ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल यांच्या शाही विवाहसोहळ्याने सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फिटलं. एका स्वप्नवत विवाहसोहळ्याची अनुभूती असणाऱ्या या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने अनेकांनीच खऱ्या खुऱ्या राजा-राणीचं लग्न होताना पाहिलं. ब्रिटनच्या राजघराण्यातही या लग्नाच्या निमित्ताने आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. या साऱ्यामध्ये मेगन आणि प्रिन्स हॅरी या नवविवाहित जोडप्याने त्यांच्या लग्नात काही परंपरा मोडित काढल्या. ज्याच्या चर्चा सध्या रंगण्यास सुरुवात झाली आहे.

चर्चमध्ये मेगनचा प्रवेश चर्चेचा विषय ठरला…
लग्नाच्या दिवशी मुलगी आपल्या वडिलांसोबत चर्चमध्ये येते. ही एक प्रकारची प्रथाच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यातही राजघराण्यात ही प्रथा पाळलीच जाते. पण, मेगनच्या बाबतीत काहीसं वेगळं घडलं. सुरुवातीचा काही भाग चर्चमध्ये एकटीने आल्यानंतर मेगनला प्रिन्स चार्ल्स यांनी हॅरीपर्यंत पोहोचवलं.

बाल्कनी किस…
प्रिन्स विलियम आणि केट यांच्या शाही विवाहसोहळ्याच्या वेळी बाल्कनीतील ती किस आठवतेय का? २०११ मध्ये पार पडलेल्या त्या विवाहसोहळ्यात प्रिन्स विलियम आणि केटची ती परफेक्ट किस पाहण्यासाठी अनेकांनीच गर्दी केली होती. पण, हॅरी आणि मेगनने ही प्रथाही पाळली नाही. विंडसर कासल इथल्या सेंट जॉर्ज चॅपल चर्चमध्ये हा विवाहसोहळा पार पडला आणि तेथेच हॅरीने पत्नी म्हणून मेगनला पहिल्यांदा किस केलं. पण, तरीही बाल्कनीतील परफेक्ट किस चर्चेचा विषय ठरली.

वाचा : प्रिन्स हॅरी- मेगन मार्कलच्या शाही विवाहसोहळ्याचा खर्च नेमका आहे तरी किती?

मेड ऑफ ऑनर…
परंपरेनुसार शाही विवाहसोहळ्या नववधूसोबत ‘मेड ऑफ ऑनर’चंही तितकच महत्त्वं असतं. ज्यावेळी केट मिडलटन आणि प्रिंस विलियमचं लग्न झालं होतं, तेव्हा केटची मेड ऑफ ऑनर असणारी पिपाही बरीच प्रकाशझोतात आली होती. पण, मेगनने मात्र कोणत्याही मेड ऑफ ऑनरची निवड केली नाही. आपल्या मित्रमैत्रीणींसोबत खास नातं असणाऱ्या मेगनला कोणा एकाचीच निवड करायची नव्हती यासाठी तिने हा निर्णय़ घेतला होता.

लग्नातील प्रिस्ट…
शाही शिष्टाचारानुसार इंग्लंडच्या चर्चमधील वरिष्ठ प्रिस्टना शाही विवाहसोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येते. पण, मेगन आणि हॅरीच्या विवाहसोहळ्यात प्रेमाची वेगळी परिभाषा उपस्थितांना पटवून देण्यासाठी शिकागो येथील बिशप मायकल करी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी ज्या पद्धतीने प्रेमाची ताकद नेमकी काय असते, हे उपस्थितांना सांगितलं ते पाहता सोशल मीडियावरही त्यांच्याविषयीच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.

वेडिंग केक…
शाही विवाहसोहळा पार पडल्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांना वेडिंग केक दिला जातो. केकचा प्रत्येक तुकडा हा त्या लग्नातील गोडवा व्यक्त करत असतो. पण, मेगन आणि हॅरी यांनी ही प्रथाही पाळली नसल्याचं म्हटलं जात आहे.