भारतीय शास्त्रीय संगीताची अनुभूती देणाऱ्या ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज पुण्यात सुरुवात झाली. भारतीय संस्कृतीमध्ये शुभकार्याचा प्रारंभ मंगल वाद्याच्या वादनाने करण्याची प्रथा आहे. त्यामुळेच मधुकर धुमाळ यांच्या सनई वादनाने सुरेल स्वर यज्ञास प्रारंभ झाला असून भीमपलास रागाच्या सुरावटींनी त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. ओंकार धुमाळ आणि विजय डेलबन्सी यांनी सनईवर, तर भरत कामत यांनी तबल्यावर धुमाळ यांना साथसंगत दिली.

त्यानंतर मूळचे दिल्लीचे आणि सध्या इंग्लंड येथे वास्तव्यास असलेले व पं. भीमसेन जोशी यांचे मार्गदर्शन लाभलेले डॉ. विजय राजपूत यांचे गायन झाले. राजपूत यांनी सादर केलेल्या ‘मोरे कान्हा जो आए पलटके’ या पिलू रागातील‘होरी’ने रसिकांची विशेष दाद मिळवली. ‘रघुवर तुमको मेरी लाज’ या भजनाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. अविनाश दिघे (हार्मोनियम), रवींद्रकुमार सोहोनी (तबला), प्रो. डेव्हिड क्लार्क (तानपुरा व गायन), सुनील रावत (तानपुरा), वसंत गरुड (टाळ) यांनी त्यांना साथ दिली.

त्यानंतर कोलकाताचे देबाशिष भट्टाचार्य यांचे चतुरंगी (स्लाईड गिटार) वादन झाले. भट्टाचार्य हे अजय चक्रवर्ती आणि पं. ब्रिजभूषण काब्रा यांचे शिष्य आहेत. सतार, सरोद, सारंगी आणि गिटार या चतुरंगी वादनाला शुभाशिष भट्टाचार्य (तबला) आणि अखिलेश गुंदेचा (पखावज) यांनी साथ दिली. आगामी चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दिग्गजांबरोबरच उदयोन्मुख कलाकार आपली कला सादर करतील. यंदा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त २८ कलाकार सहभागी झाले आहेत.