यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांत कुठलीही भाकिते खरी न ठरवणारे निकाल येण्याची शक्यता आहे.  कुठल्याही एका सिनेमाला झाडून सगळे पुरस्कार मिळणार नाहीत. सर्व पारितोषिके ही विभागली जाण्याकडे कल असेल..यंदाच्या पुरस्कारांमध्ये नक्की काय चित्र आहे, याचा आढावा

हल्ली सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या विभागात पाचपेक्षा अधिक, दहापर्यंत कितीही चित्रपट निवडणं शक्य झाल्याने या विभागात आपल्याला चांगलंच वैविध्य पाहायला मिळतं. तरीही यंदा त्यात लक्षात येण्यासारखा अपवाद आहे, तो इन्यारितूच्या ‘द रेव्हेनन्ट’ खालोखाल, तब्बल दहा विभागात नामांकन असणारा जॉर्ज मिलर दिग्दíशत चित्रपट ‘मॅड मॅक्स, फ्यूरी रोड’. त्याचा वेगळेपणा आहे तो त्यातल्या अतिशय लक्षवेधी, जवळजवळ कलेच्या पातळीवर नेलेल्या िहसक अ‍ॅक्शनमध्ये. सामान्यत: सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागातल्या चित्रपटात िहसाचार असणं शक्य असतं, इथेही ‘रेव्हेनन्ट’सारख्या चित्रपटात तो आहेच, पण तिथे त्याला एक वैचारिक बाजू आहे, जशी असणं अपेक्षित असतं. ‘मॅड मॅक्स’मधल्या िहसेला जे शुद्ध करमणूक मूल्य आहे, ते त्याला या विभागात उपरा ठरवतं. त्यामुळे इतर काही पारितोषिकं मिळोत न मिळोत, चित्रपटाचं ऑस्कर काही त्याला मिळणार नाही. ते बहुधा जाईल ‘रेव्हेनन्ट’ला.

‘द रेव्हेनन्ट’ शुक्रवारीच आपल्याकडे लागलाय, त्यामुळे तो कसा आहे, हे आपल्याला पाहाणं सहज शक्य आहे. मात्र त्यातली सर्वच दृश्य ही सर्वाच्या पचनी पडतील अशी नाहीत. चित्रपटाच्या सुरुवातीचा छावणीवरचा हल्ला किंवा अस्वल आणि डिकाप्रिओच्या व्यक्तिरेखेत होणारी झटापट, हे प्रसंग कोणाच्याही अंगावर येतील असेच आहेत. तरीही ‘रेव्हेनन्ट’ म्हणजे केवळ खून, बदला नाही. त्यातला विचार हा अनेक पातळ्यांवरचा आहे. परकीय सत्तेने येऊन भूमिपुत्रांवर केलेल्या अन्यायापासून ते नायकाचा आंतरिक आणि बाह्य़ संघर्ष, माणसाच्या आयुष्यातलं देव आणि दैव यांचं स्थान अशा अनेक गोष्टींवर हा चित्रपट बोलतो. ही आशयघन आणि ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेली सूडकथा आपल्याला बरंच काही सांगून जाते. अलेहान्द्रो इन्यारितूला गेल्या वर्षीच्या बर्डमॅनसाठी मिळवलेल्या चित्रपट आणि दिग्दर्शन पुरस्कारानंतर हे दोन्ही पुरस्कार पुन्हा मिळवण्याची संधी आता चालून आली आहे. असं असूनही ‘रेव्हेनन्ट’ जर काही कारणाने विजेता ठरला नाही, तर हा मान बहुधा चर्चच्या नतिक अध:पतनाबद्दल भाष्य करणाऱ्या ‘स्पॉटलाइट’कडे किंवा अ‍ॅडम मॅकेने दिग्दíशत केलेल्या, जागतिक अर्थसंकटातल्या अमेरिकन स्वार्थाच्या भूमिकेविषयी असणाऱ्या ‘द बिग शॉर्ट’कडे जाईल. अर्थात, सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागामध्ये ‘रेव्हेनन्ट’समोर या दोघांची वर्णी लागणं हे अशक्य नसलं, तरी कठीण वाटणारं नक्कीच आहे. ‘स्पॉटलाइट’ आणि ‘बिग शॉर्ट’ला अधिक आशा आहे ती पटकथांच्या वर्गात. अनुक्रमे स्वतंत्र आणि आधारित पटकथा या विभागातला त्यांचा दावा नक्कीच डावलण्याजोगा नाही.

