फॅशन शो म्हणजे वेगवेगळे कपडे घालून, रॅम्पवरून लचकत- मुरडत चालायचं एवढंच नसतं. नवा स्री-विचार मांडणारं एक वेगळंच जग आहे ते..

‘आजची पिढी फॅशनेबल आहे, आजच्या मुली काय तऱ्हेतऱ्हेचे चित्रविचित्र कपडे घालतात, आदिवासींसारखे भलेमोठे दागिने काय, रंगवलेले केस काय, कुठल्याही परंपरेचा विधिनिषेध बाळगायचाच नाही मुळी.. आणि ही यांची फॅशन ..’ नव्या पिढीच्या फॅशनबद्दल असे कितीतरी वेळा ऐकलं असेल ना.. बोललेलंही असेल कदाचित.

What is Israel Iron Dome a defense system that prevents Iranian attacks
इराणी हल्ल्यांना रोखून धरले इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने… काय आहे ही बचाव यंत्रणा?
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

फॅशनेबल राहणं ही प्रत्येक स्त्रीची उपजत आवड असली (खरं तर स्त्रीचीच कशाला.. पुरुषाचीसुद्धा ! सुंदर दिसावं असं सगळ्यांनाच वाटणं स्वाभाविक आहे.. आरशाचा वापर सगळेच करतात, नाही का? ) तरी फॅशनला अद्याप सर्वमान्यता नाही.  प्रत्येकीच्या लेखी फॅशनची व्याख्या वेगळी, हे खरं. तरी आजही मराठी घरांमध्ये ‘मी नाही बाबा फॅशन करत’, असं म्हणणारीचंच कौतुक अधिक होतं. ‘मी बाई साधी आणि शहाणी’ हे दहा वेळा ऐकवलं जातं.  याचं कारण फॅशनविषयी असणारे गैरसमज. भडक कपडे, बटबटीत मेकअप म्हणजे फॅशन हे आपल्या मनात लहानपणापासून बिंबवलं गेलं आहे. याला जबाबदार आपली माध्यमंही आहेत. आठवून बघा.. काही लोकप्रिय मालिकांमधून आणि चित्रपटांमधून आजही नायिका साधी, सोशिक असते. म्हणजे तशी दाखवली जाते आणि नकारात्मक छटा असलेल्या भूमिकेतली स्त्री मात्र भडक रंगसंगती, बटबटीत मेकअप, तंग कपडय़ांमध्ये वावरताना दिसते आणि तीच फॅशनेबल असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात चर्चा होत असते ‘गरीब बिचाऱ्या’ नायिकेच्या कपडय़ांची, तिच्या दागिन्यांची, तिच्या टिकल्यांची आणि बाजारात लेटेस्ट फॅशन म्हणूनही येत असतात त्याच साध्या-सोशिक नायिकेचे दागिने. पण त्या सो कॉल्ड साधेपणाची ही अशी बाजारी फॅशन झाली, की पुन्हा त्याला नाकं मुरडणारेही असतातच. थोडक्यात आम्हाला फॅशन या शब्दाचंच वावडं आहे.

फॅशनच्या नावानं बोटं मोडणाऱ्यांना साधेपणातही फॅशन असू शकते हे मान्य असतं का? माहिती नाही. मुळात खरी गोम आहे – फॅशन म्हणजे उथळपणाचं लक्षण असं मानण्यात.  पण फॅशन ही मागच्या पिढय़ांना वाटते एवढी उथळ दरवेळी असेलच असं नाही. फॅशन हे व्यक्त होण्याचं, एक्स्प्रेशनचं माध्यम असू शकतं.. नव्हे असतंच. तुमचे विचार, तुमची मतं तुमच्या फॅशनमधून मांडली जाऊ शकतात.  काही विचार सांगायला, व्यक्त व्हायला फॅशनइतकं प्रभावी माध्यम दुसरं नसेल. म्हणूनच प्रत्येक पिढीच्या फॅशनमधून त्या त्या काळातली बंडखोरी नेहमी दिसलेली आहे. बुरख्यातली, पडद्यातली किंवा डोक्यावर पदर घेऊन खालमानेनं जगणारी स्त्री फॅशन म्हणून पडदा तोडून बाहेर आली, तेव्हा ते बंडखोरीचं प्रतीकच होतं. ती फॅशन म्हणून पुरुषी कपडय़ांत वावरायला लागली, तेव्हाही ती बंडखोर होती, नव्या काळाची प्रतिनिधी होती. पण हळूहळू फॅशन म्हणजे स्त्रीदेहाचं प्रदर्शन असं वाटू लागेल अशी परिस्थिती आली तेव्हा मात्र या फॅशनमधून नेमकं सांगायचंय काय आणि कशासाठी असे प्रश्न पडायला लागले.

