेहरा झाकत माझ्याशी बोलण्याचा तिचा प्रयत्न पाहून मला शंका आली. तिच्याकडे पडदे सोपवत मी संभाषण नेटाने चालू ठेवून अंदाज घेऊ  लागले.

पडदे ठेवायच्या मिषाने ती आत वळली तेव्हा तिच्यासोबत राहणाऱ्या पोरसवदा दिराकडून इतकेच समजले की काल ती छटपूजेहून उशिरा घरी आली आणि त्यापुढे स्वयंपाक बनवायला उशीर तर झालाच पण जो बनवला तोही अपुरा पडला म्हणून कालपासून त्यांच्यात वादावादी सुरू होती. आणि आज पुन्हा त्यावरून शिबू भडकला आणि त्याने रागाच्या भरात हातातील जाडजूड पितळेचा लोटा तिच्यावर भिरकावला. घरात डोकावून पाहिले तर शिबूचा पत्ता नव्हता.. तो कुण्या गाववाल्याला भेटायला गेला होता. भारतीचा सुजलेला डोळा, काळेनिळे पडलेले गालफड, हळद चेपलेला ओठ पाहून बायकोशी असे क्रूर वागणाऱ्या आणि त्यानंतर तिला अशा अवस्थेत बिनदिक्कतपणे सोडून जाणाऱ्या शिबूबद्दल मस्तकात तिडीक गेली. ती नको म्हणत असतानाही मी तिला आमच्या डॉक्टरांकडे घेऊन आले होते. पूर्ण रस्ताभर भेदरलेली भारती अनेक प्रकारांनी, ‘‘भाभीजी, उन्हे कुछ नही बोलना.. वह हमेशा नही पीटते, मेरा कुछ काम या बात उन्हे पसंद न आये तोही हाथ उठाते है।  वैसे मनसे बहुत अच्छे है.. सिर्फ  उनका गुस्सा बहुत तेज है। लेकिन बाकी मर्दो जैसे वह शराब पिकर मारते नही है। आज असलमे मेरीही गलती हुई.. मुझे उन्हे ठीक तरहसे जवाब देना चाहिये था। ..’’ पतीपरमेश्वर परंपरा जपण्याच्या प्रयत्नात ती त्याच्या वागण्याचे मनापासून समर्थन करत होती की नवऱ्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर पुढच्या भयंकर परिणामांना घाबरून ती मला पटवायचा प्रयत्न करत होती तीच जाणे. आम्ही डॉक्टरकडे पोहोचलो. ती आपल्या वेदना सहन करत बसून राहिली.. नि मला मात्र त्यांचा भूतकाळ आठवू लागला..

सुमारे दोनेक वर्षांपूर्वी बिहारमधून आमच्या सोसायटीत वॉचमन म्हणून रुजू झालेल्या शिवकुमार तथा शिबूबद्दल सर्वाचेच चांगले मत झाले होते. बिहारमधील गरिबी आणि बेकारीला कंटाळून दोन कपडय़ांनिशी मुंबईत नशीब आजमवायला आलेला शिबू वॉचमनच्या पगाराशिवाय पडेल ते काम, कुणाच्या गाडय़ा धुवून, वाणसामान, दळण आणून देऊन, अत्यंत हसतमुखाने आणि त्याहीपेक्षा प्रामाणिकपणे करून पैसे जोडत असे. कष्टाळूपणा हा स्थायिभाव असलेल्या शिबूला स्थानिक तरुणांसारखी कामं निवडण्याची अथवा नाकारण्याची, टाळायची मिजास अर्थात परवडणारी नव्हतीच. कारण ज्या दिवशी त्याचे काम, कष्ट थांबले असते त्या दिवशी त्याची पैशाची आवक बंद झाली असती. डोक्यावरचे छप्पर गायब झाले असते. नाइलाजाने परतीची वाट धरावी लागली असती. त्याचे तर आता स्वतंत्र रूम/झोपडे घेऊन बायकोला इथे आणायचे स्वप्न होते.

त्याच्याशी बोलताना हळूहळू त्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढल्याचे लक्षात येई. दिवसेंदिवस तो मुंबईच्या वातावरणाला सरावला. अत्यंत मागास भागातील पुरुषप्रधान संस्कृतीतून आलेल्या शिबूला सुरुवातीला इथले स्त्री-पुरुषांमधील मोकळे वातावरण, स्त्रियांचे आत्मविश्वासाने सर्वत्र फिरणे, त्यांची राहणी वगैरे पचवणे बहुतेक कठीण गेले असणार. कारण त्याच्या गावच्या गोष्टी सांगताना तिथल्या अतक्र्य प्रथा पद्धती ऐकून आपण चक्रावून गेलो तरी त्याचा मात्र त्यावर ठाम विश्वास, श्रद्धा असायची. एकदा मी बाहेरगावाहूून पहाटे टॅक्सीने आले तेव्हा तत्परतेने माझे सामान उतरवताना, ‘‘भाभीजी आप अकेलेही गाव गयी थी..साब नही आये आपके साथ..’’ विचारताना त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून मला हसूच आले. कष्टाळूपणा आणि जिद्दीच्या जोरावर शिबूने लवकरच स्वतंत्र भाडय़ाची रूम घेऊन बायकोला म्हणजे भारतीला गावावरून इथे आणल्याची बातमी दिली तेव्हा समस्त सोसायटीवाल्यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

