आपण अशा समाजात राहतो जिथे तिचा होकार गृहीत धरला जातो आणि तिच्या नकाराला किंमतच नसते. म्हणूनच तिच्या नकार देण्याच्या अधिकारावर भेदक भाष्य करणारा ‘पिंक’सारख्या सिनेमा येतो तेव्हा ‘आम्ही अम्हास पुन्हा पहावे काढुनि चष्मा डोळ्यांवरचा’ अशीच आपली गत होते.

रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणारी, रॉक कॉन्सर्टला मुलांबरोबर जाणारी, पार्टी करणारी, अंगावर टॅटू काढलेली, जीन्स-शॉर्ट्स वापरणारी, एकटी राहणारी, सिगरेट ओढणारी, कधी कधी दारूही पिणारी मुलगी म्हणजे कायम ‘अ‍ॅव्हेलेबल’ असलेली मुलगी, असा सोयीस्कर अर्थ घेणारी अनेक ‘चांगल्या घरातली’ मुलं असतात. अशा ‘चवचाल’ मुलीच्या बाबतीत काही अतिप्रसंग घडलाच तर.. समाज म्हणून आपण तरी काय म्हणतो? होणारच असं.. मुलीची चाल चांगली नव्हतीच.. अशी वागणूक असल्यावर आणखी काय घडणार? इत्यादी इत्यादी. समाज म्हणून आपण नीतिमत्तेच्या अशा किती भंपक कल्पना कुरवाळत असतो आणि त्यानुसार समोरच्या व्यक्तीला जोखत असतो याचा अनुभव ‘पिंक’ चित्रपट बघताना सारखा येत होता.

गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेला ‘पिंक’ हा चित्रपट म्हणून कसा आहे, हा या लेखाचा विषय नाही. चित्रपट म्हणून त्यात काही उणिवा असतीलही, पण चित्रपटातून दिलेला संदेश खणखणीत आहे. प्रत्येक स्त्रीला ‘नाही’ म्हणायचा अधिकार आहे. अगदी शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रीचादेखील हा अधिकार कुणी नाकारू शकत नाही, हा संदेश चित्रपटातून खूप परिणामकारकरीत्या देण्यात आलाय. आपल्या समाजात चित्रपटाची भूमिका मोठी आहे. ‘सैराट’च्या निमित्ताने याचा चांगलाच अंदाज आला आहे. त्या दृष्टीने ‘पिंक’मधून हाताळला गेलेला विषय अगदी थेट भिडणारा आहे, विचार करायला लावणारा आहे, अंतर्मुख करायला लावणारा आहे यात शंका नाही. दिल्लीतील एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या तीन ‘इनडिपेंडंट’ मुलींची ही गोष्ट. या तिघी वर्किंग विमेन कॅटॅगरीतल्या. रॉक कॉन्सर्टला नुकतीच ओळख झालेल्या काही मित्रांसोबत एका रिसॉर्टमध्ये जातात तेव्हा त्यांच्यासोबत घडणाऱ्या प्रसंगामुळे त्यांचं आयुष्यच पालटतं. त्यांनी प्रथम विनयभंगाची तक्रार नोंदवली तरी त्यांच्याच विरोधात खटला उभा राहतो. खटल्यादरम्यान अर्थातच पहिला प्रयत्न होतो मुलींच्या चारित्र्यहननाचा आणि तोच विषय खटल्याचा मुख्य भाग ठरवण्यात येतो. त्या केसची ही कथा.

अमिताभ बच्चनसारखा बडा कलाकार या चित्रपटात असल्याने चित्रपटाची चर्चा सुरुवातीपासून होतीच. मुलीचे कपडे, त्यांचं चारचौघांत हसून खिदळून बोलणं यावरून तिचं चारित्र्य ठरवू नका. ‘डोण्ट बी जजमेंटल’ अशा अर्थाचे काही व्हिडीओ नेमके याच सुमारास सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केले जात होते. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दोन नातींना उद्देशून लिहिलेलं पत्रही पंधरवडय़ापूर्वी माध्यमातून प्रसिद्ध झालं. ‘लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुम्हाला काय वाटतं यावर विश्वास ठेवा’, असं अमिताभ यांनी यामध्ये लिहिलं होतं. आता हा सगळा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा भाग होता वगैरे गोष्टी मान्य केल्या तरी या सगळ्यामधून एका गंभीर विषयावर भाष्य केलं जातंय आणि त्याचा परिणाम समाजमनावर होणार असेल तर ही चांगलीच गोष्ट म्हणायला हवी. आपल्या समाजानं मुलासाठी आणि मुलीसाठी चारित्र्य जपण्याचे वेगवेगळे नियम केले आहेत. ते आपल्या नकळत आपण मान्य करून टाकलेले आहेत. या नियमांनुसार मुलांनी उशिरापर्यंत बाहेर भटकलेलं चालतं. एकटं राहिलेलं, सारखं हॉटेलमध्ये गेलेलं, पार्टीला गेलेलं आपल्याला चालतं. त्यांनी दारू प्यायलेली चालते. सिगरेटचं व्यसनही खपवून घेतलं जातं. हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वाईट असतं, एवढंच आपण मुलांना सांगतो. पण मुलींसाठी मात्र हे वर्तन अशोभनीय, चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं वगैरे वगैरेही असतं.

