एसएससी म्हणजेच १० वी च्या परीक्षेला सध्या अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थी आणि त्यांचे आई-वडील ताणतणावात वावरताना दिसतात. शालेय जीवनाचा परमोच्च बिंदू असलेल्या १० वीच्या परीक्षेला मुलांच्या आयुष्यातील पहिला मैलाचा दगड समजला जाते. याच १० वीच्या परीक्षेवर चौफेर भाष्य करणारा मराठी चित्रपट लवकरच येत आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘१० वी’. हा चित्रपट प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासोबत बघावा असाच आहे. १० वी ची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील मैलाचा दगड असला तरीही त्यावेळी येणाऱ्या ताणाचा व कदाचित त्यातून येणाऱ्या नैराश्याचा कसा सामना करता येऊ शकेल याचा सर्वांगीण विचार ‘१० वी’ चित्रपटातून करण्यात आला आहे.
या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मयूर राऊत आणि पियुष राऊत यांचे असून या दोघांनीही चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. निर्माते सुधीर जाधव यांनीच ‘१० वी’ प्रस्तुत केला आहे. देवेंद्र अरोडा हे सह-निर्मात्याच्या भूमिकेत असून रविराज पवार व आकाश पवार यांच्या गीतांवर अरुण चिल्लारा, आकाश पवार आणि ऐश्वर्य मालगावे यांनी संगीतसाज चढविला आहे. छायांकन मनोज सी कुमार यांचे असून पराग खाऊंड यांनी संकलकाची भूमिका पार पाडली आहे. नुकतेच ४ जानेवारी रोजी या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. पोस्टरमध्ये सर्व कलाकारांचे चेहरे न दाखवून निर्मात्यांनी कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. हा चित्रपट पालक आणि विद्यार्थी यांना येणाऱ्या ताणापासून मुक्तता मिळवून देणारा असेल अशी आशा चित्रपटाच्या टीमने व्यक्त केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2019 7:12 pm