News Flash

Republic Day Special : बिग बजेट चित्रपट ते बिग बजेट वेब सीरिज

#10YearsChallenge : मनोरंजन विश्वातली सगळी गणितं वेब सीरिजनी बदलायला सुरुवात केली आहे.

काही वर्षांपूर्वी चित्रपट हे माध्यम आपल्याकडे सर्वाधिक लोकप्रिय होतं. पण कालांतराने या माध्यमाला स्पर्धा निर्माण झाली ती टीव्हीच्या माध्यमामुळे. टीव्हीमुळे ते मनोरंजन घरबसल्या मिळू लागलं. काही वर्षांनी यालाही स्पर्धा निर्माण झाली इंटरनेटमुळे. आता याही स्पर्धेत आणखी एक खेळाडू उतरला आहे तो म्हणजे ओटीटी अर्थात ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म. प्रेक्षकांना मनोरंजन आता त्यांच्या खिशातच आलं आहे. निमित्त आहे ते वेगवेगळ्या डिजिटल अॅप्सचं. इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे व्हिडीओ, वेब सीरिज, वेब शो असं काहीही, कुठेही, कितीही, कधीही बघण्याचा पर्याय उपलब्ध झाला. एआयबी, टीवीएफ यांच्यामुळे हिंदीमध्ये सात-आठ वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली असली तरी यात आता मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळेच येत्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला इण्डस्ट्रीचं रूप प्राप्त होतंय अशी चिन्हं आहेत. एकेकाळी बिग बजेट फक्त चित्रपटच असू शकतात असं कोणी म्हटल्यास त्यावर आक्षेप घेता आला नसता. पण आता वेब सीरिजसुद्धा तितक्याच ताकदीच्या येऊ लागल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत या माध्यमात कमालीचा बदल झाला आहे.

विशेष म्हणजे नातेसंबंध, विवाहबाह्य संबंध, कुरघोड्या, डाव-प्रतिडाव, छळ अशा चाकोरीत अडकलेल्या टीव्ही वाहिन्यांना देशातील सर्वांत प्रभावी असलेल्या तरुण प्रेक्षकवर्गाची नस लक्षात आली नाही. ती उणीव वेब सीरिजने भरून काढली आहे. वेब सीरिज या दहा मिनिटांपासून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहेत. विविध भागात त्याची विभागणी असते. प्रत्येक भाग स्वतंत्र कथानक घेऊन येतो. त्यामुळे तो आणखी रोचक होतो. इंग्रजीसह हिंदी आणि अलीकडे मराठीसह अन्य स्थानिक भाषांतरही यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. लाखोंच्या संख्येने या मालिकांना ऑनलाइन दर्शक मिळत आहेत. प्रेक्षकांचे आकडे पाहून चित्रपट निर्माते हादरून जावेत, अशी स्थिती आहे म्हणून ‘यशराज’सारख्या बॅनरला या क्षेत्राकडे येण्याचा मोह आवरता आला नाही.

‘द व्हायरल फिव्हर’, ‘टीव्हीएफ’, ‘ऑल इंडिया बकचोद’, ‘फिल्टर कॉपी’, ‘एआयबी’, ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’, ‘हॉट स्टार’, ‘नेटफ्लिक्स’, ‘सोनी लाइव्ह’, ‘व्हूट’ अशा कितीतरी प्लॅटफॉर्मद्वारे वेब सीरिज तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. ‘टीव्हीएफ’च्या ‘पर्मनंट रुममेट’ने भारतात धुमाकूळ घातला. त्यानंतर वेब सीरिज निर्मितीचा धडाका सुरू झाला. टीव्ही आणि चित्रपटांच्या मर्यादा वेब सीरिजने हेरल्या. कधीही, कुठेही पाहण्याची सोय असल्याने तरुणवर्ग याकडे आकर्षित झाला.
मालिका किंवा चित्रपट तयार झाल्यानंतर त्याला सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीतून जावे लागते. वेब सीरिजचे वैशिष्ट्य म्हणजे ते सेन्सॉरच्या कात्रीच्या बाहेर आहेत.
वेब सीरिजने टीव्हीसारख्या माधमांसमोर आव्हान तर उभे केलंच आहे. पण चित्रपटांसाठीही ती धोक्याची घंटा मानली जात आहे. अनेक बडे कलाकार वेब सीरिजमध्ये काम करण्यास उत्सुक आहेत. मालिका आणि चित्रपट निर्माते या क्षेत्रात उतरत आहेत. तसतसं वेब सीरिजच्या निर्मितीचा दर्जा अधिकाधिक सुधरत जात आहे.
वेब सीरिज चर्चेत येण्यापूर्वी आपण बॉलिवूड स्टार्स, टीव्ही स्टार्स असे शब्द यापूर्वी अनेकदा ऐकले. असेच आता वेब स्टार्सही या वर्तुळात दिसू लागले आहेत. वेबच्या दुनियेत झळकल्यानंतर काही कलाकार हिंदी चित्रपट, रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यास सज्ज झाले आहेत. मिथिला पालकर, निधी सिंग, सुमित व्यास, आनंद तिवारी, जितेंद्र कुमार, मल्लिका दुवा ही त्यातलीच काही महत्त्वाची नावं. या सगळ्यांनी वेबवर प्रचंड लोकप्रियता मिळवली.

वाढती गुंतवणूक

फिक्कीच्या (FICCI) २०१८च्या अहवालानुसार ओटीटीमध्ये गुंतवणुकीसाठी एकूण २६ अब्ज बजेट होता. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचं ओरिजिनल कन्टेन्ट तयार करण्यासाठीचं बजेट पाच अब्ज होतं. त्यासाठी त्यांनी एक्सेल एंटरटेन्मेंट, फॅण्टम फिल्म्स, अनुराग कश्यप यांच्या टाय-अप केलं होतं. नेटफ्लिक्सने ओरिजिनल कन्टेन्ट तयार करण्यासाठी फॅण्टम फिल्म्सशी टाय-अप केलं होतं. हॉटस्टारचं ओरिजिनल कन्टेन्ट तयार करण्यासाठीचं बजेट चार अब्ज होतं. त्यांनी फोर लायन्स फिल्म्सशी टाय-अप केलं. अल्ट बालाजीने वैष्णवी मीडिया वर्क्‍ससोबत टाय-अप केलं. इरॉस नाऊचं बजेट चार अब्ज असून त्यांनी संजय लीला भन्साळी, रोहन सिप्पी, अनिल कपूर फिल्म कंपनी यांच्यासोबत टाय-अप केलं. वुटचं बजेट चार अब्ज होतं. त्यांनी टर्नर इंडिया, कोलोस्कीअम मीडिया यांच्याशी टायअप केलं. तर सोनी लिव्हने विक्रम भट यांच्याशी टाय अप केलं. थोडक्यात काय तर, सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सगळ्यांचंच बजेट मोठं असून त्यांनी टाय-अप केलं आहे. टाय-अप केलेल्या कंपन्यांसुद्धा नावाजलेल्या आणि मोठय़ा आहेत. यावरूनच हा विस्तार किती वेगाने आणि कसा होणार आहे याचा अंदाज येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:36 pm

Web Title: 10 years challenge big budget movies to big budget web series
Next Stories
1 हिमांशला विसरुन नेहा बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात ?
2 Republic Day 2019 : देशभक्तीवर आधारित ‘हे’ पाच चित्रपट पाहाच
3 भारतात प्रथमच मायथॉलॉजी ब्रॉडवे म्युझिकल सादर करण्यास काजल मुगराई सज्ज
Just Now!
X