25 February 2021

News Flash

पाप-पुण्य-नीती

मुंबई उपनगरात माझ्या घरापासून जवळ रस्त्यावरच एक लहानसे शिवमंदिर आहे.

आपल्याला ईश्वराप्रति काही कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर देवाने ज्या दुर्दैवी लोकांना उपकृत केलेले नाही, त्यांना आपण मदत करणे हीच देवाप्रति व समाजाप्रति खरी कृतज्ञता होय.

मुंबई उपनगरात माझ्या घरापासून जवळ रस्त्यावरच एक लहानसे शिवमंदिर आहे. तिथे रोज सकाळी एक भटजी काहीतरी मंत्र पुटपुटत, पूजाअर्चा करीत बसलेला असतो. तो पंचांग व हात बघून भविष्यही सांगतो म्हणे. अनेक स्त्री-पुरुष तिथे लहान तांब्याभर दूध आणि पूजेचे साहित्य घेऊन येतात. पिंडीवर दूध ओततात. गंभीर चेहऱ्याने व मनोभावे शंकराची पूजा करून देवाला व भटजीला नमस्कार करून, काही दक्षिणा ठेवून शांतपणे निघून जातात. त्याच वेळी त्या देवळाच्या बाहेर भिकाऱ्यांची मुले (की भिकाऱ्यांनी भीक मागण्यासाठी पळवून आणलेली मुले, कोण जाणे?) ती भुकेली, उपाशी मुले, पिंडीवर ओतल्या जाणाऱ्या त्या दुधाकडे आशाळभूत नजरेने पाहात असतात. आता मला सांगा, पूजा करणारी ती माणसे पुण्य करीत असतात की पाप? दुधाच्या थेंबाथेंबासाठी तडफडणारी ती मुले समोर आणि देशभर असताना, शंकराच्या पिंडीवर लोटीभर दूध ओतून भक्ताला पुण्य मिळेल का? काय या आपल्या पुण्यप्राप्तीच्या कल्पना? रोज अशा पूजा करणारे काही जण, भिकाऱ्यांच्या त्या पोरांना काही बिस्किट वगैरे खायला देतात हे जरी खरे आहे, तरी भुकेल्या पोरांसमोर दूध पिंडीवर ओतण्याचे, त्यामुळे समर्थन होते का?
बहुतेक लोकांना असे वाटते की देवाची पूजा-प्रार्थना किंवा परंपरेनुसार काही धार्मिक विधी करणे हे पुण्यकारक असते व ते न करणे हे पाप असते. त्यापेक्षा संतांनी सांगितलेली ‘परोपकार हे पुण्य व परपीडा हे पाप’ ही कल्पना योग्य वाटते. आम्हाला असे वाटते की आपण जर देवाची पूजा-प्रार्थना केली तर त्यासाठी (देव असला तरी) आपल्याला पुण्य का देईल? आपल्या पूजा-प्रार्थनांचा व नैवेद्याचा त्याला काय उपयोग? आणि त्याला हव्यातच कशाला आपल्या पूजा-प्रार्थना? आपल्याला ईश्वराप्रति काही कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर देवाने ज्या दुर्दैवी लोकांना उपकृत केलेले नाही, त्यांना आपण मदत करणे हीच देवाप्रति व समाजाप्रति खरी कृतज्ञता होय. कुठलाही धार्मिक विधी करण्यामुळे, न पापनिरसन होईल, न पुण्यप्राप्ती, न त्यामुळे तुम्ही धार्मिक ठराल, न नीतिमान ठराल, न समाजाला त्याचा काही उपयोग. एक मोठे वकीलसाहेब, धार्मिक वृत्तीचे व पूजापाठ करणारे आहेत. भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशा लोकांच्या केसेस घेऊन, स्वकौशल्याने व कायद्यांतील पळवाटांच्या ज्ञानाने ते त्यांच्या अशिलांना शिक्षा होण्यापासून वाचवतात व भरपूर पैसा कमवतात. त्यांचा व्यवसाय ‘ईश्वर कृपेने’ चांगला चाललाय असे ते म्हणतात. खरे तर तो ‘भ्रष्टाचाऱ्यांच्या कृपेने’ नीट चाललेला आहे. तुम्ही काय म्हणाल? हे पाप, पुण्य की व्यवसाय?