‘स्पॉटलाइट’ आणि ‘द बिग शॉट’ हे आशयाने श्रेष्ठ आहेत हे निर्वविाद, तरीही दिग्दर्शनात मात्र या चित्रपटांचं महत्त्व हे तुलनेने कमी. आता तुलनेने कमी, म्हणजे त्या दिग्दर्शकांची कामगिरी कमी असं होत नाही, पण दर विषयाची एक गरज असते. हे चित्रपट त्यामानाने वास्तववादी, परिचित पाश्र्वभूमीवर घडणारे आहेत. त्यामुळे त्यांची दिग्दर्शकीय जबाबदारी त्या त्या विषयाला तर्कसंगत असली, तरीही नामांकन मिळालेल्या काही इतर चित्रपटांपेक्षा मर्यादित आव्हान असणारी आहे. इन्यारितूला काही कारणाने दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला नाहीच, तर तो या दोघांमधल्या एकाला मिळणार नाही, त्याऐवजी बहुधा तो जॉर्ज मिलर कडे ‘मॅड मॅक्स’साठी जाण्याची शक्यता अधिक आहे. अ‍ॅक्शन कोरिओग्राफी इतक्या प्रभावीपणे आणि मोठय़ा प्रमाणात हाताळणं हे अतिशय अवघड काम आहे, आणि तंत्रापासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व मार्ग वापरत मिलरने भव्य कामगिरी करून दाखवलेली आहे. तिचा हेतू केवळ करमणूक असला तरीही दर्जा पाहता तिचा यथोचित सत्कार झाला तर चांगलीच गोष्ट आहे.

यंदा अभिनेत्याचा पुरस्कार अखेर लिओनाडरे डिकाप्रिओला ‘रेव्हेनन्ट’साठी मिळणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसावी. तसं वातावरणच तयार झालंय. या पुरस्कारासाठी त्याचा सर्वात जवळचा प्रतिस्पर्धी आहे एडी रेडमेन, ज्याने गेल्या वर्षी ‘द थिअरी ऑफ एवरीिथग’ मधल्या संशोधक स्टीवन हॉकिंग यांच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार पटकवला होता. यंदाची त्याची ‘द डेनिश गर्ल’मधली पुरुषात दडलेल्या स्त्रीचं व्यक्तिमत्त्व साकारणारी चरित्रात्मक भूमिकाही नक्की पुरस्कार मिळावा अशीच आहे. पण तरीही डिकाप्रिओ यावर्षी हरणार नाही अशी खात्री वाटते.

रेडमेनचा विचार ‘डेनिश गर्ल’साठी झाला नाही तरीही साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मात्र यंदा त्या चित्रपटाकडे जावा असं वाटतं, तो अलिशिया विकॅण्डरने केलेल्या त्यातल्या मर्यादेपलीकडे समजूतदारपणा दाखवणाऱ्या पत्नीच्या भूमिकेसाठी. खरं तर विकॅण्डरला यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागातच नामांकन असणं आवश्यक होतं. तिची यातली भूमिका ही चित्रपटातली प्रमुख स्त्रीभूमिकाच आहे (जर त्यासाठीही रेडमेनचाच विचार केला नाही तर) वर ‘एक्स मकीना’ या ऑस्करने डावललेल्या चित्रपटातली तिची यंत्रमानवाची मध्यवर्ती भूमिकाही यंदा चिक्कार गाजली. त्यामुळे बरोबर केट विन्स्लेट (स्टीव जॉब्ज), रुनी मारा (कॅरल), जेनिफर जेसन ली (द हेटफूल एट) अशी चांगली नावं असतानाही, विकॅण्डरला पुरस्कार मिळणार असं वाटतं.

विकॅण्डर आपसूकच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागातून बाद झाल्याने, तिथे ब्री लार्सन चा मार्ग खुला झाला आहे. तिने आपल्या ‘रूम’ या चित्रपटासाठी बाफ्टा, गोल्डन ग्लोब आणि इतर पुरस्कारही गोळा केलेच आहेत. त्यात कदाचित आता अ‍ॅकॅडमी अवॉर्डचीही भर पडेल. नाही म्हणायला इथेही केट ब्लॅंचेट (कॅरल), जेनिफर लॉरेन्स (जॉय) अशी लोकप्रिय नावं आहेत. पण त्यांचा ऑस्कर सन्मान हल्लीहल्लीच झाला असल्यानेही लार्सनचे चान्सेस चांगले दिसतात.

