08 April 2020

News Flash

शनीचं तेल धार्मिकतेवर

शनी चौथरा काही महिन्यांपासूनच चांगला चर्चेत आहे.

शनीच्या चौथऱ्यावर स्त्रियांनी प्रवेश करायचा की नाही, हा वाद पराकोटीला गेला आहे. पण या सगळ्या चर्चेचा रोख आहे तो, स्त्रियांची धार्मिकता गृहीत धरण्यावर.

सध्या राज्यापुढचा बिकट प्रश्न कोणता? दुष्काळ.. पाणी-प्रश्न..? चूक. शनीच्या चौथऱ्यावर महिलांचा प्रवेश हाच खरा प्रश्न. शनिशिंगणापूरचा वाद आता मुख्यमंत्र्यांनी सोडवावा, अशी सर्वाची इच्छा आहे. सर्वाची म्हणजे त्या चौथऱ्यावर प्रवेश हवा म्हणणाऱ्या महिलांची, त्यांना साथ देणाऱ्या संघटना, पक्ष, संस्थांची आणि त्याला विरोध करणाऱ्या शिंगणापूरच्या ग्रामस्थांची, त्यांना पाठिंबा देणाऱ्या धर्मरक्षकांची. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत सार्वत्रिक चर्चेचा, चिंतेचा, बिकट विषय शनीच्या चौथऱ्यावर स्त्रियांनी प्रवेश करावा की नाही हा आहे. ही अतिशयोक्ती नाही. जागतिक बातम्यांमध्ये या विषयानेच महाराष्ट्राला स्थान मिळवून दिले. गेल्या महिन्यांत महाराष्ट्रातून आलेली सर्वात मोठी बातमी हीच होती. बीबीसी, सीएनएनसारख्या परदेशी वृत्तसंस्थांनीही दखल घेतलेला गेल्या आठवडय़ातला महाराष्ट्रातला विषय एकच. शनीचा चौथरा आणि त्यावरचा प्रवेश. ट्विटरवर शनी हा शब्द टॉप ट्रेण्डिंग होता गेल्या आठवडय़ात. हा शनी चौथरा काही महिन्यांपासूनच चांगला चर्चेत आहे. म्हणजे शनिशिंगणापूर नावाचं एक गाव अहमदनगर जिल्ह्यत आहे. तिथे शनीनामक देवाचे (की ग्रहाचे?) मंदिर आहे आणि एके काळी शिळा उभा केलेला चौथराही त्या मंदिरात आहे. हाच तो शनिदेवाचा चौथरा. यावर प्रवेश मोजक्या अध्र्याना. म्हणजे पुण्यवान, भाग्यवान, पवित्र अशा पुरुष जमातीला. कारण उरलेली अर्धी-निम्मी स्त्री जमात अमंगळ, अपवित्र होते ना दर महिन्याच्या ठरावीक दिवसांत! अशी किती तरी मौलिक माहिती, सामान्य ज्ञान गेल्या आठवडय़ातील वृत्तांवरून महाराष्ट्राबाहेरच्यांनाही समजले. त्यांनी ते इंटरनेटवरून, समाजमाध्यमांमधून वेचले, शोधले आणि चर्चिले. (चित्रपटनिर्माता गुलशन कुमारनंतर) शनिदेवाला एवढी प्रसिद्धी देणारी ठरली ते त्या चौथऱ्यावर चढलेली एक स्त्री.

