21 September 2020

News Flash

बोंग जोन हो यांच्या चित्रपटास सुवर्ण पुरस्कार

बोंग जोन हो हे हा पुरस्कार मिळवणारे दुसरे आशियाई दिग्दर्शक आहेत.

कान महोत्सवाची सांगता

बहात्तराव्या कान चित्रपट महोत्सवात दक्षिण कोरियाचे दिग्दर्शक बोंग जोन हो यांच्या ‘पॅरासाइट’ या चित्रपटास ‘पाम डी ओर’ सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. आशियाला हा पुरस्कार लागोपाठ दुसऱ्या वर्षी मिळाला असून गेल्या वर्षी जपानचे हिराकाझू कोरे इडा यांच्या ‘शॉपलिफ्टर्स’ चित्रपटाने हा पुरस्कार पटकावला होता. याशिवाय चार महिला दिग्दर्शकांनाही पुरस्कार मिळाले आहेत.

बोंग जोन हो हे हा पुरस्कार मिळवणारे दुसरे आशियाई दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात दक्षिण कोरियातील गरीब-श्रीमंत यांच्यातील दरीमुळे निर्माण झालेली परिस्थिती हा कथाविषय आहे. बोंग जोन हो यांना फ्रेंच चित्रपट सृष्टीतील प्रमुख व्यक्तिमत्त्व असलेल्या कॅथरिन डेन्यू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिन पिअर व ल्युक डॅरडीनी या बेल्जियन बंधूंना ल जेन अहमद (यंग अहमद) या चित्रपटासाठी मिळाला आहे. यात स्थानिक इमामाने मुलास मूलतत्त्ववादाची शिकवण दिल्याची कथा आहे.

महोत्सवातील उपविजेतेपदाचा पुरस्कार ‘अ‍ॅटलांटिक’ या चित्रपटासाठी प्रथमच दिग्दर्शन करणाऱ्या मॅटी डियॉप यांना हॉलिवूड अभिनेते सिलव्हेस्टर स्टॅलोन यांनी प्रदान केला. या चित्रपटात सेनेगलमधील जीवनसंघर्षांची कहाणी आहे. परीक्षकांचा खास पुरस्कार फ्रान्सच्या लेस मिझरेबल्स या पॅरिसजवळ २००५ मध्ये झालेल्या  दंगलीवर आधारित चित्रपटास, तसेच ब्राझीलच्या बाकुरू या क्लेबेर मेंडोन्स व ज्युलियानो डॉर्नेलीस यांच्या चित्रपटास मिळाला.

विशेष लक्षवेध पुरस्कार पॅलेस्टाइनच्या दिग्दर्शक एलिया सुलेमान यांच्या ‘इट मस्ट बी हेवन’ या चित्रपटास मिळाला असून ‘पोट्र्रेट ऑफ लेडी ऑन फायर’ या सेलिन शियामा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट म्हणून मान मिळाला आहे. सेलीन यांना उत्कृष्ट पटकथा पुरस्कार मिळाला. ब्रिटिश अभिनेत्री एमिली बीचम यांना ऑस्ट्रियन दिग्दर्शक जेसिका हॉसनर यांच्या लिटल जो या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अँटोनियो बँडेरस यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘पेन अँड ग्लोरी’ या चित्रपटासाठी मिळाला. त्यांना चिनी अभिनेत्री झांग झियी यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला.

पुरस्कार

 • पाम डी ओर-‘पॅरासाइट’, बोंग जून हो
 • ग्रांप्रि- ‘अटलांटिक्स’, मॅटी डियोप
 • परीक्षक पुरस्कार – लेस मिझरेबल्स व बॅकुराउ
 • उत्कृष्ट अभिनेत्री- एमिली बीचम, लिटल जो
 • उत्कृष्ट अभिनेता- अंतोनियो बँडेरस, ‘पेन अँड ग्लोरी’
 • उत्कृष्ट दिग्दर्शक- जिन पियर, ल्युक डॅरडेनी, ‘द यंग अहमद’
 • उत्कृष्ट पटकथा- पोर्ट्ट ऑफ अ लेडी ऑन फायर ( सेलीन शियामा)
 • विशेष लक्षवेध पुरस्कार- इट मस्ट बी हेवन (एलिया सुलेमान)
 • कॅमेरा डी ओर – अवर मदर्स (सिझर डियाझ)
 • लघुपट – दी डिस्टन्स बिटविन अस अँड द स्काय (व्हॅसीलिस केकॅटोस)
 • विशेष लक्षवेध – मॉन्स्ट्रओस डियॉस, (ऑगस्टिना सॅन)
 • क्वीयर पाम फीचर – पोर्टेट ऑफ अ लेडी ऑन फायर (सेलीन शियामा)
 • क्वीयर पाम (लघुपट)- दी डिस्टन्स बिटविन अस अँड द स्काय (व्हॅसीलिस केकॅटोस)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 1:25 am

Web Title: 2019 cannes film festival
Next Stories
1 ‘बिग बॉस मराठी २चं ग्रँड प्रिमिअर; या सेलिब्रिटींचा घरात प्रवेश
2 दीपिका आणि ऐश्वर्या एकत्र! अमूलची ही भन्नाट जाहिरात पाहिली का?
3 ‘या’ फॅशन डिझायनरला करण जोहर करतोय डेट?
Just Now!
X