स्वतंत्र विचार करायला न घाबरणारी काही माणसे मात्र ‘ईश्वर खरेच आहे का?’ या शोधात जिज्ञासेने उडी घेतात. त्यातील काही जण आपल्या विचाराने ‘अज्ञेयवादी’ बनतात, तर काही जण ‘निरीश्वरवादी’..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपापल्या दैनंदिन कामाच्या रामरगाडय़ात गुंतलेला सर्वसाधारण माणूस ‘ईश्वर आहे की नाही’ या वादात बहुधा कधीच पडत नाही. अशा वादाचा काही उपयोग नाही असे ठरवून आपापल्या समाजातील किंवा परिसरातील अनेकांप्रमाणे त्यानेही ‘ईश्वराचे अस्तित्व, कर्तृत्व गृहीत धरून चालणे’ हेच त्याच्या हिताचे आहे असे मानून जीवनात तो मार्गक्रमण करीत राहतो, पण स्वतंत्र विचार करायला न घाबरणारी काही माणसे मात्र ‘ईश्वर खरेच आहे का?’ या शोधात जिज्ञासेने उडी घेतात. त्यातील काही जण आपल्या विचाराने ‘अज्ञेयवादी’ बनतात, तर काही जण ‘निरीश्वरवादी’. अज्ञेयवादी माणसाची भूमिका अशी असते की, ‘आजच्या मानवी ज्ञानाच्या व बुद्धीच्या साहाय्याने ईश्वर आहे की नाही, हे निश्चित करता येणार नाही; निदान मी तरी ते निश्चित करू शकत नाही.’ दुसरे काही जण असे मानतात की, ‘ईश्वराचे अस्तित्व किंवा नास्तित्व सिद्ध करता येणे कधीच शक्य नाही. एवढेच नव्हे तर, तसे करण्याची काही आवश्यकताही नाही.’ काही जणांच्या मते अज्ञेयवाद ही एक उत्तम मध्यममार्गी भूमिका असून, ईश्वर आहे किंवा नाही ही टोकाची दोन गृहीते सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे फुकाची डोकेफोड आहे. काही जण काही मर्यादेपर्यंत शोध घेऊन, ‘ईश्वराच्या अस्तित्वाला काहीही पुरावा नाही’ इथपर्यंत येतात; परंतु ‘अस्तित्वाला पुरावा नसणे, हाच नास्तित्वाचा पुरावा ठरतो’ हे त्यांना कळत किंवा पटत नसल्यामुळे ते म्हणतात की, धर्मग्रंथात वर्णिलेला ईश्वर आम्हाला पटत नसला तरीसुद्धा, आम्हाला समजत नाही अशी काही तरी प्रचंड शक्ती अस्तित्वात असूनही, ती कशी आहे ते आम्हाला न कळणे शक्य आहे; त्यामुळे ते स्वत:ला अज्ञेयवादी म्हणवितात.
काही जणांच्या बाबतीत अज्ञेयवाद ही पळवाट असू शकते. ईश्वर आहे बोलायला नको आणि नाहीपण बोलायला नको. अशा प्रकारे अज्ञेयवादी असणे सोयीचे आहे. काहींच्या बाबतीत अज्ञेयवादी असणे ही निरीश्वरवादाकडे जाण्याची पायरी असू शकते. ते सर्व राहो. निरीश्वरवादी मनुष्यसुद्धा ‘ईश्वराचे नास्तित्व’ गणितासारखे सिद्ध करू शकत नाही हे खरेच, पण तो असे मानतो की, ईश्वराच्या अस्तित्वाला काहीही पुरावा नसणे हाच ईश्वराच्या नास्तित्वाचा पुरेसा पुरावा आहे. पूर्णत: निरीश्वरवादी बनलेला माझ्यासारखा माणूस ‘ईश्वराचे नास्तित्व’ जरी स्वतंत्रपणे व निर्विवादपणे सिद्ध करू शकत नसला तरी तो स्वत:ला केवळ संशयवादी किंवा अज्ञेयवादी न म्हणविता निरीश्वरवादी किंवा नास्तिक म्हणवितो आणि आजूबाजूच्यांची नाराजी ओढवून घेतो.
