मॉडेल आणि फिटनेस फ्रीक मिलिंद सोमण आणि त्याच्याहून कमी वयाची त्याची प्रेयसी यांची प्रेमकथा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असते. आता पुन्हा एकदा मिलिंद त्याच्या प्रेयसीसोबत मुंबईत आयोजित ‘अॅमेझॉन इंडिया फॅशन वीक २०१८’ मध्ये रॅम्प वॉक करताना पाहण्यात आला. या रॅम्प वॉकवेळी मिलिंद जेव्हा अंकितासोबत आला तेव्हा साऱ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. मिलिंदने अंकितासोबतचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. या दोघांच्या प्रेमकथेची एवढी चर्चा होण्याचे कारण म्हणजे एकीकडे मिलिंद ५१ वर्षांचा आहे तर त्याची प्रेयसी फक्त १८ वर्षांची आहे.

‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अंकिता कोनवार ही एक एअर हॉस्टेस असून, हे दोघे गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून एकमेकांना डेट करत आहेत. मिलिंदने त्याची प्रेम कहाणी सोशल मीडियावरही शेअर केली आहे.  त्याचबरोबर अंकितासोबतचे अनेक फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वयाच्या ५० व्या वर्षी मिलिंदने अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धा जिंकून ‘आयर्न मॅन’चा किताब पटकावला होता.

मिलिंद शेवटचा ‘बाजीराव मस्तानी’ २०१५ सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याने अंबाजी पंतची व्यक्तिरेखा साकारली होती. १९ जुलै २०१६ मध्ये झुरिचमध्ये मिलिंदने ‘आयर्न मॅन’ हा किताब पटकावला होता. या स्पर्धेत त्याने ३.८ किमी स्विमिंग, १८०.२ किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी रनिंग या तिन्ही गोष्टी १५ तास आणि १९ मिनिटांमध्ये पूर्ण केल्या होत्या.

२००६ मध्ये मिलिंदने ‘वॅली ऑफ फ्लॉवर्स’ या सिनेमातील त्याची सह-कलाकार मॅलेन जाम्पनोईशी विवाह केला होता. पण त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांनी २००९ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर तो काही काळ सहाना गोस्वामी या अभिनेत्रीलाही डेट करत होता. या दोघांमधील वयातील अंतरही २१ वर्षे होते. या नात्यातही मिलिंद चार वर्षे होता.