25 April 2018

News Flash

निरीश्वरवादाचे भवितव्य

निरीश्वरवाद हा ‘प्रवाहाविरुद्ध विचार’ आहे हे मान्य करावे लागेल.

निरीश्वरवाद हा ‘प्रवाहाविरुद्ध विचार’ आहे हे मान्य करावे लागेल. मात्र तसे असूनही सार्वत्रिक शिक्षणामुळे समाजमनात ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’चा जर स्वीकार झाला आणि ‘बुद्धिवादाचा’ प्रसार झाला, तर कालांतराने पुढची पायरी म्हणून ‘निरीश्वरवाद’ अधिकाधिक लोकांना मान्य होईल..

काही लोकांना असे वाटते की ‘निरीश्वरवाद’ हे आपल्याकडे, म्हणजे भारतात नवीन आलेले काही तरी ‘पाश्चात्त्य फॅड’ आहे. परंतु सत्य हे आहे की निरीश्वरवाद नवीन नाही. पाश्चात्त्यही नाही व फॅशन, खूळ किंवा फॅड तर मुळीच नाही. भारतात प्राचीन हिंदू धर्मात काही लोक मानीत होते असा स्पष्ट (लख्ख) निरीश्वरवाद होता. त्याच्या मागे तर्कशुद्ध विचारसरणी होती आणि आता विसाव्या शतकातील जगभरच्या वैज्ञानिक शोधांनी त्याला आणखीच पाठिंबा मिळालेला आहे. या लेखमालेच्या सुरुवातीच्या (१६ फेब्रुवारी व २३ फेब्रुवारीच्या) लेखात आपण हे पाहिलेच आहे की भारतात लोकायत, लोकायतिक, बार्हस्पत्य किंवा चार्वाक या नावांनी प्रचलित असलेले तत्त्वज्ञान हे स्पष्टपणे निरीश्वरवादी तत्त्वज्ञान असून, आजचे आधुनिक जग ज्या ‘वैज्ञानिक विचारसरणीवर’ उभे आहे ‘ती विचारसरणी’ जगात प्रथम याच भारतीय विचारवंतांनी जगापुढे ठेवली होती व ही बाब भारतीयांना, हिंदूंना नक्कीच अभिमानास्पद आहे, असे माझे मत, मी तिथे नोंदवलेले आहे.
आजचे आपल्या पृथ्वीवरील जग हे अनेक राष्ट्रांचे व अनेक धर्माचे बनलेले आहे. जगात एकेका राष्ट्रातसुद्धा अनेक धर्म आहेत व ही वास्तविकता पुढे येणाऱ्या काळातही बदलली जाण्याची शक्यता नाही. म्हणून धर्माधर्मातील कटुता, परस्परद्वेष व धार्मिक दंगेयुद्धे व त्यामुळे आज निर्माण झालेल्या जगभरच्या लाखो नव्हे तर आता कोटय़वधी विस्थापितांचे/निर्वासितांचे जीवनमरणाचे प्रश्न वगैरे निदान कमी होण्यासाठी, ‘देवाधर्माचे महत्त्व किंवा मूलतत्त्ववाद’ वाढविण्याची नव्हे तर ते कमी करण्याची आवश्यकता आहे. एवढेच नव्हे तर देव, धर्म, कर्मकांड, प्रार्थना, नमाज इत्यादींना अजिबात थारा न देता, सद्वर्तन व परस्परसंबंधांना जर मनुष्य आत्मसात करील तर तो संपूर्ण मानवी जीवन आनंदमय बनवील असे माझे मत आहे.
आधुनिक काळात ‘जागतिकीकरण’ जे आता कुणीच थांबवू शकणार नाही ते व इतर अनेक कारणांनी जग परस्परावलंबी, स्पर्धाशील व सहकार्यशीलसुद्धा बनत आहे आणि विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधांमुळे प्रगतिपथावर आहे; अशा वेळी हे आवश्यक आहे की आपण सर्वानी आता ‘काल्पनिक शक्तींवर’ अवलंबून न राहता, भौतिक निसर्ग शक्तींचा, तळागाळातील माणसासह सर्वाच्या ऐहिक सुखासाठी, जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचे ध्येय मानले पाहिजे. तसेच दैववादाला नकार देऊन मानवजातीचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे. हे सर्व कल्पित ईश्वर मानून नव्हे, तर निरीश्वरवादानेच शक्य होईल असे खात्रीपूर्वक म्हणता येते.