हा सगळा विषय एवढा का चघळला जातोय, इतर सगळे प्रश्न संपले का, एवढा ज्वलंत म्हणावा असा खरेच हा विषय आहे का, असे प्रश्न विचारणारे किंवा मनात येणारे आता केवळ दोनच गट राहिलेत. त्यातला पहिला- नास्तिक. शनी गेला तेल लावत, असे थेटपणे म्हणणारा. आणि दुसरा- सश्रद्ध आस्तिक पण विवेकी म्हणजे विचार करणारा. पहिल्या गटाविषयी आणि त्यांच्या भूमिकेविषयी थोडे का होईना बोलले गेले, लिहिले गेले. त्यांचेही मत पुढे आले. खरी पंचाईत झाली ती दुसऱ्या गटाची. कारण ते आस्तिक आहेत म्हणजे त्यांनी कुठली तरी एक बाजू घेतलीच पाहिजे, हे त्यांच्यावर बंधनच आलेय. म्हणजे शनिमंदिरात महिलांनी प्रवेश केला काय किंवा न केला काय फरक पडतो, हे म्हणणारे नास्तिक असतील तर त्यांची भूमिका अगदी स्पष्ट आणि सोपी असते. पण असे म्हणणारे आस्तिक असतील तर खरी पंचाईत. कारण आपल्याकडे सरसकट काळा-पांढरा करायची सवय असते समाजाला. त्यामुळे होते काय.. आपापल्या नजरेप्रमाणे एकाच्या काळ्याला दुसरा पांढरा म्हणतो आणि दुसऱ्याच्या पांढऱ्याला पहिला काळा म्हणतो आणि काय काळे काय पांढरे याची अशी दोन-दोन व्हर्जन्स तयार होतात. नेमके कुठले खरे ते कळत नाही. व्हर्जन १ – देव मानणारा तो धार्मिक, निष्ठावान आणि न मानणारा धर्मबुडवा, पापी. व्हर्जन २ – देव मानणारा तो सनातन, प्रतिगामी आणि न मानणारा तो पुरोगामी. आता ही दोन्ही टोकाची व्हर्जन्स बघून गोंधळलेला, नेमकी कुठली बाजू घ्यावी हे न उमगलेला आणि तरी हा विषय इतका काही महत्त्वाचा नाही, अस्मितेचा नाही, जगण्या-मरण्याचा प्रश्न यात नाही. हा ज्याच्या त्याच्या धार्मिकतेचा प्रश्न आहे आणि हे इतके साधे आहे, असे म्हणणारा समाज खरे तर मोठा. तोच सहिष्णू खरा. पण त्याच्या सहिष्णुतेत ‘बातमी’ नाही. हे असे सोपे करून सांगणे म्हणजे बोटचेपे धोरण. याला काय अर्थ आहे? काही तरी स्टॅण्ड घ्यायला हवा ना.. असं म्हणणाऱ्यांची सध्या चलती आहे. त्यांची संख्या कमी तरी आवाज मोठा आहे, कारण त्यांच्या हाती माध्यमरूपी लाऊडस्पीकर आहे. ते लाऊडस्पीकरवरचे मोठमोठे आवाज ऐकून बहुसंख्य सहिष्णू समाज कुठे तरी एकीकडे झुकायला लागतोय खरा.

तर आजचा विषय हा या बहुसंख्यांच्या धार्मिकतेचा आहे. त्यातल्याही स्त्रियांच्या धार्मिकतेचा आहे. त्यातल्या वैविध्याचा आहे आणि त्यातल्या स्वातंत्र्याचा आहे. मगाशी सांगितलेल्या दुसऱ्या गटाचा आहे. शनिशिंगणापूरच्या निमित्ताने एकूणच धार्मिकतेविषयी आपल्या मनात किती भ्रामक, परस्परविरोधी आणि हास्यास्पद कल्पना आहेत याचा विचार आला. नेमकी कुणाची बाजू घ्यावी या गोंधळलेल्यांच्या गटात स्त्रियांची संख्या जास्त आहे. कारण स्वाभाविक -स्त्रीची धार्मिकता परंपरांशी जुळलेली. धर्म कुठलाही असो, स्त्रीचे स्थान दुय्यम असे त्यांची ‘परंपरा’ सांगते. धार्मिक प्रथा, परंपरा म्हटले की, सनातन्यांना एक नवा आवेश चढतो. कुणी परंपरेचे कारण विचारायचे नाही. ही प्रथा आहे, बास आणि ती ‘अभिमानाने’च पाळायला पाहिजे. एखादी परंपरा विवेकाला धरून नाही, साध्या भाषेत प्रॅक्टिकल नाही, असे सांगायची सोय नाही. कारण लगेच तुमची रवानगी धर्मबुडव्यांच्या पंथात व्हायची. त्यातून धार्मिक परंपरा सांभाळण्याची नैतिक जबाबदारी स्त्रीवरच जास्त. धर्म सांगतो म्हणे – चार दिवस बाजूला बसा. त्या दिवसात देवाजवळ जाऊ  नका. हाच धर्म एके  काळी सांगत होता- स्त्रियांनी शिकू नये, घराबाहेर पडू नये, पुरुषांनी समुद्र ओलांडून जाऊ  नये. आताच्या धार्मिकांना या गोष्टी पटतात का? अगदी कट्टर सनातन्यांना तरी हे आजच्या काळात परवडणारे आहे का? म्हणजे शतकभरापूर्वीचा ‘धर्म’ आपण सोयीस्कर बदलला आहे तर. तो बदलायलाच हवा होता, यात एकमत आहे. मग आता का त्याचा एवढा गहजब होतोय? सावित्रीबाई फुले जेव्हा स्वत: शिकल्या आणि मुलींना शिकवायला बाहेर पडल्या, तेव्हादेखील त्या अशाच ‘धर्मबुडव्या’ ठरवल्या गेल्या. रमाबाई रानडय़ांच्या शिकण्यावर आणि चारचौघांबरोबर सभेत वावरण्यावरून त्यांच्या घरातील मंडळींनीच हे धर्मात निषिद्ध असल्याचे सांगितले होते. बाईने शिकणे, पुरुषांबरोबरीने वावरणे हेदेखील आमच्या धर्माला तेव्हा मान्य नव्हते. पतिनिधनानंतर सती जाणे, केशवपन वगैरे धर्माने सांगितलेले, असे मानले जात होते. आता या सगळ्याच्या विरोधी कायदे आहेत आणि शिक्षण हा मूलभूत अधिकार. पुरुषांच्या बरोबरीने वावरण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आरक्षण, विशेष सवलती. मग अगदी शंभर-एक वर्षांपूर्वीचा ‘धर्म’ आपण विसरलो का आता? धर्म बुडलाच म्हणजे. नव्हे पार रसातळाला गेला असे म्हणायला हवे आता. नाही का?

