09 July 2020

News Flash

नामस्मरण-नामसाधना

मला वाटते जगातील सगळी माणसं, आपापल्या पद्धतीने हेच करतात. म्हणजे ‘ईश्वराच्या कृपेने ठीक चाललंय’ असे म्हणतात.

बहुतेक लोकांना असे वाटत असते की, ‘धार्मिक असणे म्हणजे चांगला माणूस असणे व म्हणून पुण्यवंत असणे.’ खरे तर तसे मानण्याचे काहीच कारण नाही. सतत देवाचे नाव घेणारा माणूस, जेवढा धार्मिक असण्याची शक्यता आहे, त्याहून तो दांभिक असण्याची शक्यता प्रत्यक्षात जास्त आहे,‘नामस्मरण’ म्हणजे नामोच्चाराने किंवा मनातल्या मनात ‘ईश्वराचे वारंवार स्मरण’ करणे होय. नामस्मरणाचा हा उपाय अनेक वेळा मनातील गोंधळावर किंवा भीतीवर, तात्कालिक मानसिक इलाज किंवा अगदी विरंगुळा म्हणूनसुद्धा वापरला जातो. उदाहरणार्थ कशाची भीती वाटली किंवा मोकळेपण असले तर रामनाम जप करणे वगैरे. ‘नामसंकीर्तन’ शब्दाचा अर्थ ‘ईश्वराचे सातत्याने नामोच्चारण किंवा स्तुतिगौरव करणे’ असा आहे. म्हणजे या दोन्ही शब्दांचे अर्थ साधारण सारखेच आहेत. अशा या नामसंकीर्तनाला आपल्या महाराष्ट्रात तरी, अध्यात्माचे अभ्यासक व गुरू पराकोटीचे महत्त्व देतात, कारण त्यांच्या मते ‘नामाइतकी ईश्वराने भरलेली दुसरी वस्तू नाही’. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने परिणामकारक अशी नामसंकीर्तनाची एक व्यवस्थित प्रक्रिया बनवून तिला ते ‘नामसाधना’ हे भारदस्त नाव देतात आणि अशी ही ‘‘नामसाधना हेच ईश्वरकृपा होण्याचे रामबाण साधन आहे,’’ असे ते म्हणतात. एवढेच नव्हे, तर नामसाधना करताना, आपला जीव त्यात गुंतविण्याचा अभ्यास (प्रत्यक्ष कृती) केली, तर त्यामुळे ईश्वरकृपा तर होतेच, शिवाय प्रत्यक्ष ईश्वरदर्शनही होऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.
परंतु आम्हा बुद्धिप्रामाण्यवाद्यांना हे अति झाले असे वाटते, कारण आमच्या दृष्टीने ‘ईश्वर ही न वस्तू, न व्यक्ती, न शक्ती.’ (ईश्वर ही एक ‘युक्ती’ आहे असे मात्र म्हणता येईल.) ईश्वर ही फक्त एक ‘मानवी संकल्पना’ आहे व त्यामुळे ‘मला ईश्वर दर्शन झालेले आहे,’ असे जर कुणी म्हणत असेल आणि ते त्याला अगदी सत्य वाटत असेल तरीही प्रत्यक्षात ते सत्य नसून तो त्याचा आभासच होय, असे आमचे म्हणणे आहे. अशा दृष्टांत-दर्शनांविषयी व साक्षात्कारांविषयी मागील लेखात आपण काही चर्चा केलेली असल्यामुळे, या लेखात आपण फक्त नामस्मरणाविषयीच बोलू या.
महाराष्ट्रात (आणि भारतातही तसे असावे) एखाद्या कागदावर किंवा वहीत एक लाख वेळा ‘श्रीराम जयराम जयराम’ किंवा आणखी कुणा देवाचे नाव (किंवा मंत्र) लिहा, म्हणजे तुमच्या सर्व आधीव्याधी व दु:खे नष्ट होतील, असे सांगणारे गुरुबाबा किंवा महापुरुष आणि गंभीर चेहऱ्याने त्यांचा सल्ला घेणारे महाभाग इथे दिसून येतात. ‘आम्हाला या उपायाचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे,’ असे ठासून सांगणारे महाभागही इथे भेटतात. बरोबर आहे. एकदा का ‘नामस्मरणासारख्या सोप्या उपायाने, जन्मजन्मांतरीच्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात’ हे भाबडय़ा जनांच्या मनावर बिंबवलेले असले किंवा बिंबवीत राहिले, की काहीही होऊ शकते हो! शिवाय ज्या कुणाला आपला या जन्मीचा भ्रष्टाचार, पैशाच्या मोहापायी चालू ठेवायचा आहे, त्याला तसे करून हवी तेवढी पापे करायला मुभाही मिळते.
