वीरेंद्र तळेगावकर

मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात कधी नव्हे ती गेल्या वर्षांत प्रचंड हालचाल झाली. या क्षेत्रातील कंपन्यांचे, व्यवसायाचे विलिनीकरण असो की स्पर्धक कंपन्यांमधील भांडवल हिस्सा खरेदी असो किंवा मोफत दूरसंचार, इंटरनेट सेवेसह ग्रामीण भागातील ग्राहक/दर्शक ‘मुठ्ठी में’ करण्याचा प्रयत्न असो अशा एकामागोमागच्या घडामोडींची घुसळण २०१८ मध्ये पहायला मिळाली. हे सारे कमी म्हणून की काय गेल्या वर्षांची अखेर तर ‘ट्राय’ने लागू केलेल्या दूरचित्रवाहिन्यांच्या किंमत सुसूत्रततेने ढवळून निघाली. मात्र हे सारे २०१९ साठी, या क्षेत्राकरिता खऱ्या आर्थिकदृष्टय़ा मलईदार वर्ष होण्यासाठी निमित्त ठरणार आहे.

२०१६ च्या शेवटातील नोटबंदी आणि २०१७ च्या मध्यातील ‘जीएसटी’ या केंद्र सरकारच्या दोन महत्त्वाच्या (आर्थिक) सुधारणांनी २०१८ वर्षही अत्यवस्थच राहिले. अगदी मोठय़ा उद्योगांपासून ते किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत साऱ्यांनाच त्याचा फटका बसला. त्यात देशातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचेही नाव घ्यावे लागेल. असे सारे असूनही या वर्षांने कधी नव्हे ते माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील प्रचंड उलथापालथ अनुभवली. ती अर्थातच भारतासारख्या आघाडीच्या मोठय़ा मनोरंजन बाजारपेठेत आणि अपरिहार्यपणे जागतिक स्तरावरही राहिली. चित्रपटनिर्मिती ते गल्लासंकलनाने गेल्या वर्षांत कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. सर्वाधिक मराठी चित्रपटही याच वर्षांत प्रदर्शित झाले, या गौरवातच सारे आले!

ज्या प्रमाणे या उद्योगाला आर्थिक फटका बसला त्याचप्रमाणे एक अनोख्या संक्रमणालाही माध्यम व मनोरंजन क्षेत्राला सामोरे जावे लागले. जग ५जीकडे प्रवास करत असताना संपूर्ण भारतावर ४जी जाळे आता बऱ्यापैकी पसरले. ते घडले ते गेल्याच वर्षांत. मनोरंजन व्यवसायाच्या फळीवर मुद्रीत, दृकश्राव्य याचबरोबर दूरसंचार व डिजिटल हे मागाहून येऊन उडी घेत वरती जाऊन बसले.

चौकोनी पडदे पाहणे ते हाताचे बोट क्रियाशील होणे असा हा प्रवास प्रेक्षकांच्या बाबतीत घडला. प्रेक्षकसंख्या आणि महसुलाबाबत मग दूरसंचार, माहिती तंत्रज्ञानाचे भक्कम पाठबळ असलेले डिजिटल माध्यम जाहिरातदारांसाठीही लाडाचे बनले. परिणामी या क्षेत्राचे पैसे कमाविण्याचे मनसुबेही वाढले आहेत. एकूणच येत्या पाच वर्षांत डिजिटलवरील जाहिरातभार आणि व्यवसायवाढही वाढणार आहे. भारतीय जाहिरात उद्योग वर्षभरात वार्षिक १५ टक्के दराने वेग घेणार असून रकमेबाबत हे क्षेत्र ८०,००० कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. सध्या डिजिटल क्षेत्र सर्वाधिक, ३० टक्के जाहिराती मिळविते.

याबाबत दूरचित्रवाणी आणि मुद्रीतमाध्यम सध्या अनुक्रमे १२.६ व ५.९ टक्के असले तरी २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुका आणि दोन क्रिकेट विश्वचषक यामुळे ही दोन्ही माध्यमे महसुलाच्या बाबत निदान डिजिटलच्या अधिक जवळ जाण्याची आशा आहे. २०१७-१८ मध्ये केंद्र सरकारचे उपक्रम, योजना यांच्या प्रसिद्धीच्या माध्यमातून १,३१५.८३ कोटी रुपये माध्यमांना मिळाले आहे. चालू वर्षांत ही रक्कमही वाढण्याची शक्यता आहे. समाजमाध्यमे यात वरचढ ठरू शकतात. भारताच्या ग्रामीण भागात सुधारलेल्या पायाभूत सुविधा, स्वस्तात उपलब्ध होणारे उपकरण आणि सेवा यामुळे मनोरंजन पुरवठादार आणि अप्रत्यक्ष जाहिरातदारांना मोठय़ा संख्येने क्षेत्रीय/विभागीय दर्शकांपर्यंत पोहोचता येणार आहे. आजही दूरचित्रवाणीवर पाहिले जाणारे कार्यक्रम हे ४५ टक्क्यांपर्यंत याच भागातील लोकांपर्यंत पोहोचतात.

रिलायन्स इंडस्ट्रीजने इरॉस इंटरनॅशनल आणि नेटवर्क१९ मधील हिस्सा वाढविण्यासह डेन व हॅथवे केबलमध्ये (अतिरिक्त २.४० कोटी ग्राहक) निम्मा हिस्सा खरेदी करताना एकाच फटक्यात सारे माध्यम ताब्यात घेण्याचा प्रयत्न २०१८ मध्ये केला. तर दूरसंचार क्षेत्रात आयडिया सेल्युलर व व्होडाफोन तसेच डीटीएच क्षेत्रात डिश टीव्ही व व्हिडिओकॉन टी२एचच्या एकत्रिकरणाने (एकत्रित २.९० कोटी ग्राहक) दोनपैकी एका कंपनीला त्या त्या क्षेत्रात ग्राहकसंख्येत अव्वल ठरविण्यास हातभार लावला. जागतिक स्तरावर नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमची मनोरंजन क्षेत्रातील घुसखोरी फलदायी ठरत असतानाच टाईम वॉरिअर व एटी अँट टी तसेच सेंच्युरी फॉक्स व डिस्ने यांचे एकत्र येणे गेल्या वर्षांत घडले.

भारतात आजघडीला ४५ कोटी ब्रॉडबँडधारक आहेत. तर २५ कोटी ऑनलाईन व्हिडिओ वापरकर्ते आहेत. ऑनलाईन व्हिडिओ वापरकर्त्यांची संख्या येत्या तीन ते चार वर्षांत ३० कोटीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सप्टेंबर २०१६ ते जून २०१८ दरम्यान ऑनलाईन व्हिडिओ वापर पाचपटीने वाढला आहे. तर विविध अ‍ॅपच्या माध्यमातून वापरण्यात येणाऱ्या डेटाचे प्रमाण तब्बल २५ पटींनी वाढले आहे.

वर्षभरापूर्वी १.५ लाख कोटी रुपयांच्या घरातील देशातील माध्यम व मनोरंजन २०२० पर्यंत २ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. अर्थातच यात नव्याने समावेश झालेल्या दूरसंचार व डिजिटल अंगाचा सिंहाचा वाटा असेल.