स्त्रीत्व, स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीवाद हे हमखास प्रसिद्धीचे ‘की वर्ड’ झालेत की काय, अशी शंका या नवप्रसिद्धीमाध्यमांच्या जमान्यात यायला लागली आहे. केवळ एक प्रसिद्धी तंत्र म्हणून हा स्त्री स्वातंत्र्याचा ‘ट्रेण्ड’ आलेला असेल तर चिंतेची बाब आहे.

हल्ली ‘प्रसिद्धी’माध्यम या शब्दाचा अर्थ शोधायला माध्यमांचा चष्मा थोडा बाजूला काढूनच बघायला हवं, असं वाटायला लागलंय. सोशल मीडिया किंवा समाजमाध्यमं हेच झटपट प्रसिद्धीचं माध्यम म्हणून वापरलं जातंय हल्ली. वृत्तपत्र, टीव्ही वगैरे प्रसारमाध्यमं देणार नाहीत एवढी प्रसिद्धी या नव प्रसिद्धीमाध्यमांमधून मिळतेय..  तीही फुकट आणि फार कमी कष्टात. पुन्हा हे माध्यम तसं फार भेदाभेद न करणारं. यावरच्या प्रसिद्धीचं तंत्र अवगत केलं की झालं. मग कुणालाही प्रसिद्धी मिळू शकते. झकेरबर्ग, पिचाई आदी महारथींच्या प्रयत्नांतून ही समाजमाध्यमं सर्वदूर पोचताहेत, त्यामुळे प्रसिद्धीचा परिघही वाढतोय. या समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्धीचं एक सोपं तंत्रही रीतसर विकसित झालंय बरं का! समाजमाध्यमांतून मार्केटिंग करणं हे आता नवीन राहिलेलं नाही. सोशल माडिया मार्केटिंग हे आजचं हॉट प्रोफेशन बनतंय. या क्षेत्रात काम करणारे या नव प्रसिद्धीमाध्यमाच्या तंत्रात अगदी तज्ज्ञ असतात. या सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये आपल्या मजकुरात/फोटोच्या जोडीला (अर्थात कण्टेण्टमध्ये)काही ठरावीक चपखल शब्द अर्थात ‘की वर्ड्स’ पेरले की, मजकुराला कशा भरपूर ‘हिट्स’ मिळतात, मग त्यातून ‘शेअर्स’ वाढतात, ‘लाइक्स’ वाढतात, थोडक्यात चर्चा वाढते आणि त्याबरोबर बोलबाला वाढतो. ही प्रस्तावना थोडी विषयांतरासारखी वाटली, तरी हाच आजचा मूळ विषय आहे.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा
PM Narendra Modi
“२०२९ मध्येही नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, कारण..”; केंद्रातल्या बड्या मंत्र्याचं भाकित
devendra fadnavis veer savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर ‘बॅरिस्टर’ पदवी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस करणार केंद्राला विनंती!

स्त्रीत्व, स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीवाद हे असे हमखास प्रसिद्धीचे ‘की वर्ड’ झालेत की काय, अशी आता शंका यायला लागली आहे. नव प्रसिद्धीमाध्यमांच्या जमान्यात हमखास विकाऊ (‘शेअर होणाऱ्या’ असं म्हणू या हवं तर.. विकाऊ यापेक्षा हा जास्त ‘सोफिस्टिकेटेड’ शब्द वाटतो ना! ) झालेला एक विषय म्हणजे स्त्री स्वातंत्र्य. सुरुवातीला सोशल मीडियावरचे काही जाहिरातपट, लघुपट त्यातल्या आशयामुळे, वेगळ्या धाटणीच्या स्त्री प्रतिमांमुळे गाजले. विषय ‘बोल्ड’ पद्धतीने मांडला म्हणून त्याविषयी चर्चा झाल्या. लेख लिहिले गेले. अगदी या स्तंभातूनही वेळोवेळी अशा समाजमाध्यमांवरच्या ‘वेगळ्या’ स्त्रीजाणिवांची दखल घेतली गेली. पण गेल्या काही दिवसांत अशा ‘वेगळ्या’ वाटणाऱ्या जाहिराती, व्हीडिओ, ब्लॉग, पोस्ट यांचं अमाप पीक आल्याचं दिसतंय. त्यातलं वेगळेपण आता नष्ट झालंय आणि उरलंय फक्त प्रसिद्धीचं तंत्र.