मानवी इतिहासात वेगवेगळ्या स्थळीकाळी ज्या नीतिकल्पना प्रचलित होत्या, त्याच कल्पना त्या त्या काळी निर्माण झालेल्या धर्मानी, धर्म-नियम व देवाच्या अपरिवर्तनीय आज्ञा म्हणून सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ, भारतात ऋग्वेदरचनाकाळी निसर्ग व निसर्गनियमांना देवत्व दिले गेले होते व त्यांच्या उपासना ते काटेकोर नियमबद्ध यज्ञांनी करत असत. त्यामुळे निसर्गानुनय व यज्ञानुनय हे त्या वेळी पुण्य व त्याविरुद्ध वर्तन हे पाप मानले जाई. अर्थात तेव्हासुद्धा कुठलेही दुष्कृत्य हे निसर्गविरुद्ध कृत्य म्हणून अनीतिमय व पापच मानले जाई. त्या काळी ब्रह्मा, विष्णू, महेश असे देवही नव्हते व त्यांची देवळे, मूर्तिपूजाही नव्हत्या; व्रतवैकल्ये, प्रायश्चित्ते व तीर्थयात्राही नव्हत्या. फक्त नदीच्या पवित्र जलात स्नान करून पाप धुतले जाते असे मात्र ते साधारणत: मानीत असत असे दिसते. भटकंती करीत आलेल्या आर्याना अफगाणिस्तानमार्गे भारतप्रवेश करीपर्यंत नद्याच माहीत नव्हत्या हे त्याचे कारण असू शकेल. भारतात वेदसंहितेच्या रचना काळानंतर, प्राचीन उपनिषदे (वेदान्त) व त्यांच्यानंतर धर्मसूत्रांच्या रचना झाल्या. येथपर्यंतसुद्धा देव, देवळे, मूर्तिपूजा, व्रतवैकल्ये अशा गोष्टी वैदिक धर्मात नव्हत्या. शिवाय वेदान्ताने यज्ञांना ‘फुटक्या होडय़ा’ असे संबोधून त्यांची उपयुक्तता नाकारलेली होती. शिवाय त्या काळात तपश्चर्येला यज्ञाहून श्रेष्ठ स्थान दिले जाऊ लागले होते. तरीही उपनिषदांत आणि पुढील काळांतील धर्मसूत्रांमध्येसुद्धा ‘पापाचे कर्मफळ भोगल्याशिवाय कुणाचीही सुटका नाही’ असा पूर्वीचा कडक नियम मात्र कायमच ठेवलेला दिसतो. मला विशेष सांगायचे आहे ते हे की त्यापाठोपाठ आलेल्या ‘स्मृतिपुराणकाळात’ मात्र, या कडक नियमाला अनेक फाटे फोडले गेले. जप, तप, उपोषणे, व्रते इत्यादी केल्याने आणि ‘पुरोहितांना’ विविध प्रकारची दाने दिल्याने, दुष्कर्माचे वाईट फळ भोगावे लागत नाही असे ‘नवीन नियम’ घालून दिले गेले. अशा या कालपरिस्थितीनुसार होणाऱ्या बदलांवरून असे म्हणता येते की सर्व धर्मग्रंथीय ‘पाप-पुण्य प्रायश्चित्तादी कल्पना’ या तत्कालीन परिस्थितीची प्रतिबिंबे असून, त्या ‘ईश्वराज्ञा’ वगैरे काही नव्हेत.
