केबल टीव्ही आणि त्यापाठोपाठ डझनांवरी उपग्रह वाहिन्यांचा पसारा वाढला, तेव्हा भारतीय प्रेक्षकांनी ज्ञान-मनोरंजनाचे एकमेव आकर्षण असलेल्या दूरदर्शन वाहिनीशी कृतघ्नतेचा कळस गाठत काडीमोड केला. चार-दोन चित्रपट ट्रेलर्सची संगीतमौज देणाऱ्या वाहिन्या, नंतर नव्या-जुन्या गाण्यांचाच वीट येईल इतक्या संख्येने अंताक्षऱ्या, निर्बृद्ध प्रश्नमंजुषा, सासू-सुनांच्या ‘बोरियत’ने भरलेल्या आदिम कारवाया, लफडी-कुलंगडी यांची बाळबोध आवरणे यांच्या दृष्टचक्रामध्ये करुण बनलेला प्रेक्षकराजा सध्या अमेरिकी, ब्रिटिश टीव्ही मालिकांकडे मोठय़ा प्रमाणावर आकर्षित होत आहे. वायुवेगाने पळणारी कथानके, अभिनयापासून सर्वच बाबींमध्ये सक्षम निर्मिती आणि वैश्विक दृश्यमूल्य असलेल्या या मालिकांमुळे नवमनोरंजनाचे युग तयार झाले आहे. तेव्हा रटाळ आणि अनंतापर्यंत चालू पाहणाऱ्या देशी भाषिक मालिकांशी काडीमोड घेऊ पाहणाऱ्या या पिढीच्या नव्या ‘ट्रेण्ड’चा वेध..

‘एपिसोड्स’ :
हॉलीवूडमध्ये एका टीव्ही मालिकेनिमित्त आलेल्या दाम्पत्याच्या नजरेतून टीव्ही मालिका तयार करणाऱ्यांचे खरेखुरे जग या वैचारिक विनोदी मालिकेत पाहायला मिळू शकेल.
सध्या तिचा चौथा सीझन तयार होत आहे.
‘हार्ट ऑफ डिक्सी’ :
शहरातून एका अमेरिकी खेडय़ात डॉक्टरकी करायला आलेल्या नायिकेची प्रेम त्रिकोणात अडकलेली कथा. बाळबोध विषय किती प्रसन्नपणे मांडता येऊ शकतो हे यात पाहायला मिळू शकते.
‘ब्रेकिंग बॅड’ :
परिस्थितीशरण बनलेल्या पापभीरू माणसाची खोलात रुतत जाण्याची कथा मांडणारी ही मालिका सर्वाधिक कुतूहलनिर्माती आहे. ब्रायन क्रॅन्स्टन या पन्नाशीनंतर स्टार झालेल्या कलाकाराने ती अजरामर केली आहे.
‘इनबिटविनर्स’ :
जग सपाट झाले असल्याने जगभरातील तरुणांची सर्वच बाबतीत विचार करण्याची पद्धतीही समानच आहे. निव्वळ १८ भागांची ही देखणी ब्रिटिश मालिका पुन:पुन्हा पाहण्यास प्रवृत्त करेल.
‘सबर्गेटरी :
न्यूयॉर्कच्या वातावरणामधून एकाएकी उपनगरामध्ये फेकल्या गेलेल्या तरुणीची आणि तिच्या वडिलांची उपनगरीय धाडसांची जंत्री यात आहे. विनोदात आणि अभिनयातील सरसपणा हा आकर्षणिबदू आहे.

