हॉलिवूडच्या चित्रपटकर्मीना भारतीय आध्यात्मिक विचार, कथा सातत्याने आकर्षित करत आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत हॉलिवूडपटांमधून अध्यात्मिक विचारांचा, संकल्पनांचा समावेश क रण्यावर भर दिला जातो आहे. जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आता पुन्हा एकदा भारतीय अध्यात्माकडे नेणाऱ्या कॉमिक बुकवर ‘३००’, ‘इमॉर्टल्स’ आणि ‘३०० : राईझ ऑफ अ‍ॅन एम्पायर’ सारख्या हॉलिवूडपटांचा निर्माता मार्क कॅन्टन याने चित्रपट करायचा निर्णय घेतला आहे. ‘वॉरिअर : द रिव्हेन्ज ऑफ साधू’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
मार्क कॅन्टनने आपल्या नव्या सुपरहिरोपटासाठी एकेकाळी गाजलेल्या ‘द साधू’ या कॉमिक बुकची निवड केली आहे. गौतम चोप्रा आणि जीवन कांग यांनी ‘द साधु’ या कॉमिक बुकची निर्मिती केली होती. या कॉमिक बुकवर आधारित चित्रपटासाठी मार्क कॅन्टन यांनी कॉमिक चे निर्माते असलेल्या गौतम चोप्रा यांच्या ग्राफिक  इंडिया या कंपनीशी हातमिळवणी केली आहे. गौतम चोप्रा आणि ग्राफिक इंडियाचे सहसंस्थापक शरद देवराजन यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून कॅन्टनबरोबर ते या चित्रपटाची सहनिर्मिती करणार आहेत.
या कॉमिकची कथा १८५८ च्या बंगालमध्ये सुरू होते. बंगालमध्ये एका ब्रिटिश कुटुंबाची हत्या होते. याच कुटुंबातील जेसन नावाचा एक तरूण तिथून पलायन करण्यात यशस्वी होतो आणि तो जंगलांमध्ये आश्रय घेतो. याच जंगलात त्याची गाठ साधूंशी पडते. त्यांच्याकडून वर्षांनुवर्ष वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेत हा सुपरहिरो तयार होतो, अशी ‘द साधू’ची मूळ कथा आहे. चित्रपटातही हीच कथा दिसणार असल्याचे गौतम यांनी म्हटले आहे.
‘३००’ सारख्या चित्रपटांमधून कॅन्टन यांनी पौराणिक आणि दंतकथांचा खुबीने वापर करून घेतला आहे. त्यामुळे ‘द साधू’लाही रूपेरी पडद्यावर आणण्याचे स्वप्न कॅन्टनमुळे पूर्ण होणार असल्याचेही गौतम यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. आजवर ग्रीक पौराणिक कथांवर पोसलेल्या हॉलिवूडपटांनी अफलातून काल्पनिक विश्व उभे केले होते. ‘द साधू’च्या निमित्ताने भारतीय अध्यात्मिक विचारांवर आधारित एक साहसी सुपरहिरोची काल्पनिक दुनिया नक्कीच लोकांचे मनोरंजन करेल असा विश्वास कॅन्टन यांनी व्यक्त केला आहे.
याआधी जेम्स कॅमेरॉनने ‘अवतार’ या भारतीय संकल्पनेवरच आपला संपूर्ण चित्रपट बेतला होता. भारतीय देव-देवतांचा निळ्या रंगाशी असलेला संबंध लक्षात घेऊन त्याने ‘अवतार’ मध्येही निळी दुनिया उभी केली होती. तर ‘मॅट्रिक्स’मध्येही वैदिक संल्कपनांचा समावेश केलेला आहे.