23 January 2018

News Flash

दृष्टान्त, साक्षात्कार आणि चमत्कार

चमत्कार वाटाव्यात अशा कृती जादूगारसुद्धा करू शकतात.

शरद बेडेकर | Updated: September 26, 2015 1:24 AM

चमत्कार वाटाव्यात अशा कृती जादूगारसुद्धा करू शकतात. परंतु त्यात एक तर हातचलाखी किंवा फसवाफसवी असते किंवा त्यात काही भौतिक, रासायनिक प्रक्रिया असते जी आपल्याला ठाऊक नसते..

काही धार्मिक, आस्तिक लोकांना असे वाटत असते की, ‘अध्यात्म आणि आध्यात्मिक अनुभव’ हे धर्माच्याही पलीकडील काही तरी स्थलकाल-अबाधित असे वैश्विक सत्य असते. उदाहरणार्थ, एखाद्या थोरामोठय़ा व्यक्तीला दृष्टान्त किंवा साक्षात्कार होणे हा त्यांना असा आध्यात्मिक अनुभव वाटतो की, त्या व्यक्तीने ईश्वराला प्रत्यक्ष न पाहता, त्याला हात न लावता, त्याचे बोलणे प्रत्यक्ष न ऐकता, त्या दृष्टान्ताद्वारे त्यांनी ईश्वराचा अस्सल (खराखुरा) अनुभव घेतलेला असतो. त्यांच्या मते अशा दृष्टान्तांनी अनेक व्यक्तींना, अनेक महत्त्वाच्या क्षणी, ईश्वरीय मार्गदर्शन मिळालेले आहे व ही उदाहरणेच ईश्वराच्या अस्तित्वाचे साक्षीपुरावे आहेत. ते म्हणतात की, ‘अगदी थोरामोठय़ांनाच असे दैवी मार्गदर्शन मिळते असेही नसून, कधी सामान्य माणसालाही त्याच्या दैनंदिन अडचणींतून अचानक मार्ग सापडल्याचा अनुभव येऊ शकतो. पण या नेहमीच्या साध्या गोष्टी म्हणजे दृष्टान्तच असतात असे नव्हे. तसा दैवी दृष्टान्त हा काहीसा दुर्लभ असणारच.’ परंतु त्यांच्या मते ‘ईश्वर-भक्तांना मात्र असे दृष्टान्त सहज होऊ शकतात. ईश्वरप्रेमाने व ईश्वरकृपेने हे सहज शक्य आहे’ असे त्यांना वाटते. ‘शिवाय भक्तांच्या हाकेला, ईश्वर या किंवा त्या रूपात अनेक वेळा धावून आलेला आहे व त्याने त्यांना मदत केलेली आहे, त्यांना ज्ञानसमृद्ध केलेले आहे; एवढेच नव्हे तर कधी कधी प्रत्यक्ष दर्शनही दिलेले आहे.’ असे दृष्टान्त होऊ शकतात व होतात हाच ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होय, असा त्यांचा दावा असतो.
यावर माझ्यासारख्या निरीश्वरवाद्याचे काय म्हणणे असते ते आता ऐका. ‘सुटत नसलेले कोडे अचानक सुटणे किंवा अडचणीतून पटकन योग्य मार्ग सापडणे हे कर्तृत्व आपल्या बुद्धीचे, विचारशक्तीचे आहे. आपला मेंदू व त्यातील बुद्धी हे निसर्गाने व उत्क्रांतीने आपल्याला दिलेले ज्ञानप्राप्तीचे ‘एकमेव साधन’ आहे. आपली मन-बुद्धी सारासार विचार करून योग्य मार्ग शोधून काढते. पण कधी कधी ते इतके अचानक घडते किंवा अशा परिस्थितीत घडते की, आपल्याला तो अनुभव नेहमीचा नव्हे तर ‘अलौकिक’ वाटतो आणि आपण त्याला ‘दृष्टांत’ हे नाव देतो. कधी कधी चिंतनाचा विषय फार गहन असेल तर दीर्घ काळ अभ्यास आणि प्रयत्न केल्यानंतर मग केव्हा तरी अचानक उत्तर वा मार्गदर्शन मिळते, ज्ञानप्राप्ती होते आणि आपण त्याला ‘साक्षात्कार’ हे नाव देतो. कधी कधी भक्ताने आपले मन ईश्वराच्या एखाद्या रूपावर किंवा ईश्वरचिंतनावर केंद्रित केले, तर त्याला त्या रूपात, ईश्वराने दर्शन दिल्याचा, ‘दिव्य वाटणारा’ अनुभव येऊ शकतो, प्रत्यक्षात मात्र तो त्याला