नुकत्याच मुंबईत झालेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ला जायची संधी मिळाली, तेव्हा सध्याच्या काळातली फॅशन नेमकं काय सांगतेय याचा शोध घ्यायचा छोटासा प्रयत्न करता आला. लॅक्मे फॅशन वीक हा फॅशन क्षेत्रातला देशपातळीवरचा मोठा सोहळा. याचे दोन ‘सीझन’ होतात. एक स्प्रिंग-समर आणि दुसरा ऑटम- विंटर. जगभरातल्या फॅशन उद्योगात हीच रीत चालत आलीय. वर्षभरात ऋतूनुसार दोन वेगवेगळी कलेक्शन्स बाजारात आणायची. गेल्या पाच-सहा वर्षांत मॉल्स आणि त्याबरोबर हाय फॅशन वाढली तशी ही जागतिक फॅशनची रीत आपल्याकडेही रुळली. हाय फॅशन म्हणजे केवळ तारे-तारकांची मक्तेदारी आता राहिलेली नाही. आजची सामान्य स्त्रीदेखील फॅशनेबल राहू शकते, हा मुख्य संदेश गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर दिला गेलाय. तो द्यायचं काम या अशा फॅ शन शोंनी केलंय. फॅशन शो सुरुवातीला केवळ उच्चभ्रूंचा ठेका होता. तिथे उपस्थित असणारे एका ठरावीक वर्गातील असायचे. अजूनही सामान्य माणूस या फॅशन शोपासून दूर असला, तरी सर्वदूर पसरलेल्या विविध माध्यमांमधून ती फॅशन सामान्यांपर्यंत पोचतेय. ऑनलाइन खरेदी शक्य झाल्यामुळे, ही फॅशन सहज आपलीशीही करता येते. आता जगातल्या एका कोपऱ्यातली फॅशन दुसरीकडे पोचायला अजिबात वेळ लागत नाही, ते याचमुळे.

आता या वर्षीच्या या समर कलेक्शन्समधून काय दिसलं ते बघू या. ट्रेण्ड, स्टाइल याच्या पलीकडे शोध घ्यायचा प्रयत्न केला तर या वेळी विशेषत नव्या पिढीतल्या फॅशन डिझायनर्समधून एक प्रकारची बंडखोरी दिसली. ग्लॅमरपलीकडे कलात्मकतेचा शोध कपडय़ांतून घ्यायची प्रवृत्ती दिसली. आजच्या पिढीची आत्ममग्नता या वर्षीच्या स्त्रियांसाठीच्या डिझाइन्समधून दिसली, त्याचप्रमाणे दिसली मुक्ततेची आस. आजची आधुनिक स्त्री कुठल्या बंधनात आहे म्हणून नाही, मुक्ततेची आस म्हणजे कुठल्याही ठरावीक साचेबद्ध कल्पनेतून तिला मोकळं व्हायचंय. मनमुक्त जगायचंय. ती करिअर करतेय, घर सांभाळतेय आणि स्वतकडेही लक्ष देतेय. पण तिने ‘सुपरवुमन’ असावं, अशी समाजाची इच्छा ती आता झुगारून देतेय. अमान्य करतेय. तिच्या जगण्यात स्वतसाठी आर्वजून जागा शोधतेय. हे सगळं फॅशन डिझाइनिंगमधल्या कट्समधून, रंगांमधून, आकारांमधून सांगायचा प्रयत्न झाला. तानिया खनुजा या डिझायनरने – ‘मॅलिस इन वंडरलँड’ या नावाने कलेक्शन सादर केलं. केवळ पांढऱ्या रंगाचे कपडे यात होते. शार्प कट्स, युनिसेक्स सिलोएट्स आणि पांढऱ्यावर त्याच रंगाच्या कापडातून उमटवलेले डिटेल्स. आपल्या या कलेक्शनबद्दल बोलताना तानिया म्हणाली, ‘स्त्रीच्या हृदयात खोलवर जाऊन पाहायचा हा प्रयत्न आहे. तिथे तुम्हाला अपूर्ण राहिलेल्या इच्छा-आकांक्षा दिसतील. प्रगतीतही सल जाणवेल – मागे ठेवलेल्या आठवणींचा. तरीही ती भविष्याकडे बघत प्रगतिपथावर चाललेली असेल, नवं काही अनुभवायला..’ तानियाने कपडय़ाच्या पांढऱ्याशुभ्र कॅनव्हासवर हे उतरवत असताना ब्रूच म्हणून, अ‍ॅक्सेसरी म्हणून कोळ्याच्या प्रतिमेचा वापर केला. हेच ते ‘मॅलिस.’