प्रत्यक्ष जीवनात निरीश्वरवादी मत अनुसरणाऱ्या माणसाला त्याच्या वैयक्तिक जीवनातही त्याचे अनेक उपयोग आहेत. असा मनुष्य जीवन जगतो ते श्रद्धेच्या पांगुळगाडय़ाच्या आधाराने नव्हे तर तर्कबुद्धीच्या खंबीर आधाराने. त्यामुळे निदान श्रद्धेचा अतिरेक व अंधश्रद्धा यांना तरी तो नकार देतो. कालबाह्य़ पुराण कल्पनांना चिकटून न राहता, ‘सामाजिक सुधारणा घडवून आणण्यास तो तयार होतो; त्यामुळे श्रद्धातिरेक व अंधश्रद्धांमध्ये खर्च होणारी त्याची व समाजाची शक्ती व वेळ याची बचत होते. ती वाचलेली शक्ती व वेळ, ‘उत्पादन, विश्रांती व अभ्यास’ यासाठी वापरून समाजजीवनाचा दर्जा सुधारला जाऊ शकतो.
ज्याप्रमाणे कशाचाही अतिरेक वाईट असतो, तसा निरीश्वरवादाचा अतिरेकही वाईटच आहे. उदाहरणार्थ, निरीश्वरवाद्याने आस्तिकांच्या कर्मकांडाला हसून त्यांचा उपमर्द करणे किंवा अस्तित्वात नसलेल्या ईश्वराची उपासना करणारे म्हणून त्यांना कमी लेखणे किंवा स्वत:स शहाणे समजून, त्यांच्याशी फटकून वागणे, हे सर्व निरीश्वरवादाचे अतिरेक होत. तसेच निरीश्वरवाद्यांना ईश्वर केवळ काल्पनिक आहे असे वाटते आणि संतांनी मात्र, ईश्वरस्मरण करीत जीवन जगावे अशी शिकवण इतिहासकाळात दिली, हे खरे आहे तरी, निरीश्वरवाद्यांनी संतांच्या त्या काळातील अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. संतांची ‘ईश्वराच्या अस्तित्व व कर्तृत्वाबद्दलची मते’ साफ नाकारूनही, समाजसुधारक व थोर मानव म्हणून संतांचे मोठेपण मान्य करणे आवश्यक आहे. जे संतांबाबत तेच प्रेषित व धर्मसंस्थापकांबाबतही खरे आहे.
सामान्य माणसाचा सध्याचा ‘धर्मनिष्ठा’ व ईश्वरनिष्ठेकडील ‘ओढा’ पाहता, निरीश्वरवाद हा ‘प्रवाहाविरुद्ध विचार’ आहे हे मान्य करावे लागेल. त्यामुळे त्यावर अधिक मर्यादा येतात. मात्र तसे असूनही सार्वत्रिक शिक्षणामुळे समाजमनात ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’चा जर स्वीकार झाला आणि ‘बुद्धिवादाचा’ जर प्रसार झाला, तर कालांतराने पुढची पायरी म्हणून ‘निरीश्वरवाद’ अधिकाधिक लोकांना मान्य होईल असे वाटते. मात्र लोकांना हे विचार फक्त हळूहळू पटतील. सर्वाच्याच मनात ईश्वरकल्पना लहानपणापासून ठसलेली असल्यामुळे, जे लोक स्वत:च मनावर बुद्धिवादी विचारांचा पुरेसा प्रयोग करतील, फक्त त्यांनाच निरीश्वरवाद पटू शकेल. सर्वाना पटणे कठीणच.
याच्या उलट दिशेला, महाराष्ट्रातील व भारतातील सामान्य माणसाची काही वाटचाल चालू आहे व तिच्यामागे हितसंबंधीयांचे एक कारस्थान कार्यरत आहे असे दिसते. आपण अगोदरच्या एका लेखात पाहिल्याप्रमाणे, हितसंबंधी ‘चौकडी’ अशी आहे. (१) सत्तालोभी राजकारणी (२) धनलोभी गुरुबाबा (३) धंदेवाईक वृत्तीचे देवळांचे मालक, ट्रस्टी व इतर, ज्यांची उपजीविका देवाधर्माच्या नावाने चालते आणि (४) पापी, भ्रष्टाचारी व गुन्हेगार लोक, ज्यांना आपल्या पापांना माफी मिळण्याच्या आशेने, आजूबाजूला देवाधर्माचा गजर हवा असतो. त्यासाठी जनजीवनात देवाधर्माचे प्रस्थ वाढविण्याकरिता ते सतत प्रयत्नशील असतात. याउलट सामान्य मनुष्य साधेसुधे जीवन जगत असतो, आपापली सुखदु:खे समाधानाने भोगीत असतो. तरीही तो काही पापे करीत नाही. कुणाला साधा त्रासही देत नाही. त्याला देवाची आणि देवाकडून मिळणाऱ्या पापाच्या माफीची काय आवश्यकता आहे? परंतु आता वरील चौकडीच्या कारस्थानामुळे अशी शक्यता आहे की हा सामान्य माणूस अधिकच देवभोळा, धर्मभोळा, दैववादी आणि कडवा (कदाचित तालिबानवादीसुद्धा) बनेल आणि ऐहिक सुखदु:खे व सामाजिक प्रगती यांच्याकडे तो दुर्लक्ष करील. अशा परिस्थितीत निरीश्वरवादाला पुढील दीर्घ काळात तरी काही चांगले भवितव्य आहे का?