झालेला भासच असतो. खरे तर कुणालाही, कुठेही, कधीही झालेले दृष्टांत, साक्षात्कार, दर्शन हे सर्व आभासच होत. कुणा देवाने किंवा देवीने दिलेला तो दृष्टान्त आहे हा आपला केवळ कल्पनातरंग असतो. त्याला ईश्वरीय अनुभव म्हणता येत नाही. तसेच काही माणसांना स्वत:ला आलेले अनुभव मुद्दाम वाढवून, रंगवून किंवा गूढ बनवून सांगण्याची सवय असते. त्याचप्रमाणे खरेच प्रामाणिक असलेल्या इतर काही व्यक्तींनासुद्धा स्वत:चे असे अनुभव हे खरे ‘दैवी अनुभव’ आहेत असे वाटू शकते. परंतु अखेरीस असे सर्व अनुभव हे त्यांचे ‘वैयक्तिक अनुभव’ असून ते त्या त्या व्यक्तीच्या, त्या त्या वेळच्या मन:स्थितीवर अवलंबून असतात. अनेकांना किंवा अगदी संत महात्म्यांनासुद्धा असे अनुभव आलेले असले तरी केवळ त्यावरून दैवी शक्तीच्या किंवा ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल काहीही निष्कर्ष काढता येत नाही. ते सगळे त्यांचे व्यक्तिगत भासच होत.
‘आत्मसाक्षात्कार’ या शब्दाचा अर्थ साधारणपणे ‘ईश्वरकृपेने एखाद्या व्यक्तीच्या मन-बुद्धीत ज्ञानगंगा अवतरणे’ असा केला जातो. असा आत्मसाक्षात्कार योगसाधनेने किंवा योगाचे काहीच ज्ञान नसलेल्यालासुद्धा, त्याची कुंडलिनी जागृत होऊन होऊ शकतो, असे मानले जाते व काही भारतीय लोक याबाबतची भारताबाहेरील उदाहरणे म्हणून येशू ख्रिस्त, काही ख्रिस्ती संत महात्मे व पैगंबर महंमद यांची उदाहरणे देतात. तसे येशूचे शिक्षण जुजबी होते व महंमद तर अशिक्षित होते. असे असूनही एकाग्र आत्मचिंतनाने व ईश्वरकृपेमुळे त्यांना देवदूतांकडून दिव्य संदेश मिळाले, त्यांना त्यांचे दर्शन झाले, त्यांच्याशी संभाषण झाले व साक्षात्काराने त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, असे मानले जाते. परंतु माझ्यासारख्या संशयवादी (स्केप्टिक) माणसाची याबाबतची शंका अशी की, जर सबंध विश्वाचा एकच ईश्वर असेल, तर त्याने वेगवेगळ्या मान्यवरांना, महात्म्यांना परस्पर भिन्न साक्षात्कार का बरे घडवून आणले? जगभरच्या सगळ्या महात्म्यांना त्याने सारखेच ज्ञान का दिले नाही? हा विषय या लेखमालेतील पूर्वीच्या काही लेखांत येऊन गेलेला असल्यामुळे, इथे त्याविषयी आणखी काही नको.
त्याबाबत इथे फक्त एकच मुद्दा घेऊ या. माणसांपैकी कुणाला बुद्धी कमी असते, कुणाला जास्त असते व कुणाला खूप जास्तही असू शकते; परंतु साक्षात्कारासारखा आपोआप सर्वज्ञानप्राप्ती घडवून आणणारा ‘बुद्धीहून निराळा’ असा ज्ञानप्राप्तीचा वेगळा मार्ग काही ‘निवडक’ माणसांना उपलब्ध असू शकतो काय, हा कळीचा प्रश्न आहे. आम्हाला वाटते की, माणूस जातीचा ज्ञानप्राप्तीचा ‘बुद्धी’ हा एकमेव मार्ग आहे. साक्षात्कार या वेगळ्या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे हे आम्हाला गूढ कल्पनारंजन वाटते, चमत्कार वाटतो आणि चमत्कार आम्ही मानीत नाही.