एका प्रसिद्ध कंपनीने आपल्या साबणाच्या जाहिरातीनिमित्ताने प्रत्येक स्त्री कशी सुंदरच असते आणि सौंदर्याचे ठोकताळे बदला असं सांगत एक ‘सुंदर’ जाहिरात केली आहे. ती नुकतीच ऑनलाइन दर्शकांसाठी प्रदर्शित झाली आणि गाजायलाही लागली. त्याआधी दोन दिवस एका यू टय़ूब वाहिनीने राधिका आपटेला घेऊन अगदी याच विषयावर हेच सांगणारा एक तसाच सुंदर व्हिडीओ प्रदर्शित केला. त्यालाही भरपूर शेअर्स मिळाले. अजूनही मिळत आहेत. त्यानिमित्ताने गेल्या वर्षभरातील अशा जाहिराती आठवल्या आणि वर उल्लेख केलेल्या शंकेला निमित्त मिळालं. एका केशतेल विकणाऱ्या कंपनीने बाह्य़सौंदर्य महत्त्वाचं नाही, असं सांगत संवेदनशीलपणे ‘वेगळी’ जाहिरात केली होती. ती काही महिन्यांपूर्वी खूप गाजली. घरगुती कामांमध्ये पुरुषांचा सहभाग असावा, हा विषय घेऊन आणखी एक कंपनी आपल्या डिर्टजटची जाहिरात करतेय, तर दुसरी एक साबणाचीच जाहिरात करणारी कंपनी पुन्हा प्रत्येक स्त्री सुंदरच असते, असा संदेश देतेय.

‘माय चॉइस’ असं म्हणत स्त्री स्वातंत्र्याचा विषय ‘बोल्ड’ करणाऱ्या एका ऑनलाइन व्हिडीओची गेल्या वर्षी मोठय़ा प्रमाणात चर्चा झाली होती. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा या लघुपटात सहभाग होता. त्यानंतर मग समाजातील स्त्री-पुरुष भेदभावांबद्दल बोलणाऱ्या अभिनेत्रींची रांगच लागली. कंगना राणावत, अनुष्का शर्मा, कल्की कोचलीन, राधिका आपटे आदी अभिनेत्रींनी व्हिडीओ, ऑनलाइन जाहिराती, ऑनलाइन वाहिन्यांवरील मुलाखती, ट्विटर-इन्स्टाग्राम- यूटय़ूब पोस्ट्स, त्यावरच्या कविता यांतून या भेदभावावर टिप्पणी केली. त्यांच्या वक्तव्यांना प्रसिद्धीही मिळाली. या अभिनेत्रींनी कचकडय़ाच्या बाहुल्यांची प्रतिमा झुगारली. स्त्रीच्या मुक्त जाणिवांना, समानतेच्या अपेक्षांना वाचा फोडली, हे खरं. हे तर चांगलंच झालं, यात काहीच वावगं नाही. पण त्यांनी विषय मांडला आणि त्याची प्रसिद्धी झाली, हे लक्षात घेऊन आता केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्त्री-जाणिवांचा वापर केला जात असेल तर ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण एक दर्शक, वाचक, प्रेक्षक.. एक रीसिव्हर म्हणून ते आपल्याला गृहीत धरायला लागले आहेत, असा याचा अर्थ आहे.