आमच्या मते निरीश्वरवादाला चांगले भवितव्य नक्कीच आहे. जर काल्पनिक ईश्वराला श्रद्धेने स्वीकारून, ईश्वरवादी मताचा जगभर इतका प्रसार व टिकाव होऊ शकतो, तर बुद्धिवान असलेल्या या मानवजातीत, आज ना उद्या तर्कबुद्धी वापरून, आपण गेली पाच हजार वर्षे मानला तसला ईश्वर प्रत्यक्षात नाही हे सत्य कालांतराने तरी अनेक लोक स्वीकारतील असे आम्हाला वाटते. जरी आज देवदेवळे व देवळांपुढील रांगा वाढत आहेत, धार्मिक सिनेमे व धार्मिक पुस्तकांचा खप वाढत आहे, गुरुबाबा वाढत आहेत, जनतेचा धार्मिक जल्लोश व उन्माद वाढत आहे, तरी आज ना उद्या ‘सत्य’ – जे ‘भौतिक’ आहे त्याचाच अखेरीस जय होईल, असे मला तरी वाटते. या विधानाच्या समर्थनार्थ काही उदाहरणे आपल्या अनुभवात आहेत का, ते इथे पाहू या. आधुनिक जगात सर्वत्र विद्वन्मान्य झालेले ‘मानवतावाद’ हे तत्त्वज्ञान ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि निरीश्वरवाद’ या दोन मूळ विचारांवरच आधारित आहे. गेल्या शतकात होऊन गेलेला महान बुद्धिवान विचारवंत आणि विश्वमानव ‘मानवेंद्रनाथ रॉय’ (१८८७ ते १९५४) यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस सांगितलेला ‘मूलगामी मानवतावाद’ (रॅडिकल ह्य़ुमॅनिझम) ज्याला ‘शास्त्रीय मानवतावाद’ किंवा ‘नवमानवतावाद’ म्हणतात ते तत्त्वज्ञानसुद्धा निरीश्वरवादीच आहे. महाराष्ट्रात होऊन गेलेले गाढे विद्वान व थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हेसुद्धा रॉयिस्ट आणि निरीश्वरवादीच होते. सध्या अमेरिकेत कार्यरत व सुप्रसिद्ध असलेले ब्रिटिश शास्त्रज्ञ, ‘गॉड डिल्यूजन’सह अनेक बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक ‘रिचर्ड डॉकिन्स’ हे तर जगाला, डार्विनचे तत्त्वज्ञान व निरीश्वरवाद पटवून देण्याचा अव्याहत प्रयत्न करीत आहेत. ब्रिटिश राजवटीत १९३१ साली ब्रिटिशांनी ज्या २३ वर्षे वयाच्या क्रांतिकारकाला फाशी दिले तो भारताचा सुपुत्र शहीद भगतसिंग, अखेपर्यंत निरीश्वरवादीच होता आणि मृत्यूपूर्वी त्याने ‘मी नास्तिक का आहे?’ ही पुस्तिका लिहून ठेवलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे महान कार्य केल्यानंतर ज्यांची हत्या झाली ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांचे अंगीकृत कार्य नीट चालू राहावे म्हणून जरी स्वत:ला निरीश्वरवादी म्हणवीत नव्हते, तरी त्यांचे कार्य वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठीच होते.
