केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब-हरियाणा येथील शेतकरी आंदोलन करत आहेत. २६ नोव्हेंबर २०२० पासून हे शेतकरी आंदोलन करत असून या काळात अनेक शेतकऱ्यांना त्यांचे प्राणदेखील गमवावे लागले आहेत. आतापर्यंत या आंदोलनामध्ये जवळपास ५३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ५७ वर्षीय गलतान सिंह यांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या निधनानंतर अभिनेत्री दिया मिर्झाने केवळ अंकाच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शेतकऱ्यांनी दिल्ली सीमेवर आंदोलनास सुरुवात केल्यापासून दिया मिर्झा सातत्याने त्यांना पाठिंबा देत आहे. यामध्येच ५७ वर्षीय गलतान सिंह यांचं कडाक्याच्या थंडीमुळे निधन झाल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर दिया नि:शब्द झाली असून तिने केवळ ‘५७’ हा आकडा ट्विटरवर शेअर केला आहे. सध्या तिच्या या ट्विटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.


२०२१ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच १ तारखेला गाझीपूर सीमेवर ५७ वर्षीय गलतान सिंह यांचं निधन झालं. गलतान सिंह हे बागपत जिल्ह्यातील नांगल भावनपूर येथील रहिवासी होते.

वाचा : नेहा पेंडसे आता अनिता भाभीच्या रुपात; ‘भाभी जी घर पर हैं’ मध्ये लवकरच होणार एण्ट्री

दरम्यान, २ जानेवारीपर्यंत ५३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं. यात २० शेतकऱ्यांचा पंजाबमध्ये, तर ३३ जणांचा दिल्लीच्या सीमेवर मृत्यू झाला. यात काहींनी आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. तर, काही जणांचे कडाक्याच्या थंडीने प्राण गेल्याचं सांगण्यात येत आहे.