मी मुंबईच्या उपनगरात राहतो, त्या परिसरांतील एक प्रौढ मुस्लीम सद्गृहस्थ, जाता-येता कधी समोरासमोर भेट झाली व मी त्यांना सहज ‘कसं काय चाललंय?’ असे विचारले, तर ते थांबून आकाशाकडे पाहून, हात वर करून ‘ठीक है। ऊपरवाले की दुवा है।’ असे म्हणतात. मला वाटते जगातील सगळी माणसं, आपापल्या पद्धतीने हेच करतात. म्हणजे ‘ईश्वराच्या कृपेने ठीक चाललंय’ असे म्हणतात. असे करण्यात माणसाचे तीन हेतू असतात. ‘ठीक चाललंय’ हे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर, त्या ठीक चालण्याचे श्रेय स्वत:कडे न घेता ईश्वराला देणे हा दुसरा हेतू, आपण कसे नि:स्पृह आहोत हे दाखविण्यासाठी आणि तिसरा हेतू असा की, ‘मी आस्तिक, धार्मिक व सश्रद्ध आहे’ हे न विचारता सांगण्यासाठी. बहुतेक लोकांना असे वाटत असते की, ‘धार्मिक असणे म्हणजे चांगला माणूस असणे व म्हणून पुण्यवंत असणे.’ खरे तर तसे मानण्याचे काहीच कारण नाही. सतत देवाचे नाव घेणारा माणूस, जेवढा धार्मिक असण्याची शक्यता आहे, त्याहून तो दांभिक असण्याची शक्यता प्रत्यक्षात जास्त आहे, कारण स्वत:चे दोष झाकण्यासाठी धार्मिकता हा परिणामकारक बुरखा म्हणून वापरला जाण्याची शक्यता प्रत्यक्षात जास्त आहे आणि धार्मिकता याचा अर्थ ‘धर्माचे कर्मकांड आचरणे’ एवढाच असेल, तर ‘त्यामुळे मनुष्य चांगला ठरतो’, असे कसे म्हणता येईल? पूजा आणि कर्मकांड न करता, त्यासाठीचा वेळ सत्कृत्यांसाठी वापरणारा माणूस हा ‘जास्त चांगला माणूस’ नाही का? नामस्मरण, पूजा व कर्मकांडात मन व शरीर गुंतवून, आजूबाजूच्या दुर्दैवांकडे, दु:खांकडे डोळेझाक करणाऱ्या माणसाला खरेच का ‘चांगला माणूस’ म्हणता येईल?
म्हातारपणी शरीर साथ देईनासे झाले, उठणे, बसणे, लहानसहान कामे करणेसुद्धा कष्टप्रद झाले की फक्त ईश्वराचे नामस्मरण व होईल तेवढी पूजा-प्रार्थना करीत, देवाचे बोलावणे येण्याची वाट बघत जगायचे, असे अनेक वृद्धांना वाटत असते किंवा आपली तशी परंपराच आहे म्हणा ना; परंतु प्रत्येक वृद्धाच्या पाठी त्याचा आयुष्यभराचा अनुभव आणि व्यासंग असतो. आयुष्यात प्रत्येकाने काही न काही कौशल्ये आत्मसात केलेली असतात. तेव्हा नुसतेच हरी हरी करीत जगण्यापेक्षा ज्येष्ठांनी आपली ती कौशल्ये व तो अनुभव यांचा कुठल्या तरी प्रकारे समाजाला उपयोग होईल असे जगणे हे समाजहिताच्या दृष्टीने जास्त श्रेयस्कर आहे. हरी हरी करीत जगणे, हा काय त्याहून चांगला पर्याय आहे का? असे म्हणताना कुणाचाही दोष दाखविण्याचा किंवा कुणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नाही. नामस्मरणात वेळ किंवा आयुष्य घालवण्यापेक्षा, समाजोपयोगी असे काही करणे शक्य असेल, तर ज्येष्ठांनी ते करणे चांगले एवढेच मी म्हणतो.
मी जेव्हा शाळकरी मुलगा होतो, तेव्हा पुराणकथांतील काही भक्तांनी केलेल्या घोर तपस्यांच्या गोष्टी वाचून-ऐकून मलाही कधी कधी उत्साहित होऊन, आपणही एखाद्या मोठय़ा देवाची गाढ ‘तपश्चर्या’ करावी असे वाटत असे; पण तशी तपश्चर्या करण्याकरिता, भयानक जंगलात एकांतात दीर्घकाळ जाऊन बसणे आवश्यक होते आणि तपश्चर्या करायची म्हणजे काय, तर ईश्वरनामाचा सतत जप करीत राहायचे एवढेच मला ठाऊक होते. त्या नामस्मरणाने ईश्वर का व कसा प्रसन्न होईल त्याचा काही अंदाज मला तेव्हा करता येत नव्हता आणि अजूनही करता येत नाही. आता मी ८० वयाच्या आसपास पोहोचलेला असताना या वयात ‘मला अशा कशाचीच गरज उरलेली नाही,’ असेही म्हणता येईल. म्हणजे मला नको ईश्वरदर्शन, नको कृपा, नको स्वर्ग आणि नको तो मोक्षसुद्धा. चला बरे झाले. माझा जेव्हा व जसा मृत्यू होईल, तोच माझा मोक्ष. तेव्हा मी निसर्गनियमाने संपेन आणि मला अमर आत्मा नसल्यामुळे माझा ‘पुनर्जन्म’ही होणार नाही. माझा शेवट होईल व त्याचा मी आनंदाने स्वीकार करीन.