विविध स्मृतींमध्ये सांगितलेल्या पातकांचा (पापांचा) व त्यावरील प्रायश्चित्तांचा, स्मृतींच्या कालानुक्रमे अभ्यास केला तर असे दिसते की (१) काही पातकांना, प्राचीन ग्रंथांनी फार कठोर, अगदी देहान्तसुद्धा घडविणारी प्रायश्चित्ते सांगितली होती. त्या पातकांना नंतरच्या काळांतील स्मृतींनी, सौम्य प्रायश्चित्ते सांगितली, जसे गायत्री मंत्राचा जप, ब्राह्मण भोजन घालणे, ब्राह्मणाला गाईचे किंवा सुवर्णाचे दान देणे वगैरे. यावरून असे दिसते की ही प्रायश्चित्ते कुणा देवाने, ईश्वराने नव्हे तर ग्रंथकर्त्यां ब्राह्मणांनी, पुरोहितांनी सांगितलेली आहेत. (२) काही स्मृतिपुराणांनी सांगितले की, पुरोहिताला इतके दान दिले म्हणजे त्या प्रमाणात इतके पाप माफ होते किंवा इतके दान दिले की स्वर्गात इतके काळ सुख मिळते वगैरे. याच्या मुळाशी पुरोहितांची धंदेवाईक वृत्ती दिसून येते. (३) म्हणजे ‘धार्मिक प्रायश्चित्ते’ ही देवाने दिलेली पापाची माफी नसून, पुरोहितांनी दिलेली पापाची माफी आहे. त्यांना मिळणारी दक्षिणा व दान जेवढे मोठे व घसघशीत असेल, तेवढी मोठय़ात मोठय़ा पापालाही जास्त माफी मिळत असे. असे हे निष्कर्ष माझ्यासारख्या निरीश्वरवाद्याचे नसून ते भारतरत्न महामहोपाध्याय काणे यांनी काढलेले निष्कर्ष आहेत. (प्र.स.सा.सं.मं. प्रकाशित ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ सारांशरूप ग्रंथ, उत्तरार्ध खंड ४ विभाग १ मधील सर्व प्रकरणे). स्मृतिपुराणकारांनी प्रायश्चित्ते सांगताना आणखी एक मोठे पाप केलेले आहे. त्यांनी सांगितलेल्या प्रायश्चित्तांची तीव्रता/सौम्यता ही ते पातक करणारा ‘चातुर्वर्णापैकी कुठल्या वर्णाचा आहे’ आणि त्याने ते पातक ‘कुठल्या वर्णाच्या माणसाविरुद्ध केले’ त्यावर अवलंबून आहे. म्हणजे हे कायदे उघडपणे एकाला एक नियम व दुसऱ्याला दुसरा असे आहेत. स्मृतिपुराणकारांना समाजात जन्माधारित विषमता हवी होती म्हणून त्यांनी असे केलेले आहे. प्रत्यक्षात जरी कुणी ईश्वर असला तरी तो स्वत: सामाजिक विषमतेचा व अन्यायाचा पुरस्कर्ता असणे काही शक्य नाही. हे तुम्हाला पटते ना?
