जात, धर्म, वर्ण, प्रदेश यांचे भेद इतके खोलवर रुजवले गेले आहेत की, त्यांच्याआड लिंगभेद पुरता झाकला जातो. आपापल्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठीच मग बाईपणाचा गरजेपुरता वापर केला जातो. म्हणून हिलरी क्लिंटन केवळ स्त्री म्हणून हरल्या हे म्हणणं दुधखुळेपणाचं आहे.

माहितीवर आधारित निवड किंवा इनफॉम्र्ड् चॉइस, ज्ञानाधिष्ठित मत हा प्रकार ज्ञानाधिष्ठित समाजातच एकंदर शक्य आहे, असं आपल्याला वाटत असतं. अशा समाजाला भावनिक साद घालत कुठल्या एका बाजूकडे झुकवणं सहजी शक्य नसतं. पण सभोवती माहितीचा महापूर आलेला असताना त्यातलं ज्ञान वेचण्यात आपण एक समाज म्हणून कमी पडतोय, हेच सध्याच्या वातावरणातून उघड होतंय. हे चित्र आपल्या देशापुरतं नाही, तर जगभरात (अमेरिका म्हणजे जग असं वाटणाऱ्या सो कॉल्ड ज्ञानाधिष्ठित समाजातही) दिसतंय, हे विशेष. एकीकडे इंटरनेट आणि त्यातल्या त्यात सोशल मीडियावरून माहितीचा विस्फोट होत असताना दुसरीकडे कोणती माहिती खरी आणि कोणती खोटी, याची शहानिशा न करता व्यक्त होणाऱ्यांची संख्याही प्रचंड वेगाने वाढतेय. आपल्याला माहिती देण्याचा देखावा केला जातोय. त्यातून छुपा अजेंडाच पेरला जातोय याची जाणीवदेखील अशा वेळी लोप पावते. हे सगळ्यात भयानक आहे आणि तेच सध्या सगळीकडे दिसतंय.. घडतंय.

‘मनमुक्ता’ स्तंभाचा आजचा मथळा तर ‘नेहमीसारखा’ वाटतोय, पण ही प्रस्तावना विषयांतर वाटतेय का..? पण ते तसं नाही. या ‘नेहमीसारख्या’ असण्यावरच आज थोडा विचार करू या. स्त्रियांबाबतच्या कुठल्याही गोष्टीचं विश्लेषण ती बाई आहे म्हणून सुरू होतं आणि शेवटी ती बाईच म्हणून थांबतं. कारण हे असं करणं फार सोपं असतं. ‘नेहमीचं’ं असतं. स्त्रियांनाही याचीच सवय झालेली असते. नेमकेपणानं सांगण्यासाठी गेल्या काही दिवसांतील ठळक घटना..

हिलरी क्लिंटन अध्यक्षीय निवडणूक हरल्या.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी शेवटी स्त्री नाहीच.

पहिल्या वाक्यातून केवळ माहिती हाताला लागतेय आणि दुसऱ्या बातमीमधून त्या बातमीमागचं मत आपल्यापर्यंत येतंय. बघा.. हिलरी क्लिंटन स्त्री होत्या म्हणूनच हरल्या. अमेरिकेत अजूनही स्त्री राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकत नाही. एवढय़ा पुढारलेल्या देशात बघा कसा लिंगभेद आहे, वगैरे अर्थाच्या अनेक पोस्ट माहिती म्हणून यानंतर सोशल मीडियावर पेरल्या गेल्या. डोनाल्ड ट्रम्प हा स्त्रियांचा अनादर करणारा माणूस हिलरींच्या विरोधात निवडून येणं हे महत्त्वपूर्ण होतं अर्थातच. ते खचितच अनेक मनांना जास्त लागलं. असं कसं सुजाण अमेरिकन नागरिकांनी- त्यातल्या स्त्रियांनी ट्रम्पना मत दिलं.. असे प्रश्नदेखील अनेकींना पडले. पण खरोखर अमेरिकेच्या या निवडणूक संग्रामात हिलरींचं स्त्री असणं आणि ट्रम्प यांची स्त्रीविरोधातली वक्तव्ये किती कारणीभूत ठरली याचा विचार करणं गरजेचं आहे. तो नंतर तज्ज्ञांकडून झालाही आणि त्यावर काही माध्यमांनी लिहिलंही. पण तोवर नुकसान होऊन गेलं होतं. आपल्यापर्यंत विविध माध्यमांतून पोहोचला तो केवळ एक स्त्री विरुद्ध पुरुष असा संघर्ष. तो वरकरणी होता आणि त्याच्या आत खूप खोलवर वेगळाच राजकारणी, अर्थकारणी आणि महासत्ताधीश होण्याचा संघर्ष होता. हा संघर्ष थोडय़ा प्रमाणात सगळ्या जगभरात चाललाय आणि त्यात बळी दिला जातोय स्त्रीचा.

डोनाल्ड ट्रम्पना मतं देणाऱ्यांमध्ये निम्मी संख्या गोऱ्या अमेरिकन स्त्रियांची होती. ट्रम्प यांचा वर्णाधारित राष्ट्रवाद त्यांना स्त्रीवादापेक्षा महत्त्वाचा वाटला. हीच गोष्ट आपल्याकडेही हल्ली होतेय. जातीयवादापुढे आपल्याला स्त्रीवाद मागे टाकावासा वाटतो. म्हणून तर बलात्कारासारख्या घृणास्पद घटनेतही पीडित स्त्रीची जात आता आपल्याला आधी दिसू लागली आहे. आपल्याला देण्यात येणाऱ्या माहितीमधून आपण आपल्याला सोयीस्कर माहितीचा स्वीकार करीत त्यावर आधारित मत बनवून टाकतो आणि माझं स्वतंत्र मत म्हणून ते मिरवतो, याचा दाखला देणारी ही दुसरी घटना बघा..