बेनेडिक्ट कम्बरबॅच, ब्रायन क्रॅन्स्टन, आरुन पॉल, झोई डिश्ॉनल ही नावे तुम्हाला अपरिचित वाटत असली, तरी मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर शहरांतील तरुणाई ती माहिती नसल्याबद्दल तुमची मूर्खात गणना करेल. ही थोर नट मंडळी छोटय़ा पडद्याद्वारे त्रिखंडामध्ये लोकप्रिय झाली आहेत. एकाच अभिनयाच्या जनप्रियतेच्या बळावर ‘टाइम’ साप्ताहिकाच्या कव्हरवर झळकलेल्या कम्बरबॅचच्या ‘शेरलॉक’ मालिकेचे अतूट भक्त शालेय- महाविद्यालयीन मुलांमध्ये तुफानी वेगाने वाढत आहेत. झोईची ‘न्यू गर्ल’ मालिका भारतीय इंग्रजी वाहिन्यांवर झळकून बहुचर्चित झाली आहे, तर क्रॅन्स्टन आणि पॉल या शिक्षक-विद्यार्थी जोडगोळीची ‘ब्रेकिंग बॅड’ ही खिळवून टाकणाऱ्या मालिकेची पारायणे करणारी पिढी तयार झाली आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी इंग्रजी मालिकांच्या वाहिन्यांचा देशी टीआरपी हा विशिष्ट गटापुरता मर्यादित होता. अल्पसंख्य दर्शकवर्ग असलेल्या या वाहिन्यांवर सुरू होणाऱ्या मालिकांच्या वृत्तपत्रातील पूर्ण पानांच्या जाहिराती, सध्या बदललेले चित्र स्पष्ट करते. उदारीकरणानंतर उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय यांच्या आर्थिक स्थितीत झालेला बदल, प्रादेशिक भाषेऐवजी इंग्रजी शिक्षण घेण्यात वाढलेला प्रवाह, इंटरनेटने खुली केलेली अमाप दारे व यूटय़ूब-टोरंट्स-हबच्या आजच्या जगामध्ये सुलभ झालेले डाऊनलोड्स यांमुळे परदेशी मालिका पाहण्याचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. उगीचच लांबड लावणाऱ्या आणि एकाच विषयाचे दळण लावणाऱ्या तद्दन मूर्ख मालिका देशी वाहिन्यांवर सुरू असताना विषय वैविध्याची आणि मनोरंजन दर्जाची हमी देणाऱ्या मालिकांकडे नवतरुण आणि देशी प्रेक्षकांचा कल वाढणे स्वाभाविक आहे. ‘हाऊ आय मेट यूअर मदर’, ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘अवेक’, ‘हार्ट ऑफ डिक्सी’, ‘हाऊस ऑफ कार्डस’, ‘मॅड मेन’, ‘ट्र डिटेक्टिव्ह’ आदी अमेरिकी प्रेक्षकांशी समांतररीत्या मालिका पाहणारे थोर प्रेक्षक आपल्या इथे वाढत आहेत. आयएमडीबीच्या श्रेणीपद्धतीमुळे देशी प्रेक्षकांमध्ये मालिकेची लोकप्रियता- त्यातला कण्टेण्ट आदींविषयी माहिती करून ते डाऊनलोड करणे सोपे आहे.
महिनोन् महिने कथानक न सरकणाऱ्या कौटुंबिक समस्यांना कंटाळा येईस्तोवर डोके ताणणाऱ्या मालिकांपेक्षा या हव्या तेव्हा आपल्यासमोर निख्खळ-वेगवान मनोंरजन देणाऱ्या आठ-तेरा-सोळा किंवा फारतर बावीस भागांचा सीझन व्यापणाऱ्या अमेरिकी टीव्ही मालिका पाहणे केव्हाही उत्तम असल्याचा विचार या मालिकांचे देशी भक्त वाढण्यात झाले आहेत. तोंडी प्रसिद्धीमुळे या मालिकांच्या प्रेक्षकवर्गात उत्तरोत्तर वाढ होत असून, एक दिवस असा येईल की, देशी मालिकांना सध्याच्या रटाळ स्वरूपाला बदलणे भाग पडेल. पण सध्या तरी देशी मालिका कुठल्याच पातळीवर या मनोरंजनाशी टक्कर देऊ शकत नाही. प्रत्येकजण आपल्याला वाटेल त्या विषयाच्या टीव्ही मालिकांचा शोध घेऊन स्वत:चे वेगळे जग टॅब, संगणक, लॅपटॉप अथवा टीव्हीच्या छोटय़ा पडद्यावर तयार करीत आहेत. आपल्याकडे इंग्रजी मालिकांच्या प्रेक्षकवर्गाचे साधारणत: तीन टप्पे पडतात.