साहाय्यक भूमिकेतल्या अभिनेत्यांची नावं पाहिली तर स्पर्धा जोरदार वाटावी, कारण क्रिश्चन बेल (द बिग शॉर्ट) , मार्क रफालो ( स्पॉटलाइट), टॉम हार्डी (द रेवेनन्टमधे हार्डी खलनायक आहे, पण मॅड मॅक्समध्ये नायक, जरी त्या भूमिकेसाठी त्याला नामांकन नाही) अशी नेहमी नायकांच्या भूमिका करणारी नावं इथे दिसतात, पण प्रत्यक्षात हा पुरस्कार क्रीड चित्रपटासाठी, लोकप्रिय स्टार सिल्वेस्टर स्टलोनला जाइल. ‘क्रीड’ हा चित्रपट समीक्षकांनी नावाजला आणि ऑस्करवर जी कृष्णवर्णीयांना डावलल्याची टीका झाली त्यात त्याचा दिग्दर्शक रायन कूगलर आणि प्रमुख भूमिकेतला मायकेल जॉर्डन ही दोन्ही नावं होती. त्यात नामांकन मिळणारी एकुलती एक व्यक्ती गोरी, हे टीकेचं अधिक मोठं कारण. स्टलोनला हा पुरस्कार मिळेल तो त्याच्या कामासाठी आणि त्याच्यावरच्या प्रेमासाठीही. १९७७मधे जेव्हा रॉकी आला, तेव्हा स्टलोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन होतं, त्यानंतर इतक्या वर्षांनी त्याला नामांकन मिळालंय, तेही त्याच व्यक्तिरेखेसाठी. डिकाप्रिओप्रमाणेच या वर्षी तोही जिंकावा असं प्रत्येकाला वाटतंय.

तांत्रिक बाजूमधल्या इतर पुरस्कारांचं काही होवो, पण सर्वाधिक नामांकनं पटकावणाऱ्या रेव्हेनन्टला किमान आणखी एक पुरस्कार नक्कीच मिळण्यासारखा आहे, आणि तो म्हणजे इमॅन्यूएल लुबेज्कीला, त्याच्या छायालेखनासाठी. निसर्ग, हा रेव्हेनन्टच्या प्रवृत्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्या आशयाशी सुसंगत अशा विविध छटा, छायाप्रकाशाचे खेळ या सिनेमॅटोग्राफरने अचूक पकडले आहेत. प्रतिकूल वातावरणात कृत्रिम प्रकाशयोजनेचा वापर पूर्णपणे टाळून केवळ नॅचरल लाइटमध्ये चित्रण करणं हे खूपच आव्हानात्मक आहे. लुबेज्कीला जर यंदा पुरस्कार मिळाला, तर त्याचं हे लागोपाठ तिसरं ऑस्कर असेल. गेल्या वर्षीचा बर्डमॅन आणि त्या आधीच्या वर्षीचा ग्रॅव्हिटी या दोघांसाठी त्याला आधी पुरस्कार मिळालेला आहे. अर्थात, यंदा त्याचे प्रतिस्पर्धीही तसेच तगडे आहेत. मॅड मॅक्स : फ्युरी रोडचं छायाचित्रण करणारा जॉन सील हा त्यातला एक, ज्याला या आधी ‘द इंग्लिश पेशन्ट’ (१९९६) साठी हा पुरस्कार मिळाला होता. मात्र ऑस्करला अशीही एक शक्यता असते, की उत्तम काम करूनही जे अनेकदा डावलले गेले त्यांच्याबद्दल प्रेमाची लाट उसळते आणि त्यामानाने सोप्या कामासाठीही पुरस्कार दिला जातो. या वर्षी छायालेखनासाठी असा एक उमेदवार आहे, आणि तो म्हणजे ‘सिकारिओ’साठी नामांकन असणारा रॉजर डेकिन्स. कोएन ब्रदर्सचे अनेक चित्रपट करणाऱ्या डेकिन्सचं या वर्षीचं तेरावं नामांकन आहे. अनेक महत्त्वाचे चित्रपट करूनही त्याला अजून पुरस्कार मिळालेला नाही. आता सिकारिओची रेव्हेनन्ट किंवा मॅड मॅक्सबरोबर तुलना होऊ शकते का? तर नक्कीच नाही. त्यांचं काम हे नक्कीच अधिक अवघड आहे, पण डेकिन्स तेराव्या वेळी लकी ठरला, तर ते इतर दोघांनाही नक्कीच आवडेल.

एकूण पाहता असं दिसतं, की रेव्हेनन्टने नामांकनात राखलेलं आपलं वर्चस्व, तो पुरस्कारांतही (निदान महत्त्वाच्या पुरस्कारात) कायम राखेल. अर्थात, असं आता वाटतंय. प्रत्यक्षात घोषणांच्या वेळी काय धक्के मिळतात ते पाहूच.