युरोपात हिजाब घालून मॉडेल फॅशन रॅम्पवर

हिजाबवाली यूटय़ूब सेलेब्रिटी नूरा अफिया नवी कव्हरगर्ल

हिजाब फेमिनिस्ट आहे -प्ले बॉयच्या मुखपृष्ठावरील मॉडेलची भावना

भारताच्या हीना सिद्धूचा हिजाब घालून इराणमध्ये खेळण्यास नकार

हरयाणातील एका गावाने घुंघट पद्धत नाकारली

गेल्या काही दिवसांत किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत हिजाब आणि घुंघट पोहोचला याची ही साक्ष. पुन्हा माहितीवर आधारित मत बनवताना आपण सारासार विचार करतो का हे बघायचं हे उदाहरण. हिजाब कसा काय बुवा फेमिनिस्ट झाला, असं बिनदिक्कतपणे विचारत त्या धर्माची, त्यांच्या मागासलेपणाची खिल्ली उडवणारे कुंकू लावताना कसं ठरावीक ठिकाणी अ‍ॅक्युप्रेशर मिळून स्त्रियांना आरोग्यपूर्ण लाभ मिळतो असा प्रचार करताना दिसतात. साडी नेसली तरच देवळात प्रवेश हे योग्य वाटतं त्यांना आणि ठरावीक देवस्थानांत स्त्रियांना मज्जाव असला पाहिजे, असंही वाटतं त्यांना. घुंघट प्रथा पाळणारी, मंगळसूत्र घालून मांग भरणारी स्त्री तीच कशी शालीन हेदेखील त्यांचं ठरलेलं असतं, पण हिजाबला विरोध असतो. प्रार्थनागृहात जाताना बिनबाह्य़ांचे कपडे चालणार नाहीत. पायघोळ स्कर्टच हवा असे नियम योग्य वाटतात, पण हिजाबला मात्र विरोध असतो.

हिजाबसारख्या अटी म्हणजे स्त्रियांच्या मूलभूत हक्कांवर गदा आहे, मानवाधिकाराच्या विरोधात आहे हे खरं. पण तोच न्याय कुठलीही धार्मिक प्रथा जाचक अट म्हणून पुढे येते तेव्हा लावला पाहिजे. सक्ती मग ती कुठलीही असो, मूलभूत मानवाधिकारांचं उल्लंघनच करते ना? स्त्रीला एक व्यक्ती म्हणून तिने काय परिधान करावं आणि काय नाही, तिने काय काम करावं काय नाही, घरी बसावं की बाहेर जावं आणि कधी जावं.. हे अधिकार नाहीत का? आता अमेरिकेतील नोकरदार स्त्रिया घाबरल्यात म्हणे.. कारण स्त्रियांनी काम करण्यापेक्षा कुटुंब सांभाळावं असं मत राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून वावरताना ट्रम्प यांनी कधी तरी वर्तवलं होतं. हेच ट्रम्प हिजाबच्याही विरोधात बोलले होते. सध्या हिजाब घालणाऱ्या अमेरिकेतील स्त्रियाही आपल्याला लक्ष्य केलं जाईल म्हणून घाबरताहेत. हा विरोधाभास प्रगत आणि कमालीचं व्यक्तिस्वातंत्र्य जपणाऱ्या अमेरिकेत दिसतोय सध्या.

बुद्धिनिष्ठ, समन्यायी विचार,  न्याय्य भाव, सदसद्विवेकबुद्धी, सहिष्णुता हे प्रगत मानवाचे स्थायिभाव आपण बाजूला ठेवायला लागलोय आणि एकाच रंगाच्या चष्म्यातून सगळ्या गोष्टी बघायचा प्रयत्न करतोय. हा चष्मा स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी समान आहे, हे विशेष आणि स्त्रियांनी काय बघावं हे ठरवण्याचा अधिकारच त्यांना नाहीये. ‘माय चॉइस’ असं मुक्तपणे सांगणाऱ्या मुलींची संख्या वाढतेय हे निश्चित. पण हा त्यांचा चॉइस नेमक्या कुठल्या तत्त्वांवर आधारित आहे आणि हा तत्त्वांचा डोस त्यांना पाजण्यात आलाय की ती तत्त्वं अनुभवातून, सदसद्विवेकबुद्धीतून आली आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरतं.

आपला इनफॉम्र्ड चॉइस आहे असं वाटून घेणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढतेय, पण प्रत्यक्षात त्यांना पुरवण्यात आलेली माहितीच खरं तर अजेंडा आहे, कुणाचं तरी मत आहे आणि ते चुकीचं असू शकतं, अन्याय्य असू शकतं हे लक्षातसुद्धा येत नाहीये त्यांच्या, हेच भयानक आहे. बाईला काय अक्कल आहे, शेवटी तिची जागा घरात असं म्हणणारेच ही एकांगी मतं त्यांच्यावर थोपवतात आणि आपल्या कार्यात हिरिरीने भाग घेण्यास सांगतात. सत्य काय, प्रचार काय हेच कळेनासं होतं अशा वातावरणात. म्हणूनच आपल्या विचारांचा परीघ थोडा जास्त व्यासाचा करावा असं वाटू लागलंय हल्ली.
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com