भारतीय चित्रपटातील स्त्रीदेहाच्या ‘बाजारीकरणा’ने आज टोक गाठलेले आहे. यातील ३५ टक्क्यांहून अधिक चित्रपटांत स्त्री नग्नता दाखवण्यात येते. लोकप्रिय चित्रपटांमध्ये स्त्रीला अधिकाधिक आकर्षक दाखवण्यात भारतीय चित्रपटसृष्टी नेहमीच आघाडीवर राहिली आहे, असे मत संयुक्त राष्ट्रांच्या वतीने करण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या जागतिक अभ्यास अहवालात व्यक्त केले आहे.
‘प्रसारमाध्यमांतील लिंगभाव’ या दृष्टिकोनातून अभ्यास करणाऱ्या गिना डेव्हिस संस्थेने हा अभ्यास केला आहे. यात संयुक्त राष्ट्रे महिला आणि ‘रॉकफेलर फाऊंडेशन’ संस्थेचे या अभ्यासासाठी साहाय्य लाभले आहे.
भारतीय चित्रपटांतील स्त्रियांचे अंगप्रदर्शन, सापत्नभाव, नकारात्मक दृष्टिकोन आणि दुय्यम भूमिका यांची रेलचेल असते. अशा भूमिकांमध्येच स्त्रियांना अधिक स्थान देण्यात येते. स्त्रीची चित्रपटातील भूमिका महत्त्वाची असते, हे चित्रपटसृष्टीत विचारातही घेतले जात नाही. अभियंता आणि शास्त्रज्ञाच्या भूमिकेतील स्त्री चित्रपटात कधी दिसलेली नाही, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. जगभरातील विविध भाषिक चित्रपटांतील स्त्रीचे हे सार्वत्रिक चित्रण आहे, असे नमूद करण्यात आले आहे. जागतिक लोकसंख्येचा निम्मा भाग स्त्रिया आहेत, तरीही चित्रपटात एक तृतीयांशहून कमी स्त्री व्यक्तिरेखांच्या तोंडी संवाद असतात. भारतीय चित्रपटांमध्ये अशा स्त्री व्यक्तिरेखांचे प्रमाण अधिक आहे. म्हणजे चित्रपटांत स्त्रियांचा वापर केवळ पाहण्याची वस्तू म्हणूनच अधिक केला जातो, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.