वैज्ञानिकांना त्यांच्या त्यांच्या विषयातील संशोधन करताना, ईश्वराचे अस्तित्व मानावे लागत नाही हे तर निश्चितच खरे आहे; परंतु यावर लोकांचे म्हणणे असे की, ‘तर मग सगळे वैज्ञानिक नास्तिक का नाहीत? अनेक मोठमोठे वैज्ञानिक त्यांच्या वैयक्तिक जीवनात ईश्वराचे अस्तित्व मानीत असतील किंवा तसे म्हणत असतील हे शक्य आहे, पण याबाबत आम्हाला असे वाटते की, अनेक वैज्ञानिक फक्त संशयवादी किंवा ईश्वरवादी किंवा भक्तसुद्धा असण्यात आश्चर्य असे काहीच नाही. कारण ते जे जे संशोधन करतात ते ते, त्या त्या विज्ञानशाखेतील संशोधन असते; ते काही ईश्वराबाबत संशोधन नव्हे. ते कशाला म्हणतील, ‘ईश्वर नाही’ म्हणून?
निरीश्वरवाद्यांना तात्त्विक पातळीवर जसा ईश्वरवाद अमान्य आहे तसा अज्ञेयवादही अमान्यच आहे; पण ते असे मात्र म्हणतात की, व्यावहारिक पातळीवर समाजाने ईश्वरवाद मान्य करून, ईश्वरकृपेसाठी पूजा, प्रार्थना, उत्सव, उन्माद इत्यादींमध्ये वेळ व श्रम खर्च करून त्यात आयुष्य वेचण्याऐवजी, अज्ञेयवाद स्वीकारलेला बरा. कारण त्यामुळे निदान अध्यात्माचा अतिरेक जो माणूस जातीला नि:संशय हानिकारक आहे तो तरी टाळला जाईल आणि काही विशिष्ट धार्मिक गटांना अध्यात्माची झिंग येऊन, ते जगात दहशतवादी, आतंकवादी कृत्ये करून जगाला हैराण करतात, ते तरी टळेल किंवा कमी होईल. त्या दृष्टीने अज्ञेयवाद मानणे ईश्वरवाद मानण्यापेक्षा चांगले आहे.
आता निरीश्वरवादाची भूमिका नेमकी काय असते ते इथे आपण थोडक्यात पाहू या. तर निरीश्वरवादाची भूमिका अशी आहे की, या विश्वात जे जे काही आहे ते ते सर्व ‘भौतिक’ आहे. म्हणजे असे की, विश्वातील सर्व शक्ती व सर्व वस्तू (ज्या सर्व शक्तींचीच वेगवेगळी रूपे आहेत.) व त्यांचे सर्व नियम आणि काळ व अवकाश (पोकळी) हे सर्व अस्तित्व भौतिक-रासायनिक असून या विश्वात अतिभौतिक (म्हणजे भौतिकापलीकडील किंवा भौतिकाव्यतिरिक्त) असे किंवा ‘आध्यात्मिक गूढ शक्ती’ असे किंवा ‘विश्वनिर्माता व त्याचा सांभाळकर्ता ईश्वर’ असे काही तरी इथे किंवा आसपास आहे, असे म्हणायला काहीही आधार नाही.
परंतु विश्व या भौतिक अस्तित्वात, त्याच्या भौतिकतेचे आज स्पष्टपणे तीन स्तर निर्माण झालेले आहेत, ते लक्षात घेणे जरूर आहे. ते तीन स्तर थोडक्यात असे आहेत. पहिला मूळ स्तर निम्न स्तर असून तो निर्जीव स्तर आहे. त्यातून निर्माण झालेला दुसरा स्तर ‘सजीव स्तर’ असून तो ‘अन्नग्रहण करणारा’ व ‘टिकून राहण्याचे उद्दिष्ट असलेला’ असा आहे. या दुसऱ्या सजीव स्तरांतून निर्माण झालेला भौतिकाचा तिसरा स्तर हा ‘मानव स्तर’ असून हा ‘उत्क्रांत सजीव प्राणी स्तर’ मन, बुद्धी व भावनाधारक आहे.
संपूर्ण विश्व हे अस्तित्व, मुळात अतिप्रचंड, टिकाऊ, चैतन्यमय, गतिमान व भौतिक नियम पाळणारे होते व आहे. म्हणजे ते केवळ निर्जीव, भौतिक प्रकारचे होते व आहे. त्यात भौतिकापलीकडील किंवा भौतिकाव्यतिरिक्त किंवा गूढ असे काहीही नव्हते आणि अर्थात आजही त्यात असे काही नाही. त्याला मूलत: साधी सजीवताही नव्हती. म्हणजे अर्थात त्याला मन, बुद्धी, भावनाही नव्हत्या. तसेच त्याला इच्छा, उद्दिष्टे, योजना, प्रेरणा वगैरे काहीही नव्हते व नाही.