आई झाल्यावर बाईचं करिअर दुय्यम स्थानी जातं, हा सर्वसाधारण अनुभव. ती क्षणाची पत्नी अनंत काळची माता वगैरे असते.. थोडक्यात आई होताना तिनं बाकी सगळं विसरायचं असतं.. हेच सांगते ना आपली परंपरा? फॅशन रॅम्पवर चालणाऱ्या मॉडेल्सची तर ‘मापं’ ठरलेली. इतर उद्योग-व्यवसायात स्त्रिया आई होण्याच्या शेवटच्या महिन्यापर्यंत काम करताना दिसताहेत सध्या. ती सोय या मनोरंजन आणि मॉडेलिंग क्षेत्रात नाही. पण हा समज यंदा खोटा ठरवला कॅरल ग्रेशिअसनं. गौरांग मेहता या डिझायनरने कॅरल गर्भवती असल्याचं माहिती असूनही तिला खास गोव्याहून बोलावून घेतलं. सहा महिन्यांची गरोदर असलेली कॅरल तितक्याच आत्मविश्वासानं आणि ऐटीत रॅम्पवर उतरली आणि मॉडेलिंगबाबतचे अनेक ठोकताळे तिने खोडून काढले. ‘माझ्यासारख्या आजच्या स्त्रीसाठी ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. मॉडेलिंग माझं काम आहे आणि ते मी केलं. इतर क्षेत्रातल्या स्त्रियाही गरोदर असताना कामावर जातात. मीपण तेच केलं. गवगवा करण्यासाठी हे केलेलं नाही.’ कॅरलचं हे म्हणणं नेमका आजच्या काळातल्या स्त्रीचा अ‍ॅटिटय़ूड दाखवून जातं.

‘माकू’ नावाचं कलेक्शन सादर करणाऱ्या कोलकत्याचा तरुण डिझायनर शांतनू दास यानं तर त्याच्या डिझाइन्ससाठी मॉडेल्सना मास्क लावून रॅम्पवर यायला सांगितलं. ‘आजचं जग प्रचंड वेगवान आहे. या वेगात आपली ओळख आपण हरवू पाहतोय. फॅशनही फास्ट चेंजिंग झालीय. ती चेहरा नसलेली होऊ नये, यासाठी थोडं थांबायला हवं, आपली ओळख जपत जगायला हवं…’ आपल्या कलेक्शनमधून काय सांगायचा प्रयत्न केलाय, याबाबत शांतनू भरभरून बोलत होता.

‘डाउट इज आउट’ नावाचं कलेक्शन तर फॅशन म्हणजे काय हे सांगण्यासाठीच तयार केलं गेलं होतं. फॅ शन करायला शरीरयष्टी, वय, व्यवसाय या कशाचंच बंधन नसतं. स्त्रीने ती करायची असते, स्वतसाठी.. जगण्यातल्या आनंदासाठी. हेच सांगायला ‘अजिओ’ या इ-कॉमर्स कंपनीने अगदी वेगळ्या मॉडेल्स रॅम्पवर उतरवल्या. ‘रोल नो बार’ असं म्हणत लढाऊ विमानाची पहिली महिला वैमानिक सुमन शर्मा फॅशन रॅम्पवर आली. ‘एज नो बार’ म्हणत वार्धक्याकडे झुकलेली हेलन मॉडेल म्हणून समोर आली. ‘साइज नो बार’ म्हणत आपल्या लठ्ठपणाची तमा न बाळगता कॉमेडी क्वीन भारती सिंग रॅम्पवर आली. एवढंच नाही तर ‘जेंडर नो बार’ असं सांगायला तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढणारी आणि स्वत ट्रान्सजेंडर असणारी लक्ष्मी नारायण त्रिपाठी मॉडेल म्हणून रॅम्पवर आली. या आगळ्यावेगळ्या फॅशन शोची ‘शो स्टॉपर’ होती हिंदी चित्रपट अभिनेत्री सनी लिऑनी. पॉर्नस्टार म्हणून करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री सांगत होती – ‘चॉइस नो बार’! फॅशनविषयीच्या सगळ्या शंका, सगळे पूर्वग्रह इथेच संपवायला हवेत. इट्स हाय टाइम – फॅशनमागचा विचार समजून घेण्याची आणि विचाराने फॅशन करणाऱ्या ‘तिला’  – आजच्या प्रत्येक ‘मनमुक्ता’ला समजून घेण्याची!
अरुंधती जोशी
response.lokprabha@expressindia.com
@aru001