‘मनमुक्ता’मधूनच यापूर्वीही समाजानं कुरवाळलेल्या मुलीचं चारित्र्य या संकल्पनेवर लिहिलेलं आहे. स्त्रीचं स्वातंत्र्य आणि कधी कधी तर अस्तित्वही संपवून टाकणाऱ्या अनेक प्रथा या चारित्र्याच्या, संस्कारांच्या नावाखाली अनेक र्वष आपण बिनदिक्कत चालू ठेवल्या. याच नावाखाली मुलींवर अनेक नियमही लादले गेले. अगदी स्त्रियांनाही यात काही वावगं वाटलं नाही. त्यांच्याच भल्यासाठी हे नियम असल्याचं सतत त्यांना भासवलं गेलं. गेल्या काही वर्षांत मात्र त्यात थोडे बदल होत आहेत. स्त्रियांनी करायच्या नोकरीच्या कक्षा रुंदावल्यानंतर त्यात थोडे बदल होताहेत. आधीच्या पिढीच्या स्त्रिया कमावत्या झाल्या, तरी त्यांचं कमावणं केवळ कुटुंबासाठीचं अर्थार्जन असे. त्यामुळे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच टाइपच्या आणि सातच्या आत घरात येऊ देणाऱ्या नोकऱ्यांना त्यांच्या लेखी प्राधान्य होतं. घराचा प्राधान्यक्रम वरचा होता. आताच्या पिढीतल्या मुलींसमोर नोकरी-व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि प्रोफेशनल म्हणून त्यांच्याकडून अपेक्षाही पुरुषांसारख्याच आहेत. त्यामुळे साहजिकच कामाचे तास वाढले आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या मुलींची संख्या गेल्या दहा वर्षांत लक्षणीय वाढली आहे. अर्थात मुलींच्या हातातला पैसाही वाढला आहे आणि तो त्यांना व्यक्तिस्वातंत्र्याची जाणीव करून द्यायला लागला आहे. त्यातून मुलींवर लादलेले नियम त्यांना आता कुठे खुपायला लागलेत. कुटुंबाची गरज या पलीकडे माझी वैयक्तिक वैचारिक गरज, वैयक्तिक आवड, वैयक्तिक प्रगती ही नोकरीची कारणं झाली आहेत. समाजातल्या स्त्रिया काळाबरोबर जितक्या झपाटय़ाने बदलत चालल्या आहेत, तेवढय़ा झपाटय़ाने पुरुष मात्र बदलायला तयार नाहीत. त्यामुळे स्त्री-पुरुषांच्या चारित्र्याबाबतचे ठोकताळे तसेच आहेत. अर्थातच सामाजिक नियम, रूढी, परंपरा, त्यामागचे विचार सध्या अर्धवट अवस्थेत आहेत. ते पूर्णपणे बाद करता येत नाहीत आणि स्वीकारण्याएवढी किंवा पाळण्याएवढी सवड आणि उसंत आता राहिलेली नाही.