त्या मूळ निर्जीव, भौतिक चैतन्यांतून अतिदीर्घ काळाने म्हणजे शे-सव्वाशे कोटी वर्षांनी पृथ्वी या ग्रहावर, काही ठिकाणी आधी साधे, सूक्ष्म आकाराचे व क्षणभंगुर आयुष्य असलेले, परंतु कसले तरी अन्न ग्रहण करणारे आणि ज्यांना टिकून राहण्याचे उद्दिष्ट व प्रेरणा आहे व ज्यांना पुनरुत्पादन क्षमता प्राप्त झालेली आहे असे सूक्ष्म सजीव निर्माण झाले.
अशा साध्या सूक्ष्म सजीवांतून, पुढील अतिदीर्घ काळात पायरीपायरीने उत्क्रांती होऊन, शेवटी मन, बुद्धी, भावनाधारक व ज्ञानलालसा प्राप्त झालेला मानवी स्तर बनला व त्याने प्रयत्नपूर्वक आपली मन-बुद्धी व आपले ज्ञान विकसित केले. म्हणजे आपल्या आजच्या या विश्वात या मानवी मन-बुद्धीसह सर्व काही भौतिक आहे आणि भौतिक नियमांनी बद्ध आहे. म्हणजे भौतिक नियमांचे उल्लंघन करू शकणारे असे इथे काहीही नाही; परंतु झाले काय की, या मानवी स्तराने आपल्या विकसित मन-बुद्धीतून ईश्वर, धर्म, अध्यात्म, स्वर्ग, नरक, परलोक, पुनर्जन्म वगैरे अस्तित्वात नसलेल्या अनेक गोष्टी केवळ कल्पनेने रचलेल्या आहेत. सारांश, ईश्वर किंवा सैतान या (भुताखेतांप्रमाणेच) केवळ मानवी कल्पना असून त्यात काही सत्य नाही, असे निरीश्वरवादाचे म्हणणे आहे.
यावर असा आक्षेप येऊ शकेल की, ‘मानवी मन-बुद्धी’ ही भौतिक विज्ञान ज्या जड वस्तूंचा व त्यांच्या शक्तींचा अभ्यास करते, तशा प्रकारची जड वस्तू/शक्ती नसल्यामुळे तिला ‘भौतिक’ म्हणता येणार नाही. (म्हणजे ती ईश्वरीय किंवा आध्यात्मिक आहे.) परंतु असे म्हणणे बरोबर नाही, कारण मानवी मन-बुद्धीचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास नक्कीच करता येतो. (मानसविज्ञान). शिवाय मेंदूच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीचा अभ्यास त्यातील रासायनिक घटना, त्यातील विद्युतप्रेरणा इत्यादींचाही वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास आजचे प्रगत मेंदूविज्ञान करीत आहे. शिवाय वर पाहिल्याप्रमाणे, काळाच्या तुलनेने क्षणभंगुर असलेली आपली सजीवता म्हणजे आपला प्राण व त्याबरोबर येणारे आपले सचेतनादी गुण व आपली मन-बुद्धी वगैरे सर्व बाबी या भौतिकाव्यतिरिक्त किंवा भौतिकापलीकडील नसून ते भौतिकाचेच केवळ विस्तार किंवा नवनिर्मित स्तर आहेत; म्हणजे ते भौतिकच आहेत. पण आपण मात्र अशी युक्ती करतो की, सजीवांना किंवा मानवाला त्यांच्या ‘प्राणा’बरोबर एक ‘आत्मा’ही मिळालेला आहे असे ठरवितो, तो आत्मा क्षणभंगुर तर नाहीच, पण फक्त टिकाऊही नसून ‘अमर’ आहे असे ठरवितो व तो आत्मा ईश्वराने आपल्याला दिलेला आहे असेही ठरवितो आणि अशा प्रकारे आपण मानवी जीवनावर अध्यात्माचा आरोप करतो. ईश्वर परमात्म्याचे अस्तित्व मानतो आणि मग अध्यात्माला कुरवाळीत आपले आयुष्य व्यतीत करतो.

मराठीतील सर्व मानव-विजय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atheist and devotees
First published on: 02-11-2015 at 01:25 IST