आजची धार्मिक श्रद्धा ही काळानुरूप बदललेली आहे. ती आता प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणारी व्हावी अशी अपेक्षा आहे. स्त्री ही स्वतंत्र व्यक्ती आहे, हे आधी मान्य व्हायला हवे. तर ही अपेक्षा पूर्ण होऊ  शकेल. हिंदुत्वावर विश्वास असणारा किंवा मनापासून इस्लाम पाळणारा प्रत्येजण कट्टरवादी नसतो, तसे धार्मिकता पाळणारी प्रत्येक स्त्री सनातन्यांना अपेक्षित असलेला बुरसटलेला रूढीवादी धर्म पाळणारी नसते. स्त्रियांच्या बाबतीत तिची धार्मिकता ही कायमच पुरुषाशी बांधलेली असते. स्वतंत्र नसते. म्हणजे लग्न करून ज्या घरी जाईल, त्या घरची धार्मिक प्रथा पाळायची. मग ती देव मानण्याची असो वा न मानण्याची. मुलगी धार्मिक असावी, देवाधर्माचे करणारी असावी, अशी अपेक्षा असणाऱ्यांच्या घरी एक मैत्रीण लग्न करून गेली. मैत्रीण तशी सश्रद्ध. पण लग्नानंतर तिला समजले की, कुणी एक महाराज नियमितपणे त्यांच्याकडे वास्तव्याला येतात आणि त्यांची सेवा हाच त्या कुटुंबाचा धर्म. घरात आलेल्या सुनेने ही गुरुसेवा केलीच पाहिजे, हा आग्रह. म्हणजे तिच्या धार्मिकतेचा चुकीचा अर्थ लावला गेला.

‘आमच्याकडे देव मानतात. मूर्तिपूजा मानत नाहीत. त्यामुळे मूर्ती घरात पुजलेली चालणार नाही’.  ‘कुळधर्म- कुळाचार, सोवळेओवळे सगळे विधी करावेच लागतील,’ अशी सगळी सगळी बंधने स्त्रीवर असतात. तिच्या धार्मिकतेवर असतात. म्हणजे देव मानणाऱ्या स्त्रीला तिच्या विचारांना पटणारी धार्मिकता पाळायची सोय नाही.

एक देव मानणारी पण स्वतंत्र विचारांची मैत्रीण एका देवस्थानच्या भक्तनिवासामध्ये गेली. तिचा पती उशिरा येणार होता. पण तो आल्याशिवाय भक्तनिवासमध्ये प्रवेश नाही, असे तिला सांगण्यात आले. दोघे आले असाल तर पतीच्याच नावाने खोली देणार. पत्नीला तो अधिकार नाही. लग्न-मुंज- पूजा या सगळ्यात पुरुषाचा मान पहिला. पती नसेल तर महिलेला पूजाविधी करता येणार नाही. पुरुषांना मात्र पत्नीची अट शिथिल केलेली. हा दुजाभाव आजच्या स्वतंत्र स्त्रीला ती कितीही धार्मिक असली तरी कुठे तरी बोचतो. त्रास देतो. मग त्यापेक्षा ही धार्मिकताच नको, असा देवच नको. असे त्या सश्रद्ध पण विचारी स्त्रीला वाटायला लागले तर त्यात नवल नाही. धार्मिकता पाळण्याचे स्वातंत्र्य म्हणजे हवा तो धर्म पाळण्याचे हे खरे, तसे हव्या त्या पद्धतीने पाळण्याचे, हव्या त्या अर्थाने पाळायचे स्वातंत्र्य आहे. यालाच खरी सहिष्णुता म्हणायचे. नाही तर वडाचं तेल वांग्यावर तसं शनीचं तेल धार्मिकतेवर कधी पडेल आणि त्यात सहिष्णुतेचा बळी जाईल हे सांगता येत नाही.
अरुंधती जोशी
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2016 1:11 am

Web Title: shani mandir and women
Next Stories
1 जिकडे तिकडे ख्रिस गेल!
Just Now!
X