ठाणे शहरात मूळ असलेल्या ‘ब्राइट’ नावाच्या सुशिक्षित, तडफदार, तरुण-तरुणींच्या एका ग्रुपबरोबर, गेल्या दोन वर्षांपासून माझा संबंध आहे. हे तरुण (ज्यांची पटावरील संख्या सध्या दोन हजारांपुढे गेली आहे ते) महाराष्ट्रात व बाहेरही ‘शहीद भगतसिंग’ यांचा स्मृतिदिन वगैरे निमित्ताने एकत्र येतात, लोकांना जमवितात आणि व्याख्यानांद्वारे निरीश्वरवादी विचारांचा प्रचार करतात. जेव्हा असे पंधरा-वीस तरुण व्यासपीठावर शिस्तीत उभे राहून ‘मी नास्तिक आहे आणि मी आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करीन’ अशी जाहीर शपथ घेतात, तेव्हा ते दृश्य पाहून फार आशादायी वाटते. निरीश्वरवादाला उज्ज्वल भवितव्य आहे असे वाटते.

First Published on November 16, 2015 1:21 am

Web Title: future of the atheist people
 1. M
  MANGESH
  Nov 16, 2015 at 1:11 pm
  ज्यांचे शिक्षण किमान १२ वि पर्यंत झालेले नाही अशा व्यक्तींना वैज्ञानिक दृष्टीकोन सांगणे मोठी कठीण गोष्ट आहे. मात्र याला अनेक अपवाद देखील आहेत उदा.गे महाराज पहिल्या वर्गात सुद्धा गेले नाहीत पण त्यांचा दृष्टीकोन विज्ञान्वादीच होता. खरे तर मानवी जीवनात अशा काही गोष्टी घडतात असे प्रसंग येतात कि त्याला असे सतत वाटते कि एखादा चमत्कार झाले तर बरे होईल या आशेने तो नेमका उपाय शोधण्यापेक्षा एखाद्या चमत्कारिक बाबाच्या शोधत फिरतो .
  Reply
  1. M
   Mukund Joglekar
   Nov 16, 2015 at 7:25 pm
   ‘निरीश्वरवादाचे भवितव्य’ एक उत्कृष्ट लेख! “निरीश्वरवादाचा अतिरेकही वाईटच आहे. उदाहरणार्थ, निरीश्वरवाद्याने आस्तिकांच्या कर्मकांडांना हसून त्यांचा उपमर्द करणे किंवा अस्तित्वात नसलेल्या ईश्वराची उपासना करणारे म्हणून त्यांना कमी लेखणे किंवा स्वतःला शहाणे समजून, त्यांच्याशी फटकून वागणे, हे सर्व निरीश्वरवादाचे अतिरेक होत.” हे या लेखातील वाक्य तथाकथित पुरोगाम्यांचे डोळे उघडायला पुरेसे होईल. अशी अतिरेकी भूमिका घेवून आपण आपल्याच उद्देशांची माती करतोय आणि विरोधक निर्माण करतोय याचे भान असायला हवे.
   Reply
   1. O
    om
    Nov 18, 2015 at 3:56 pm
    तुम्हाला ईश्वर दिसला नाही म्हणून अथवा त्याच अस्तित्व जाणवला नाही म्हणून तो अस्तित्वातच नाही असा तर्क लावणे हा कसला जावईशोध ??म्हंज तुमी अमेरिका बघितली नाही तर ती अस्तित्वातच नाही अस म्हणण्या सारख आहे. ईश्वर हा काही पैस्यासाठी लोकसत्तामध्ये लेख लिहून मिळत नाही तर त्यासाठी त्याग मेहनत कष्ट कराव लागत ईश्वर म्हंज भाजीपाला नव्हे. तुमचे तार्किक आधार आहेत आणि तास नसेल तर विज्ञानात एखाद नोबेल मिळवून दाखवा .
    Reply
    1. O
     om
     Nov 18, 2015 at 3:54 pm
     बेडेकर एवढा विज्ञानवादी आहे तर एखाद नोबेल मिळवायचं ना ? ह्यांची धाव लोकसत्ता पेपर बाहेर नाही हा गल्लीतला तत्ववेत्ता ह्याला कोण विचारतो पैसे कमवायचे धंदे करतोय ....कोण कितीही शहाणा असला तरी ईश्वराच्या अस्तित्वावर शंका घेण म्हणजे अतिशहन्पन आणि मूर्खपणाचा कळसाच कारण ह्याने याआधी नामस्मरण योग यावर देखील टीका केली आहे.
