हवाई टेहळणीसाठी ‘ड्रोन’ही सज्ज

येत्या १० मे रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये होणाऱ्या कॅनेडियन पॉपस्टार जस्टिन बिबर याच्या सादरीकरणासाठी नवी मुंबई पोलीस विभागाचा तब्बल ५०० पोलिसांचा फौजफाटा कार्यक्रमास्थळी पहारा देणार आहे. जस्टिन बिबर भारतात येणार असल्याचे जाहीर झाल्यापासून त्याच्या राजेशाही सुविधांच्या यादीने तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

कॅनेडियन पॉपस्टार जस्टिन बिबर आपल्या सादरीकरणासाठी तीन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन दिवसीय दौऱ्यातील जस्टिनच्या शाहीथाटांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी तो भारतीय भोजनची चव चाखणार आहे, तर दुसऱ्या दिवसाचा समारोप मुंबई दर्शनाने करणार आहे. १० मे रोजी जस्टिन नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये सादरीकरण करत असल्याने कार्यक्रमस्थळी साधारण ४५,००० प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता नवी मुंबई पोलिसांनी वर्तवली आहे. इतक्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांनी उचलली असून यासाठी ५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमस्थळी पहारा देण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरांसोबतच ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांचाही वापर पोलीस प्रशासनाकडून केला जाणार आहे. ५०० पोलिसांमधील काही पोलीस कर्मचारी साध्या वेशातही टेहळणी करणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.

प्रेक्षकांच्या प्रवेशिका तपासणीची आणि गर्दी व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी ही खासगी सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या संस्थेला दिली असल्याचेही त्यांनी म्हटले. कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश आणि बाहेर जाणाऱ्या द्वारांच्या निर्मितीची व्यवस्था मात्र पोलीस प्रशासन करणार आहे.