रसाळ निवेदनाद्वारे उत्तमोत्तम िहदी, मराठी गीते प्रसारित करून लाखो रसिकांना श्रवणानंद देणाऱ्या मुंबई आकाशवाणीच्या एफएम गोल्ड आणि एफएम रेनबो या वाहिन्यांमधील सुमारे १०० रेडिओ जॉकींवर गंडांतर आले आहे. या आरजेंची चूक काय, तर त्यांनी वयाची पस्तिशी ओलांडली आहे! विश्वास बसणार नाही, मात्र थेट दिल्लीहून आलेल्या एका विचित्र परिपत्रकानुसार पस्तीसपेक्षा अधिक वय असणाऱ्या आरजेंना यापुढे आकाशवाणीवर काम करता येणार नाही. हा नियम देशभरातील सर्व आकाशवाणी केंद्रांना लागू असून चालू महिन्यापासून त्याची अंमलबजावणी झाल्याने मुंबई केंद्रावरील शंभर-एक आरजेंचा ‘आवाज’ बंद झाला आहे.
अन्य केंद्रांप्रमाणे मुंबई आकाशवाणीवरील अनेक विभागात कंत्राटी पद्धतीने काम चालते. एफएम गोल्ड (१००.७) आणि एफएम रेनबो (१०७.१) या वाहिन्यांवरही अनेक वर्षांपासून अनेक आरजे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. या आरजेंना दर महिन्याला सहा ते दहा दिवस डय़ुटी दिली जाते. एफएम गोल्डवर मराठी, िहदी आणि गुजराती भाषांमधील गाणी प्रसारित केली जातात, तर एफएम रेनबोवर मुख्यत्वे इंग्लिश गाणी ऐकवली जातात. मोजके-माहितीपूर्ण निवेदन, उत्तमोत्तम गाण्यांचे सादरीकरण, प्रासंगिक कल्पना आदी कारणांमुळे खासगी एफएम वाहिन्यांच्या तुलनेत या दोन वाहिन्या अधिक लोकप्रिय आहेत. या दोन्ही वाहिन्यांवर आतापर्यंत सूत्रसंचालन करणाऱ्या अनेक आरजेंना दहापेक्षा अधिक वर्षांचा अनुभव असून अभ्यासू वृत्ती तसेच गाण्यांची आवड यामुळे ते या कार्यक्रमांत रंग भरतात. मात्र, गेले काही दिवस या आरजेंमध्ये कमालीची अस्वस्थता होती. पस्तीसपेक्षा अधिक वय असणाऱ्या आरजेंना यापुढे डय़ुटी न देण्याबाबत प्रसारभारतीचे परिपत्रक आले आहे, असे काही महिन्यांपूर्वी सांगण्यात आले. ही वाईट बातमी खोटी ठरेल, अशी आशा या निवेदकांकडून व्यक्त होत असतानाच प्रसारभारतीकडून जुलचे ‘अल्टिमेटम’ आल्याने मुंबई केंद्रातील सुमारे शंभर आरजेंचा ‘आवाज’ या महिन्यापासून बंद झाला.
आरजेंच्या चमूमध्ये तरुण, सळसळत्या रक्ताला वाव मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा अजब युक्तिवाद आकाशवाणीकडून करण्यात आला. या फतव्यामुळे या आरजेंच्या जागी आता नव्या दमाच्या तरुण-तरुणींना डय़ुटीज मिळत आहेत. मात्र त्यातील अनेकांना जुन्या गाण्यांचा गंधही नसल्याने अनेक गमतीजमती घडत आहेत. या सर्व प्रकाराची जाणीव असूनही दिल्लीश्वरांच्या निर्णयामुळे आकाशवाणीच्या संचालकांना हे विनोदी प्रकार उघडय़ा कानांनी ऐकावे लागत आहेत. दिल्लीतील ३५प्लस आरजेंनी या विरोधात आंदोलन केले आहे. तसेच गुवाहाटी व कोलकात्यामध्ये या निर्णयाला स्थगिती मिळविण्यात तेथील आरजेंना यश आल्याचेही ऐकिवात आहे. या प्रकरणी केंद्रातील नवे सरकार काही ‘प्रकाश’ पाडते का, याची मुंबईसह देशभरातील आरजेंना प्रतीक्षा आहे.
आमचा नाइलाज
प्रसारभारतीकडून अनेक महिन्यांपूर्वीच हा आदेश आला होता. आरजेंची उत्तम टीम तयार झाल्याने आम्ही दिल्लीशी बोलणी करून हा निर्णय अनेक महिने लांबवला. मात्र आता आमचा नाइलाज झाला. हा निर्णय मागे घेण्याबाबत या आरजेंकडून आम्हाला एक निवेदन आले आहे, आम्ही ते दिल्लीला धाडणार आहोत. त्यातून काही चांगले निष्पन्न होईल, अशी आशा आहे. तसे न झाल्यास या आरजेंना संबंधित अन्य विभागांत कंत्राटी पद्धतीवर सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया मुंबई आकाशवाणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गरज सरो, वैद्य मरो..
आकाशवाणीला आम्ही आमची उमेदीची वर्ष दिल्येत. आकाशवाणी हे आमचे दुसरे घर झाले आहे. एकदा डय़ुटी मिळाली की घरी कोणताही कार्यक्रम असो, नसíगक आपत्ती असो वा बॉम्बस्फोटांसारखी आणीबाणी असो, आकाशवाणी केंद्र गाठून आपली शिफ्ट चोखपणे सांभाळायची एवढंच आम्हाला ठाऊक होतं. ३५ हे काही निवृत्तीचे वय नाही. पस्तिशी पार केल्यानंतरही आमच्या सादरीकरणात कोठेही उणेपणा येत नसताना या निर्णयामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. ‘गरज सरो, वैद्य मरो’ असाच हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया अनेक आरजेंनी व्यक्त केली.
नव्यांचे अज्ञान
या बदलावर जुनेजाणते श्रोतेही कमालीचे नाराज आहेत. नव्या आरजेंपकी अनेकांना संगीताच्या सुवर्णकाळाविषयी काहीच माहिती नाही, त्यामुळे ते त्यांच्या मनाप्रमाणे गाणी लावतात. १९५०मधील गाण्यानंतर ते थेट १९८०मधील गाण्यांवर उडी घेतात व त्यामुळे रसभंग होतो. एका नवीन मुलीने एकदा याद हा विषय घेऊन गाणी सुरू केली व त्यात ‘अनुपमा’मधील ‘या दिलकी सुनो दुनियावालों’ हे गीतही लावले. तर एका मुलाने अमूक एका गाण्याचे संगीतकार जावेद आहेत, असे सांगितले. या नावाचा संगीतकार झालेलाच नाही, अशा गंमती काही श्रोत्यांनी सांगितल्या.