‘बॉम्बे टॉकीज’चा गल्ला यथातथाच!
भारतीय चित्रपटसृष्टीच्या शंभरीनिमित्त मोठा गाजावाजा करीत चार तरूण अव्वल दिग्दर्शकांनी तयार केलेल्या ‘बॉम्बे टॉकीज’ला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. त्याउलट ‘शूटआऊट अ‍ॅट वडाला’ला १० कोटींची कमाई करण्याची संधी देणाऱ्या प्रेक्षकांनी चित्रपटसृष्टीच्या शंभरीशी आमचे काहीएक देणेघेणे नसल्याचे दाखवून दिले आहे.
‘बॉम्बे टॉकीज’ ही भारतीय चित्रपटसृष्टीला आमच्याकडून सलामी आहे, असा गाजावाजा करीत बॉलिवूडक डून विशेष चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. आघाडीच्या कलाकारांना एकत्र आणत ‘थीम साँग’ केले गेले आणि ३ मे रोजी चित्रपटही प्रदर्शित झाला. मात्र, पहिल्या दिवशी या चित्रपटाची कमाई होती सव्वा ते दीड कोटी रुपये. अर्थात, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी, अनुराग कश्यप आणि करण जोहर अशा नामवंतांकडून ‘बॉम्बे टॉकीज’चे दिग्दर्शन झाले असल्याने चित्रपट आशयात्मकदृष्टय़ा अतिशय सुंदर, दर्जेदार असल्याची पसंती चित्रपट समीक्षकांनी दिली                आहे.
 ट्रेड विश्लेषक तरुण आदर्श यांनीही ‘बॉम्बे टॉकीज’ला सुंदर चित्रपट म्हणून पसंती देतानाच त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
‘बॉम्बे टॉकीज’साठी या प्रत्येक दिग्दर्शकाने दीड कोटी रुपये घेतले आहेत. त्यामुळे दीड कोटी रुपयांची कमाई म्हणजे प्रत्येकाला जेमतेम २५ लाखांच्या खर्चाचीही वसुली नाही, अशी टिंगल ट्विटरवर केली जात आहे.
 दुसरीकडे याच दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘शूटआऊट अ‍ॅट वडाला’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १० कोटींची कमाई करत यावर्षीचा प्रदर्शित झाल्या झाल्या सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून नोंद केली आहे.