शिबूजवळ मी बरेचदा भारतीची चौकशी करायची तेव्हा एकदा ‘‘भाभीजी, भारती घरमे पूरा दिन अकेली बैठके आराम करनेसे कुछ काम करेगी तो अच्छा है ना.. लेकिन कही बाहर जाके कमानेसे घरमेही काम करना मुझे ठीक लगता है। इसलिए जल्दीही हमारे बस्तीवालोंके कपडे प्रेस करनेका काम करेगी। कपडा लेके आनेका-देनेका काम मै संभालूगा। वो सिर्फ घरमे काम करेगी..’’ त्यासाठी त्याला माझ्याकडून सुती जुन्या साडय़ा, पडदे, चादरी वगैरे हवे होते. शिबूच्या या कल्पनेचे त्याच्या उद्योगप्रियतेचे पुन्हा खूप कौतुक वाटले. पण एकीकडे बायकोने पैसे कमवावे वाटणारा शिबू तिचे चार जणांत मिसळणे टाळतोय ही सूक्ष्म शंका मात्र माझ्या मनात आल्याशिवाय राहिली नाही.

एकदा शिबूला पैशाच्या नियोजनासंबंधी सांगताना त्या दोघांचे बँकेत खाते उघडण्याविषयी सांगितले. त्याने तयारी दर्शवल्यावर मी त्याच्यासाठी बँकेतून फॉर्म घेऊन आले. दुसऱ्या दिवशी तो प्रथमच भारतीला आमच्याकडे घेऊन आला. भांगात केशरी सिंदूर भरलेली लहानखुरी भारती चुणचुणीत वाटली. मी दोघांचे नाव विचारून फॉर्म भरला त्यांच्याकडे सहीला दिला दोघेही सही करण्यापुरते शिक्षित होते. भारतीने सही करून तो शिबूकडे सोपवला. त्याने सही केली आणि बराच वेळ फॉर्मकडे बघत हळूच म्हणाला. ‘‘भाभीजी एक गलती दुरुस्त करनी है।’’ मी चमकून पाहिले तेव्हा भारतीकडे बोट दाखवत म्हणाला, ‘‘इसका नाम सिर्फ भारती नही भारतीदेवी लिखना चाहिए। हमारेमे हर औरत देवी मानी जाती है! इसलिए छोटी बच्चीसे लेकर हर औरतके नामके आगे देवी जोडना जरुरी है।’’ त्या थोर परंपरेचा अभिमान शिबूच्या चेहऱ्यावर त्या क्षणी झळकत होता..

.. आणि आज हे.. डॉक्टरांकडे बसलेल्या भारतीविषयी कणव दाटून आली. केवळ स्वयंपाक उशिरा आणि अपुरा केल्याबद्दल, नवऱ्याला प्रत्युत्तर दिल्याबद्दल संतापाने हाताला येईल ती वस्तू बायकोवर फेकून मारणाऱ्या शिबूला ‘देवी’ काय ‘माणूस’ शब्दाचा अर्थ तरी नीट समजला होता का अशी शंका मला आली. वर्षांनुवर्षे स्त्रियांना देवी मानणारा शिबू आणि त्याचा समाज त्यांच्याशी असं वागायला कसं धजावतो? आपल्या अन्यायकर्त्यांचा, दुर्जनांचा प्रतिकार करायला ज्याप्रमाणे देवीने हातातील शस्त्र उचलून प्रतिकार केल्याचं आपण आजवर ऐकत आलो तसंच या देवी नाव मिरवणाऱ्या भारतीसारख्या अनेक स्त्रियांनी त्यांच्या अन्यायकर्त्यांवर त्यांच्या हातातील शस्त्राने म्हणजेच चिमटा, लाटणं, झाडू, काठीने प्रतिकार केला तर? अर्थात ही कल्पनाच होती कारण भारतीसारख्या स्त्रिया ज्यांना आपल्यावर अन्याय होतोय हेच मुळात कळत नसतं तिथे त्याविरोधात कसं लढणार? अजून किती पिढय़ा अशा मार खात खर्ची पडणार याबद्दल खंत दाटून आली.

मी भारतीकडे पाहिलं. मंदिरातील देवीच्या चेहऱ्यावरच्या करारीपणाचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता. सुजलेल्या तोंडाभोवती पदर घेऊन अपराधी चेहऱ्याने ती जमिनीकडे नजर खिळवून बसली होती. मनात आलं, या देवीला जोवर आपल्यावरच्या अन्यायाची, आपल्या आत्मसन्मानाची जाणीव होत नाही तोवर आपल्या ढोंगी समाजाकडून मंदिरातील देवींना आणि भारतीसारख्या देवींना मिळणाऱ्या वागणुकीत प्रचंड तफावतच असणार. गलती त्या ढोंगी समाजाची नाही तर.. फक्त नावापुरतं देवीपण स्वीकारणाऱ्या असंख्य स्त्रियांची आहे.

alaknanda263@gmail.com