भारतातील नामांकित चित्रपट महोत्सव म्हणून ओळख असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदा गोव्यात आयोजन करण्यात आलं. १९५२ साली सुरू झालेला या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा ५० वं वर्ष असून सिनेरसिकांना इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी)चे वेध लागले आहेत. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षात जगभरातल्या निवडक उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना पाहायला मिळणार आहेत. इफ्फीमधल्या ‘इंडियन पॅनोरमा’ सेक्शनमधल्या ‘नॉन फिचर फिल्म’ विभागात अभिनेत्री स्मिता तांबेच्या ‘गढुळ’ चित्रपटाची निवड झाली आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाशी स्मिता तांबेचा ऋणानुबंध तसा जुना आहे. इफ्फीमध्ये दाखवली जाणारी ही स्मिताची चौथी कलाकृती आहे. यापूर्वी तिची ‘धुसर’, ‘रूख’, ‘पांगिरा’ या चित्रपटांची इफीमध्ये वर्णी लागली होती. “पहिल्यांदा मी इफीमध्ये जेव्हा सहभागी झाले होते. तेव्हा या चित्रपट महोत्सवाच्या भव्यतेविषयी मला कल्पना नव्हती. पण लवकरच मला हा महोत्सव म्हणजे सिनेरसिकांची पंढरी असल्याचे जाणवले. जगभरातल्या फिल्ममेकर्स आणि कलावंतांना भेटण्याची संधी या चित्रपट महोत्सवातून मिळते. इफ्फीमध्ये आपल्या सिनेमाचे सिलेक्शन होणे, ही एक कौतुकाची थाप असते. त्यामुळे ‘गढुळ’चे सिलेक्शन होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असं स्मिता म्हणाली.

पुढे ती म्हणते,“जेव्हा नातेसंबंधांमध्ये गोष्टी गढुळ होतात, तेव्हा तुमच्या अचार- विचारातली पारदर्शकता हरवत जाते, ही या कथानकामागची कल्पना मला आवडली. गणेश शेलार या नवोदित दिग्दर्शकामध्ये फिल्ममेकिंगची योग्य जाण असल्याने या फिल्मवर काम करतानाचा अनुभव अविस्मरणीय होता.” दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या ४९ व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘इंडियन पॅनारोमा फीचर फिल्म’ विभागात २२ चित्रपटांपैकी केवळ २ आणि २१ नॉन फीचर फिल्मपैकी ८ मराठी लघुपटांची निवड करण्यात आली होती.