आस्तिक, धार्मिक व श्रद्धाळू लोकांचे ‘चमत्काराबद्दल’ असे म्हणणे असते की, जगभर आणि सर्व धर्मामध्ये, केव्हा न केव्हा, कसला तरी चमत्कार घडल्याच्या नोंदी आहेत. (या नोंदी त्यांना पुरावे वाटतात.) आमचे पुराण वाङ्मय तर अशा चमत्कार कथांनी भरलेले आहे. अवतारांनी, प्रेषितांनी, ऋषीमुनींनी आणि अनेक संतांनीसुद्धा चमत्कार केलेले आहेत. त्यामुळे ‘कुणीही चमत्कार करूच शकत नाही, तसेच कुणालाही अतिमानवी सामथ्र्य असूच शकत नाही’ ही आमची भूमिका त्यांना अवास्तव वाटते, कारण त्यांनी लहानपणापासून चमत्कारकथा ऐकलेल्या असतात, त्यांच्या बालमनाला त्या आवडलेल्या असतात व आयुष्यभर ते त्या कथांना खऱ्याच मानीत आलेले असतात. मानवाच्या शक्ती फारच मर्यादित असतात हे खरे; पण एवढय़ा या प्रचंड विश्वाचा रामरगाडा ज्या ईश्वरीय शक्तींनी चालू ठेवला आहे त्या शक्तीसुद्धा चमत्कार करू शकत नाहीत’ हे पटावे तरी कसे, असे त्यांना वाटते. तसे हे खरेच आहे की, एकदा का ईश्वराचे अस्तित्व आणि कर्तृत्व मानले, की कुठलाही चमत्कार सहज शक्य वाटतो, किंबहुना ‘चमत्कार करू शकणारा, कुणी तरी हवा’ म्हणूनच मानवजातीने ईश्वर कल्पिला असावा.
माणसामाणसांमधील सामर्थ्यांमध्ये पुष्कळच तफावत-कमीजास्तपणा असू शकतो हे खरेच आहे; परंतु एकंदरीत मानवी सामर्थ्यांला काही पटण्याजोग्या मर्यादा आहेत. कुणी हाताने डोंगर उचलला, कुणी करंगळीवर पर्वत उचलला, कुणी हातावर डोंगर घेऊन आकाशमार्गे समुद्र पार केला, कुणी नदी दुभंगवली, कुणी समुद्र पिऊन टाकला, या अशक्य कथा आहेत. अशा मनोहारी कथांनीच आपले पुराण वाङ्मय भरलेले आहे. यांनाच जर चमत्कार म्हणायचे असेल, तर आम्हाला ते सगळे चमत्कार अविश्वासार्ह वाटतात, खोटे वाटतात. अशांव्यतिरिक्त दुसरेही कित्येक चमत्कार सांगितले जातात, ज्यात कुणा महान माणसाचे, निर्जीव वस्तुमात्रावरसुद्धा प्रभुत्व आहे असे सांगितले जाते. तसेच कुणी अदृश्य होऊ शकतात, कुणी हवेत तरंगू शकतात, कुणी मंत्रसामर्थ्यांने आजार बरे करतात, मेलेला माणूस जिवंत करतात वगैरे वगैरे. कुणाला दृष्टान्त, साक्षात्कार होऊन ईश्वरदर्शन घडते. त्यालाही आम्ही चमत्कारच म्हणतो आणि असलेही सर्व चमत्कार आम्ही नाकारतो. अशक्य म्हणतो.
आमच्या मते पृथ्वीवरील हे जग आणि संपूर्ण विश्वच केवळ भौतिक आहे. यात घडणाऱ्या सर्व घटना भौतिक आहेत व त्या भौतिक नियमांबरहुकूमच घडतात. या नैसर्गिक घटनांवर, शक्तींवर अधिकार गाजवू शकेल अशी काही तरी ‘निसर्गाहून श्रेष्ठ’ अशी दिव्यशक्ती अस्तित्वात असावी, ती काहीही चमत्कार करू शकत असावी व तिची प्रार्थना केल्याने ती आपल्याला अनुकूल प्रतिसाद देत असावी, अशा इच्छांमधूनच, मानवाच्या ‘ईश्वर कल्पना’ निर्माण झाल्या असाव्यात असे आम्हाला वाटते आणि वर म्हटल्याप्रमाणे एकदा का ईश्वराचे अस्तित्व आणि कर्तृत्व मानले, की मग कुठलाही चमत्कार सहज शक्य होत असावा. ‘चमत्कारांवर विश्वास ठेवणे हा अधर्म आहे’ असे गौतम बुद्धसुद्धा म्हणालेले आहेत. त्याचीही आपण आठवण ठेवली पाहिजे. चमत्कार वाटाव्यात अशा कृती जादूगारसुद्धा करू शकतात; परंतु त्यात एक तर हातचलाखी किंवा फसवाफसवी असते किंवा त्यात काही भौतिक, रासायनिक प्रक्रिया असते जी आपल्याला ठाऊक नसते. म्हणजे आपल्याला वाटतात तसे चमत्कार घडणे कधीही शक्य नसते.