यात सगळ्यात जास्त ओढाताण होतेय स्त्रीची. कारण नोकरीच्या ठिकाणी तिला आपलं पुढारलेपण दाखवायचंय. स्वतंत्रपणे जगायचंय. त्याच वेळी घरात ती किती परंपराप्रिय सुगृहिणी आहे हेदेखील तिला सिद्ध करायचंय. तिच्या मित्र-मैत्रिणींच्या गोतावळ्यात तिला बिनधास्तपणे रमायचंय. कधी थोडी मजाही करायचीय, पण प्रत्येक वेळी असं कुठेतरी स्वत:च्या मजेखातर जाताना तिला दहा वेळा विचार करावा लागतोय. आपल्यासारख्या चांगल्या घरातल्या मुलीनं असं मित्रांबरोबर नाइट आउटला जायला नको खरं तर.. अशी टोचणी सतत तिच्या मनाला लागलेली आहे. तिच्या सुरक्षेचा प्रश्न तर आणखी गंभीर होतोय. कारण वर सांगितल्याप्रमाणे तिच्या मोकळेपणाचा अर्थ वेगळा घेतला जाण्याची शक्यता आहे. तिच्या कपडय़ांवरून, तिच्या बोलण्या-चालण्यावरून तिला जज करणारी माणसं जास्त आहेत. त्यामुळे स्वत:साठी, स्वत:च्या मनाप्रमाणे जगताना आजही तिच्या मनात अपराधी भावना असते.

‘पिंक’च्या निमित्ताने ही अपराधी भावना थोडी कमी व्हायला मदत होऊ शकते. किमान त्या दृष्टीने विचार तरी होऊ शकतो. या चित्रपटाच्या निमित्ताने झालेली एक चांगली गोष्ट म्हणजे स्त्रीस्वातंत्र्यावर विविध माध्यमांतून सुरू असलेली चर्चा या चित्रपटाने पुढे नेली. अगदी चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या उद्देशाने का होईना पण मुलीचं व्यक्तिस्वातंत्र्य, तिचा ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार यावर परिणामकारक भाष्य केलं गेलं. मुलगी ‘व्हर्जिन’ नाही, तिचे चार बॉयफ्रेण्ड झालेले आहेत, याचा अर्थ तिने ‘नाही’ म्हणायचा अधिकार गमावलेला नाही. ती परिचित असेल, गर्लफ्रेण्ड असेल अगदी लग्नाची बायको असेल तरीही तिला सेक्ससाठी ‘नाही’ म्हणायचा अधिकार आहे. अगदी पैसे घेऊन शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रीचाही स्वत:च्या शरीरावर हक्क आहेच आणि तिलाही तो ‘नाही’चा अधिकार आहेच, हे आपण सोयीस्कर विसरतो. ते या चित्रपटानं अगदी परखडपणे सांगितलं. हे असं थेट सांगितल्याबद्दल निर्माता, दिग्दर्शक, लेखकांचे आभारच मानायला हवेत. कारण आपल्याकडचे अनेक चित्रपट महत्त्वाचा संवेदनशील विषय हाताळतानाही लोकप्रियतेचं कारण देत समाजातल्या त्याच बुरसटलेल्या परंपरा चुचकारतात. समाजाचं लांगूलचालन करतात. समाज काय म्हणेल याची चिंता करताना शेवटी आपणही समाजाचा भाग आहोत, हे प्रत्येक जण विसरतो. त्यातूनच मुलींवर चांगल्या घराचे संस्कार या नावाखाली बंधनं लादली जातात. शील किती महत्त्वाचं हे मुलगी कळत्या वयाची व्हायच्या आधीपासून तिच्या मनावर बिंबवायची पद्धत आपल्याकडे आहे. चांगल्या घरच्या मुलींवर बंधनं अधिक. चांगल्या घरातली मुलगी आहेस तू, म्हणजे अमुक एका पद्धतीनंच जगलं पाहिजेस, हे कायम ठरलेलं. मुलगी चांगली सज्ञान झाली, नोकरीला लागली, कमावती झाली, लग्नाच्या वयाची झाली तरी तिला कसं जगायचंय याचा कधी विचारच नसतो करायचा. घरचे सांगतील त्याप्रमाणे असं म्हणते ती मुलगी चांगल्या घरातली. हे इतकं ठरून गेलेलं आहे की, याउलट वागणाऱ्या सगळ्या मुलींना आपण वाईट नजरेनंच बघायला लागतो. ‘पिंक’मधल्या अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगवर टाळ्या वाजवणारे आपण घरी आल्यानंतर मात्र पुन्हा आपल्याच सांस्कृतिक कोशात परत जातो. चांगल्या घरच्या संस्काराची शिदोरी देता देता-तू स्वत:साठी जगू स्वत:च्या मनाप्रमाणे जगू शकतेस आणि नको असेल तेव्हा नाही म्हणू शकतेस हेच घरातल्या मुलीला शिकवायला विसरून जातो. तिच्याभोवतीचं गुलाबी दिसणारं काटेरी वास्तव आणखी गडद करत राहतो.
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com