जीएसटी परिषदेच्या गुरुवारी झालेल्या २५ व्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये २९ हस्तकला वस्तूंवरील तसेच ५३ प्रकारच्या सेवांवरील जीएसटी रद्द करण्यात आला आहे. यात नाटकांच्या तिकीटांचाही समावेश करण्यात आला आहे. ५०० रुपयांपर्यंतच्या नाटकांच्या तिकीटांवरील जीएसटी रद्द करण्यात येणार असल्याच्या निर्णयामुळे नाट्यप्रेमी काहीसे सुखावले आहेत. गणेश भक्तांसाठीही आनंदाची बात असून गणेशमुर्तींनाही जीएसटीतून वगळण्यात आले आहे. गणेशमुर्ती घडवणे ही एक कला असल्यामुळे मुर्तींनाही जीएसटीतून सूट मिळाली आहे.

या बैठकीत विविध प्रकारच्या ८० वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात करण्याचा मुद्दा अजेंड्यावर होता. या बैठकीत पेट्रोल-डिझेलवर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. येत्या २५ जानेवारीपासून जीएसटी नवे दर लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

जीएसटी परिषदेच्या बैठकीत ४९ वस्तूंवरील जीएसटीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वस्तूंवरील जीएसटी ५ ते १२ टक्क्यांच्या दरम्यान राहणार आहे. यामध्ये शेतीतील सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचा समावेश आहे. त्याचबरोबर ज्या २९ हस्तकलेच्या वस्तूंवरील कर हटवण्यात आला आहे. यामध्ये गणेश मूर्तींसारख्या वस्तूंचा समावेश आहे. कारण देव-देवतांच्या मूर्तीकला ही हस्तकला या प्रकारात मोडते. यामुळे राज्याला या निर्णयाचा फायदा होणार असून यामुळे येत्या वर्षातील गणेशोत्सवात गणेश मूर्ती स्वस्त झालेल्या असतील.