बहुप्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळा काल (३मार्च) लॉस एन्जेलिस येथे पार पाडला. हा सोहळा तब्बल साडेचार कोटी दर्शकांनी पाहिला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेने यात २५ लक्ष इतकी वाढ झाली आहे. हॉलिवूडमध्ये सर्वात मानाच्या समजल्या जाणा-या या पुरस्काराचे सूत्रसंचालन एलेन दजेनरसने केले होते. तर एबीसी आणि स्टार मूव्हिज या वाहिन्यांनी या पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले होते.
या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण साडेचार कोटी लोकांनी पाहिले. १८-४९ वयोगटातून सोहळ्यास १२.९ इतकी रेटिंग मिळाली असून, यात ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १८ ते ३४ वयोगटातील मुले आणि पुरुषांमध्ये एलेन फार प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षीच्या सोहळ्यास चार कोटी चार लक्ष दर्शक लाभले होते आणि १८-४९ वयोगटाकडून यास १३ रेटिंग देण्यात आली होती. जवळपास २००८ सालच्या ऑस्कर पुररस्कारापासून या सोहळयाची रेटिंग सर्वसामान्यपणे स्थिर राहिली आहे.
एलेन दजेनरसने २००७ साली ऑस्करचे सूत्रसंचालन केले होते. त्यावेळेस, या सोहळ्यास ४ कोटी २ लक्ष दर्शक लाभले होते आणि १८-४९ वयोगटातून १४.१ रेटिंग देण्यात आली होती. जेम्स फ्रॅन्को, एनी हॅथवे आणि सेठ मॅकफारलेन यांनीदेखील यापूर्वी ऑस्करचे सूत्रसंचालन केले होते. पण, त्यांना दर्शकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तुलनेने एलेन दजेनरसला तिच्या सूत्रसंचालनासाठी दर्शकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.