मनोरंजन समाधान!
प्रेक्षकाचे कुतूहल वाढवत, चाळवत ठेवणे ही कुठल्याही मालिकेची चांगली लक्षणे मानली जातात. आपल्याकडच्या मालिका मनोरंजन समाधान न देता त्या ज्या महिला वर्गाला आकर्षून घेण्यासाठी तयार केल्या जात आहेत त्यांची डोकी भ्रष्ट करण्याचे एकमेव कार्य करीत आहेत. या मालिकांचे बद्धकोष्टतेत अडकलेले कथानक सामान्य माणसांनाही ताडता येणारे असेल, तर मग त्यांचा उपयोग काय? असा विचार सध्या प्रेक्षकवर्ग करीत आहे. ज्या अमेरिकी-ब्रिटिश मालिकांकडे भारतीय आकर्षित होत आहेत, त्यांच्यामध्ये मनोरंजन, लेखन-कौशल्याचे, दिग्दर्शनाचे आणि विषय-आशयाचे वैविध्य भरपूर आहे. हसविणाऱ्या, रडविणाऱ्या, घाबरविणाऱ्या आणि वैचारिक सक्रिय करणाऱ्या मालिकांचे पर्याय अमर्याद असल्याने, या मालिकांच्या सान्निध्यात आल्यानंतर पुन्हा संथगतीने चालणाऱ्या देशी ‘वैतागवाडी’ मालिकांना कुणीच कवटाळू शकणार नाही. ड्रग तस्करीचा प्रश्न मांडणारी अमेरिकी ‘ब्रेकिंग बॅड’ त्यातील गोळीबंद कथानकामुळे भागांमागून भाग पाहिले जाऊ शकतात. ब्रिटिश शेरलॉक होमच्या आधुनिक, चाणाक्ष डिटेक्टिव्हीटी कारवाया आणि ‘इनबिटविनर’मधील पौगंडी समस्या यांचे चित्रण प्रेक्षकाला जागेवर खिळविणारे आहे.
‘ऑकवर्ड’, ‘सबर्गेटरी’सारख्या टीन एजर्सच्या मालिका बावळटशून्य
कशा बनू शकतात, हे त्यातल्या विनोदाच्या दर्जापासून ते अभिनयाच्या मात्रेला अनुभवल्यानंतरच कळू
शकेल.

गैरसमजाचा पहिला टप्पा
टीव्हीवर इंग्रजी वाहिनी आणि मालिका पाहणारे दोन वर्ग पूर्वी भारतात अस्तित्वात होते. पहिला वर्ग या मनोरंजनाच्या आकलनामुळे खरोखर आस्वाद घेणारा, तर दुसरा गैरसमजुतीतून त्याच्या वाटेला जाणारा. ‘व्हॅली ऑफ द डॉल्स’, ‘बेवॉच’ या मालिका पूर्णपणे आवाज म्यूट करून आपल्याकडे ‘पाहिल्या’ गेल्या तो काळ वेगळा होता. तथाकथित संस्कृती रक्षकांपासून अनेकांनी आक्षेप घेण्याचे कारण असले, तरी मुळातच या वाहिन्यांचा टीआरपी कमी होता. त्या वेळी देशी मालिकांमध्ये काही प्रमाणात गुणवत्ताही शाबूत होती व इंग्रजी भाषिक उच्चारांच्या अडथळ्यांना पार करणारा वर्ग कमी होता. ‘फ्रेण्ड्स’ ही अमेरिकी मालिका मात्र मोठय़ा प्रमाणावर प्रेक्षक बनवून होती.

मनोरंजन समांतर तिसरा टप्पा
छोटय़ा पडद्यावरील मालिका समाजाचे खरेखुरे चित्र उभे करतात असे मानले जाते. असे म्हटले तर सध्याच्या आपल्या मालिका जे समाजाचे रडके, भंपक चित्र रंगविण्यात गुंतल्यात ते कुणालाही पाहायला आवडणार नाही. ‘हार्ट ऑफ डिक्सी’, ‘ट्र डिटेक्टिव्ह’, ‘हाऊस ऑफ कार्डस’, ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘शेरलॉक’ या मालिका टीव्हीवर प्रदर्शनानंतर दुसऱ्याच दिवशी ते टोरण्ट्सवर उपलब्ध असल्याने भारतात पाहिल्या जात आहेत.  चित्रपटवेडय़ांइतकेच आता मालिकावेडी मंडळी तयार होत आहेत.

