घराकाम, स्वयंपाक, कुटुंबीयांचं आरोग्य या सगळ्याकडे तिचंच लक्ष असतं; या सगळ्यात ती कुठे कमी पडली तर अपराधीपणाची भावनाही तिच्याच मनात डोकावणार. पण, या अपराधीपणाच्या प्रांतात पुरुषांना प्रवेश करायला सांगणारी एक जाहिरात सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय. या जाहिरातीच्या निमित्ताने..

एरवी चित्रपटगृहात गेल्यावर चित्रपट सुरू व्हायच्या आधी किंवा मध्यंतरात लागणाऱ्या जाहिराती सर्रास दुर्लक्ष करण्याचा विषय असतो. चित्रपटाच्या आवाजापेक्षा मोठय़ा, कर्णकर्कश आवाजातल्या (कधी कधी अक्षरश: कानात बोटं घालायला भाग पाडणाऱ्या) या जाहिराती अंधाराला सरावण्यासाठी, खुर्चीत व्यवस्थित सेट होण्यासाठीच वेळ देतात जणू. पण त्या दिवशी एका जाहिरातीनं लक्ष वेधलं. दोन मिनिटांची जाहिरात म्हणजे जाहिरातीच्या विश्वात महाकायच म्हणायला हवी. ती कसली आहे हे अगदी शेवटी लक्षात येतं, हे विशेष. पण त्यातून दिलेला संदेश विचार करायला भाग पाडतो. एका धुण्याच्या पावडरची ही जाहिरात. ‘शेअर द लोड’ ही त्यांची मोहीम सध्या खूप गाजतेय. त्याच मोहिमेतली ही एक जाहिरात.

ऑफिसमधून थकून-भागून आलेल्या आपल्या लाडक्या लेकीकडे राहायला आलेले एक वडील कौतुकानं बघताहेत, तिचा कामाचा उरक बघताहेत. तिने ऑफिसमधून येता येता भाजी आणलीय. घरी येताच वडिलांची चौकशी करत मुलाला अभ्यासाबाबतही ती सूचना करतेय. एका बाजूला तिच्या कानाला फोन चालूच आहे.. ऑफिसचाच असावा. आल्या आल्या ती स्वयंपाकघरात शिरतेय..चहा करायला. हॉलमध्ये लॅपटॉप उघडून तिचा नवरा बसलेला दिसतोय टीव्हीसमोर. तोही ऑफिसमधून आलेला असावा. त्याला ती चहा आणून देते. घरातल्या सगळ्यांच्याच जेवणाची तयारी करायचीय ही चिंता तिच्या डोळ्यात दिसतेय. कपडे मशीनला लावणे, भाजीची व्यवस्था सुरू असतानाच वडिलांचे मनोगताचे शब्द आपल्या कानी येतात. .. (अर्थात हिंदीतून पण काहीशा अशा अर्थाचे..) ‘किती मोठी झालीय माझी लाडकी लेक. लहानपणी घरभर हुंदडायची. घर घर खेळायचीस तू.. आता खरंखुरं घर सांभाळतेयस.. कामं उपसत घरभर फिरतेयस. ऑफिस, घर, नवरा-मुलगा सगळं व्यवस्थित करतेयस, पण एकटीच राबते आहेस गं. यात दोष माझाच आहे म्हणा. तसा तुझ्या नवऱ्याच्या वडिलांचाही.. आमचंच चुकलं. आम्हीच वाढवलं असं तुम्हाला. आम्ही कधीच घरकाम केलं नाही. तुझ्या नवऱ्यानेही तेच पाहिलं लहानपणी. तू घरघर खेळायचीस तेव्हा सगळा स्वयंपाक करायचीस, तुझा नवराही कुणाच्या तरी भातुकलीच्या खेळात टीव्ही बघत चहा पिण्याचा रोल करत असणार. पण बेटा.. सॉरी आता मात्र चूक सुधारायचा प्रयत्न करणार. तुझ्या आईबरोबर घरातलं काम करणार..’

दोन मिनिटांची ही जाहिरात संपली, तेव्हा आसपासच्या आसनांवरची माणसंदेखील गंभीरपणे जाहिरात बघताहेत असं दिसलं. ती ‘गिल्ट’ नावाची टाचणी बरोबर योग्य ठिकाणी लागल्याचं दिसलं. कदाचित पहिल्यांदाच घरगुती कामांनी पुरुषांना ‘गिल्ट’ द्यायचं काम केलं असेल म्हणून थोडी गंमत वाटली. एरवी हा गिल्टचा प्रांत स्त्रियांसाठी राखीव. अपराधीपणाची भावना.. ‘घरच्यांची’ आबाळ होतेय याचा दोष, आपण कमी पडतोय की काय याची भीती ही सगळी लक्षणं या गिल्टच्या प्रांतात शिरलं की दिसू लागतात. ती इतके दिवस स्त्रियांचीच मक्तेदारी होती. आता पुरुषही यात शिरकाव करू लागले आहेत तर..

घर हे दोघांचं असतं, घरगुती कामांची जबाबदारीदेखील दोघांची बरोबरीची आहे, याची पुरुषांना झालेली जाणीव तशी अगदी अलीकडच्या काळातली. स्त्री नोकरीसाठी घराबाहेर पडली, कमावती झाली या गोष्टीला दोन-तीन पिढय़ा होऊन गेल्या तरी ही जाणीव यायला मात्र बराच वेळ गेला. इतकी र्वषे घराची जबाबदारी पूर्णपणे स्त्रीचीच राहिली. तिला घरकामात ‘मदत’ करणारे मिळाले. पण मदत नेहमीच वेळ मिळेल तेव्हा करण्याची गोष्ट. वेळ, संधी आणि गरज असेल तेव्हाच मदत केली जाते. मूळ जबाबदारी मात्र ज्याची त्यालाच पेलावी लागते. घरकाम, मुलं आणि त्यांचे आजी-आजोबा ही सगळीच जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. हेच सगळ्यांनी लहानपणापासून घरात पाहिलेलं असतं. याचेच ‘संस्कार’ असतात. त्यामुळे एखादीला काही कारणाने ही जबाबदारी पूर्ण करण्यात अडचणी आल्या तर त्यामुळे येणारी अपराधी भावना ही तिची एकटीची असते. दोष तिचा एकटीचा असतो. ती तरी तसंच मानते.

