रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’ या चित्रपटाचा पहिला आणि बहुप्रतिक्षीत टीझर गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा तगडी स्टारकास्ट आणि त्याच्या बजेटमुळे मागील बऱ्याच काळापासूनच चर्चेत आहे.. VFX चं बरंचसं काम बाकी असल्यानं या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. मात्र अखेर आज या सिनेमाचा टीझर प्रदर्शित कऱण्यात आला.

अभिनेता अक्षय कुमारने या सिनेमाच्या टीझरची लिंक आपल्या ट्विटर आणि फेसबुक पेजवरून सकाळी नऊच्या सुमारास शेअर केली. या ट्विटमध्ये अक्षयने गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर भारतामधील सर्वात मोठ्या सिनेमाचा श्रीगणेशा आम्ही करत आहोत, असं म्हटलं आहे. पुढे लिहीताना तो म्हणतो, सर्वात मोठ्या शत्रुत्वाची कहाणी, चांगले काय वाईट काय कोण ठरवणार? अशा शब्दांमध्ये अक्षयने टीझरमध्ये काय पहायला मिळेच याची हिंट दिली आहे.

या टीझरमधून सिनेमाच्या कथेचा एकंदरीत अंदाज बांधणे सहज शक्य आहे. स्मार्टफोनपासून तयार झालेला दानव विरुद्ध रजनीकांतच्या रेबोट सिनेमामधील चिट्टी रोबोटचा संघर्ष पहायला मिळणार आहे. दीड मिनिटांच्या या टीझरला युट्यूबवर अवघ्या अर्ध्या तासात दोन लाखांहून अधिक हिट्स मिळाले आहेत.

पाहा ‘2.0’ या चित्रपटाचा टीझर

ट्विटवरही #2Point0Teaser हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसला. अनेकांना हा टीझर आवडला तर अनेकांनी आणखीन चांगल्या पद्धतीने टीझर करता आला असता असे मत व्यक्त केले. या सिनेमातील स्पेशल इफेक्टसाठीच तब्बल ५४४ कोटींचा खर्च आला आहे. केवळ VFX साठी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करणारा ‘2.0’ हा पहिलाच चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून जगभरातल्या ३००० तंत्रज्ञांची टीम या चित्रपटाच्या निर्मितीसाठी काम करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वारंवार पुढे ढकलली जात आहे, त्यामुळे चाहतेही नाराज होती ती नाराजी हा टीझर प्रदर्शित करुन थोड्या फार प्रमाणात दूर करण्यात निर्मात्यांना यश आल्याचे म्हणता येईल.