सुधारणांचा दुसरा टप्पा
दोन हजारोत्तर दशकामध्ये इंटरनेटचे युवा पिढीवरील वर्चस्व मोठे होते. डीव्हीडी, यूटय़ूब, टोरंट्स आदी माध्यमांनी अमेरिकी-ब्रिटिश टीव्ही मालिकांचा परिचय जगभरातील प्रेक्षकांना होऊ लागला. गुणवत्तेच्या बळावर त्या मालिकांना प्रेक्षकाश्रय मिळाला. भारतीय छोटय़ा पडद्यांवर इंग्रजी मालिका दाखविणाऱ्या वाहिन्या वाढू लागल्या. उच्चार आकलन सुलभतेसाठी या मालिकांच्या वाहिन्यांनी इंग्रजी सबटायटल्स देणे सुरू केले. इंग्रजी वृत्तपत्र जसे भाषिक वृत्तपत्रासोबत घरोघरी शिरले, तसे इंग्रजी मालिका हिंदी-मराठी अथवा प्रादेशिक मालिकांच्या कानामागून घराघरांमध्ये प्रवेश करू लागल्या. गेल्या पाच वर्षांत हे प्रमाण खूपच मोठे आहे. ‘लॉस्ट’, ‘डेक्स्टर’ या मालिका आपल्याकडेही आवडीने पाहिल्या गेल्या.
मी परदेशी मालिका पाहतो कारण त्या चांगल्या असतात. ‘होम्स’चा आधुनिक अवतार असलेल्या ‘शेरलॉक’ आणि ‘एलिमेण्टरी’पासून सिटकॉम शैलीतील ‘फ्रेण्ड्स’, ‘बिग बॅन्ग थिअरी’पर्यंत, तसेच मॅच्युअर विषय असणाऱ्या ‘ब्रेकिंग बॅड’, ‘आन्टूराज’पासून ते ‘गेम ऑफ थ्रोन्स’सारख्या साहित्याच्या महारूपांतरापर्यंत सर्वच प्रकार त्यात आहेत. अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क या विविध देशांमधील या मालिका पाहून इतर लोक अजून मराठी/ हिंदूी मालिका का पाहतात, असा प्रश्न पडतो. आपल्याकडे हल्ली मालिका म्हटली की डेली सोप हे गणित झाले आहे. त्याचा मोठय़ा प्रमाणात गुंतणारा महिला प्रेक्षकवर्ग मिळविता येणे ही आपली अत्युच्च महत्त्वाकांक्षा आहे. याउलट इतर देशांचा प्रयत्न हा टेलिव्हिजनचा आवाका आणि खोली, या दोन्ही दृष्टींनी सिनेमाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न आहे. कोएन बंधूंच्या ‘फार्गो’ चित्रपटाच्या विश्वात घडणारी त्याच नावाची अलीकडली मालिका पाहिली की ते ज्या प्रतीचे काम करताहेत त्याचा हेवा आणि आपण ज्या प्रतीचे काम करतोय, त्याची कीव वाटते. गंमत म्हणजे दिग्दर्शकांपासून ते अभिनेत्यांपर्यंत सारेच, काही वेगळे करण्याचा दम असलेले आहेत. पण चॅनल्सना वाटणारी, नवे काही करून पाहण्याची भीती आणि त्यांनीच बाळबोध कार्यक्रमांची सवय लावलेला प्रेक्षक यांनी तयार केलेल्या दृष्टचक्रात ते अडकलेले आहेत. मला आशा होती की, अनिल कपूर निर्मित ‘ट्वेंटीफोर’च्या रूपांतरानंतर गणित बदलेल आणि आपणही योग्य वेळ देऊन केलेल्या विषयाशी सुसंगत असणाऱ्या, मर्यादित भागांच्या मालिका तयार करायला लागू, पण अजून तरी आनंदच आहे.
– गणेश मतकरी
चित्रपट समीक्षक आणि दिग्दर्शक

मी शेरलॉकचा फॅन आहे, कारण बेनेडिक्ट कम्बरबॅचचे ‘स्टाइलिस्ट’ वावरणे, त्याचा अभिनय, त्याचे खासमखास बोलणे मला आवडते. शेरलॉक होमच्या पुस्तकाचेही वाचन मी या मालिकेमुळे करू लागलो. त्याचबरोबर ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ आणि ‘बिग बॅन्ग थिअरी’देखील मला आवडतात.
– तेजस हिंदूळेकर
विद्यार्थी

– मराठी, हिंदूी किंवा आपल्या देशी मालिकाही यूटय़ूबसारख्या माध्यमांतून पाहायला मिळतात. त्यामुळे कुठल्याही वेळी देशी मालिका उपलब्ध असतात. पण हल्ली त्यांच्या कथानक ताणण्याच्या अट्टहासामुळे मी ‘शेरलॉक’ आणि ‘ब्रेकिंग बॅड’ पाहण्यास सुरुवात केली. आता आयएमडीबीमुळे अनेक नव्या अमेरिकी आणि ब्रिटिश मालिका मी पाहात आहे.
– कौस्तुभ नाईक
मॅकॅनिकल इंजिनीअर