सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘२.०’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या तुलनेची अॅक्शन, वीएफएक्स इफेक्ट्स, चित्रपटातील कलाकार, संगीत आणि दिग्दर्शन पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची स्टारकास्ट आणि भव्यता पाहता ‘बाहुबली २’ या चित्रपटाला ‘२.०’ हा चित्रपट चांगलीच टक्कर देणार आहे असे चित्र दिसत आहे.

वाचा: रजनीकांत यांनी आमंत्रितांच्या यादीतून सलमानला वगळले

‘२.०’ या चित्रपटामध्ये सुपरस्टार रजनीकांत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे सध्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रजनीकांत यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमारही झळकणार आहे. खिलाडी कुमार या चित्रपटामध्ये खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत असल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ‘२.०’च्या वाट्याला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.

enthiran-poster-main

विशेष म्हणजे, ‘२.०’ हा चित्रपट आतापर्यंतचा बिग बजेट चित्रपट ठरणार असल्याची चर्चा आहे. तब्बल ३५० कोटी खर्चून चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. रजनीकांत आणि अक्षय यांच्यासोबतच चित्रपटात अॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्याही भूमिका आहेत. ऑस्कर विजेते सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान यांनी या चित्रपटाता संगीत दिले आहे. त्यामुळे येत्या काळात ‘बाहुबली २’ आणि ‘२.०’ या चित्रपटांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.