     Reply
     1. P
      pamar
      Nov 16, 2015 at 6:37 pm
      it is very easy to preach all this in India and particularly to Hindus. I have been waiting to see all these rationalists and non believers to preach this rationalism to Muslims in India or in any Muslim country including stan. Also, keep saying that this is the only scientific view and believers , particularly Hindus, need to change etc. But the fact is that most of the world's famous scientists including Albert Einstein were strong believers in God and the faith
      Reply
      1. p
       parag वैशंपायन
       Nov 16, 2015 at 9:54 pm
       शरद बेदेकाराना कोपरापासून नमस्कार .........आता पुरे करा .वाचून कंटाळलो
       Reply
       1. A
        Ameya
        Nov 16, 2015 at 5:18 pm
        अहो तुम्हाी स्वत:ला स्वामी विवेकानन्दांपेक्षा शहाणे समजता का????
        Reply
        1. S
         Sachin
         Nov 17, 2015 at 8:38 am
         अतिशय सुंदर लेख. बेडेकर सर आगे बढो हम तुम्हारे साथ हे.
         Reply
         1. S
          sandesh
          Nov 16, 2015 at 6:21 pm
          पहिल्या लेखापासून लेखक स्वताची बाजुच कशी बरोबर आहे ते मांडत आहे. दुसरा काही विचार असू शकतो हेच ज्याला मान्य नाही त्याच्या बद्दल काय बोलणार. देव न मानणारे योग्य आणि बाकी सर्व चूक असे मानूनच हे सर्व लेख लिहिले आहेत. निदान या पुढे तरी लोकसत्ताने अश्या एकांगी लिहिणाऱ्या लोकांना स्थान देवू नये
          Reply
          1. Sudhir Karangutkar
           Nov 16, 2015 at 5:58 pm
           निरीश्वरवाद म्झान्जे फक्त हिंदू धर्म नीती न मानणे होय कारण या संघटनेत फक्त हिंदूच तेही अति शहाणे आम्ही काहीतरी वेगळे करतो आहोत हे दुसर्यांवर बिम्बिविणारे आहेत यांना अनिस सारखे इतर धर्मीय प्रिय आहेत त्यांच्या विरुद्ध काहीही बर वायीट काढायची ताकद नाही आणि इतर धर्मातील यात पडणार नाही कारण हिंदू धर्मासारखे हे साहिस्नू नाहीत हेच मान्य करायला पाहिजे आणि हा फुकाचा अीनुवाद पुरस्कार वापसी वगरे बोकाळला आहे त्याची निर्भास्ताना केली पाहिजे
           Reply
           1. S
            Sudam
            Nov 17, 2015 at 5:40 pm
            अतिशय सुंदर लेख. गौत्तम बुध्दांचाही अशा तर्कहीन, थोतांड विचारांना विरोधच होता. बाबासाहेबांनी सांगितलेल्या २२ प्रतिज्ञा विज्ञाननिष्ठेचाच पुरस्कार करतात. शेवटी सत्यमेव जयते.
            Reply
            1. S
             Suresh
             Nov 16, 2015 at 5:51 pm
             सुधारा स्वताला.... अजून वेळ गेलेली नाही. प्रत्येक वेळी इस्लामची भीती दाखवणे बंद करा. काहीही झाले कि मुसलमानांना असे बोलून दाखवा किंवा त्यांच्या विरुद्ध बोला मग बघा काय होते .... हा बाष्कळपणा पुरे झाला. आपल्या जी मध्ये डी नसतो तेव्हा असला गां..duपणा सुचतो.
             Reply
             1. S
              subhash uttarwar
              Nov 16, 2015 at 5:20 pm
              हा फालतू वाद आहे .ईश्वर हि संकल्पना जर माण समाधान देत असेल ,आणि जर त्याला ते आवडत असेल तर मग निरर्थक चर्चा कशाला ?ईश्वर थोडा म्हणतो ा माना ,माझी पूजा करा .बेडेकरांनी हे मत सिरीया आणि पाकीस्थान मध्ये मांडावे .कारण तेथे गरज आहे .बेदेकाराना एक विचारावेसे वाटते ,निरीश्वरवाद तुमचा मानला तरी असा काय मानव जातीचा फायदा होणार आहे ?जो पर्यंत मानव समाज आहे तो पर्यंत देव धर्म ,अल्ला येशु राहणारच आहेत मग कशाला निरर्थक चर्चा .
              Reply
              1. U
               Uday
               Nov 18, 2015 at 4:24 pm
               Religion comes from emotions,Human beings believe in God because they want: -A father figure to protect them from this frightening world -Someone who gives their lives meaning and purpose -Something that stops death being the end -To believe that they are an important part of the universe, and that some component of the universe (God) cares for and respects them Atheists argue that religion is just a psychological fantasy, human beings should abandon it and deal with the world as it is.
               Reply
               1. Load More Comments