अभिनेत्री ईशा शरवानीची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ऑस्ट्रेलियन आयकर अधिकारी असल्याचं सांगत तिघांनी ईशाची फसवणूक केली. याप्रकरणी दिल्ली सायबर क्राइम युनिटने कारवाई केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ईशाला वेगवेगळ्या नंबरवरून फोनकॉल येत होते. ऑस्ट्रेलियन आयकर अधिकारी असल्याचं सांगत तिला धमकावण्यात येतं होतं. आयकराची मोठी रक्कम तू भरली नसून तुझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी धमकी तिला आरोपी देत होते. या आरोपींनी तिच्याकडून रिया ट्रान्सफर आणि वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून दिल्लीच्या एका पत्त्यावर दोन वेळा जवळपास साडेतीन लाख रुपये जमा करून घेतले.

ईशाने ऑस्ट्रेलिया पोलिसांना या घटनेची माहिती दिली व त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. तपासानंतर सेलने एका बोगस कॉल सेंटरवर छापेमारी करत त्याच्या मालकाला अटक केली. मालकाच्या चौकशीनंतर वेस्टन यूनियन मनी ट्रांसफरचा एक एजंट आणि एक कॉल सेंटर ऑपरेटरला अटक करण्यात आली आहे.

दिल्लीतील कॉल सेंटरमधून ईशाला ऑस्ट्रेलियाला फोन केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याची शोध ते घेत आहेत.

ईशाने ‘लक बाय चान्स’, ‘नक्षा’, ‘कृष्णा’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. ईशा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये राहात असून तिथेच ती डान्स अकादमी चालवत आहे.