दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी आजपर्यंत अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच चाहते त्यांना ‘थलायवा’ असे म्हणतात. आज त्यांचा ६८वा वाढदिवस आहे. १२ डिसेंबर ही जन्मतारीख त्यांच्यासाठी खास ठरली आहे. कारण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘2.0’ या चित्रपटाने केवळ १२ दिवसांत एक नवा विक्रम केला आहे.

दाक्षिणात्य आणि विशेषकरून तामिळ चित्रपटांसाठी चेन्नई बॉक्स ऑफीस सर्वांत मोठा मार्केट आहे. चेन्नई बॉक्स ऑफीसवर शंकर दिग्दर्शित ‘2.0’ या चित्रपटाने एस. एस. राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाला मागे टाकलं आहे.

वाचा : सुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा..

‘बाहुबली २’ने चेन्नई बॉक्स ऑफीसवर १८.८५ कोटींचा गल्ला जमवला होता आणि हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होता. मात्र भारतातल्या सर्वांत महागड्या अशा ‘2.0’ या चित्रपटाने केवळ १२ दिवसांत १९.३ कोटींची कमाई करत नवीन विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे चेन्नईतल्या चित्रपटगृहांमध्ये अजूनही ‘2.0’ची क्रेझ असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

रजनीकांत यांना वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे ‘थलायवा’चा वाढदिवस साजरा करण्यासाठी परदेशाहूनही अनेक लोक चेन्नईत आले आहेत.