केवळ चार-दोन अभिनेत्री, त्यांचे ऑनलाइन व्हिडीओ आणि ऑनलाइन जाहिराती एवढय़ापुरता हा विषय राहिलेला नाही. या वेगळेपणाचं आणि त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीचं हे तंत्र समाजमाध्यमांमध्ये आतापर्यंत झिरपलंय आणि सामान्यजनही या प्रवाहात वहात चाललेत हे काही मित्र-मैत्रिणींच्या फेसबुक भिंतींवरून आणि टिवटिवाटातूनही समोर येतंय. मंदिर प्रवेशाचा वाद, या अशा जाहिराती यामुळे असं स्त्री-स्वातंत्र्याच्या विषयावर व्यक्त होण्याची संधी सामान्यजनांना मिळतेय. स्त्री स्वातंत्र्याच्या नव्या जाणिवांविषयी (‘सो कॉल्ड’ बोल्ड भाषेत) चार ओळी लिहिल्या की, त्या हमखास शेअर होणार याची खात्री नेटकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यातूनच या सो कॉल्ड वेगळ्या जाहिराती सैरावैरा पसरतात. पुन्हा यातून दुहेरी फायदा होतो. हे शेअर करणाऱ्यावर पुरोगामी असल्याचा शिक्काही आपोआप बसतो आणि बुद्धिवादींच्या मांदियाळीत आपण अलगद जाऊन पोचतो.

हे असं व्यक्त होण्यात गैर ते काय, अशा विचारांचा प्रसार व्हायलाच हवा. एकदम मान्य. पण विचारांचा प्रसार होत असताना तो वाचणाऱ्याच्या, शेअर करणाऱ्याच्या आत किती झिरपतोय हे जास्त महत्त्वाचं नाही का? किती सुंदर जाहिरात आहे हे म्हणणारी मुलगी गोरं बनवणारं क्रीम वापरतेच आहे. ‘शेअर द लोड’ ला लाइक करणारे बसल्या जागी बायकोला ऑर्डर सोडताहेत, ‘माय चॉइस’ला पाठिंबा देणारी स्त्री- आमच्यामध्ये हे असं चालत नाही, असं म्हणत बुरसटलेल्या परंपरेला शरण जातेच आहे. अजूनही मोठमोठय़ा घरांमध्ये हुंडाबळी जाताहेत आणि घरगुती हिंसाचार निमूटपणे सहन केला जातो आहे. परिवर्तन एका दिवसात होत नाही, हे जरी मान्य केलं, तरी या ऑनलाइन कण्टेण्टच्या व्हायरल होण्यातून नेमकं समाजासाठी काय साध्य होतंय हे कळत नाहीये. ‘स्त्री स्वातंत्र्य’च्या हॅशटॅगमुळे पोस्टच्या ‘शेअर्स’चा आकडा वाढल्याचा फायदा व्यक्तीची किंवा कंपनीची ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ वाढल्याचं सांगतोय हे निश्चित. नवप्रसिद्धीमाध्यमांमध्ये स्वतचा ब्रॅण्ड निर्माण करणंच महत्त्वाचं असतं, हे काही वेगळं सांगायला नको.

स्टीरिओटाइप मोडण्याच्या नादात आपण प्रसिद्धीचे नवे ठोकताळे उभे करतोय आणि त्यामध्ये स्वतच अडकतोय असं आता वाटायला लागलंय. स्त्री-पुरुष भेदभाव नष्ट व्हावा असं मनापासून वाटणाऱ्यांच्या पोस्टचीही मग भीती वाटायला लागते. अतिरेकापायी याचीही गणना ‘ट्रेण्ड’ म्हणून केली जाईल की काय? ही ती भीती. याला कुठे लाइक्स आणि शेअर्सच्या प्रसिद्धीचा वास तर लागला नाही ना? अशी मन शंका घ्यायला लागतं. या अशा व्हिडीओंमधून, पोस्टरूपी कवितांमधून, त्यावरच्या कमेंट्समधून समाजमन बदलत असेल, एक चळवळ उभी राहात असेल तर चांगलंच आहे. पण केवळ एक प्रसिद्धी तंत्र म्हणून हा स्त्री स्वातंत्र्याचा ‘ट्रेण्ड’ आलेला असेल तर चिंतेची बाब आहे. कारण ट्रेण्ड हा जाण्यासाठीच येतो. तो टिकणारा नसतो म्हणूनच ‘बाईपणा’चं ट्रेिण्डग चिंताजनक वाटतं.
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com