रिटायर्ड लाइफ एंजॉय करायचं असं ठरवलेल्या हेमाकाकूंना निवृत्तीच्या पहिल्याच दिवशी ‘सकाळी असं उशिरापर्यंत बाईनं असं लोळत कसं बसायचं..’ कसंतरी वाटतंय, त्यांची सूनही स्वत:चा, मुलाचा आणि नवऱ्याचा डबा करण्याच्या घाईत चुकचुकतेय.. ‘आईंना आतासुद्धा सकाळी लवकर उठून बाबांच्या नाश्त्याचं बघावं लागतंय’ यासाठी.  हेमाकाकूंच्या घरी आजपासून थोडं उशिरा जायचं म्हणजे आपल्या चिंटय़ाला कॉलेजातून घरी आल्यावर आपलं आपण जेवण गरम करून घ्यावं लागणार, आपल्याला उशीर होणार याची स्वयंपाकवाल्या शांताक्कांना हुरहुर. स्वयंपाकघरात वावरणाऱ्या सर्व स्त्रियांना आपण कुठे कमी पडता कामा नये, याची चिंता आहे, कसली ना कसली हुरहुर आहे.

नोकरी करणाऱ्या किंवा घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांनाच ही रुखरुख लागते असं नाही, ही सगळ्यांनाच लागते. रांधून खाऊ घालणं, मुलाबाळांचं करणं, त्यांना ‘वळण’ लावणं आणि घर टापटीप ठेवणं ही घरगुती कामं स्त्रियांची आणि पुरुषांची सत्ता बाहेर असं ‘क्लीअर डिव्हिजन ऑफ वर्क’ अगदी लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं गेलं. दोन-तीन पिढय़ांपूर्वी यात थोडा बदल झाला. घरातली आईदेखील बाहेर पडायला लागली नोकरीसाठी. पण ती घरातलं सगळं आवरून जाते, हेच आम्ही पाहिलेलं. तिला बाहेरचा प्रांत मिळाला, सत्ताविस्तार झाला; पण मूळ राज्यात वाटेकरी मिळाला नाही. ते तिचं एकटीचंच राहिलं. त्यामुळे घरघर खेळणाऱ्या मुलींच्या हाती भातुकलीच्या सेटबरोबर, डॉक्टर सेट दिला गेला, मेकॅनो दिला, खेळण्यातल्या गाडय़ा दिल्या तरी भातुकलीचा खेळ तिचाच राहिला. या खेळात लुटुपुटुचा भात तिनंच शिजवायचा यात बदल झाला नाही. तो खायला मुलाला बोलवायचं, यातही बदल झाला नाही. मुलाच्या हाती मात्र फक्त मेकॅनो राहिला.

या दोन्ही राज्यांमध्ये राज्य करण्याच्या नादात बाई गिल्टच्या प्रांतात जास्त राहायला लागली. ही अपराधी भावना ‘हॅव इट ऑल’च्या हव्यासापायी येऊ लागली. ‘पेप्सिको’च्या ‘सीईओ’पासून घराघरांत स्वयंपाकाची कामं करणाऱ्या शांताक्कापर्यंत सगळ्यांनाच या गिल्टची लागण चुकली नाही. मला कमवायचंय, करिअरपण करायचंय, घरची जबाबदारीही माझी आहे, मुलांकडेही मीच बघणार.. नवऱ्याला कुठे वेळ असतो. या सगळ्यात कधी स्वत:कडे आवर्जून बघणं होतं का? आणि स्वत:साठी काही केलंच तर ते करण्याच्या नादात दुसऱ्यावर सो कॉल्ड अन्याय होतोय म्हणून उगाच दोष वाटत असतो आपल्याला. खरंय ना? स्त्री ही अनंत काळची माता असते, आईनं त्यागमूर्ती वगैरे असलंच पाहिजे, हेच आपल्याला माहिती. या नादात स्वत:साठी जगायला हवं असं कुणी शिकवतंच नाही आणि स्वत:साठी केलेल्या छोटय़ा गोष्टीचीसुद्धा बोच लागून राहते. कधी आयता चहा मिळाला हातात, तरी भरून येतं मग.

वेळच नसतो, मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, नोकरीमुळे घरच्यांची आबाळ होते वगैरे विचार पिच्छा सोडत नाहीत. दुसऱ्याला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर सोपवणाऱ्यांनी कधी तुमच्या न्यायाकडे लक्ष दिलेलं असतं का? याचा विचार मनातही येत नाही कधी. घरातल्या पुरुषांना हा गिल्टचा प्रांत नवखा असतो. माहीतच नसतो. कारण त्याची जाणीव आपणच होऊ दिलेली नसते कधी. इच्छा असली तरी तो कसा ‘लोड शेअर’ करणार मग? जाहिरातीच्या मोहिमेतून का होईना, पण हा प्रांत पुरुषांसाठी खुला होतोय याची जाणीव झाली आणि घराची लोड बेअिरग कपॅसिटी यामुळे वाढणार याची खात्री पटली.
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com