First Published on September 26, 2015 1:24 am

Web Title: glimpse revelation and miracles
 1. S
  Sushil
  Sep 30, 2015 at 9:41 pm
  Scientific view हा पृथीवर जगणाय्साठी उत्तम आहे पण आपल्याला अंतिम सत्याचे उत्तर देवू शकत नाही.
  Reply
  1. S
   Sushil
   Sep 30, 2015 at 6:47 am
   अनुभव व science मध्ये बराच फरक आहे. science आणि तर्कला मर्यादा आहेत. मी अंध श्रद्धेचे समर्थन करत नाही. जिवंत असलायचा अनुभव प्रत्येकाला असतो. तो सिद्ध करायची गरज नसते, तसेच तो science किवा तर्कावर अवलंबून नसते. आपण अद्वित वेदांत वाचले आहे काय?
   Reply
   1. S
    Sushil
    Oct 6, 2015 at 3:21 am
    जगभर Consciousness म्हणजे काय आहे यावर science संशोधन करत आहे. पण हे science ला अशक्य आहे हे पण कळले. David Chalmers चे "Hard Problem of Consciousness वाचा. Consciousness म्हणजे काय आहे हे कळल्या साठी बुद्धी, विवेक व वैराग वर आधारित rational अद्वैत वेदांत वाचा म्हणजे उत्तर सापडेल. अद्वैत वेदांत अंधश्रद्धा वगरे वर आधारित नाही.
    Reply
    1. V
     Vinayak
     Oct 7, 2015 at 5:11 pm
     चमत्कार कथा या सांकेतिक आहेत. त्यांचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. लोकसत्ता च्या ह्याच website वर चैतन्य प्रेम यांचे सदर गेली काही वर्षे प्रसिद्ध होत आहे.त्यामध्ये यातील सगळ्या शंकांची उत्तरे सापडतील.
     Reply