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांनी १९८२ साली ‘नामस्मरणाचा रोग’ या नावाचा एक लेख लिहिला होता. त्यात त्यांना सारांशाने असे म्हणायचे होते की, महात्मा गांधी, महात्मा फुले, सावरकर, आंबेडकर अशांसारख्या महान व्यक्तींचे आपण केवळ नाव घेतो म्हणजे त्यांचा नामोच्चार व नामस्मरण करतो आणि मग त्या महात्म्याने सांगितलेली तत्त्वे आचरणात आणण्याची आपली जबाबदारी संपली असे मानतो. हा लेख आपल्या आजच्या विषयाशी संबंधित असल्याने त्यातील तीन वाक्ये नमुन्यादाखल इथे देत आहे. (१) फुले मंडईत, महात्मा फुले जयंतीनिमित्त होणाऱ्या सार्वजनिक सत्यनारायणाविषयी :- ‘म्हणजे एकाच जागी फुल्यांचे नामस्मरण आणि ज्या भाकडकथांना फुल्यांनी आजन्म विरोध केला त्या सत्यनारायणाचेही नामस्मरण, तिथेच व तेव्हाच. (२) एकदा (एखाद्या महात्म्याचे) नामस्मरण सुरू झाले की त्या माणसाचा देव होतो आणि ‘बुद्धिनिष्ठ चिकित्सेची’ हकालपट्टी होते. (३) पूर्वी पंढरपूरच्या यात्रेत हजारो माणसे कॉलऱ्याने मरत असत. ते भयानक मरण लाखो लोकांनी केलेल्या नामाच्या गजराने थांबले नाही. ते थांबवले कॉलऱ्याची लस शोधून काढणाऱ्या वैज्ञानिकाने.
अलीकडे काही आध्यात्मिक गुरूंनी, नामसाधना लोकप्रिय करून तिचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या पुस्तकांतून काही प्रमेये मांडली आहेत; पण ती सर्व प्रमेये श्रद्धामूलक व शब्दप्रामाण्यावर विसंबून आहेत असे दिसते. त्यांच्याविषयी आम्हा बुद्धिप्रामाण्यवाद्यांची निवडक निरीक्षणे खालीलप्रमाणे आहेत. (१) नामसाधनेने धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ (ध्येये) प्राप्त होतात, असे ते म्हणतात. त्यापैकी मधली अर्थ आणि काम ही अध्यात्माहून साफ वेगळी असलेली ध्येयेसुद्धा नामसाधनेने कशी प्राप्त होतील याचे बुद्धीला पटण्याजोगे उत्तर कुणी देऊ शकत नाही. (२) नामसाधनेने घडणाऱ्या प्रक्रिया व येणाऱ्या अनुभवांबाबत ज्यांना अनुभूती आहे त्यांच्यात एकवाक्यता मुळीच नाही. त्यात कुणी साधकाच्या विरक्तीला, कुणी अतिमानुषी संवेदनेला, तर कुणी योगप्रक्रियेला महत्त्व देतात, तर काही जण गूढवादाच्या आधाराने त्यांचे अनुभव सत्य असल्याचे पटविण्याचा प्रयत्न करतात. (३) काही जण ईश्वरकृपा झाली तरच ईश्वरदर्शन होईल, असे सांगतात, तर काही जण नामसाधनेने अनेक जणांना ईश्वरदर्शन प्रत्यक्ष झालेले आहे, असे म्हणतात. (४) काही जण ही प्रमेये वैज्ञानिक प्रमेयांप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करतात, पण त्यात इतकी गृहीते असतात की, शेवटी त्यांच्या सिद्धांतात ‘बिनशर्त सत्य’ असे काहीच उरत नाही. (५) प्रामाणिक नामसाधना करणाऱ्या मनुष्याचे सद्विचार आणि सदाचार यात कदाचित वाढ होईल, तो आध्यात्मिक बनेल, चिंतनमग्न राहील वगैरेंसारखे त्यांचे दावे, मान्य करता येतीलही; कारण या सर्व मानसशास्त्रीय प्रक्रिया आहेत; पण नामस्मरणाने कुणावर ईश्वरकृपा झाली असेल, ईश्वरदर्शन झालेले असेल, तर तो त्याचा अनुभव वस्तुनिष्ठ किंवा सार्वत्रिक नसल्यामुळे म्हणजे तो केवळ व्यक्तिनिष्ठ अनुभव असल्यामुळे व तो सिद्ध करता येत नसल्यामुळे, आम्हाला तो मान्य होऊ शकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2015 12:12 am

Web Title: gods worship
Next Stories
1 दृष्टान्त, साक्षात्कार आणि चमत्कार
2 नियती-प्रारब्ध-नशीब
3 पाप-पुण्य-नीती
Just Now!
X