प्रायश्चित्त या संकल्पनेतील ‘वाईट कर्म करणाऱ्याला शिक्षा होणे’ व ‘त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे’ हे मूळ हेतू स्तुत्यच आहेत. पातक करणाऱ्याच्या मनावर उपचार होणे व त्याने पुन्हा ते पातक न करण्याचा निश्चय करणे हे मानसिकदृष्टय़ा आणि सामाजिक हिताच्या दृष्टीनेही आवश्यक आहे यात काही संशय नाही. परंतु कुणा लोभी ढोंगी माणसाने अगदी काशीरामेश्वरासह भारतातील सर्व पवित्र तीर्थामध्ये जरी अगदी शास्त्रोक्त विधिवत स्नान केले तरी त्याची पातके धुतली जातील का? कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या मुहूर्तावर गंगा-गोदावरी स्नान करणाऱ्यांना देव खरेच पापमुक्त करील का? किंवा त्या बदल्यात त्याला काही पुण्य देईल का? त्याच्या विकारग्रस्त मनावर अशा स्नानामुळे काही उपचार होतील का? संत तुकारामानेसुद्धा सांगितलेले आहे की तीर्थस्नानाने आपली फक्त कातडी धुतली जाईल. भारतातील तीर्थस्थळे ही सर्व सौंदर्यस्थळे आहेत. त्यामुळे तीर्थस्थळी जायचे तर अवश्य जा. पण मुहूर्ताची गर्दी व धक्काबुक्की टाळून जा. (उदाहरणार्थ कुंभमेळा). पाणी स्वच्छ असेल (खात्री करून घ्या) तर त्यात स्नानही करा. पण तसे करून व काही कर्मकांड करून पापक्षालन होईल किंवा पुण्य, स्वर्ग, मोक्ष मिळेल या आशा मात्र निर्थक आहेत. तसेच कुठलेही व्रताचरण हे साधे सत्कृत्यसुद्धा नसून, तो वेळेचा व पैशाचा अपव्यय मात्र आहे. कारण त्यातून दुर्बलांना, रोगपीडितांना, संकटग्रस्तांना काहीही मदत होत नाही. व्रते व कर्मकांडे करून तुम्हाला खोटेच कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल. शुभाशुभ, मुहूर्त, सोवळे-ओवळे पाळून तुम्ही स्वत:ला धार्मिक समजाल. पण तेही खरे नव्हे. व्रते व दैवी उपाय विसरून, फक्त सत्कृत्ये करा. कारण प्रत्येकाने जमेल तेवढी सत्कृत्ये करणे हीच सामाजिक गरज आहे.
मानवाच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात, नीतिमत्तेचे महत्त्व सर्वोच्च आहे यात काही शंका नाही. ईश्वराचे अस्तित्व न मानणारे लोकसुद्धा, सत्य व नीती यांनाच जीवनात सर्वोच्च स्थान देतात. मानवाने अत्यंत प्राचीन काळी जेव्हापासून ‘सामाजिक जीवन’ सुरू केले तेव्हापासूनच नीतिमत्ता ही त्याची सर्वात महत्त्वाची सामाजिक गरज ठरली आहे व तीच पाप, पुण्य, धर्म इत्यादी मानवी संकल्पनांचा मजबूत पाया आहे. हे खरे आणि योग्यच आहे. पण काही लोक मानतात त्याप्रमाणे धर्मग्रंथीय नीतिकल्पना या ‘ईश्वरीय किंवा अपरिवर्तनीय’ मात्र मुळीच नव्हेत. आता समजा तुम्ही हिंदू आहात व तुमच्या मुलीला तुम्ही पदवीपर्यंत शिक्षण दिलेत आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी तिचे योग्य वराशी लग्न लावून दिलेत, तर तुम्ही हे कर्तव्य केलेत की दुष्कृत्य? अहो, तुम्ही जर एकोणिसाव्या शतकात हेच केले असते तर देवाच्या दफ्तरी त्याची ‘महत्पाप’ म्हणून नोंद झाली असती असे तत्कालीन मोठमोठे पंडित व पुरोहित आम्हाला सांगत होते. त्या काळी स्त्रीला शिक्षण देणे व मासिक पाळी येण्यापूर्वी तिचे ‘लग्न न करणे’ ही ‘आईबापांसाठी नरकाची साधने’ मानली गेली होती. मग कुठे आहे ती सर्वकालीन नीती? आज आपण स्त्रीशिक्षण आवश्यक मानतो हे काय पाप आहे काय? आणि मुलीचे लहानपणीच लग्न लावून देणे हे पुण्य आहे काय? नीतिकल्पना आपणच त्या त्या कालपरिस्थितीत तयार करतो व त्यांना अपरिवर्तनीय मानणे चूक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 1:50 am

Web Title: sin virtue strategies
Next Stories
1 कर्मफलसिद्धान्त
2 गुरुबाबा
3 श्रद्धा
Just Now!
X